राजकारणात ईष्रेची भावना हवीच, पण वास्तवाचे भानही हवे. पहिल्या भावनेचा नारायण राणेंच्या मनी उदंड वास तर दुसरी औषधालाही नाही. त्यामुळे ते भलत्याच आवेशात वांद्रय़ाच्या पोटनिवडणुकीत उतरले आणि पराभूत झाले. एमआयएमचाही फुगा या निकालाने फुटल्याने तो पक्षदेखील आता जमिनीवर येऊ शकेल.

वांद्रे पूर्व आणि तासगाव पोटनिवडणुकांच्या निकालात आश्चर्य वाटावे असे काहीही नाही. तरीही त्या निकालांची दखल घेणे गरजेचे आहे. कारण त्यातून आपल्या लोकशाहीची अपरिपक्वता दिसते. ती पाहणे हे प्रचलित भावनेच्या विरोधात जाणारे असले तरी तसे करणे आवश्यक आहे. या दोन्ही विधानसभा मतदारसंघांत विद्यमान आमदारांच्या अर्धागिनी सहज विजयी झाल्या. आपल्याकडील अनुकंपेच्या अजागळ भावनेचा हा परिणाम. या दोन्ही मतदारसंघांतील विजयी आमदारांच्या अर्धागिनींना राजकारणाचा काही अनुभव होता असे नाही. बाळा सावंत आणि आर आर आबा पाटील जोपर्यंत हयात होते तोपर्यंत त्यांच्या अर्धागिनी आपापली कुटुंबव्यवस्था चालवण्यात मग्न होत्या. त्यात काहीही गर नाही. परंतु सावंत आणि पाटील या आमदारांचे निधन झाल्यावर संबंधित राजकीय पक्षांनी त्यांना निवडणुकीच्या राजकारणात ओढले. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांनी या पोटनिवडणुकांत आपापल्या दिवंगत उमेदवारांच्या कुटुंबातच उमेदवारी राहील याची काळजी घेतली. त्यांचे आडाखे अचूक होते. कारण आपली जनता किती भाबडेपणाने विचार करते आणि तो करताना मतदारांच्या मनात विचारांच्या पातळीवर कोणताही संदेहदेखील कसा नसतो याची उभय पक्षांना पूर्ण कल्पना होती. सरकारी नोकऱ्यांत एखादा कर्मचारी दिवंगत झाल्यास त्याच्या जवळच्या वारसास वा पत्नीस अनुकंपेच्या पातळीवर सेवेत सामावून घेतले जाते. मानवतेच्या दृष्टिकोनातून ते योग्यच असले तरी त्यातील नोंद घेण्याजोगी बाब म्हणजे अनुकंपा निकष लावला जात असला तरी दिवंगत व्यक्तीचेच पद कुटुंबीयास दिले जात नाही. म्हणजे दिवंगत सरकारी कर्मचारी ज्या पदावर होता त्याच पदावर त्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबीयास सामावून घेण्याचे औदार्य सरकारसुद्धा दाखवत नाही. आपल्या राजकारणात या किमान सरकारी राजकारणाचादेखील अभाव असल्यामुळे आमदार दिवंगत झाल्यास त्याच्या पत्नी वा मुलास आमदारकीचे तिकीट दिले जाते आणि खासदाराचे निधन झाल्यास त्याची पत्नी वा कुलदीपक लोकसभा निवडणूक लढवतो. त्यातही कहर म्हणजे तो तो राजकीय पक्ष इतर राजकीय पक्षांना दिवंगत उमेदवाराच्या कुटुंबीयांच्या विरोधात उमेदवार न देण्याचे आवाहन करतो आणि एरवी ज्यांच्यामधून विस्तवदेखील जात नाही असे राजकारणी या मुद्दय़ावर एकमताने विचार करतात. जणू काही दिवंगत उमेदवाराची जागा ही त्या त्या कुटुंबालाच आंदण देण्यात आली आहे. यातील गंभीर बाब म्हणजे दिवंगत नेता लोकसभा उमेदवार असेल तर त्याची पत्नी वा एखादा चिरंजीव लोकसभा निवडणूक लढवते/लढवतो आणि दुसरे चिरंजीव ती विधानसभा निवडणूक लढवतात. उदाहरणार्थ दिवंगत गोपीनाथ मुंडे. त्यांच्या अकाली निधनानंतर एक कन्या लोकसभेत गेली तर दुसरी विधानसभेत. श्रीमती पाटील, श्रीमती सावंत वा कु. मुंडेकन्या यांच्याविषयी आमच्या मनात कोणताही आकस नाही. असा आकस बाळगावा असे काहीही नाही. किंबहुना या तीनही नेत्यांशी आमचे सौहार्दाचे संबंध होते. आमचा मुद्दा इतकाच की हे असे अनुकंपेचे राजकारण करणे हे लोकशाही प्रौढ होण्याच्या वाटेवरील महत्त्वाचा अडसर आहे. यातून राजकीय पक्षांची लबाडी आणि मतदारांचा बावळटपणा याचेच दर्शन होते. असो. तरीही या दोन्ही पोटनिवडणुकांपकी वांद्रय़ातील पराभवाचे सविस्तर विश्लेषण आवश्यक ठरते.
याचे कारण या निवडणुकीत माजी शिवसेना नेते नारायण राणे यांनी आपली ताकद पणाला लावली होती. शिवसेनेचे संस्थापक दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या हातून ज्या काही ऐतिहासिक घोडचुका घडल्या त्यातील एक म्हणजे राणे यांची पदोन्नती. त्यांना बढती देऊन आपण मनगटशाहीचा उघड कैवार घेत आहोत, याचा जराही विचार दिवंगत ठाकरे यांनी केला नाही. त्यांनी केवळ मातोश्रीवर रसद पाठवण्याची क्षमता हाच निकष लावला आणि राणे यांना मुख्यमंत्री केले. त्याची किंमत सेनेस द्यावी लागली. राणे यांनी पुढे पक्ष सोडला. सेनेसमोर नाक खाजवता येईल याच उद्देशाने राणे यांना काँग्रेसने आपले म्हटले. तसे करून आपण काय विकतचे दुखणे घेत आहोत याची प्रचीती काँग्रेसला लगेचच आली. राणे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याविरोधात बंड करून थेट मुख्यमंत्रिपदालाच हात घातला. काँग्रेसमध्ये शीतपेयदेखील थंडा करके पियो असा नियम असतो. हे राणे यांना अद्यापही उमगलेले नाही. खेरीज त्या पक्षातील प्रत्येकाचा मी हा चेचून नष्ट केला जातो. राणे यांना हेही लक्षात आले नाही. त्यांचा अहं त्यांच्यापेक्षाही मोठा होता. परिणामी काँग्रेस त्यांच्याकडे दुर्लक्ष करणार हे उघड होते. तसेच झाले. काँग्रेसमध्ये राणे अडगळीत पडले. अशा वेळी अपरिपक्वता दाखवून पक्षश्रेष्ठींच्या चरणी लीन  होण्यास राणे यांनी नकार दिला. त्यात त्यांना त्यांच्या दोन चिरंजीवांनी भरीस घातले नसेलच असे नाही. राणे घोडय़ावरून उतरण्यास तयार नाहीत आणि त्यांचे एकापेक्षा एक तोडीस तोड दोन्ही सुपुत्र तर उडत्या घोडय़ावर स्वार. वास्तव हे आहे की या राणे कुटुंबीयांनी सिंधुदुर्गकिनारी धुमाकूळ घातला असून त्यांच्या अरेरावीस सामान्य जनता कमालीची विटलेली आहे. या वास्तवाचे भान नसलेल्या राणे आणि पितापुत्रांना लोकसभा, विधानसभा अशा दोन्ही निवडणुकांत अखेर मतदारांनीच इंगा दाखवला. कोकणच्या किनारपट्टीवर सूर्यदेखील आपण सांगितल्यास पश्चिमेला उगवेल असा राणे कुटुंबीयांचा तोरा होता. तो दोन वेळा मतदारांनी उतरवला. ज्या प्रदेशाचे आपण अनभिषिक्त सम्राटच असे ज्यांचे वर्तन होते त्यांना हे पराभव हा इशारा होता. तोदेखील समजण्याचे राणे यांनी नाकारले. अशा वेळी एखादा शांतपणे आपल्या प्रतिमासंवर्धनाच्या कामी लागला असता. राणे यांना त्याची गरज वाटली नाही. त्यामुळे सेनेच्या मुखात जाऊन सिंधुदुर्गाच्या घरात जे जमले नाही ते वांद्रय़ाच्या अंगणात करून दाखवण्याची त्यांची ईर्षां जागृत झाली. राजकारणात ईष्रेची भावना हवीच. पण वास्तवाचे भानही हवे. पहिल्या भावनेचा राणेंच्या मनी उदंड वास तर दुसरी औषधालाही नाही. त्यामुळे ते भलत्याच आवेशात या निवडणुकीत उतरले. जोडीला त्यांचे ते दिव्य सुपुत्र. त्यामुळे काँग्रेसमध्येदेखील आपण निवडून आलेले कोणाला नको आहे, हे त्यांना लक्षातही आले नाही. नवे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या मनातील किंचितशी सहानुभूती वगळता राणे विजयी व्हावेत असे मुंबईचे अध्यक्ष संजय निरुपम वा विधानसभेतील काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनादेखील वाटत नव्हते. कृपाशंकर यांच्यासारखा बाजारबुणगा सोडला तर राणे यांना कोणाचीही साथ नव्हती. अगदी या मतदारसंघातील कोकणी मतदारांचीदेखील. त्यामुळे मुस्लीम मतदारांची मते आपल्याला मिळावीत यासाठी एमआयएमशी छुप्या तहासह अनेक खटपटी काँग्रेसने करून पाहिल्या. त्या सर्व पाण्यात गेल्या. अखेर मतदारांनी राणे यांना दोन्ही हातांनी भरभरून धूळ चारली. राणे यांनी ही निवडणूक विनाकारण प्रतिष्ठेची केली नसती तर हे धुळीचे प्रमाण काही प्रमाणात का होईना कमी झाले असते. परंतु एकदा एखाद्याचा अहं मोठय़ा प्रमाणात वाढला की विवेक विस्थापित होतो. या निवडणुकीच्या निमित्ताने हे पुन्हा एकदा दिसून आले. एमआयएमचाही फुगा या निकालाने मोठय़ा प्रमाणावर फुटला. त्या पक्षाचे राजकारणही विवेकाच्या थडग्यावरच आधारित होऊ लागले आहे. आताच्या निकालाने तो पक्षदेखील जमिनीवर येऊ शकेल.
अशा तऱ्हेने या निवडणुकीने अनेकांना बरेच काही शिकवले. अर्थात जे काही शिकू इच्छितात त्यांनाच. एरवी पराभूतांचा पराजय एवढाच या निवडणूक निकालाचा अर्थ.