उत्तर प्रदेशातील दंगलपीडितांना रोजच्या जेवणाची भ्रान्त असताना ते पाकिस्तानी गुप्तहेरांच्या संपर्कात आहेत, असे म्हणणे हे केवळ संवेदनाशून्यतेचेच लक्षण ठरते. मात्र कोणत्याही व्यक्तीपेक्षा संस्था ही मोठी असते. त्यामुळे चि. राहुलबाबा काहीही बरळले तरी आपणास काय करावयाचे आहे याची पूर्ण जाण काँग्रेसजनांना आहे..
शालेय वयात उन्हाळ्याच्या सुटीत नुकतीच दुचाकी शिकलेल्याने ती वाटेल तशी, वाटेल त्याच्यावर दामटावी तसे चि. राहुलबाबा गांधी यांचे झाले आहे. चाळिशी पार केलेल्या या युवा नेत्यास नुकतीच राजकीय मिसरूड फुटत असून आपले बेजबाबदार नवशिकेपण कसेही करून उघडे करण्याचा चंगच त्यांनी बांधलेला दिसतो. परंतु गेल्या काही दिवसांतील चि. राहुलबाबांनी उधळलेली मुक्ताफळे पाहता बौद्धिक आणि वैचारिक प्रौढावस्था त्यांच्यापासून बरीच योजने दूर असल्याचा निष्कर्ष निघाल्यास गैर नाही. आपल्याच पक्षाच्या पंतप्रधानांनी घेतलेला निर्णय कसा मूर्खपणाचा आहे हे अकारण जाहीर करून चि. राहुलबाबांनी आपल्याला आता राजकारण येऊ लागल्याचा पहिला संदेश दिला. त्यावर त्या निर्णयामागे चि. राहुलबाबांची कशी आखीव रणनीती होती अशी भलामण करण्याचा उद्योग त्यांच्या काही बौद्धिक गुलामांनी केला. तसे असेलही कदाचित. परंतु त्यामुळे आपण आपल्या पंतप्रधानांनाच अंगचोरी करावयास लावीत आहोत, असे काही त्यांना वाटले नाही. असो. अलीकडे त्यांना आजी, आजोबा, मातोo्री यांच्या आठवणींचे कढ येत आहेत हेही दिसू लागले आहे. शीख अतिरेक्यांनी आधी आजी इंदिरा गांधी आणि नंतर तामीळ दहशतवाद्यांनी तीर्थरूप राजीव गांधी यांची हत्या केल्याने चि. राहुलबाबा यास दु:ख होणे साहजिकच आहे. कोणाच्याही कोणत्याही आप्तस्वकीयास असे मरण येणे दुर्दैवीच. सर्वसाधारण मानवी नातेसंबंधांना लागू असलेले भावभावनिक निकष राजकीय नेत्यांना लागू नाहीत, असे कदापिही म्हणता येणार नाही. तेव्हा आजी आणि वडिलांच्या मृत्यूने त्यांचा शोक अनावर झाला असल्यास ते नैसर्गिकच. आजी इंदिरा गांधी गेल्या त्या वेळी चि. राहुलबाबा हे शारीरिक आणि बौद्धिक वयाने शाळकरीच होते. त्यामुळे त्यांना हे कृत्य कोणी आणि का केले असावे याचे संदर्भ लगेचच लागले नसतील तर तेही क्षम्यच. परंतु आता वया च्या या टप्प्यावरही हे संदर्भ आणि तपशील चि. राहुलबाबांना माहीत नसतील तर शालेय वयाच्या पुढे त्यांची कितपत बौद्धिक प्रगती झाली असेल हा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर आपल्या मनातील क्षोभ दूर होण्यासाठी १५ वर्षांचा काळ जावा लागला, आपण इतकी वर्षे खदखदत होतो, असे चि. राहुलबाबा म्हणतात. परंतु इतक्या वर्षांत त्यांनी पंजाब समस्येच्या अभ्यासासाठी आठवडाभर काढला असता तर त्यांच्या मनात राग साठून राहता ना. ज्या भिंद्रनवाले यांच्या अनुयायांनी चि. राहुलबाबांच्या आजीस आपल्यातून नेले, त्या भिंद्रनवाले यांची निर्मिती कोणामुळे झाली हा प्रश्न इतक्या वर्षांत त्यांना पडला नसेल तर ती बौद्धिक पोकळीच म्हणावयास हवी. पंजाबमधील क्षुद्र राजकीय स्वार्थासाठी अतिरेकी तत्त्वांना खतपाणी कोणी दिले, त्या राज्यातील नेमस्तांकडे दुर्लक्ष करीत अतिरेकी मंडळींना मान्यता देण्याचे राजकारण कोणी केले याचीही उत्तरे चि. राहुलबाबा यांनी शोधण्यास हरकत नव्हती. आपल्या राजकीय विरोधकांवर ते जातीय, धार्मिक विद्वेष पसरवीत असल्याचा आरोप करतात आणि त्यात काहीही चूक नाही. परंतु आपल्या आजीच्या हत्येनंतर शीख बांधवांच्या शिरकाणाकडे कोणी दुर्लक्ष केले या प्रश्नाचे उत्तरही त्यांनी शोधावे. किंबहुना शिखांचे हत्याकांड होणे ही नैसर्गिक प्रतिक्रिया आहे अशी भावना कोणी व्यक्त केली, हा प्रश्न चि. राहुलबाबांनी किमान आपल्या मातोश्रींना तरी विचारावयास हवा होता. ज्या तामिळ अतिरेक्यांच्या प्रश्नामुळे चि. राहुलबाबांच्या तीर्थरूपांना प्राण गमवावे लागले त्या प्रश्नात नको त्या दिशेने नाक खुपसण्याचा उद्योग कोणी केला होता, त्याची सविस्तर माहितीही मातोश्री सोनिया यांनी चि. राहुलबाबांस देणे गरजेचे होते. तशी ती दिली असती तर चि. राहुलबाबांच्या कोवळ्या मनाला इतक्या यातना झाल्या नसत्या. तेव्हा आता या सगळ्याविषयी ते राग आणि उद्वेग व्यक्त करीत असतील तर त्यांची भूमिका समजून घ्यायला हवी. तरीही एक मुद्दा उरतोच. तो असा की चि. राहुलबाबांचा संताप इतका खरा असेल तर त्यांनी शिखांच्या शिरकाणास जबाबदार असणाऱ्या स्वपक्षीयांना दूर ठेवण्यासाठी काय केले आणि त्याच वेळी आपल्या वडिलांच्या मारेकऱ्यांना पाठीशी घालणाऱ्यांशी सत्तेसाठी हातमिळवणी कशी काय केली? याचीही उत्तरे त्यांनी द्यायला हवीत. त्यामुळे चि. राहुलबाबांना ऐकण्यासाठी येणाऱ्यांना इतिहासाचे पूर्ण भान येऊ शकेल.
परंतु वस्तुस्थिती अशी आहे की काँग्रेसच्या वारसदारास इतिहासाचे जसे ज्ञान नाही आणि वर्तमानाचे आहे असेही म्हणता येणार नाही. असे असते तर दंगलीत होरपळलेल्या मुसलमानांशी पाकिस्तानी गुप्तहेर यंत्रणा संपर्कात असल्याचे अत्यंत बेजबाबदार विधान त्यांनी केले नसते. हे विधान करताना चि. राहुलबाबांचा रोख हा उत्तर प्रदेशातील ताज्या दंगलपीडितांकडे होता. यातील काही पीडितांनी आपल्या हालअपेष्टांची हृदयद्रावक कहाणी चि. राहुलबाबांच्या मातोश्री सोनिया गांधी यांना आणि राहुलग्रस्त पंतप्रधान मनमोहन सिंग यांनाही सांगितली त्यालाही महिना झाला. तरीही त्यांना कोणतीही भरीव मदत मिळालेली नाही आणि या टीव्हीकॅमेरीय भेटींनंतरही या पीडितांच्या हालअपेष्टांना उतार नाही. राजकीय दंगलीच्या वणव्यात अडकलेले हे अश्राप आपल्या हातातोंडाची कशी गाठ घालायची या विवंचनेत असताना ते पाकिस्तानी गुप्तहेरांच्या संपर्कात आहेत असे विधान करणे हे केवळ संवेदनाशून्यतेचेच लक्षण ठरते. ते करून आपल्या बेगडी निधर्मीवादास नवी दिशा देण्याचा चि. राहुलबाबांचा प्रयत्न दिसतो. आपल्या विधानाचा काय अर्थ निघतो, हे चि. राहुलबाबांस समजते काय? म्हणजे मुळात विशिष्ट धर्मीयांच्या मनात विद्वेषाचे विष पेरायचे आणि त्यास फळे लागल्यानंतर पाकिस्तान त्यांच्या संपर्कात आहे, असे म्हणायचे हे निधर्मी राजकारण मानायचे काय? खेरीज या दंगली घडवण्यात चि. राहुलबाबांच्या काँग्रेस पक्षाशी सत्तासोबत करणाऱ्या समाजवादी पक्षाचाही हात आहे असे उघड बोलले जाते. तेव्हा या पक्षाशी आपला पक्ष कोणताही संबंध ठेवणार नाही, सरकार टिकवण्यासाठी लोकसभेत त्यांच्या पक्षाचा पाठिंबा घेणार नाही आणि निवडणुकीनंतर गरज लागली तरी त्यांची मदत घेणार नाही इतकी सोपी प्रतिज्ञा करणे चि. राहुलबाबांना शक्य आहे. ते ती का करीत नाहीत? आपण निवडणुकांकडे पाहून वा मतपेटय़ांकडे डोळा ठेवून बोलत नाही, असेही चि. राहुलबाबांचे म्हणणे आहे. तसे असेल तर इतक्या निर्भीड आणि नि:स्वार्थी विचारधारेचे स्वागतच करावयास हवे. फक्त त्याबाबतची शंका इतकीच की हे जर त्यांचे विधान खरे असेल तर ते सध्या मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, दिल्ली आदी निवडणूकवाल्या राज्यांचाच दौरा करीत आहेत, हा केवळ योगायोग मानायचा काय? ही मते व्यक्त करण्यासाठी केरळ वा पुड्डचेरी या प्रदेशांची निवड त्यांनी का नाही केली, हाही प्रश्न उरतोच. सत्ता हे विष असल्याचा इशारा त्यांनी पक्षाच्या जयपूर अधिवेशनात दिला होता. आपला पक्ष या विषापासून चार हात दूर राहावा या उदात्त हेतूनेच बहुधा चि. राहुलबाबा या राज्यांच्या दौऱ्यावर असावेत. असो.
त्यांच्या या विचारमौक्तिकांमुळे काँग्रेसजनांनाही नक्की काय करावे हा प्रश्न पडून ते भांबावले असण्याची शक्यता आहे. कोणत्याही व्यक्तीपेक्षा संस्था ही मोठी असते. त्यामुळे चि. राहुलबाबा काहीही बरळले तरी आपणास काय करावयाचे आहे याची पूर्ण जाण काँग्रेसजनांना आहे. त्याचमुळे बाबा वाक्यं अप्रमाणम् असे त्यांनी मनोमन ठरवले असल्यास आश्चर्य नाही.