समाजशास्त्रज्ञाने हस्तिदंती मनोऱ्यात राहू नये म्हणजे काय करावे, याचे एक उत्तम उदाहरण एम एस एस पांडियन यांनी १९८८ सालच्या सुरुवातीस घालून दिले होते..  ‘वरदाभाई’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुंड-स्मगलराला मुंबईतील गरीब दाक्षिणात्य रहिवाशांनी कसे देवमाणूस मानले आणि सामाजिक प्रतिष्ठाही मिळवून दिली, याबद्दलचे विश्लेषण- तेही ‘ईपीडब्ल्यू’ (इकॉनॉमिक अँड पोलिटिकल वीकली) सारख्या गंभीर नियतकालिकात- पांडियन यांनी केले होते. मुंबई बकाल नसती, तर वरदराजन मुदलियारला प्रतिष्ठा मिळालीच नसती. वरदाभाईने श्रीलंकेतील तामिळांवर होणाऱ्या अत्याचारांविरुद्ध १९८३ साली मोठा मोर्चा काढून मुंबईत द्राविडी अस्मितेचे राजकारण सुरू केले, या साऱ्याचे कारण मुंबईत पुरेशा नागरी सुविधा नसताना न रोखता येणारा लोकसंख्येचा भार, असे पांडियन यांनी वयाच्या ३१व्या वर्षी केलेले विश्लेषण होते.
हे पांडियन वयाच्या अवघ्या ५७व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने सोमवारी दिल्लीत कालवश झाले. मूळचे ते चेन्नईचे, पण २००९ पासून दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात प्राध्यापक होते. चेन्नईच्या ज्या ‘मद्रास इन्स्टिटय़ूट ऑफ डेव्हलपमेंट स्टडीज’मध्ये पांडियन यांनी १९८९ पासून पुढली २० वर्षे सहायक प्राध्यापक म्हणून काम केले होते, तेथेच त्यांच्या सहचरी डॉ. एस. आनंदी शिकवतात. १९५७ साली जन्मलेले पांडियन नागरकोईलच्या महाविद्यालयातून १९७८ मध्ये बीए पदवी घेऊन मद्रास विद्यापीठातून १९८० मध्ये एमए झाले; तर १९८७ मध्ये त्यांनी सामाजिक इतिहास शाखेतून पीएच.डी. प्राप्त केली. सन १८८० ते १९३९ मध्ये शेती-अर्थव्यवस्थेत घडलेल्या बदलांची राजकीय कारणे, हा त्यांच्या संशोधनाचा विषय होता. नंतर १९९२ मध्ये ‘द इमेज ट्रॅप : एम जी रामचंद्रन इन फिल्म्स अँड पॉलिटिक्स’ या पुस्तकाने त्यांच्यातील ‘संशोधनाची धमक आणि निधडेपण’ याचे दर्शन घडविले. ‘सबाल्टर्न स्टडीज’ अथवा लोकांच्या, सर्वहारांच्या दृष्टिकोनातून सामाजिक इतिहासलेखन करण्याची अभ्यासदिशा रणजित गुहा आणि एरिक स्टोक्स यांनी १९८०च्या दशकात स्पष्ट केली होतीच, परंतु या दिशेने पुढे जाऊन सामाजिक अंगाने समकालीन इतिहासलेखनाचे तंत्र विकसित करणाऱ्या विद्वानांत पांडियन यांचे नाव अत्यंत आदराने घेतले जाते. द्रविड अस्मितेत जातिआधारित उप-अस्मितांनी जो घोळ घातला व त्यातून तामिळनाडूचे जे आक्रस्ताळी राजकारण आजही दिसते, त्याचा मागोवा घेणारे ‘ब्राह्मीन अँड नॉनब्राह्मीन : जीनिऑलॉजीज ऑफ द तामिळ पोलिटिकल प्रेझेंट’ हे पुस्तकही पांडियन यांचेच. मोदींच्या आणि हिटलरच्या उदयकाळी मध्यमवर्गाचे विचार कसे होते  याबद्दलचा जून २०१४ मधील त्यांचा लेखही खूप  गाजला.