पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तृत्वशैलीला तोड नाही. ते उत्कृष्ट वक्ते आहेत, उत्तम वाचिक-अभिनेते आहेत, उपमा, उत्प्रेक्षा, अनुप्रास अशा अलंकारांनी नटलेले त्यांचे िहदीतील भाषण श्रोत्यांच्या काळजाचा ठाव घेऊन जाते. हे भारतात सिद्ध झाले आहे. तेच संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेतही दिसून आले. एवढेच नव्हे तर त्यांच्या इंग्रजी भाषणाने अमेरिकेतील तरुणाईही मोहून गेल्याचे चित्र दिसले. न्यूयॉर्कच्या सेन्ट्रल पार्कमध्ये सध्या विश्वनागरिक महोत्सव सुरू आहे. तेथे गाणीबजावणी चालतात. त्यातून सामाजिक संदेश दिला जातो. सोहळा मोठा असतो. त्याच्या आयोजकांनी मोदींना आमंत्रित केले. तेथे त्यांनी छोटेसे भाषण दिले. त्यात िहदीचा डौल नव्हता. पण त्यांचा स्वच्छतेचा, आरोग्याचा मंत्र लोकांना भावला. ‘एक्स मेन’ चित्रमालिकेतील अभिनेता ह्यूज जॅकमन हा त्या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक. त्याने तर या भाषणानंतर मोदींना मिठी मारून त्यांची पाठ थोपटली. पण या कार्यक्रमाला सौहार्दसंवर्धनापलीकडे मूल्य नाही. ओबामा मुंबईत येऊन कोळीनृत्य करतात. तसेच हे. महत्त्वाचे भाषण होते ते संयुक्त राष्ट्रांतील. मोदींच्या भाषणाच्या आदल्या दिवशीच तेथे पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ बोलून गेले. पाकिस्तानी नेते संयुक्त राष्ट्रांत बोलू लागले की त्यांना काश्मीरशिवाय अन्य काही दिसत नाही. काश्मीर हे भारतीय उपखंडातील पॅलेस्टिन आहे, हे िबबवण्याचा त्यांचा नेहमीचाच कावा असतो. शरीफ यांनीही तेच तुणतुणे वाजविले. आम्हालाही शांतता हवी आहे. पण काश्मीरचा प्रश्न अजून सुटलेला नाही. तो सोडविण्याची जबाबदारी आंतरराष्ट्रीय समुदायाची आहे. हे त्यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे. तिकडे पाकिस्तानात शरीफ यांची सत्ता डळमळीत आहे. बिलावल भुट्टो आदी मंडळी आम्ही सत्तेवर आल्यावर काश्मीर घेऊन टाकू अशा वल्गना करीत आहेत. या परिस्थितीत शरीफ असे बोलले नसते तरच नवल. याला मोदी काय उत्तर देतात हा महत्त्वाचा प्रश्न होता.  पाकबाबत मोदी यांचा सूरही तसा चढाच असतो हा पूर्वीचा अनुभव आहे. परंतु मोदी यांनी याबाबत आपल्या अनुयायांची निराशाच केली. आधीची सरकारे ज्या भाषेत बोलत होती तीच भाषा त्यांनी वापरली. हा प्रश्न संयुक्त राष्ट्रांत उपस्थित करून उपयोग नाही. शांतता, चर्चा आम्हालाही हवी आहे. पण ती दहशतवादाच्या छायेत होऊ शकत नाही, असे मोदी यांनी संयत पण ठामपणे सांगितले. त्यांचा तो सूर अभिनंदनीय असाच होता. अशा व्यासपीठांवर सिंहगर्जना करून केवळ ध्वनिप्रदूषण होते. सभा गाजते. बाकी परिस्थिती तीच राहते. मोदी यांच्या भाषणामध्ये ती जाणीव होती. खरे तर त्यांच्या वक्तव्याचा गाभा काही वेगळाच होता. जागतिक भान असलेला नेता जसे बोलेल तसे ते बोलले. दहशतवाद, जागतिक राजकारणाचे एकध्रुवीकरण येथपासून आरोग्यापर्यंतचे अनेक मुद्दे त्यांच्या भाषणात होते. संयुक्त राष्ट्रांचा प्रभाव आणि विश्वासार्हता वाढावी असे सांगतानाच कोणताही एकच एक देश जगाच्या समस्या सोडवू शकणार नाही, असा चिमटाही त्यांनी काढला. तो अर्थात अमेरिकेला होता. सेन्ट्रल पार्कमध्ये त्यांनी संस्कृत श्लोक म्हटला. संयुक्त राष्ट्रांत त्यांनी योगाचे महत्त्व अधोरेखित केले. आपण आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करावा असे सांगताना ते थेट वातावरणबदलाच्या समस्येपर्यंत पोचले. भारतीय संस्कृतीचा अवलंब केल्यास जगाच्या अनेक समस्या सुटतील या विश्वासाच्या संस्कारात वाढलेले मन असेच बोलणार. तेव्हा त्यात काही विशेष नाही. एकंदर त्यांचे हे संयुक्त राष्ट्रांतील पहिलेवहिले भाषण अपेक्षेनुसार उत्तमच झाले. आता जागतिक समुदायालाही प्रतीक्षा असेल ती शब्दांना कृतीची जोड केव्हा मिळते याची.