संगीतातल्या नवनव्या प्रयोगांना आव्हान देणारं एक साधन म्हणून जुगलबंदीकडे पाह्य़लं जाऊ लागलं आणि त्यामुळे कर्नाटक आणि हिंदुस्थानी संगीतातील दिग्गज एकत्रितपणे गाऊ लागले. दोन वेगळ्या प्रकृतिधर्माच्या वाद्यांनी एकत्र येऊन एका नव्या स्वरध्वनीची निर्मिती करण्याचा प्रयत्न सुरू केला. एकल संगीताचा गाभा ढळू न देता आपापली निर्मितीक्षमता जपत केलेला हा आविष्कार नवसर्जनाचं वेगळं दर्शन घडवू लागला.
 भारतीय अभिजात संगीतात जुगलबंदी या संगीत सादरीकरणाच्या प्रकाराकडे नेहमीच वेगळ्या नजरेनं पाह्य़लं जातं. एकाच वेळी दोन कलावंत शेजारी बसून संगीत सादर करण्याच्या या प्रकारात श्रोत्यांची वाहवा कुणाला अधिक मिळते, यावर सर्वाचं लक्ष केंद्रित असतं. एके काळी हा प्रकार कुस्तीतल्या फडासारखा वापरण्याची सवय भारतातील सम्राटांना आणि राजेरजवाडय़ांना लागली होती. प्रत्येकाच्या दरबारात राजगायक असायचा. आपला गायक इतरांहून अधिक श्रेष्ठ आहे, हे सिद्ध करण्याच्या नादात अनेक दरबारांत अन्य राजगायकांना बोलावून त्यांची जुगलबंदी लावली जायची. जो गायक श्रेष्ठ ठरेल, त्याचं सादर कोडकौतुकही व्हायचं. राजेसाहेबांकडून शाबासकी आणि बक्षिसीही मिळायची. पण श्रेष्ठ कोण हे ठरवणार कसं? तर ज्या गायकाची तयारी जास्त तो अधिक श्रेष्ठ अशी सरळ मांडणी असायची. तयारी म्हणजे तरी काय, रागाची मांडणी कशी केली की तानांच्या भेंडोळ्या किती ताकदीने मारल्या? तयारीच म्हणायची तर ती तानेतच दिसते, असाही एक समज त्या काळातील संगीतेतर जनतेमध्ये दृढ असावा. यात संगीतातून मिळणाऱ्या आनंदापेक्षाही कोणी कोणाला कसं हरवलं, यालाच महत्त्व अधिक. दोन गायक वेगवेगळ्या शैलीत शिकलेले असतील, तर ते एकत्रितपणे कसं गाऊ शकणार? ज्यांना एकमेकांच्या सृजनाचाच अंदाज नाही, ते एकमेकावर कुरघोडी तरी कशी करणार? पण कोंबडय़ाच्या झुंजीप्रमाणे दोन गायकांमध्ये लावल्या जाणाऱ्या या जाहीर स्पर्धेची मजा तेव्हाचे राजे आणि त्यांचे खुशमस्करे नक्कीच घेत असणार. गायकांना त्यात कोणता आनंद मिळत असेल, कोण जाणे. आयुष्यभर आपण ज्या संगीताची आराधना केली, सतत आनंदाचे झरे निर्माण करण्याचा प्रयत्न केला, त्या संगीताला असं स्पर्धेत उभं करून आपली आयुष्यभराची तपोसाधना पणाला लावणाऱ्या कलावंतांपुढे त्या काळात अन्य कोणता पर्यायही नव्हता. संगीताला राजाश्रय मिळणं ही त्या काळातील एक अभूतपूर्व घटना होती हेही खरंच. कलावंताला सुखाने आणि मनाप्रमाणे गाणं करता यावं, याची ती एक अधिकृत तरतूद होती. राज्यकर्त्यांना कलांबद्दल प्रेम होतं आणि ते त्यामध्ये रसही घेत. अनेक राजे राजगवयाकडून संगीत शिकण्याचाही प्रयत्न करीत. संगीत कळणं, ही राज्यकर्त्यांसाठी आवश्यक बाब होती, तेव्हा. संगीतच नव्हे, तर चित्रकला, नृत्यकला, स्थापत्यकला अशा अनेक कलांचा चाहता असणं म्हणजेच अभिजन असणं, अशी एक खूणगाठ तेव्हा बांधली जात असे. रयतेला मात्र हे सारं उपलब्ध नसे. उत्तमोत्तम मैफली फक्त राजदरबारातच व्हायच्या आणि तिथं अगदी मोजक्यांनाच प्रवेश असे. तरीही जनमनात या सगळ्या कलांबद्दल कमालीचं औत्सुक्य असे आणि ते शमवण्याचे विविध मार्ग त्यांनी शोधूनही काढले होते.
दोन कलावंतांनी एकत्र गायचं, तर आधी एकमेकांना समजावून घ्यायला हवं. एकमेकांच्या कलात्मक जाणिवांशी समरस व्हायला हवं. परस्परपूरक असं काही आहे का, हेही तपासायला हवं. संगीत सादर करताना केवळ कुरघोडीपेक्षा सर्जनाच्या दोन वेगळ्या प्रवाहांचं मीलन करण्याचा प्रयत्न करायला हवा. कोण श्रेष्ठ हे सिद्ध करण्यापेक्षा संगीतच श्रेष्ठ हे साध्य ठेवायला हवं. श्रोत्यांना काही नवं ऐकायला मिळणार असेल, तर ते अधिक सौंदर्यपूर्ण रीतीनं सादर करायला हवं. त्यासाठी दोन्ही कलावंतांनी एकमेकांचं अवकाश ओळखायला हवं. भारतीय अभिजात संगीत हे एकल संगीत म्हणून सादर केलं जातं, याचं कारणच एकटय़ा कलावंताच्या कलात्मक जाणिवांचा तो आविष्कार असतो. गाणं शिकायला लागल्यापासून त्या कलावंतानं गुरूकडून मिळवलेल्या कलेवर स्वत:च्या प्रज्ञेचं जे कोंदण रचलेलं असतं, त्याचा परिपूर्ण आविष्कार त्याच्या एकटय़ाच्या सादरीकरणातूनच मिळणं शक्य असतं, अशी आपल्या संगीताची धारणा असते. साहजिकच त्यामध्ये अन्य कुणाचीही लुडबुड अडचणीची ठरू शकते. जे मी एकटा करू शकतो, त्यासाठी अन्य कुणाची मदत घ्यायची कशाला? असा त्या कलेसमोरील प्रश्न असतो. शेजारी बसलेल्या कलावंताला आपल्याएवढंच संगीत समजतं आहे आणि त्याच्या प्रतिभेलाही आपल्याप्रमाणेच धुमारे फुटत आहेत, याचा आनंद साजरा करायचा की त्याच्यापुढे जाऊन आपले श्रेष्ठत्व सिद्ध करायचं, असा प्रश्नही खरं तर पडायला नको. पण दरबारी संगीताच्या काळात जुगलबंदी याचा अर्थ तेवढाच होता. एखाद्या तालमीच्या वस्तादानं आपलाच पठ्ठय़ा कसा तरबेज आहे, याची फुशारकी मारावी, तसं राजेरजवाडय़ांच्या बाबतीत होत असावं. एखाद्या गवयाची चर्चा होऊ लागली, की त्याला आपल्या दरबारात आणण्यासाठी नाना तरकिबी लढवल्या जात. अनेक आमिषं दाखवली जात. दरबारात रुजू होताच त्याचे लाडाकोडानं स्वागत होई आणि नंतर आपलाच पठ्ठय़ा श्रेष्ठ असल्याचं सिद्ध करण्यासाठी जुगलबंदीचं आयोजन होई. ब्रिटिशांच्या आगमनापर्यंत भारतीय संगीताच्या क्षेत्रात जुगलबंदीचा अर्थ असा मर्यादित होता. त्यामध्ये स्पर्धेची अहमहमिका होती आणि कलेच्या प्रांतात कधीही उपस्थित नसलेली जयपराजयाची झाक होती.
कलेच्याच नव्हे, तर जगण्याच्या सगळ्याच प्रांतात स्पर्धेपेक्षाही व्यक्त करण्याला अधिक महत्त्व देणारी संस्कृती ब्रिटिशांनी भारतात स्थापन केली. मुसलमानी आक्रमणानंतर भारतात आलेल्या नव्या संगीतशैलीनं सुरुवातीच्या काळात येथील संगीताला हादरे दिले असण्याची शक्यता नाकारण्याचे कारण नाही. काही हजार वर्षांच्या परंपरेतील सततच्या नावीन्यातून निर्माण झालेल्या त्या संगीताला एकदम वेगळ्याच धर्तीच्या शैलीनं धक्के दिलेच असणार. कौतुकाचा भाग असा की हे हादरे पचवण्याएवढी लवचीकता भारतीय संगीतात होती. त्यामुळे या दोन भिन्न संगीतशैलींचा सुखद संकर घडू शकला. साम गायनानंतरच्या प्रबंध गायकीतून बाहेर पडून ध्रुपद शैली निर्माण झाल्यानंतर ख्याल गायकीच्या निर्मितीत या भिन्न शैलींचं मिश्रण इतकं अलवारपणे झालं, की त्या बदलानं ऐकणाऱ्यालाही संपन्नतेचा अनुभव यावा. ब्रिटिशांनी आणलेल्या संगीताची भारतीय संगीताशी नाळ जुळणं शक्य नव्हतं. त्याचं कारण त्या दोन्ही संगीताची बैठक निराळी होती. ते संगीत समूहाला प्रत्यक्ष कला सादर करण्यासाठी साद घालणारं होतं आणि आपलं एकटय़ाचं. या दोन्ही संगीताचा अभिजात संगीतात संकर होण्याची शक्यता नसल्याचं लक्षात आल्यानंतरही राज्यकर्ते म्हणून ब्रिटिश कधी आग्रही राहिले नाहीत. त्यांनी त्यांचं संगीत थोपलं नाही आणि आपल्या संगीताच्या विकासाला खीळही घातली नाही. या नव्या संस्कृतीचा विधायक परिणाम जुगलबंदी या प्रकारावर निश्चितच झाला.
एकाच गुरूकडे शिकणाऱ्या दोन कलावंतांनी मिळून संगीत सादर करण्याची नवी पद्धत सुरू होण्यास तो काळ उपयोगी पडला. ‘बैजू बावरा’ आणि ‘बसंत बहार’ या संगीतमय चित्रपटातील कुस्तीच्या जुगलबंदीनंतर आकाराला आलेली जुगलबंदी अधिक सौंदर्यपूर्ण आणि रसपूर्ण होऊ लागली. तिला संपूर्णतेचा ध्यास लागला आणि त्यातून एकाच शैलीतील दोन कलावंतांनी संगीताचा घेतलेला शोध साकारू लागला. पंडित रविशंकर आणि उस्ताद अली अकबर खाँ यांनी सतार आणि सरोद या वाद्यांची केलेली जुगलबंदी ऐकण्यासाठी उपलब्ध आहे. (या दोघांचेही घराणे एकच. मैहर घराणे आणि गुरू एकच. त्यांचं नाव अल्लाउद्दीन खाँ. अली अकबर खाँ हे त्यांचे चिरंजीव, तर रविशंकर जावई.) एकमेकांना समजावून घेत, सांभाळून घेत आणि परस्परांबद्दल कमालीचा आदर बाळगत सादर केलेल्या जुगलबंदीत स्वत:च्या सर्जनाच्या सर्व शक्यता व्यक्त करण्याचा तो प्रयत्न अभूतपूर्व होता. त्यामध्ये सिद्ध करण्यापेक्षा साध्य करणं अधिक होतं. नजाकत अली आणि सलामत अली हे जुगल गायनातील आणखी एक उदाहरण. एकाची तान इतकी चमकदार आणि चित्ताकर्षक की ऐकणाऱ्याने दिपून जावं, दुसऱ्यानं प्रत्येक स्वराला लडिवाळपणे कुरवाळत त्यातून एका सुंदर आकारांना जन्म द्यावा आणि हे दोन्ही एकमेकांवर मात करण्याच्या ईष्र्येनं न घडता, एकमेकांना सांभाळत करता येणं, यासाठी एका वेगळ्या मानसिकतेमध्ये वावरता यावं लागतं. गेल्या काही दशकांत जुगलबंदीचा अर्थ बदलायला लागला आणि तो अधिक संगीतपूर्ण होऊ लागला, याचं हे एक कारण. संगीतातल्या नवनव्या प्रयोगांना आव्हान देणारं एक साधन म्हणून जुगलबंदीकडे पाह्य़लं जाऊ लागलं आणि त्यामुळे कर्नाटक आणि हिंदुस्थानी संगीतातील दिग्गज एकत्रितपणे गाऊ लागले. दोन वेगळ्या प्रकृतिधर्माच्या वाद्यांनी एकत्र येऊन एका नव्या स्वरध्वनीची निर्मिती करण्याचा प्रयत्न सुरू केला. त्यातून एका नव्या शैलीची बीजेही रोवली जाऊ लागली. एकल संगीताचा गाभा ढळू न देता आपापली निर्मितीक्षमता जपत केलेला हा आविष्कार नवसर्जनाचं वेगळं दर्शन घडवू लागला. जुगलबंदी म्हणजे कोंबडय़ांची झुंज किंवा ‘बुल फायटिंग’ नव्हे, याचं भान देणारा हा आविष्कार समूहगानापेक्षा वेगळा ठरला. अनेकांनी एकत्र संगीत सादर करण्यापेक्षा दोन तरबेज कलावंतांनी एकमेकांच्या प्रतिभेचा अंदाज घेत सर्जनाच्या एका नव्या वाटेवर जाणं केव्हाही अधिक आनंदाचंच.

Husband Appreciation Day
Husband Appreciation Day : महिलांनो, नवऱ्याला गृहीत धरता का? त्यांच्या पाठीवर कधी देणार कौतुकाची थाप?
parbati barua, elephant, Hasti Kanya, Gauripur, Assam, mahout
हत्तीच तिचे मित्र
dr jane goodall, dr jane goodall marathi article,
संशोधकाची नव्वदी!
career in singin
चौकट मोडताना : ‘छंद म्हणून हवा तेवढा जोपासा’