चक्रवर्ती खटल्यानंतर अमेरिकेत सजीवांवर पेटंट्स देण्याचे पर्व सुरू झाले; त्यात रीकॉम्बिनंट तंत्रज्ञानाने बनविलेल्या अनेक डीएनएवरील पेटंट्सचाही समावेश होता. या तंत्रज्ञानने औषधक्षेत्रात एक क्रांती घडवून आणली.. ती म्हणजे जैविक औषधांचा शोध. पण २०१३ मध्ये आयुष्याच्या याच ‘डीएनए’ गोफावरचे पेटंट मायरियाड जेनेटिक्स या कंपनीला नाकरण्यात आले.. ते का त्याची ही कहाणी..
‘‘बघ कसा तंदुरुस्त आहे मी अजून.. एक औषध घेतलं नाही आहे आत्तापर्यंत.. वाटलं काय तुला?.. माझ्या ओळखीचे ६५ वर्षांचे एक काका दंडातील बेटकुळी दाखवत हे येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येकाला ऐकवत असतात. औषध म्हटलं की एक नकोनकोशी भावना अंगावर काटा आणते हे खरंच आहे. त्यातूनही कॅन्सर किंवा सोरायसिससारख्या बरं व्हायला त्रास देणाऱ्या औषधांचं तर नावसुद्धा काढावंसं वाटत नाही, पण प्रत्येकाला आपला जीव प्यारा असतो. हा जीव तंदुरुस्त ठेवणारी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे औषधं! कितीही नकोनकोशी वाटत असली तरी आज या औषधांनी माणसाचं जीवनमान खूपच उंचावले आहे हे मात्र नक्की. कॅन्सर बरा करणाऱ्या मोनोक्लोनल अॅण्टिबॉडीज किंवा मधुमेहासाठी इन्सुलिन, मूत्रिपडांच्या विकारासाठी एरिथ्रोपोएटीन किंवा मुलांच्या योग्य वाढीसाठी ग्रोथ हॉर्मोन यांसारखी संप्रेरके औषधे म्हणून घ्यायला गेलं, तर ती प्रचंड महाग असतात. कारण ही औषधं तापावरचं पॅरासेटमॉल किंवा आयबुप्रोफेनसारखी वेदनाशामकं यांच्यापेक्षा वेगळी असतात. काय फरक आहे या औषधांत? तर फरक असा की, तापाची किंवा वेदनाशामक औषधं ही रसायनांपासून बनविलेली असतात, त्यांचे रेणू आकाराने छोटे असतात; पण हॉर्मोन्स वा कॅन्सरवरची बरीच औषधं ही मात्र जैविक (बायोफार्मास्युटिकल्स किंवा बायॉलॉजिक्स) असतात व त्यांचे रेणू आकारानं अवाढव्य असतात.
पहिल्या पिढीतली जैविक औषधं (first generation biologics) म्हणजे इन्सुलिन, रक्त किंवा रक्तापासून बनविलेली उत्पादनं किंवा प्रतिबंधक लसी. ही औषधं सरळसरळ माणसापासून वा प्राण्यांपासून बनविलेली असत. दुसऱ्या पिढीतील जैविक औषधं मात्र जैवतंत्रज्ञानानं (बायोटेक्नॉलॉजी) बनविली जातात. ही औषधं अनेक प्रकारचे कॅन्सर, संधिवात, सोरायसिससारख्या आजारांवर अतिशय गुणकारी आहेत.
रासायनिक औषधं म्हणजे काय? तर काही रसायनं एकमेकांत मिसळून, त्यांना गरम करून, उकळून, गाळून, त्यांचे स्फटिक बनवून तयार केलेलं आणखी एक रसायन, पण जैविक औषधं म्हणजे मात्र अतिशय गुंतागुंतीची प्रथिनं. ती अशी रसायनं एकमेकांत मिसळून बनविता येत नाहीत किंवा ती अशा प्रकारे कशी बनवायची हे आपल्याला आजतागायत ठाऊक नाही. सजीवांच्या शरीरातील पेशींना मात्र ही प्रथिनं कशी बनवायची ते नक्की माहिती असतं, कारण ते त्यांचं रोजचं काम असतं. म्हणून अशा सजीव पेशींना कामाला लावून ही औषधं बनविली जातात. जिवाणू, कवकं किंवा चायनीज हॅमस्टरसारख्या सस्तन प्राण्याच्या पेशींना अशी प्रथिनं (म्हणजे औषधं) बनविण्याच्या कामाला जुंपलं जातं. अशा पेशींची प्रचंड प्रमाणात वाढ करावी लागते.. त्याचं पीक घ्यावं लागतं म्हणा ना.. शिवाय त्यांना जगविण्यासाठी विशिष्ट तापमान वा इतर गोष्टी राखाव्या लागतात. हे करणं अवघड.
समजा, हे काम करणारे मजूर म्हणजे या पेशी आणि त्यांना हे काम करण्याची आज्ञा देणारा त्यांचा ठेकेदार म्हणजे डीएनए. शरीरातल्या प्रत्येक पेशीला अर्थातच प्रत्येक प्रथिन बनविता येत नाही. कुठलं प्रथिन कसं बनवायचं याच्या सूचना साठविलेल्या असतात जनुकामधील (जीन्समधील) डीएनएमध्ये. प्रत्येक प्रथिन बनविण्यासाठी डीएनए आम्लांचा एक विशिष्ट क्रम डीएनएमध्ये असणं गरजेचं असतं. प्रत्येक प्रथिन बनविण्यासाठी एक वेगळा आणि एकमेवाद्वितीय क्रम असलेला डीएनए असतो. आपल्याला हवं असलेलं प्रथिन स्वरूपातले जैविक औषध बनविण्यासाठी कुठला डीएनए कारणीभूत आहे, हे आधी शास्त्रज्ञ शोधून काढतात आणि तो वेगळा करतात. मग जैविक तंत्रज्ञानातील Recombinant DNA Technology   ने मग असा डीएनए वर सांगितलेल्या एका पेशीच्या जनुकात प्रत्यारोपित केला जातो. अशा प्रत्यारोपित पेशीला म्हणतात क्लोन आणि मग या बाहेरून प्रत्यारोपित केलेल्या डीएनएच्या आज्ञेच्या तालावर या क्लोन पेशी नाचू लागतात आणि आपल्याला हव्या असलेल्या जैविक औषधाची निर्मिती करू लागतात.
मागच्या लेखात आपण पाहिलं की, डायमंड विरुद्ध चक्रवर्ती या खटल्यात Recombinant DNA  तंत्रज्ञानानं प्रयोगशाळेत बनविलेल्या एका जिवाणूवर पेटंट दिलं गेलं आणि त्यानंतर जैविक गोष्टींवर पेटंट घेण्याचा नवा पायंडा रूढ झाला. तोवर सजीवांशी संबंधित कुठल्याही गोष्टीवर पेटंट्स दिली जात नव्हती, पण आता ती दिली जाऊ लागली. यात मोठय़ा प्रमाणावर समावेश होता, अशा प्रकारे रीकॉम्बिनंट डीएनए तंत्रानं बनविण्यात आलेल्या ‘क्लोन’वरच्या आणि मग त्या क्लोननं बनविलेल्या औषधांवरच्या पेटंट्सचा. कारण अर्थात हे क्लोन आणि त्यांनी बनविलेली औषधं ही मानवनिर्मितच होती. ती निसर्गात अस्तित्वात नव्हती आणि म्हणून ‘चक्रवर्ती पेटंट खटल्या’त अमेरिकी न्यायालयानं सांगितल्याप्रमाणं तेथे ही पेटंट्स दिली जाऊ लागली. ज्या औषध कंपनीला असं पेटंट मिळेल ती पुढे त्या-त्या औषधाचं उत्पादन करू शके.
१९८२ मध्ये कॅलिफोíनया विद्यापीठाला, मानवी वाढीसाठी कारणीभूत असलेल्या संप्रेरकाच्या (ग्रोथ हॉर्मोन) Recombinant DNA चे पेटंट देण्यात आले. जे त्यांनी नंतर लिली या औषध कंपनीला विकलं आणि ती कंपनी हे औषध बनवू लागली. त्यानंतर कोहेन बोयर पेटंट्स (रीकॉम्बिनंट प्रथिनांसाठी), मोनोक्लोनल अॅण्टिबॉडीज बनविण्यासाठी लागणारे पेटंट्स अशा अनेक डीएनएवर पेटंट्स देण्यात आली, पण २०१३ मध्ये डीएनएवरच्या पेटंट्समधून परत एक मोठा वाद उभा राहिला तो ‘असोसिएशन ऑफ मॉलेक्युलर पॅथॉलॉजिस्ट्स विरुद्ध मायरियाड जेनेटिक्स’ या खटल्यात. मायरियाड जेनेटिक्स या कंपनीनं स्तनांच्या कर्करोगासाठी कारणीभूत ठरणारं बीआरसीए-वन नावाचं जीन वेगळं करण्यात यश मिळवलं आणि यावर आधारित स्तनांच्या कर्करोगाचं निदान करणारी एक चाचणी शोधून काढली आणि मग हा डीएनए आणि निदान चाचणी अशा दोन्ही गोष्टींवर पेटंट फाईल केले. आधी देण्यात आलेल्या डीएनएवरच्या पेटंट्समध्ये आणि या पेटंटमध्ये फरक हा होता की, आधीची पेटंट्स ही रीकॉम्बिनंट तंत्रानं बनविलेलं क्लोन आणि त्यापासून बनलेल्या औषधांवर होती आणि हे सर्व माणसानं केलेलं संशोधन होतं; पण मायरियाडचं पेटंट मात्र मानवी शरीरात निसर्गत: अस्तित्वात असलेल्या डीएनएवर होतं. मायरियाडनं केलं होतं इतकंच की, शरीरातील अनेक डीएनएमधून या कर्करोगाला कारणीभूत असलेला डीएनए वेगळा केला होता आणि हा अर्थात शोध (डिस्कव्हरी) होता.. संशोधन (इन्व्हेन्शन) नव्हे.
या पेटंटला ‘असोसिएशन ऑफ मॉलेक्युलर पॅथॉलॉजिस्ट्स’ या संस्थेने विरोध केला. वेगवेगळ्या स्तरांवर हा खटला लढला गेला. अगदी डीएनएची- दुहेरी गोफासारखी- रचना शोधून काढणारे नोबेल मानकरी डॉ. वॉटसन यांचंही मत विचारात घेतलं गेलं आणि मायरियाडला पेटंट नाकारण्यात आलं.
हे पेटंट नाकारण्याची दोन कारणं होती. एक म्हणजे इथे मायरियाडनं कुठलीही ‘रीकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी’ वापरली नव्हती, तर फक्त नसíगकरीत्या अस्तित्वात असलेला डीएनए वेगळा केला होता. याबाबत निवाडा देताना न्यायालय म्हणाले, ‘झाडावर (म्हणजे माणसाच्या शरीरातील सगळ्या डीएनएवर) पेटंट मिळवता येत नाही म्हणून झाडाची फांदी (म्हणजे एक वेगळा केलेला डीएनए) तोडून आणायची आणि मग त्यावर पेटंट मागायचं अशासारखं हे मायरियाडचं पेटंट आहे.’ दुसरं म्हणजे इथे हा वेगळा करण्यात आलेला डीएनए वापरून कुठलंही जैविक औषध बनविण्यात आलेलं नव्हतं, तर एक निदान-चाचणी शोधून काढण्यात आलेली होती. तिच्यावर पेटंट दिल्यानं कॅन्सरच्या निदानासाठीच प्रचंड पसे मोजावे लागणार होते. शिवाय अमेरिकेतल्या निदानतज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणं त्यांना यामुळे कॅन्सरचं निदान करण्यात अडचणी येणार होत्या. या सर्व कारणांमुळे हे पेटंट नाकारण्यात आलं. चक्रवर्ती खटल्यापासून सजीव गोष्टींवर पेटंट्स देण्याच्या पाडलेल्या पायंडय़ाला प्रथमच मायरियाड खटल्यात पायबंद घालण्यात आला.
१९९० ते २००२ या कालावधीत अनेक देशांच्या सहकार्यानं ‘हय़ूमन जिनोम प्रोजेक्ट’ हा उपक्रम अमेरिकेत राबवला गेला. करोडो रुपये खर्च करून माणसांच्या शरीरातील जिनोमचं आरेखन करणं हा त्याचा उद्देश होता. डॉ. वॉटसन यांनी मायरियाड खटल्याबाबत न्यायालयाला दिलेल्या आपल्या मतात म्हटलं की, हय़ूमन जिनोम प्रोजेक्ट हा कुठल्याही एका व्यक्तीच्या स्वार्थासाठी निर्माण करण्यात आलेला उपक्रम नाही. तो लोकांच्या पशातून उभा करण्यात आला आहे, लोकांचा आहे आणि म्हणून त्याची मदत घेऊन करण्यात आलेल्या या संशोधनावर मक्तेदारी देण्यात येऊ नये. निसर्गात अस्तित्वात असलेल्या डीएनएला वेगळं करणं हे अजिबातच पेटंटयोग्य काम नव्हे.
अशा रीतीने, एरवी सढळ हातानं पेटंट्स आणि मक्तेदारी बहाल करणाऱ्या अमेरिकी पेटंट ऑफिसनं आम जनतेच्या हितासाठी हे पेटंट नाकारलं. चक्रवर्ती खटल्यापासून सुरू झालेल्या सजीवांच्या पेटंट्सवरचं हे वर्तुळ अशा प्रकारे पूर्ण झालं. माणसाच्या शरीराला आपल्या तालावर नाचवणारा गोफासारखी संरचना असलेला डीएनए म्हणजे निसर्गाची एक अप्रतिम कलाकृती. तो माणसानं ‘रीकॉम्बिनंट’ तंत्र वापरून नव्या पद्धतीने विणला तर त्यावर पेटंट्स मिळतील.. पण केवळ तो वेगळा काढून त्यावर ठेका प्रस्थापित करू पाहिला, तर मात्र ही पेटंट्स नाकारली जातील, हेच यातून सिद्ध झालं.
लेखिका औषध निर्माण शास्त्राच्या प्राध्यापिका असून बौद्धिक संपदा कायद्यातील पदवीधर व पेटंट सल्लागार आहेत.
ईमेल : mrudulabele@gmail.com