राज्यात कोणत्याही क्षणी विधानसभेच्या निवडणुका जाहीर होतील. ‘मतदार राजा’ला सुखस्वप्ने दाखविण्याची आणि त्यांची पूर्तता ‘करून दाखविण्या’ची स्पर्धा आता सुरू होईल. नवनव्या संकल्पना जन्माला येतील आणि श्रेयाच्या लढायादेखील सुरू होतील. ‘सुंदर मुंबई’चे स्वप्न नागरिकांच्या मनात फुलविण्याचे अनेक प्रयत्न आजवर राजकीय पक्षांनी केले. महापौरपदावर आरूढ झाल्यानंतर मुंबईकरांना नवे स्वप्न दाखविण्याच्या प्रथेनुसार आजवर असंख्य घोषणा झाल्या आणि बघताबघता त्यांचे ‘राजकीयीकरण’ही झाले. मुंबई मात्र दिवसागणिक बकाल आणि अस्ताव्यस्तच होत गेली.  ‘मुंबईचे शांघाय होणे शक्य नाही’, अशी प्रामाणिक कबुली स्वत: मुख्यमंत्र्यांनीच दिल्यानंतर आता आपापल्या पोतडीतील स्वप्ने बाहेर काढण्यासाठी विरोधकांमध्ये जुंपली आहे. बकाल झोपडपट्टय़ा, अनारोग्यकारी डंपिंग ग्राउंड्स, अस्वच्छ नाले आणि तुंबलेली गटारे हे मुंबईचे खरे रूप आहे. ते रूप पुसले पाहिजे, ही प्रत्येकाचीच इच्छा असली तरी त्या कर्तबगारीचे राजकीय श्रेय घेण्याचा मुद्दा येतो तेव्हा मात्र एकमेकांच्यात जुंपते आणि वास्तव रूपातील मुंबई उदासपणे विकासाची प्रतीक्षा करीत पुढे जात राहते, हेच मुंबईचे प्राक्तन आहे. भांडुप येथील मिठागराच्या जागेवरील थीम पार्क हे याच वास्तवाचे उदाहरण ठरले आहे. वस्तुत: मिठागराच्या ओसाड जमिनींचा विकास केला तर मुंबईच्या अनेक समस्या सुटतील याबाबत सर्वाचेच एकमत आहे. मुंबईच्या शहर भागात गेल्या काही वर्षांत एवढा झगमगाटी विकास सुरू आहे की त्याकडे पाहताना दिवसागणिक डोळे विस्फारले जातात, आणि आश्चर्यातिरेकाने आ वासला जातो. या तुलनेत उपनगरांचा, विशेषत: पूर्व उपनगरांचा विकास मात्र रडतखडतच सुरू आहे. भांडुप हे असेच एक दुर्दैवी उपनगर म्हणावे लागेल. या उपनगराच्या विकासाच्या स्वप्नांसमोर राजकारणाचेच अडसर उभे असतात. आताही तसेच झाले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार मंगेश सांगळे यांच्या संकल्पनेतून येथील भांडुपेश्वर कुंडाच्या परिसरातील सुमारे २० हजार चौरस मीटरच्या जागेत अत्याधुनिक ‘संकल्पना उद्यान’ तयार होणार असे जाहीर झाले आणि खळबळ उडाली. वस्तुत: विकास हेच साऱ्या राजकीय पक्षांचे समान ध्येय असतानादेखील विकास करून दाखविण्याची मक्तेदारी कुणाची या मुद्दय़ावरूनही एखादा प्रकल्प वादाच्या वलयांत सापडतो, तसेच या संकल्पना उद्यानाचे झाले. मिठागराच्या भकास जमिनींवर सुंदर संकल्पना उद्यान आकाराला आलेच, तर या उपनगराचीच शोभा वाढणार आहे; अन्यथा रातोरात उभ्या राहणाऱ्या बकाल झोपडपट्टय़ा छाताडावर झेलत या जमिनी वर्षांनुवर्षे विकासाची वाट पाहत रखडलेल्या आहेतच. तरीही सत्ताधारी शिवसेनेचा कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून या जमिनीवर एक संकल्पना उद्यान होणार याची कुणकुण लागताच, परवानगीच्या मुद्दय़ावरून त्यात अडथळे सुरू झाले. विकासाची आस असलेल्या कुणीही राजकारण विसरून विकासाच्या चांगल्या संकल्पनेचे स्वागत केले, तर त्याचा समाजातही आदर केला जातो. या संकल्पना उद्यानाबाबत असे झाले असते, तर कुरघोडीविरहित राजकारणाचा एक आगळा पायंडा पडला असता. श्रेयाचे राजकारण विसरून विकासाचे राजकारण झाले तर त्याचा ठसा अधिक ठळक असतो. भांडुपच्या  या उद्यानाचे नशीब तेवढे बलवत्तर दिसत नाही. शिवसेनेच्या थीम पार्कच्या अगोदर मनसेचे थीम पार्क उभे राहणार, अशा चर्चेची वावटळ उठते, आणि विकासाच्या एका दृश्य टप्प्यावर त्याचा पडदा दाटून राहतो, हे दुर्दैवी आहे. निवडणुकीच्या तोंडावर जनतेची सुखस्वप्ने पूर्ण होणार की राजकारणाच्या झळा बसून ती करपून जाणार, याचा विचार करण्याची वेळ आली आहे! राज्यात कोणत्याही क्षणी विधानसभेच्या निवडणुका जाहीर होतील. ‘मतदार राजा’ला सुखस्वप्ने दाखविण्याची आणि त्यांची पूर्तता ‘करून दाखविण्या’ची स्पर्धा आता सुरू होईल. नवनव्या संकल्पना जन्माला येतील आणि श्रेयाच्या लढायादेखील सुरू होतील. ‘सुंदर मुंबई’चे स्वप्न नागरिकांच्या मनात फुलविण्याचे अनेक प्रयत्न आजवर राजकीय पक्षांनी केले. महापौरपदावर आरूढ झाल्यानंतर मुंबईकरांना नवे स्वप्न दाखविण्याच्या प्रथेनुसार आजवर असंख्य घोषणा झाल्या आणि बघताबघता त्यांचे ‘राजकीयीकरण’ही झाले. मुंबई मात्र दिवसागणिक बकाल आणि अस्ताव्यस्तच होत गेली.  ‘मुंबईचे शांघाय होणे शक्य नाही’, अशी प्रामाणिक कबुली स्वत: मुख्यमंत्र्यांनीच दिल्यानंतर आता आपापल्या पोतडीतील स्वप्ने बाहेर काढण्यासाठी विरोधकांमध्ये जुंपली आहे. बकाल झोपडपट्टय़ा, अनारोग्यकारी डंपिंग ग्राउंड्स, अस्वच्छ नाले आणि तुंबलेली गटारे हे मुंबईचे खरे रूप आहे. ते रूप पुसले पाहिजे, ही प्रत्येकाचीच इच्छा असली तरी त्या कर्तबगारीचे राजकीय श्रेय घेण्याचा मुद्दा येतो तेव्हा मात्र एकमेकांच्यात जुंपते आणि वास्तव रूपातील मुंबई उदासपणे विकासाची प्रतीक्षा करीत पुढे जात राहते, हेच मुंबईचे प्राक्तन आहे. भांडुप येथील मिठागराच्या जागेवरील थीम पार्क हे याच वास्तवाचे उदाहरण ठरले आहे. वस्तुत: मिठागराच्या ओसाड जमिनींचा विकास केला तर मुंबईच्या अनेक समस्या सुटतील याबाबत सर्वाचेच एकमत आहे. मुंबईच्या शहर भागात गेल्या काही वर्षांत एवढा झगमगाटी विकास सुरू आहे की त्याकडे पाहताना दिवसागणिक डोळे विस्फारले जातात, आणि आश्चर्यातिरेकाने आ वासला जातो. या तुलनेत उपनगरांचा, विशेषत: पूर्व उपनगरांचा विकास मात्र रडतखडतच सुरू आहे. भांडुप हे असेच एक दुर्दैवी उपनगर म्हणावे लागेल. या उपनगराच्या विकासाच्या स्वप्नांसमोर राजकारणाचेच अडसर उभे असतात. आताही तसेच झाले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार मंगेश सांगळे यांच्या संकल्पनेतून येथील भांडुपेश्वर कुंडाच्या परिसरातील सुमारे २० हजार चौरस मीटरच्या जागेत अत्याधुनिक ‘संकल्पना उद्यान’ तयार होणार असे जाहीर झाले आणि खळबळ उडाली. वस्तुत: विकास हेच साऱ्या राजकीय पक्षांचे समान ध्येय असतानादेखील विकास करून दाखविण्याची मक्तेदारी कुणाची या मुद्दय़ावरूनही एखादा प्रकल्प वादाच्या वलयांत सापडतो, तसेच या संकल्पना उद्यानाचे झाले. मिठागराच्या भकास जमिनींवर सुंदर संकल्पना उद्यान आकाराला आलेच, तर या उपनगराचीच शोभा वाढणार आहे; अन्यथा रातोरात उभ्या राहणाऱ्या बकाल झोपडपट्टय़ा छाताडावर झेलत या जमिनी वर्षांनुवर्षे विकासाची वाट पाहत रखडलेल्या आहेतच. तरीही सत्ताधारी शिवसेनेचा कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून या जमिनीवर एक संकल्पना उद्यान होणार याची कुणकुण लागताच, परवानगीच्या मुद्दय़ावरून त्यात अडथळे सुरू झाले. विकासाची आस असलेल्या कुणीही राजकारण विसरून विकासाच्या चांगल्या संकल्पनेचे स्वागत केले, तर त्याचा समाजातही आदर केला जातो. या संकल्पना उद्यानाबाबत असे झाले असते, तर कुरघोडीविरहित राजकारणाचा एक आगळा पायंडा पडला असता. श्रेयाचे राजकारण विसरून विकासाचे राजकारण झाले तर त्याचा ठसा अधिक ठळक असतो. भांडुपच्या  या उद्यानाचे नशीब तेवढे बलवत्तर दिसत नाही. शिवसेनेच्या थीम पार्कच्या अगोदर मनसेचे थीम पार्क उभे राहणार, अशा चर्चेची वावटळ उठते, आणि विकासाच्या एका दृश्य टप्प्यावर त्याचा पडदा दाटून राहतो, हे दुर्दैवी आहे. निवडणुकीच्या तोंडावर जनतेची सुखस्वप्ने पूर्ण होणार की राजकारणाच्या झळा बसून ती करपून जाणार, याचा विचार करण्याची वेळ आली आहे!