जुगलबंदी करणारे दोघे वादक निमिषभर थांबून एकमेकांकडे पाहतात,  त्यांची ती नजरानजर तिऱ्हाइताला साधीच वाटली तरी एकाच्या नजरेत कौतुक आणि दुसऱ्याच्या नजरेत हे कौतुक स्वीकारल्याचे समाधान असे भाव तरळलेले असावेत.. हे जाणकार श्रोता कानांनीच पाहातो! असा क्षण कलानिधी एन रमणी आणि पंडित हरिप्रसाद चौरसिया या दोघा कलावंतांच्या आयुष्यात परवाच्या रविवारी आला. पहिला ‘हरिप्रसाद चौरसिया पुरस्कार’ रमणी यांना देण्याचा सोहळा ठाणे येथील बांसुरी उत्सवात २० जानेवारीस झाला आणि रमणी यांनीही कौतुक स्वीकारण्याच्या समाधानानेच हा पुरस्कार स्वीकारला! पद्मश्री मिळवलेल्या आणि १९४२ पासून २०१२ असा तब्बल सहा दशकांचा काळ ‘कर्नाटक फ्ल्यूट वादक’ म्हणून पाहिलेल्या रमणी यांना आता पुरस्कारांची मातबरी अजिबात नसूनही ते ठाण्यास आले. कर्नाटक संगीतात फ्ल्यूट रुळवण्याचे श्रेय ज्यांना जाते, त्या टी. आर. महालिंगम ऊर्फ ‘माली’ यांचे रमणी हे शिष्योत्तम. वयाच्या पाचव्या वर्षीपासून घरीच आजोबांकडून फ्ल्यूटचे धडे घेणारे रमणी, त्याच वर्षी मालींचे शिष्य झाले आणि आठ वर्षांचे असताना(१९४२) मालींच्या अनुज्ञेनेच त्यांनी पहिला जाहीर कार्यक्रम केला. १९४५ पासून ते ‘रेडिओ आर्टिस्ट’ झाले.. अर्थात, आकाशवाणीच्या राष्ट्रीय संगीत संमेलनात रमणी यांना उशीराच, १९६८ मध्ये स्थान मिळाले. तोवर कर्नाटक संगीतातील बासरीचे तंत्र आणि मंत्र समजावून देणारी व्याख्याने देण्यासाठी रमणींना देश-विदेशातून निमंत्रणे येऊ लागली होती. त्यागराज- दीक्षितार आणि शास्त्रिगळ यांच्या तिरुवरूर गावात १९३४ साली जन्मलेले रमणी, तिशीत जगभर माहीत झाले ते अमेरिकादी देशांच्या दौऱ्यांमुळे स्वत: पं. रविशंकर यांनी १९६५ मध्येच अमेरिकेचे निमंत्रण रमणींना दिले, पण ऐन वेळी रमणींचे जाणे रद्द झाले. मान वा कीर्ती यांच्यासाठी थांबून न राहता हरिप्रसाद यांच्याशी हिंदुस्तानी- कर्नाटक शैलीच्या बासरी जुगलबंदींचे कार्यक्रम रमणी यांनी त्या वेळीच स्वीकारले होते. तेव्हापासून ७० हून अधिक वेळा या दोघांची जुगलबंदी झाली आहे. ग्लॅमर नसले, तरी रमणींचा शिष्यपरिवार आणि रसिकवृंद मोठा आहे.