आंतरराष्ट्रीय संबंध आणि मुत्सद्देगिरी गोगलगायीच्या गतीनेच चालत असतात. त्यात प्रश्न भारत आणि पाकिस्तान या दोन देशांसारखा गुंतागुंतीचा असेल तर ही गोगलगायदेखील मंदावते. मंगळवारची मोदी-शरीफ चर्चा केवळ शिष्टाचार होती आणि तीतून पंतप्रधान मोदी यांनी काही साध्य करून दाखवणे अपेक्षितच नव्हते.. असे असताना मोदी यांनी किती कडक मागण्या पाकिस्तानपुढे ठेवल्या, अशा बातम्या पेरणे हे मोदींच्याच प्रयत्नांना खीळ घालणारे ठरेल..
बंदुकांचा आणि तोफगोळय़ांचा आवाज येत असेल तर चर्चा कानावर येत नाही, असे मत नरेंद्र मोदी यांनी निवडणूक प्रचारसभांत वारंवार व्यक्त केले होते. त्या प्रचार सभांनंतरच्या निवडणुकांत मोदी यांना सत्ता मिळाली आणि हे बंदुकांचे आणि तोफगोळय़ांचे आवाज शांत व्हायच्या आत त्यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्याशी चर्चा करण्याचे ठरवले. निवडणूक प्रचारसभा आणि सत्तांतर या काळात भारत-पाक सीमेवरील परिस्थिती मूलत: बदलली असे नव्हे. तरीही मोदी यांना पाकिस्तानशी चर्चा करावीशी वाटली. सत्ता ही व्यक्तीस सहनशील होण्यास कशी भाग पडते, याचे हे उदाहरण. तेव्हा मोदी यांच्या इच्छेस मान देत शरीफ यांनी दिल्ली गाठली आणि भारताच्या पहिल्या पूर्ण बिगरकाँग्रेसी सरकारच्या शपथविधीस हजेरी लावली. शरीफ यांची ही भारतभेट म्हणजे दोन देशांतील संबंधांचा नवा अध्याय असल्याचा दावा काही चॅनेलीय चर्चकांनी केला होता. शरीफ हे मोदी यांच्या शपथविधीस आल्याने काहींचा उत्साह इतका उचंबळून आला की पाकिस्तानी पंतप्रधान त्यांच्या भारतभेटीत आपणास विशेष प्राधान्य दर्जा देण्याची घोषणा करतील, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील व्यापारउदिमास मोठी गती मिळेल अशीही भाकिते वर्तवली गेली. पण असे काहीही झाले नाही. कारण ते होणारच नव्हते. याचे कारण आंतरराष्ट्रीय संबंध आणि मुत्सद्देगिरी गोगलगायीच्या गतीनेच चालत असतात. त्यात प्रश्न भारत आणि पाकिस्तान या दोन देशांसारखा गुंतागुंतीचा असेल तर ही गोगलगायदेखील मंदावते. भारताच्या पंतप्रधानपदाची सूत्रे घेऊन २४ तासही व्हायच्या आत पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणाऱ्या नरेंद्र मोदी यांना या मंद वास्तवाची जाणीव नक्कीच झाली असेल. मोदी यांना चेंडू दुसऱ्याच्या हद्दीत तटवायला आवडते. तो त्यांच्या राजकारणी चातुर्याचा भाग आहे. त्याच चातुर्यातून त्यांनी दक्षिण आशियाई देश प्रमुखांना शपथविधी सोहळय़ासाठी बोलावले आणि अनेकांची, विशेषत: शरीफ यांची, पंचाईत करून टाकली. आमंत्रण स्वीकारावे तर पाकिस्तानातील कडवे भारतद्वेषी पडते घेतले म्हणून डोक्यात राख घालणार आणि न स्वीकारावे तर दोस्तीचा हात झिडकारल्याचे पातक कपाळी चिकटायची भीती. या धोक्यांमधील त्यातल्या त्यात कमी धोका शरीफ यांनी पत्करला आणि मोदी यांच्या शपथविधीस हजेरी लावली. आंतरराष्ट्रीय संबंधांकडे फार लांबून पाहणाऱ्यांना शरीफ यांनी निमंत्रण स्वीकारणे हा मोदी यांचा विजय वाटतो. चीनची कोंडी करण्यासाठी इतर देशांनी असे एकत्र येण्याची गरजच होती, असे अनेक पुस्तकी पंडितांना वाटून गेले. सारेच हास्यास्पद. हे असे या मार्गाने चीनला एकटे पाडण्याचे स्वप्न पाहणे म्हणजे वारावर दिवस काढणाऱ्यांनी एकत्र येऊन यजमानाची कोंडी करण्याची इच्छा बाळगण्यासारखेच. अन्य काहींनी लगेचच मोदी यांच्या बुद्धिचातुर्याचे गोडवे गायला सुरुवात केली आणि आता कसे अडकले शरीफ असे म्हणत एकमेकांना टाळय़ाही दिल्या. परंतु यांतून असे टाळय़ा देणारे आणि शरीफ यांना विरोध करताना अणुबॉम्बची भाषा करणारे शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यासारखे या दोन्ही गटांचे गाढ अज्ञान दिसून आले. पाकिस्तानने आपले उद्योग थांबवले नाहीत तर अणुबॉम्बचे बटण दाबावे असा सल्ला शिवसेनाप्रमुखांनी देऊन आपल्या पक्षाचे बौद्धिक वय अधोरेखित केले. आंतरराष्ट्रीय संबंधांत शत्रूशीही चर्चा करावी लागते. या चर्चातून काहीही निष्पन्न नाही झाले तरी काहीच चर्चा न होण्यापेक्षा निष्फळ तर निष्फळ पण बोलणी होत राहाणे महत्त्वाचे असते. मंगळवारी तेच झाले. मोदी समर्थक वा शरीफ विरोधक यांनी या चर्चेवर तावातावाने भाष्य करण्याची खरे तर गरज नाही. याचे कारण मोदी यांच्या या कृतीमागे आंतरराष्ट्रीय नव्हे तर देशी वर्ग होता. मोदी ज्या पक्षातून येतात आणि ज्या पद्धतीच्या राजकारणासाठी ते ओळखले जातात ते अल्पसंख्याकांना आवडेल असे नाही. त्यातही पाकिस्तान हा भाजपच्या द्वेषाचा खास आवडता विषय आहे. पाकिस्तानविरोधात सतत युद्धखोरीची भाषा करून हवा तापवणे मोदी यांच्या पक्षाचा आवडता खेळ. या पाश्र्वभूमीवर विशिष्ट धर्मीयांविरोधात मोदी यांची काय भूमिका असेल याची अटकळ अनेकांनी बांधलेली होती. तीत मोदी हे पाकिस्तानशी भारताचे संबंध सौहार्दाचे राहतील यासाठी प्रयत्न करतील असे अनेकांना वाटत नव्हते. मोदी यांनी नेमके तेच केले आणि आपल्या धक्कातंत्राचा पुन्हा एकवार अनुभव दिला. येथपर्यंत सारे ठीक.
परंतु मग शरीफ आणि मोदी यांच्यातील चर्चा संपल्या संपल्या त्यात काय घडले त्याची बातमी पेरण्याची घाई करून परराष्ट्र खात्यातील अधिकाऱ्यांनी काय साधले? या चर्चेत मोदी यांनी दहशतवादाविरोधात कशी कडक भूमिका घेतली याचा निवडक तपशील वार्ताहरांच्या कानात सोडण्यात आला आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी मोदी यांच्या नेतृत्वाचे गुणगान सुरू केले. हे खरे तर मोदी यांच्या चर्चाप्रयत्नांना खो घालणारे होते. याचे कारण असे की ही चर्चा केवळ शिष्टाचार होती आणि तीतून पंतप्रधान मोदी यांनी काही साध्य करून दाखवणे अपेक्षितच नव्हते. हे दोन नेते जेमतेम ४५ मिनिटे भेटले. त्यातील सुरुवातीची दहा मिनिटे आगतस्वागतात गेली असे गृहीत धरले तर दोन्ही नेत्यांना बोलण्यासाठी जेमतेम अर्धा तास मिळाला असेल. बरे, इतक्या कमी वेळाच्या चर्चेतूनही महत्त्वाचे निर्णय होतात, त्यामागे अनेक महिन्यांची उभयपक्षी तयारी असावी लागते. ती इथे नव्हती. तेव्हा अशा या बोलण्यातून भारत-पाक संबंधांना नवी दिशा मिळेल वगैरे असे मानणे हा भोळसटपणा म्हणावयास हवा. असे असताना मोदी यांनी भारतासाठी महत्त्वाच्या असलेल्या कुख्यात दाऊद इब्राहीम, हफीज सईद, २६/११ हल्ल्यातील आरोपींना शिक्षा आदी अनेक मुद्दय़ांवर शरीफ यांच्यासमोर परखड भूमिका घेतली, असे आपल्या परराष्ट्र अधिकाऱ्यांनी सांगणे ही फार तर वरिष्ठांची खुशामत म्हणावी लागेल. याच भरात, मोदी यांनी शरीफ यांच्यासमोर आपला पाच सूत्री कार्यक्रम ठेवला असेही सांगितले गेले. हे खरे असेल तर त्यावर शरीफ यांनी काय मत व्यक्त केले, हा प्रश्न उरतो. त्याबाबत मात्र सोयीस्कर मौन बाळगण्यात आले. या तुलनेत पाक पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे निवेदन अधिक प्रौढ होते, असे म्हणावयास हवे. शरीफ यांनी आपल्या काटेकोरपणे रचलेल्या निवेदनात कोणत्याही मुद्दय़ाचा उल्लेखदेखील केला नाही आणि उभयतांतील चर्चा सकारात्मक झाल्याचे तेवढे नमूद केले. या परिसरात कायमस्वरूपी शांतता आणि सलोखा नांदावा अशी इच्छा असेल तर एकमेकांबद्दलचे अविश्वासाचे वातावरण संपुष्टात आणावे लागेल, असेही शरीफ म्हणाले. दोन्ही देशांनी आरोप प्रत्यारोप करणे थांबवण्याची आणि संघर्षांच्या वातावरणाचे रूपांतर सहकार्यात करण्याची गरज शरीफ यांनी व्यक्त केली.
याचाच अर्थ हे सारे उद्योग भारताकडूनही सुरू असल्याचे त्यांनी अप्रत्यक्षपणे सूचित केले असून भारतीयांनी सर्व समस्यांसाठी केवळ पाकिस्तानलाच दोष देणे योग्य नाही असा त्याचा अर्थ आहे. म्हणजेच आपल्या निमंत्रणावरून भारतात येऊन नवाज शरीफ आपल्यालाच शहाणपणा शिकवून गेले आहेत. त्यांना ती संधी मिळाली, अर्थातच मोदी यांच्या निमंत्रणामुळे. यावरही मोदी यांचे कौतुक करावे काय?