भाजपमधल्या अंतर्गत सुंदोपसुंदीमुळे काँग्रेसच्या विरोधाची धार आपोआपच कमी झाली आहे. मोदींचे महत्त्व इतके वाढले आहे की, त्याची मर्जी राखण्यासाठी बडय़ा भाजप नेत्यांनीदेखील जी-हुजुरी सुरू केली आहे.
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी हेच पक्षाचे सर्वेसर्वा आहेत, असे चित्र रंगविले जात असले तरी प्रत्यक्षात ते तसे नाही. मोदींना पंतप्रधानपदी विराजमान करण्यासाठी संघ परिवार झपाटय़ाने कामाला लागला आहे. परंतु ‘नमो-नमो’ करणे संघाचे काम नाही, हा सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी अलीकडे दिलेला संदेश सूचक आहे. सरसंघचालकांचा हा संदेश भाजपमधल्या मोदीविरोधी गटासाठी सुखावणारा आहे. नाहीतरी दिल्लीतल्या नेत्यांना मोदींसारख्या बाहेरच्या नेत्याने दिल्लीत यावे, मोठे व्हावे, हे रुचण्यासारखे नाही. त्यामुळे ऐन रणधुमाळीत लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांची नाराजी व्यवस्थितपणे प्रसारमाध्यमांपर्यंत पोहोचवली जाते. यामागे स्वराजच नव्हे तर पंतप्रधापनदाची आस अद्यापही बाळगून असलेले लालकृष्ण अडवाणी हे देखील आहेत. सक्रिय राजकारणात अडवाणींना मार्गदर्शक, प्रेरक,  श्रद्धास्थान वगैरे.. अशी विशेषणे चिटकवून भाजपच्या पहिल्या फळीतल्या नेत्यांनी विजनवासात ढकलले .ं अडवाणींनीच उणीव भरून काढण्यासाठी सध्या स्वराज पुढे सरसावल्या आहेत. त्यांचाही भाजपमध्ये स्वतंत्र असा गट आहे.  त्यामुळे सत्ताप्राप्तीच्या महत्त्वाकांक्षेतून होणाऱ्या घुसळणीमुळे पक्षांतर्गत सुंदोपसुंदी चव्हाटय़ावर येईल.
भाजपमध्ये उमेदवारी वाटप अगदी अलीकडच्या काळापर्यंत कसे होत होते, हे साऱ्यांनी पाहिले. माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी राज्यसभेसाठी कुणा परदेशातील भारतीय उद्योजकाच्या नावाचा आग्रह धरला होता. तेव्हा पक्षातून त्यांच्याविरोधी सूर उमटू लागला. तेव्हापासून गडकरी यांच्या प्रत्येक निर्णयाला विरोध करणाऱ्यांची मोठी फळी पक्षात तयार झाली. मनसेशी युती करण्याबाबत खुद्द नरेद्र मोदी अत्यंत गंभीर आहेत. महाराष्ट्रात शिवसेना नेतृत्वाची स्वपक्षीयांवरील पकड सैल होत असल्याने मनसे काँग्रेसच्या गळाला लागण्यापूर्वी भाजपसोबत आणण्यासाठी गडकरींनी पुढाकार घेतला होता. परंतु बोलणी फिस्कटल्यावर गडकरी तोंडघशी पडले.
हल्ली तर उमेदवारी वाटपाच्या घोषणेचा मुहूर्तदेखील गुजरातमधील प्रथा-परंपरा पाहून निश्चित केला जातो. गुजरातमध्ये होळीनंतर पुढचे आठ दिवस कोणतेही शुभकार्य केले जात नाही. खरेदी-विक्री, नवीन व्यापार करता येत नाहीत. व्यापारी मनोवृत्तीचा गुजराती माणूस ‘होलिकाष्टक’ कटाक्षाने पाळतो. म्हणून होळीच्या आदल्या दिवशी रात्री अकरा वाजता भाजपने यादी प्रसिद्ध केली.  ज्यात प्रामुख्याने नरेंद्र मोदी, मुरली मनोहर जोशी, राजनाथ सिंह, अरुण जेटली यांसारखी बडी नावे आहेत. दिल्लीच्या सातही जागांसाठीदेखील उमेदवार घोषीत करण्यात आले. दिल्लीत पहिल्या टप्प्यात मतदान होणार असल्याने दिल्लीचे उमेदवार पहिल्याच यादीत प्रसिद्ध होणे आवश्यक होते. परंतु केवळ चांगल्या मुहूर्ताची वाट पाहण्यात भाजप नेत्यांचा वेळ गेला. एकेक उमेदवार निश्चित करताना प्रचंड सावधगिरी भाजप नेत्यांनी बाळगली. एरव्ही राज्यसभेत आनंदी राहणाऱ्या अरुण जेटली यांना लोकसभेचे वेध लागले आहेत. पक्के दिल्लीकर असलेले अरुण जेटली यांना गेल्या कित्येक वर्षांत स्वतसाठी मतदारसंघ तयार करता आला नाही. अमृतसरमधून जेटली निवडणूक लढविणार असल्याचे निश्चित झाल्यानंतर खासदार नवज्योत सिंह सिद्धू यांना पक्षनेत्यांनी मुख्यालयात बोलावून निर्णयाची माहिती दिली. भाजपवर नाराज असलेले सिद्धू  मोदींना इतके वचकून आहेत की त्यांना नाही म्हणवलेच नाही. कारण, सध्यातरी दिल्लीत अरुण जेटली जणू काही पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्र्यांसारखेच वावरत आहेत. कोणत्याही विषयावर जेटली मत प्रकट करतात. आपला विचार म्हणजे मोदींचा विचार, असा संभ्रम निर्माण करण्यात जेटली यशस्वी झाले आहेत. हेच खरे अडवाणी गटाचे दुखणे आहे.
अडवाणी गटाच्या प्रवक्त्या सुषमा स्वराज यांचे कधीकाळी कर्नाटकवर अत्यंत प्रेम होते. भगिनी सुषमा यांच्यासाठी खाणसम्राट रेड्डी दरवर्षी न चुकता सणासुदीला भेटवस्तू पाठवत असत. त्यामुळे कर्नाटकमध्ये आपले ऐकले जाते, असा त्यांचा कालपरवापर्यंतचा समज होता. बेल्लारी खाण घोटाळ्यातील आरोपी श्रीरामलू यांना भाजपमध्ये सामील करून घेण्यास विरोध करणाऱ्या स्वराज यांनी येडियुरप्पांच्या भ्रष्टाचाराविरोधात चकार शब्दही का काढला नाही?  मुळात श्रीरामलू हे अल्पसंख्याक समुदायाचे आहेत. त्यामुळे या श्रीरामाचे भाजपला कौतुक! जोपर्यंत कर्नाटकातील भ्रष्टाचाराची कोटय़वधींची रक्कम पक्षनिधीच्या नावावर जिरवली जात होती तोपर्यंत स्वराज यांना खाण घोटाळा करणारे बंधूसम भासत होते. मग आत्ताच का हे बंधूप्रेम आटले?  अर्थात हे विचार स्वराज यांचे नाहीच. त्यामागे आहेत पक्षातील ज्येष्ठ-श्रेष्ठ नेते. अस्तित्वाची लढाई असल्याने येनकेनप्रकारे आपले उपद्रवमूल्य दाखवून देण्यासाठी भाजपचे पहिल्या फळीतील अनेक नेते धडपडत आहेत.
नरेंद्र मोदी यांचाच पक्षावर एकछत्री अंमल असता तरी उमेदवार निश्चितीसाठी इतकी मारामारी झाली नसती. मोदींचे लक्ष्य फक्त गुजरातमधील लोकसभेच्या जागा आहेत. सर्वच्या सर्व जागा निवडणून आणा, असा मोदीहुकूम आहे. मोदींसाठी न भूतो.. संघ परिवार कामाला लागला आहे. ही पहिलीच निवडणूक अशी आहे, ज्यात अगदी बूथपातळीपर्यंत संघपरिवाराने स्वतची यंत्रणा मैदानात उतरवली आहे. हे मोदींसाठी नव्हे तर ‘परिवर्तनासाठी’ आहे; हे कार्यकर्त्यांना सांगण्याची संघनेत्यांची धडपड आहे. उत्तर व मध्य भारतात होळी उत्साहात साजरी केली जाते. होली‘मीलन’ कार्यक्रमाच्या निमित्ताने नेत्यांच्या गाठीभेटी होतात, राजकीय विषयांवर चर्चा होते. यंदा मात्र आचारसंहिता असल्याने एरव्ही राजकीय पक्षाच्या नेत्यांकडून आयोजित केले जाणारे होली मिलनाचे कार्यक्रम संघ परिवाराच्या माध्यमातून आयोजित केले जात आहेत. प्रत्येक मतदारसंघाचा आढावा, त्यासाठी बूथ स्तरापर्यंतची यंत्रणा कार्यान्वित करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. हेच अडवाणी गटाचे दुखणे आहे. कारण, काँग्रेसच नव्हे तर डावे पक्षदेखील सध्या देशात ‘लाट’ असल्याचे मान्य करतात. त्यामुळे रालोआचा आकडा २०० च्या आत राहिल्यास भविष्यात आपल्याला(च) संधी मिळेल अशी आशा या गटाला आहे. हा जसा अडवाणी गट राष्ट्रीय स्तरावर आहे, तसेच गट-तट प्रत्येक राज्यांत आहेत.  महाराष्ट्रात महाजन गट होता. महाजनांनंतर या गटाचे नेतृत्व गोपीनाथ मुंडे यांच्याकडे आले. विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे मुंडेसमर्थक मानले जातात. जळगाव  जिल्ह्य़ातील दोन्ही उमेदवार खडसे स्वतच ठरवत असत. ‘निवडून आले तरी तुझे, पराभूत झालेत तरी तुझे’, इतक्या स्पष्ट शब्दांत खडसेंच्या निर्णयाला महाजनांचे समर्थन असे. आता मात्र परिस्थिती बदलली आहे. भाजपच्या पहिल्याच यादीत रावेरमधून विद्यमान खासदार हरिभाऊ जावळे यांना उमेवारी घोषित झाली. ही घोषित उमेदवारी मागे घेऊन स्वतची सून रक्षा यांना उमेदवारी द्या, असा आग्रह खडसेंनी पक्षनेत्यांकडे धरला. परंतु आता तशी होण्याची शक्यता नाही. कारण, महाराष्ट्रात मुंडे-गडकरी यांच्याबरोबरीने प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांचे मत विचारात घेतले जाते. हे वरकरणी पाहता केवळ निर्णयप्रक्रियेत नेत्यांचा सहभाग असे दिसते. परंतु, हा प्रकार म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून काही जणांचे नेतृत्व पुढे आणून भारतीय जनता पक्षाचा ‘मेकओव्हर’ करण्याचा संघपरिवाराने चालवलेला ‘मोदी-प्रयोग’ आहे. याशिवाय राज्यांतर्गत गट-तट मोडीत काढून नवे नेतृत्व पुढे आणण्याची महत्त्वकांक्षी योजना आहे.
गलितगात्र काँग्रेसला नेतृत्वाची चिंता भेडसावत आहे. तिकडे भाजपमध्ये याच्या विपरित स्थिती आहे. काँग्रेसकडे नेता नाही व भाजपमध्ये गरजेपेक्षा जास्त नेते आहेत.  समोरून एकसंघ दाखविण्याची भाजप नेत्यांची धडपड आहे. सध्यातरी भाजपची स्थिती संत्र्यासारखी आहे. वरून एकच दिसत असले तरी आतून प्रत्येक फोड वेगळी. मोदींच्या नावावर भाजप एकजूट झाला. पण वरवरच. हा तर्क भाजपसमर्थकांना झोंबू शकतो. परंतु गेल्या महिनाभरातील प्रचार पाहता याची खात्री पटू शकेल. प्रचारादरम्यान सुषमा स्वराज कुठे आहेत, अडवाणी-मुरली मनोहर जोशी कुठे आहेत, हा प्रश्न कुणाकडूनही विचारला जात नाही. श्रीरामलूंच्या भाजपप्रवेशाचा विरोध सुषमा स्वराज यांना ट्विटरवरून व्यक्त करावा लागला, हा दैवदुíवलास आहे. दीनदयाल शोध संस्थानचे प्रवर्तक दिवंगत समाजसेवक नानाजी देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्त दिल्लीत एक कार्यक्रम झाला होता. त्या कार्यक्रमात सुषमा स्वराज व संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी उपस्थित होते. निवेदक स्वराज यांचा उल्लेख  ‘नेता प्रतिपक्ष’ असा करून देत होता. त्यावर स्वराज नाराजी व्यक्त करताना म्हणाल्या होत्या, मी लोकसभेत ‘नेता प्रतिपक्ष’ आहे. हा आपला (परिवाराचा) कार्यक्रम असेल तर मग मी इथे ‘नेता प्रतिपक्ष’ कशी?  आपल्या परिवारातील कार्यक्रमात मी नेता स्वपक्ष आहे ! हा प्रसंग साधारण दीड वर्षांपूर्वीचा. तेव्हा पंतप्रधानपदाच्या उमेदवारीवर संघ परिवारात चर्चा सुरू  होती. चेहऱ्याचा शोध सुरू होता. लालकृष्ण अडवाणी श्रद्धेय वगैरे व्हायचे होते. आज स्वराज ‘नेता प्रतिपक्ष’ आहेत.
भाजपमधल्या अंतर्गत सुंदोपसुंदीमुळे काँग्रेसच्या विरोधाची धार आपोआपच कमी झाली आहे. मोदींचे महत्त्व इतके वाढले आहे की, त्याची मर्जी राखण्यासाठी बडय़ा भाजप नेत्यांनीदेखील       जी-हुजुरी सुरू केली आहे. वाजपेयींना संदेश द्यायचा असल्यास संघाची स्वतची यंत्रणा होती. निरोप पोहोचविण्यासाठी ‘समन्वय’ साधणारे नेते होते. मोदींबाबत असे म्हणण्याचे धाडस कुणाकडेही नाही. मोदींचा ‘निकटवर्तीय’ अशी एकाही दिल्लीस्थित नेत्याची प्रतिमा नाही. यामागे मोदीच आहेत. स्वतच्या हातात सारी सूत्रे ठेवायची, हा मोदींच्या स्वभावातील गुण व दोषही आहे. त्यामुळे मोदी उद्या दिल्लीत आलेच तर त्यांच्या जागी गुजरातमध्ये कोण, असा प्रतिप्रश्न विचारण्याची हिंमत भाजपच्या एकही नेत्यामध्ये नाही. मोदीवगळता याचे उत्तर सध्यातरी कुणाकडेही नाही. भाजपमधील एकाधिकारशाहीचा हा परमोच्च बिंदू आहे.