18 February 2019

News Flash

अंदाज आपला आपला

देशातील एका खासगी कंपनीने हवामान खात्याचा मान्सूनविषयीचा अंदाज चुकीचा असल्याचे म्हटले असून यंदाचा पावसाळा नेहमीसारखाच राहणार असे भाकीत वर्तविले आहे.

| June 5, 2015 02:52 am

देशातील एका खासगी कंपनीने हवामान खात्याचा मान्सूनविषयीचा अंदाज चुकीचा असल्याचे म्हटले असून यंदाचा पावसाळा नेहमीसारखाच राहणार असे भाकीत वर्तविले आहे.  हवामानाचा अंदाज अप्रत्यक्षरीत्या अर्थव्यवस्थेशी निगडित असल्याने तो कोणी, कधी आणि कसा जाहीर करावा याबाबतही काही नियमन करणे आवश्यक वाटते.
अर्थतज्ज्ञांचे एक वर्णन भूतकाळाचे अचूक भविष्य वर्तवणारा असे केले जाते. याचा अर्थ ते घडून गेलेल्याचेच भाकीत वर्तवतात, असा आहे. काही प्रमाणात हे वर्णन आपल्या हवामान खात्यासही लागू पडते. अकाली पावसाने दणका दिल्यानंतर आपले हवामान खाते कमी दाबाच्या पट्टय़ामुळे हे झाले असे सांगते. हा कमी दाबाचा पट्टा हाहाकार व्हायच्या आधी त्यांना का दिसत नाही, असा प्रश्न त्यावर पडू शकतो. मध्यंतरीच्या काळात दिवंगत वसंतराव गोवारीकर यांनी हवामान अंदाजाची काही नवी प्रारूपे वापरण्यास सुरुवात केल्यानंतर काही काळ परिस्थितीत सुधारणा झाली होती. आपल्या हवामान खात्याचे अंदाज अचूक नाही तरी योग्य ठरू लागले होते. परंतु नंतर पुन्हा या खात्याचा गाडा घसरला. अर्थात परिस्थिती एके काळी होती तितकी गंभीर नाही, हे मान्य करणे गरजेचे आहे. दिवंगत गोवारीकर यांनी यात लक्ष घालेपर्यंत हवामान खात्याचे अंदाज हे विनोदासाठी वापरले जात. म्हणजे, तुफान पावसाची शक्यता हवामान खाते वर्तवीत असेल तर मंडळी नििश्चतपणे छत्री न घेता बाहेर पडत. कारण या अंदाजाच्या चुकण्याचीच खात्री त्या वेळी अधिक होती. पुढे अर्थातच त्यात बरीच सुधारणा झाली. २०१३ साली दक्षिण किनारपट्टीवर आदळलेल्या फलिन चक्रीवादळास हाताळण्यात भारतीय हवामान खात्याने बऱ्यापकी चापल्य दाखवले होते. पण त्याही वेळी हे वादळ भारताच्या दिशेने घोंघावू पाहत असल्याचा पहिला इशारा जपानच्या हवामान खात्याने दिला होता आणि पुढे त्यांच्या सातत्यपूर्ण निरीक्षणाची जबाबदारी अमेरिकेच्या हवामान खात्याने सांभाळली होती. हे वादळ अंदाज वर्तवल्याप्रमाणे भारतीय किनारपट्टीवर नुकसान करून गेले. या हाहाकाराची शक्यता हवामान खात्याने आधीच वर्तवलेली असल्याने आपण सतर्क होतो. परिणामी त्यामुळे अधिक नुकसानही टाळता आले. त्यानंतर सध्याच्या संभाव्य दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर हवामान खात्याची भूमिका आणि परिणामकारकता यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
  याचे कारण आगामी काळात दुष्काळ वा सदृश परिस्थिती याबाबत भाकीत वर्तवण्यात त्यांनी केलेली दिरंगाई. आपल्याकडची प्रथा ही की हवामान खाते ३० एप्रिल या दिवशी पर्जन्यमानाचा पहिला अधिकृत अंदाज वर्तवते. तो याही वर्षी व्यक्त झाला. परंतु त्या आधी केंद्रीय पातळीवर यंदाचा पावसाळा किती उत्तम असणार आहे याचे चित्र रंगवण्याचा प्रयत्न झाला. त्यात हवामान खात्याचा वाटा किती हे कळावयास मार्ग नाही. तो असेल तर ते अयोग्यच. पण तो नाही असे गृहीत धरले तरी हवामान खात्याने त्या नंतरच्या वार्षकि अंदाजात ही शक्यता वर्तवणे गरजेचे होते. या संदर्भात सरकारचे स्पष्टीकरण असे की आम्ही योग्य वेळी ते सांगणारच होतो. परंतु ही योग्य वेळ कोणासाठी, ती कोण ठरवणार, या प्रश्नांचे प्रयोजन म्हणजे कोणत्याही सरकारला दुष्काळाचा अंदाज वर्तवला जात असेल तर ते आवडत नाही. हे असे भाकीत सरकारसाठी अडचणीचे असते. त्यात नवे कोरे सरकार आपल्या पहिल्यावहिल्या वर्धापन दिन सोहळ्याच्या आनंदात असताना त्यावर अवर्षणाचे विरजण पाडणे हे विद्यमान वातावरणात सुरळीत सेवाकालाच्या आड येणारे असेल हे नि:संशय. हे आताच घडले असे नाही. राजीव गांधी पंतप्रधानपदी असताना त्यांनीदेखील अप्रिय हवामान अंदाज प्रसृत होणे लांबवले होते. हे असे करणे तेव्हा तर चूक होते आणि आता तर ते अधिकच अयोग्य आणि हास्यास्पद आहे. याचे कारण तंत्रज्ञानाचा झालेला प्रसार. दिवंगत गांधी यांच्या वेळी इंटरनेट नव्हते. ते आता बहरात आहे. त्यामुळे हवामानाचा अंदाज वर्तवण्याचे काम करणारी किमान डझनभर संकेतस्थळे सध्या महाजालात जोमाने पाहिली जातात. त्यामुळे आपल्या हवामान खात्याने दुष्काळाचे कोंबडे झाकायचा प्रयत्न केला तरी ते तसे होण्याची यित्कचितही शक्यता नाही. ते लगेचच दिसून आले. आपले हवामान खाते बऱ्या पावसाची शक्यता वर्तवत असताना ऑस्ट्रेलियाच्या हवामान खात्याने भारतात सणसणीत दुष्काळाची शक्यता वर्तवली. प्रशांत महासागराच्या तळाशी तयार होणारा एल निनो नावाचा गरम पाण्याचा प्रवाह कार्यान्वित झाला असून तसे झाल्यास या उपखंडातील पर्जन्यमानासाठी ते धोक्याचे असते. याचे कारण या गरम प्रवाहामुळे समुद्राच्या बाष्पीभवन प्रक्रियेवर परिणाम होतो आणि त्यामुळे पाणी वाहून नेऊ शकणारे ढग पुरेशा प्रमाणात तयार होत नाहीत आणि एकंदर पर्जन्यमान आकसते. प्रशांत सागरातील हा गरम पाण्याचा प्रवाह यंदाही जाणवत असून त्यामुळे भारतावर अवर्षणाचे संकट ओढवेल असे ऑस्ट्रेलियाच्या हवामान खात्याचे म्हणणे. यात पंचाईत म्हणजे एल निनो आणि त्याचे संभाव्य परिणाम याविषयी आपल्याही हवाई खात्याचे दुमत नाही. परंतु तरीही मुद्दा हा की आपल्या हवामान खात्याने ही बाब गुलदस्त्यात ठेवली. ऑस्ट्रेलियाच्या हवामान खात्याने त्याबाबत वाच्यता केल्यानंतर ही दुष्काळाची शक्यता आपल्यालाही मान्य करावी लागली. तीमुळे आता सगळेच धास्तावले आहेत. गेले तीन दिवस भांडवली बाजार मोठय़ा प्रमाणावर आपटी खात असून त्याचे कारण या दुष्काळाच्या शक्यतेत आहे. औद्योगिक आघाडीवर मंदीसदृश स्थिती आणि शेतीतही नन्नाचा पाढा असे दुहेरी संकट त्यामुळे आपल्यावर चालून येताना दिसते. गेल्या तीन दिवसांच्या वातावरणातून या संकटासाठी नागरिकांची मानसिक तयारी होत असताना एक नवीनच वळण त्यास मिळताना दिसते.
ते म्हणजे स्कायमेट या कंपनीने वर्तवलेला हवामानाचा भलताच अंदाज. स्कायमेट ही या उद्योगात पडलेली भारतातील पहिली खासगी कंपनी. इतके दिवस हवामानाचा अंदाज वर्तवणे ही सरकारी मक्तेदारी होती. स्कायमेटच्या रूपाने खासगी उद्योगांचे या क्षेत्रातही पदार्पण झाले असे मानता येईल. आपल्याकडील काही बलाढय़ उद्योगसमूह आणि विविध वृत्तवाहिन्या आदींना या स्कायमेटच्या वतीने हवामानाचे अंदाज पुरवले जातात. दूरदर्शनचा अपवाद वगळता जवळपास सर्वच खासगी वाहिन्या स्कायमेटच्या ग्राहक आहेत. या कंपनीने भारतीय हवामान खात्याचा अंदाज चुकीचा असल्याचे म्हटले असून यंदाचा पावसाळा अगदी नेहमीसारखाच असेल असे भाकीत वर्तवले आहे. या कंपनीचे म्हणणे असे की एल निनो हा जर सलग दोन वष्रे वाहत असेल तर त्याच्यामुळे अवर्षणाची शक्यता फक्त पहिल्या वर्षीच असते, दुसऱ्या वर्षी त्याचा परिणाम राहत नाही. एल निनो जिवंत असण्याचे हे सलग दुसरे वर्ष. त्यामुळे यंदा या गरम प्रवाहाचा परिणाम राहणार नाही, असे छातीठोकपणे ही कंपनी सांगते. गेल्या १४० वर्षांच्या इतिहासात सलग दुसऱ्या वर्षीही दुष्काळ फक्त चार वेळा पडला. तेव्हा केवळ एल निनो जिवंत आहे, म्हणून दुष्काळ पडणारच असे मानणे अयोग्य असल्याचा युक्तिवाद या कंपनीने केला आहे. भारतीय हवामान खात्याच्या तुलनेत ही कंपनी फक्त १२ वर्षांची. परंतु तरीही आपली प्रारूपे ही सरकारी हवामान खात्यापेक्षा अधिक भरवशाची आहेत, असे ही कंपनी सांगते.
अशा तऱ्हेने खासगी आणि सरकारी क्षेत्रातील मतभेदाचे सावट हवामान खात्यावरही पडले असून केवळ दुष्काळ नसेल या शक्यतेमुळे यात खासगी क्षेत्राचा अंदाज बरोबर ठरो, अशीच प्रार्थना अनेक जण करतील. परंतु या निमित्ताने हवामानाचा अंदाज कोणी, कधी आणि कसा व्यक्त करावा याबाबतही काही नियमनाचा विचार व्हावा. तसा तो केल्यास भारतीय हवामान खात्यास अधिक स्वातंत्र्य देण्याची गरज जाणवेल. ते दिले जावे अन्यथा हा अंदाज आपला आपला खेळ असाच सुरू राहील.

First Published on June 5, 2015 2:52 am

Web Title: monsoon forecast imd vs skymet
टॅग Monsoon