‘मी पंतप्रधान होण्याचे स्वप्न पाहत नाही. गुजरातच्या जनतेने मला गुजरातच्या भल्यासाठी निवडून दिले आहे. तेव्हा मी २०१७ सालापर्यंत गुजरातचा मुख्यमंत्री म्हणूनच काम करीत राहणार आहे, असे नरेन्द्र मोदी यांनी आठ-दहा दिवसांपूर्वी सांगितले होते. पण भाजपने पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून त्यांचे नाव जाहीर केल्यापासून ते पंतप्रधान झाल्याच्याच आविर्भावात वागत आहेत. जर त्यांना गुजरातचे मुख्यमंत्री म्हणूनच काम करावयाचे आहे तर मग त्यांनी पंतप्रधानपदाचे उमेदवार होण्यास नकार का नाही दिला? कारण उघड आहे. देशाचा पंतप्रधान होणे हीच तर त्यांची महत्त्वाकांक्षा आहे. पण संधिसाधू नसेल तर तो राजकारणी कसला? मोदीही याला अपवाद नाहीत. मोदी म्हणजे ‘डिसायसिव्ह’ (निश्चयात्मक), ‘डायनॅमिक’ (गतिमान) आणि ‘डेव्हलपमेंट’ (विकास) या तीन गुणांचे थ्री-डी व्यक्तिमत्त्व आहे, असा वेंकय्या नायडू यांनी त्यांचा गौरव केला आहे. पण प्रत्यक्षात त्यांच्यात वरील तीन गुणच आहेत की ‘डिसेप्टिव्ह’ (फसव्या), ‘डेडली’ (मारक) आणि ‘डिस्ट्रक्टिव्ह’ (विध्वंसक) हे तीन (दु)र्गुणही आहेत? कृषिमंत्री शरद पवार यांनी मोदींचे ‘उतावळा नवरा गुडघ्याला बािशग’ असे जे वर्णन केले आहे ते या संदर्भात अगदी चपखल बसते.
अनिल रा. तोरणे,  तळेगाव दाभाडे

तज्ज्ञांचे क्रांतिकारी विचार सेवानिवृत्तीनंतरच..
‘ज्ञान बनो कर्मशील, कर्म ज्ञानवान’ हा आपला उत्कृष्ट अग्रलेख       (१८ सप्टेंबर) वाचला. शिक्षण क्षेत्रात आपण जागतिक पातळीवर मागासलेले आहोत आणि तरीही आपण महाशक्ती होण्याचा निर्धार करतो आहोत हा मोठा विरोधाभास आहे.
आपण या अग्रलेखात निगवेकर समितीच्या अहवालाचा उल्लेख केला आहे. आपल्याकडे तज्ज्ञ मंडळी दुर्दैवाने सेवानिवृत्तीनंतर क्रांतिकारी विचार मांडतात असे दिसते. डॉ. निगवेकर हे स्वत: पुणे विद्यापीठाचे कुलगुरू, एनसीएचे  प्रमुख आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष होते. त्यांच्या अधिकाराच्या काळात ते सुचवत असलेले बदल हे त्यांना करता येणे शक्य होते. पण ही पदे भूषवताना त्यांनी उच्चशिक्षणात दर्जेदार अध्यापन, संशोधन आणल्याचे दिसत नाही. परदेशात उपकेंद्र काढणे ही सूचना तर जिल्हापातळीवर न चमकणाऱ्या खेळाडूला राष्ट्रकुल स्पध्रेत भाग घ्यायला लावण्यासारखे आहे.  कागदावर आकर्षक दिसणाऱ्या सूचना, प्रत्यक्ष काम करताना किती कवडीमोल ठरतात याचा प्रत्यय आपण अनेक वेळा घेतला आहे. या समितीचा अहवाल हेही असे दु:स्वप्न न ठरो!
 -सौमित्र राणे, पुणे

गुंतस का, कुंथस का?
लालबागच्या राजाच्या मंडपात भाविकांना धक्काबुक्की, कार्यकर्त्यांची मुजोरी या बातम्या (१७ व १८ सप्टेंबर) वाचल्या. वाहिन्यांवरून त्याचे दर्शन गेले काही दिवस घडत आहे. राजाच्या दर्शनासाठी १८ तास रांगेत ताटकळत उभे राहिलेल्या भाविकांना कार्यकर्त्यांकडून धक्काबुक्की होणे ही बाब िनद्य असून, अरेरावीला लगाम घालणे अत्यावश्यक आहे याबद्दल दुमत नाही .
मुंबईकर सर्वसामान्यांना रेल्वे, बस तिकिटांच्या लांब रांगेत ताटकळत उभे राहण्याची सवय असल्याने राजाच्या मंडपात दर्शनासाठी उभे राहताना त्याला काहीच वाटत नाही. कोणत्याही देवाची, देवीची नवसाला पावणारा, हाकेला धावणारा अशी जोरदार जाहिरात केली, सेलिब्रेटी दर्शनाला आले की आपसूकच देव, उत्सव अधिकाधिक मोठा होत जातो. भाविकांच्या मोठय़ा रांगाही वाढतच जातात. हे पद्धतशीर धूर्त मार्केटिंग आहे.  अठरा तास ताटकळत होतो पण गणरायाच्या चरणापर्यंत पोचताच आले नाही, कार्यकर्त्यांनी ढकलून दिले म्हणून तक्रार करणाऱ्यांनी तेथे जाण्याआगोदर हे अनेक वर्षांचे यशस्वी झालेले मार्केटिंग लक्षात घेतले नाही. स्वत:चा अमूल्य वेळ खर्च करून, त्रास सहन करून ते तेथे गेले ही चूक त्यांचीही नव्हे का? कार्यकर्त्यांच्या उद्दाम वर्तनाचे येथे समर्थन नाही.
गणराय हे कोकणातील अनेकांचे आराध्य दैवत. नाही ते करू नये आणि केले तर कुंथू नये, या अर्थाची ‘गुंतस का, कुंथस का’ अशी म्हण कोकणात आहे. श्रद्धेचा हा प्रतिवर्षी वाढता बाजार, भाविकांच्या लांबच लांब रांगा, त्यांचे होणारे हाल आणि संपलेली सहनशक्ती पाहून ही म्हण आठवते.
रजनी देवधर, ठाणे</strong>

आता तरी डोळे उघडा!
‘लालबागच्या कार्यकर्त्यांची मुजोरी सुरूच, उपनिरीक्षकापाठोपाठ महिला पोलिसालाही मारहाण’ ही बातमी  वाचली. सामान्य नागरिक अंधश्रद्धेच्या मागे कसे फरफटत जातात याचे हे विदारक उदाहरण आहे. कुठलाही गणपती, देव किंवा देवी नवसाला पावतो ही धादांत खोटी बातमी पसरवली जाते आणि त्याचे मार्केटिंग केले जाते. त्याला पापभिरू बळी पडतात आणि गल्लाभरू त्याचा फायदा उठवतात. रस्त्याच्या बाजूला जुगाराचा खेळ मांडून बसलेल्यांच्या बाजूला त्यांच्याच माणसांचे कोंडाळे उभे असते व त्यांना जिंकवण्याचे डाव प्रारंभी मांडले जातात. ते बघून पापभिरू अधिक पसा मिळेल या भावनेने त्यावर डाव लावतो व सगळे पसे हरून बसतो. कुठेही तक्रार करून काहीही फायदा नसतो, कारण त्यामध्ये पोलीसही सहभागी असतात. म्हणून तर भर रस्त्यात ते लोकांना लुबाडण्याचे काम सगळ्यांदेखत करत असतात. त्यातलाच हा तथाकथित राजांचा प्रकार आहे. नवसाला पावणारे देव हे आधुनिक मंत्र्यांसारखे असतात. त्यांना समाजाशी काहीही घेणेदेणे नसते.
मला काय मिळणार असेल, तरच मी तुझे काम करीन या वृत्तीचे असतात. गरिबांनी किंवा सामान्य नागरिकांनी किमान आपला आत्मसन्मान तरी अबाधित राखला जाईल एवढे तरी प्रयत्न करावेत. लालबागच्या राजा मंडळानेच तुमची प्रतिष्ठा धुळीला मिळवली आहे. लहान मुले, महिला, वृद्ध यांना बखोटीला धरून बाहेर काढून तुमची जागा तुम्हाला दाखवून दिली आहे. मंत्र्यांना शाल, श्रीफळ, सेलिब्रेटींना विशेष आदराची वागवणूक देऊन ‘लालबागच्या राजा’ने मी तुमच्यासाठी नाही, तर फक्त आणि फक्त यांच्यासाठीच आहे हे साधार दाखवून दिले आहे. म्हणून या सामान्य पापभिरू लोकांना  विनंती आहे, आता तरी डोळे उघडा. हे मंत्री आणि देव तुमचे काहीही भले करणार नाहीत. उगाच त्यांच्यामागे फरफटत जाऊन आपला आत्मसन्मान पायदळी तुडवू देऊ नका.
अनिरुद्ध गणेश बर्वे, कल्याण</strong>

अन्नधान्याची नासाडी
जगभरात प्रति वर्षी उत्पादित झालेल्या अन्नधान्यापकी एक तृतीयांश अन्नधान्य चक्क वाया जाते.
 या नासाडीमुळे जागतिक अर्थव्यवस्थेची प्रति वर्षी सुमारे ५० सहस्र कोटी रुपयांची हानी होते. दुसरीकडे जगात प्रति दिन ८७ कोटी नागरिक उपाशीपोटी झोपत आहेत. विकासाच्या नवनव्या पायऱ्या पादाक्रांत करत निघालेल्या आधुनिक जगातील हे विरोधाभासाचे चित्र आहे.
 विकसित देशांमध्ये ग्राहक आवश्यकतेपेक्षा किती तरी अधिक अन्नधान्य खरेदी करतात आणि खाल्ले न जाणारे अन्नधान्य फेकून देतात.
माधुरी तडवळकर, हडपसर

आपण तक्रार का करायची?
गणेशोत्सवातील ध्वनिप्रदूषण, ओंगळ नाचगाणी, डीजेच्या भेसूर कर्कश िभती याबद्दल आपले अनेक जण तक्रार करतात.  आपल्यापकी अनेकांना हे आवडत नाही, पण आपण हा विचार करत नाही की, याचे प्रमाण तीन टक्क्य़ांपेक्षाही जास्त निघणार नाही. बहुसंख्य गरीब, मध्यमवर्गीय, कनिष्ठ मध्यमवर्गीय, कामगार यांना हा उत्सव असाच साजरा करायला आवडतो. त्यासाठी ते डोळ्यांत प्राण आणून या दिवसांची वाट बघत असतात. वाचन, संगीत, व्याख्यान या आपली आवडी, तर जोरजोरात गाणी, नृत्य, दिव्यांचा झगमगाट याचे त्यांना आकर्षण. आता बहुसंख्य जनतेला जे हवे ते कायद्याच्या कक्षेत होत असेल, तर आपण तक्रार का करायची? आपली ती अभिरुची आणि त्यांचा तो सवंगपणा हे कोणी ठरवायचे? रात्रभर चालणारा सवाई गंधर्व आपल्याला चालतो (आता वेळेचे बंधन आले आहे.) तेव्हा तेथील शेजाऱ्यांना हा गोंगाट वाटतो.  आपल्याला अपेक्षित असलेली तथाकथित अभिरुची वाढवण्याची आपण या मंडळींना कधी संधीच दिली नाही.
– शुभा परांजपे, पुणे