‘साहित्य क्षेत्राला बनवाबनवीचे ग्रहण’ ही धक्कादायक बातमी ‘लोकसत्ता’त बुधवारी वाचली. मििलद जोशी यांनी पद मिळवण्यासाठी केलेला प्रकार हा गंभीर फौजदारी गुन्हा ठरू शकणारा आहे.
त्यामुळे महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी संस्थेपुरत्या न्यायाधीशाची भूमिका न बजावता जबाबदार नागरिकाची भूमिका बजावावी आणि म्हणून त्यांनी त्वरित पोलिसात तक्रार दाखल करायला हवी. तरुण वय, करिअर असला भावनिक घोळ घालू नये, कारण हा डॉं. शेजवलकर आणि डॉं. वैद्य यांचा खासगी प्रश्न नाही. हा संपूर्ण समाजाच्या, मराठी साहित्यिक सांस्कृतिक वर्तुळाच्या भविष्याचा प्रश्न आहे. जोशी यातून सुटून पुन्हा असेच वागू लागले तर पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेची आहे नाही ती अब्रूही जाईल आणि त्याला जबाबदार हे पदाधिकारी असतील.
अशा सार्वजनिक गुन्ह्यांत स्युओमोटो (स्वत:हून) कारवाई शक्य आहे का, याचे तज्ज्ञांनी मार्गदर्शन करावे आणि अपराध्याला योग्य ते शासन होईल असे पाहावे.
अनघा गोखले, मुंबई

गौरवाचा हा मार्ग नव्हे!
‘तारतम्याचा अभाव’ या अविनाश वाघ यांच्या पत्रातील (२२ एप्रिल) मतांशी मी पूर्ण सहमत आहे. राही सरनोबत हिने सुवर्णपदक पटकावून अभिमानास्पद कामगिरी केली, यात शंकाच नाही. त्यासाठी तिचा योग्य गौरव झालाच पाहिजे; परंतु एक कोटी रुपयांचे बक्षीस हा काही गौरवाचा मार्ग नव्हे. खेळाडू म्हणून तिच्यासमोर फार मोठे करिअर पडले आहे व त्यात पुढे जाण्यासाठी तिला पशांची नव्हे, तर योग्य आहार, प्रशिक्षण, खेळाची सामग्री इत्यादींची गरज आहे. तिला परदेशीदेखील प्रशिक्षणासाठी पाठवावे. हा सर्व खर्च शासनाने करावा. यातूनच तिचा भविष्यकाळ सोनेरी होणार आहे.
शरद फडणवीस, कोथरूड, पुणे.

भारताची प्रतिमा घसरते आहे
दिल्लीतील बलात्कारानंतर तेथे उसळलेला जनक्षोभ मलेशियातील चित्रवाणी वृत्तवाहिन्यांनी दाखविला, तसेच आपले गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी ‘बलात्कार अन्य ठिकाणीही घडतात’ अशा अर्थाचे केलेले वक्तव्यही येथे सर्वानी पाहिले. त्यातून आपल्या देशाची मान खाली जाते आहे, भारताची प्रतिमा घसरते आहे, याच्या जाणिवेने मी व्यथित आहे. भारत सरकारला अशी विनंती करावीशी वाटते की, तुमची मते आणि मतभेद, त्यातून उद्भवणारे गोंधळ हे सारे आता बाजूला ठेवा आणि पहिल्यांदा कायदा व सुव्यवस्थेची घडी नीट बसवा!
भारताची प्रतिमा अशीच घसरू लागली तर त्याचा अनिष्ट परिणाम परकीय गुंतवणुकीवर होईल आणि पर्यटनावरही होईल, हे कुणाला समजत नाही का?
धीरज झोपे, क्वालालुंपूर, मलेशिया.

पुरे झाली व्यक्तिपूजा!
‘लोकसत्ता हा निर्भीड वृत्तकारण, निरपेक्ष भूमिका आणि सडेतोड प्रतिक्रियेसाठी प्रसिद्ध होता. मात्र दिवसेंदिवस लोकसत्ताही इतर वर्तमानपत्रांप्रमाणे उथळपणा आणि व्यक्तिपूजेसाठी ‘नावाजलेला’ होऊ लागला आहे. आजचा अंक पाहून तर या गोष्टीची आणखी खात्री पटली. सचिन तेंडुलकरच्या चाळिसाव्या वाढदिवसाच्या निमित्ताने जी तीन पानी व्यक्तिपूजा चालवली गेली त्याला तोड नाही! काय सचिन तेंडुलकर ही एवढी सर्वोच्च व्यक्ती आहे की त्याचे एवढे स्तोम माजवावे? सचिनने वयाची चाळिशी पार केली, यात एवढे नवल,  कौतुक कसले?  विविध लोकांची प्रतिक्रिया काय.. ‘स्लाइस ऑफ लाइफ’ काय, सगळेच चीड आणणारे होते. सचिनपेक्षा जास्त कर्तृत्ववान व अनुकरणीय व्यक्ती या देशात नाहीत काय?
क्रिकेट हा फक्त दहा देशांत खेळला जाणारा रटाळ खेळ. भारतीय उपखंडाबाहेर कोणी क्रिकेटला, क्रिकेटपटूंना ओळखतदेखील नाही. एवढय़ा कमी देशांत खेळल्या जाणाऱ्या खेळात, तेही घरच्या मैदानांवर कोणी शतके केली तर त्यात नवल ते काय? आणि या वयात तो काही बहारदार खेळ करीत नाही. कसोटी क्रिकेटमध्ये उदयोन्मुख खेळाडूंना संधी मिळत नाही ती अशी जागेची अडवणूक झाल्यामुळे.
सगळीकडेच व्यक्तिपूजा चालू असल्यामुळे सचिनला वास्तव दाखवणार तरी कोण? प्रायोजकांचे हितदेखील सचिन संघात असण्यातच आहे, तर ‘लोकसत्ता’ला ही विनंती आहे की तुम्ही तरी व्यक्तिपूजा थांबवावी.
अभिषेक कोरगावकर

वाढत्या पिळवणुकीचा प्रतिकार का नाकारता?
‘नक्षलवाद्यांच्या दुटप्पी धोरणाचे बळी’ या लेखात (लोकसत्ता, १८ एप्रिल) देवेंद्र गावंडे यांच्या लेखातील मांडणी पटली नाही. वास्तविक या लेखाच्या बुडाशी दोन मुद्दे आहेत : १) नक्षलवादी तरुणांवर लगबगीने कारवाई करणाऱ्या पोलिसांकडे फारसे पुरावे नसतात, मग न्यायालयांतून हे तरुण निदरेष सुटतात; त्यामुळे चळवळ कमी न होता उलट वाढते असा आजवरचा अनुभव आहे.
२) व्यवस्थेवर राग असणाऱ्या सुशिक्षित तरुणांनी हिंसेच्या मार्गाने जाऊ नये यासाठी कायद्याचा नाही, तर प्रबोधनाचा वापर करणे गरजेचे आहे. त्याचीच वानवा आपल्या राज्यात आहे.
गावंडे यांना चिंता लागलेली दिसते ती हीच की वरील कारणांमुळे, त्याचा फायदा घेऊन नक्षलवादी शहरांकडे वाटचाल करू लागले आहेत. यावरून एक स्पष्ट होते की, ‘तरुण-तरुणींनी ‘व्यवस्थेवर’ (सत्ताधाऱ्यांच्या सत्ता राबविण्याच्या पद्धतीवर) राग करण्यात चूक नाही’, हे तरी गावंडे यांनाही पटले असावे. या व्यवस्थाविरोधाला मानणाऱ्या विचाराचा धागा घेऊन, भारताच्या स्वातंत्र्यलढय़ात ज्या तरुण-तरुणींनी दडपशाहीची फरफट पत्करून भारताचा देदीप्यमान इतिहास घडवला त्याबाबत आठवण करून द्यावीशी वाटते.
भारताचा तो देदीप्यमान इतिहास पडताळताना हे स्पष्ट होते की, भारताचा स्वातंत्र्यसंग्राम हा ब्रिटिश साम्राज्यवाद्यांच्या वसाहतवादी नीतीविरुद्ध व सरंजामशाही राज्यपद्धतीविरोधी होता; तो लढा वसाहतवादी पिळवणुकीविरुद्ध होता. आज त्या अवस्थेतून भारत मुक्त झाला आहे, असे म्हणता येणार नाही. किंबहुना जागतिक स्तरावर अनेक साम्राज्यवादी शक्तींनी भारतात घुसखोरी करून भारतीय जनतेच्या एकजुटीची (धर्माच्या नावाने वा जातीजमातींच्या कारणास्तव) अशा तऱ्हेने मोडतोड केली आहे की, साम्राज्यवाद्यांना भारतातून हुसकून लावण्यासाठी ‘जालीम टोला’ आम जनतेस द्यावा लागणार आहे, हे निश्चितच आहे.
६५ वर्षांच्या तथाकथित स्वातंत्र्याच्या संचालनात काँग्रेस संघटनेने जे कार्य केले त्यातून ना स्वाभिमान टिकला, ना स्वातंत्र्य टिकले. उलट या सर्व काळात साम्राज्यवादय़ांचे दलाल म्हणून कार्यरत राहून देशभर भ्रष्टाचाराचे थैमान चालू करूनआज सत्ताधारी भारताच्या विकासाची स्वप्ने पाहात आहेत. अशा समयी ‘साम्राज्यवाद्यांच्या वसाहतवादी धोरणाविरुद्ध दुसरे युद्ध (स्वातंत्र्य लढा) देण्याची वेळ आलेली आहे. हे भारतीय जनतेतील तरुणांना अनुभवातून समजले आहे. आज परिस्थिती अशी आहे की, जगातील अनेक साम्राज्यवादी शक्ती, भारताचे अखंडत्व तोडून आपापल्या कक्षेत वसाहतिक पिळवणुकीचे ‘अड्डे’ उभारण्याच्या कारवाया करीत आहेत. म्हणून गावंडे यांनी उपस्थित केलेले मुद्दे निकामी आहेत, असे म्हणावे लागेल.
साम्राज्यवाद्यांच्या वसाहतिक पिळवणुकीचे ‘अड्डे’ वाटून घेण्याच्या घोडदौडीचा मुकाबला करणे आवश्यक ठरत आहे आणि यात सफलता व्हायची असेल तर ‘हिंसा’- ‘अहिंसा’ यांचा बागुलबुवा उभा करून तरुण-तरुणींमध्ये मरणाची धास्ती उभारणे हे कृत्य देशाभिमान्यांचे नाही. भारतातील वसाहतवादी पिळवणुकीच्या योजनांचा मुकाबला करणे आवश्यक आहे.
भारतातील प्रचलित सत्ताधाऱ्यांची कथा काय सांगावी? सत्ताधाऱ्यांत असा कोण भ्रष्टाचाराच्या आरोपांतून सहीसलामत बाहेर पडत आहे? याबाबत ‘उडदामाजी काळे-गोरे’ हेच खरे ठरले आहे. म्हणूनच या भ्रष्टाचाराने बरबटलेल्या समाजव्यवस्थेविरुद्ध जर क्रियाशील कार्यकर्ते जीव तोडून कार्यरत असले, तर त्या त्यांच्या कार्याला गावंडे यांनी आक्षेप घेणे योग्य ठरत नाही.
सुंदर वि. नवलकर, दादर.  

ही सफाई की नासाडी?
मुंबईत वा ज्या शहरांत पाणी पुरेसे आहे, त्या शहरांतील सर्व वाचकांना या पत्राद्वारे कळकळीची नम्र विनंती अशी की, एप्रिल आणि मे महिन्यांमध्ये आपल्या बिल्डिंगच्या पाण्याच्या टाक्या साफ करून घेऊ नका. टाक्या धुतल्यामुळे टाकीच्या क्षमतेच्या ७५ टक्के पाणी वाया जाते. इकडे महाराष्ट्रात दुष्काळग्रस्त भागांत लोकांना प्यायला पाणी मिळत नाही आणि आपण एवढे पाणी वाया घालवावे हे काही बरोबर नाही. टाक्या जुलअखेर किंवा ऑगस्टमध्ये साफ करता येतीलच.  
रवींद्र रा. धने

शहाणपणा कोठे गेला?
मूर्खाच्या नंदनवनात ‘लोकसत्ता’नेही सहभागी होऊन सचिनवर चक्क तीन पाने प्रसिद्ध केलेली पाहून पराकोटीची तिडीक तर वाटलीच, परंतु एरवीचा आपला शहाणपणा कोठे गेला, असा प्रश्नही पडला.
श्री. वि. आगाशे