खरा आणि शुद्ध विचार मांडू पाहणाऱ्या संतांना निंदा, मानहानी, त्रास याला तोंड द्यावंच लागलं. खऱ्या भक्ताच्या वाटय़ाला या गोष्टी येतातच, पण त्यामागे एक मोठं रहस्य आहे, असं हृदयेंद्र म्हणाला तेव्हा त्याच्या मित्रांना थोडं आश्चर्य वाटलंच. त्यांच्याकडे पाहात हृदयेंद्र बोलू लागला..
हृदयेंद्र – रूढ समाजमान्यतेला धक्का लावायला मोठं धाडस लागतं. एक लक्षात घ्या, केवळ खळबळ माजविण्यासाठी किंवा जाणीवपूर्वक लोकांचा विरोध ओढवून घेऊन वेगळ्या मार्गानं स्वत:ची प्रसिद्धीच साधण्यासाठी जी सवंग विचार अभिव्यक्ती होते, ती मला अभिप्रेत नाही.. पण जे खरं आहे, वास्तविक आहे ते समाजाला रुचणारं नसलं तरी  मांडायला मोठं धाडस लागतं. समाजाला भावतं ते मांडून समाजाकडून वाहवा मिळविण्यात काही त्रास नसतो. समाजाला जे भावत नाही, पण आज ना उद्या भोवणार आहे, ते स्पष्ट सांगायला धाडस लागतं.. त्या धाडसाची परीक्षाच या भक्ताचे विरोधक घेत असतात!!
योगेंद्र – ओहो! निंदकाचे घर असावे शेजारी!!
ज्ञानेंद्र – खरं आहे. आपल्या वैचारिक बांधीलकीचीच ही परीक्षा असते.
हृदयेंद्र – खरी शुद्ध भक्ती जो रुजवू पाहातो, खऱ्या आध्यात्मिक वाटचालीबाबत जो लोकांना जागृत करू पाहातो, त्याला पाखंडी धर्मधुरीणांकडून त्रास होणारच. हा त्रास, हा अवमान म्हणजे त्याच्या आत्मनिष्ठेची जणू परीक्षाच असते. लोकांकडून होणाऱ्या अवमानाची जर भीती वाटत असेल, तर याचा अर्थ लोकेषणा आहे!
कर्मेद्र – लोकेषणा म्हणजे?
हृदयेंद्र – इषणा म्हणजे इच्छा, आसक्ती. लोकांची आसक्ती ती लोकेषणा, पैशाची आसक्ती ती वित्तेषणा, लैंगिक आसक्ती ती दारेषणा.. तर लोकांनी अवमान करू नये, असं वाटतं तर याचाच अर्थ लोकांकडून मानाचीच अपेक्षा आहे. त्या मानापुढे शुद्ध विचाराचा त्याग होत असेल तर तो विचार माझ्याही मनात पक्का नाही, हाच अर्थ होतो ना? तेव्हा प्रत्येक संताच्या जीवनात मानहानी, त्रासाचे असे प्रसंग हे भक्तांसाठीच मार्गदर्शक असतात. धीरानं कसं रहावं, हे भक्तांच्या मनावर बिंबविण्यासाठी असतात. ज्याला वैचारिक बांधीलकीपुढे लोकमानाची फिकीर वाटत नाही तोच लोकांचा अपमानही सोसायला तयार असतो, पण सत्य तेच सांगतो! त्रास देणाऱ्या, अवमान करणाऱ्या लोकांमध्ये तो भावविवश होऊन गुंतत नाही! त्या लोकांच्या कलानं घेऊन त्यांची मर्जी राखण्याचा प्रयत्न तो करीत नाही. ‘नसे राम ते धाम सोडुनि द्यावे। सुखालागी आरण्य सेवित जावे।।’ या तडफेनं तो जगतो! इथे आता तुकाराम महाराजांच्या या अभंगाच्या अखेरचा चरणाचा सांधा चपखलपणे जुळतो!! हा चरण म्हणजे, तुका म्हणें आम्हीं केली जिवें साठी। तुम्हां आम्हां तुटी घालू आता।।
योगेंद्र – अरेच्चा! पण याचा गाथेत काय अर्थ दिलाय?
हृदयेंद्र – या चरणाचा अर्थ असा की, तुकाराम महाराज म्हणतात आम्ही जीव अर्पण केला आहे. आता तुमचा आमचा संबंध तोडून टाकू! बघा.. हा अभंग केवळ विठ्ठलाला उद्देशून असता तर पहिल्या दोन चरणांत प्रगाढ भक्तीचं दर्शन, त्यापुढल्या दोन चरणांत शब्दांचे फटके आणि अखेरच्या चरणात हे विठ्ठला आम्ही तुम्हाला जीव अर्पण केलाय, आता तुमचा आमचा संबंध तोडून टाकू, असं विधान.. अशी विसंगती शक्य आहे का? तेव्हा पहिल्या दोन चरणांत प्रगाढ भक्तीचं रूप दाखवलं, त्यापुढल्या चरणांत भक्तीचं पाखंड माजविणाऱ्यांवर ताशेरे ओढले आणि अखेरच्या चरणात पाखंडप्रेमींना तुकाराम महाराज सुनावतात की, आम्ही त्या विठ्ठलाच्या चरणी प्राण अर्पण केला आहे.. तुमच्याशी आम्ही सर्व संबंध तोडून टाकला आहे! इथे ‘प्राण’ या शब्दात जीवाचं सर्वस्व सूचित केलं आहे. प्राण असेल तरच जगणं आहे! तेव्हा विठ्ठल हाच  आमचं जीवनसर्वस्व आहे.. आम्हाला प्राणाचीही पर्वा नाही.. मग या भौतिक जगाच्या मानमरातबाच्या ओढीत आमचा प्राण गुंतेल का? छे! या जगाशी आमचा आता संबंधच उरला नाही, तर या जगातल्या मानापमानाशी संबंध कशाला उरेल, त्याचं सुख-दु:खं कशाला उरेल,  असा प्रश्नच हा चरण मांडतो.. तेव्हा भगवंताशी कसं अनन्य व्हायचं, हे नामदेवांनी, तुकाराम महाराजांनी सांगितलंय. त्या अनन्यतेचा वारसा आम्हाला का नाही, या मुद्दय़ावर नामदेवांची पोरं भांडत आहेत!!
चैतन्य प्रेम