जनुकांच्या, व्यक्तींच्या, आप्तांच्या, समुदायांच्या, संपूर्ण जीवकुळींच्या अशा नानाविध पातळ्यांवर साकारत राहणाऱ्या निसर्गनिवडीतून जीवसृष्टीचे वैविध्य खुलत राहते..
माझे गुरू, पक्षितज्ज्ञ सलीम अली लहानपणी मोठे शौकीन शिकारी होते. हरतऱ्हेच्या पक्ष्यांना मारून खुशीने भाजायचे, मटकवायचे. या शौकातूनच त्यांनी पक्षिजीवनाचे बारकाईने निरीक्षण सुरू केले, त्याची टिपणे ठेवायला लागले. अशी अगदी सुरुवातीची, सलीम अली शाळेत असतानाची, नोंद होती चिमण्यांची. एका चिमण्यांच्या घरटय़ावर त्यांनी रुबाबात मिरवणाऱ्या नरांची शिकार सुरू केली. एक नर खाल्ला, तर दुसऱ्या सकाळी आणखी एक त्याच्या जागेवर हजर. असे ओळीने चार नर बळी पडले. सलीम अलींनी नोंदवले आहे की याचा अर्थ असा की अनेक नरांना विणीची संधी मिळत नाही, ते अशी संधी मिळताच पुढे सरसावतात. ते काही आपखुशीने ब्रह्मचर्य पत्करत नाहीत. निसर्गनिवडीचा सिद्धांतही हेच सुचवतो. आपला जीव सांभाळणे, आपली वंशवेल फुलवणे, हीच प्रत्येक प्राण्याची प्रवृत्ती असणार. ब्रह्मचर्य स्वीकारले जाणार केवळ नाइलाजाने. पण याला आप्तनिवडीचा सिद्धांत पुस्ती जोडतो. आपल्या रक्ताच्या नातेवाईकांच्या प्रजननाला भरपूर फायदा होतो म्हणून मुंग्या-मधमाश्यांसारखे प्राणी आपखुशीने ब्रह्मचर्य स्वीकारतात. पण निसर्गनिवडीचा आवाका केवळ स्वहित व आप्तहित एवढाच मर्यादित आहे का? आप्तपरिवारांसारख्या समूहांपलीकडच्या मोठय़ा समुदायाच्या पातळीवर निसर्गनिवड होऊ शकते का? अशा कोणकोणत्या आणखी वरच्या पातळ्यांवर निसर्गनिवड होऊ शकते?
या संदर्भात अलीकडेच एक मोठा रंजक अभ्यास झाला आहे पाण्यावरच्या लहरींनी प्रीतिसंदेश पाठवणाऱ्या पाणढांग्या या अफलातून कीटकाचा. पाण्याचा पृष्ठभाग एक ताणलेला पातळ पडदा असतो. त्याला बिलकूल न भोसकता आपल्या लांबलचक ढांगा टाकत हे पाणढांगे मजेत पाण्यावर बागडतात. डबक्यात, तळ्यांत, नद्यांच्या संथ पाण्यात पाणकिडय़ांची, अपघातकी पडणाऱ्या कीटकांची शिकार करत कंपू-कंपूने राहतात. नर-माद्या दोघेही आपापले टापू राखतात. कुणी घुसतेय असे दिसले तर पाय आपटत पाण्याच्या लहरींद्वारे बजावतात – दूर हटो ओ दुनियावालो, ये टापू हमारा है. पण प्रियाराधनाच्या दिवसांत वेगळेच संदेश धाडतात. या हंगामात नराच्या दूर हटोला उत्तर आले नाही, तर तो ओळखतो ही मादी आहे, आणि पुढे सरकत खालच्या पट्टीच्या कंपनांचा प्रीतिसंदेश धाडतो. मग काही माद्या कंपनांद्वारेच उत्तरतात : प्रेम मजला ना रुचे रे, प्रेम तुजचे राहू दे! दुसऱ्या देतात मूकसंमती, अन्? मग होते प्रीतिमीलन.
पण नेहमीच सगळे सुरळीत चालत नाही. काही नर उपजतच तापट, भांडकुदळ असतात. माद्यांच्या होकाराची वाट न पाहता त्यांच्यावर हल्ला चढवतात. दुसऱ्यांच्या तोंडातला घास हिसकावतात. स्पध्रेत असे तामस नर सरस ठरतात, त्यांना जोडीदारणी चटकन मिळतात. हे तामस गुण आनुवंशिक असल्याने दर पिढीत त्यांचे प्रमाण वाढतच राहते. पण म्हणून पाणढांग्यांच्यात सगळेच नर असे भांडोरे असतात असे बिलकूलच नाही. मवाळ नरही मोठय़ा प्रमाणात आढळतात. हे कसे? ज्या कंपूंत तामसी वृत्ती बोकाळते, तेथून माद्या चक्क पलायन करतात, उडून जातात. मवाळांचे प्रमाण जास्त असलेल्या कंपूंना जाऊन मिळतात. अशा राजस कंपूंत प्रजोत्पादन भरपूर होते. साहजिकच समंजस नर तग धरून राहतात. म्हणजे निसर्गाच्या निवडीत वैयक्तिक पातळीवर जरी नरांच्या स्वार्थी प्रवृत्ती सरस ठरत असल्या, तरी माद्यांना मवाळ नरांचे समूह अधिक पसंत असल्यामुळे समूहांच्या पातळीवर संघर्षांला आवर घातला जातो, सामंजस्य टिकून राहते.
हा झाला कीटकांच्या कंपूंच्या पातळीवर काही पिढय़ांतच परिणाम प्रगट होणाऱ्या वेगळ्या ढंगाच्या निसर्गनिवडीचा- संघनिवडीचा- आविष्कार. असाच खास आगळा आविष्कार उत्क्रांतीच्या लक्षावधी वर्षांच्या यात्रेत घडणाऱ्या जीवजातींच्या पातळीवरही बघायला मिळतो. जीवांच्या प्रजननाची आरंभीची रीत होती एका बॅक्टेरियाच्या पेशीचे दोनांत विभाजन होत राहून प्रजावळ निर्माण होण्याची. इथे नर-मादी, दोन जीवांचे मीलन असा काहीच खटाटोप नव्हता. अशा उपद्व्यापात पडणाऱ्या जीवजातींच्या प्रजोत्पादनाचा वेग निम्म्याने घटतो. कारण आता केवळ माद्याच पिलावळ निर्माण करू शकतात. हे केवळ प्राण्यांतच नाही, तर वनस्पतींतही बघायला मिळते. फुलाफुलांत अंडपेशी असतात आणि परागही. पराग काही फुकट बनत नाहीत, ते बनवायचे म्हणजे वनस्पतींना अंडपेशींचे उत्पादन कमीत कमी निम्म्यावर घटवणे भाग पडते. वर परागीकरणासाठी, सावरकरांच्या शब्दांत ‘हय़ा पुष्पा वश त्या पुष्पी करवीत परोपरी। घाली खेपा मधावरी मदनाचा दलाल हा! ’ अशा मदनाच्या दलालांसाठी- परागीकरणासाठी सहकार्य करणाऱ्या कीटकांसाठी- मधाचा पुरवठा करायला पाहिजे. तरीही बहुतांश प्रगत जीवजातींत लैंगिक पुनरुत्पादन नजरेस येते. या जीवजातींना या प्रजननप्रणालीचा फायदा जीवांच्या वैयक्तिक पातळीवर नक्कीच मिळत नाही, उलट या पातळीवर प्रजननक्षमतेत घटच सोसावी लागते. मग लैंगिक पुनरुत्पादन कसे टिकून राहते?
वैयक्तिक पातळीवर प्रजननक्षमतेत घटच होत असल्याने अनेक सपुष्प वनस्पतींत अलैंगिक, केवळ मातृजनित प्रजननप्रणाली बळावू शकते. गवत, सूर्यफूल, गुलाबांच्या कुळांत अशा अनेक जाती आढळतात. पण त्यांचे अस्तित्व मर्यादित आहे. असे मातृजनित जीव समुच्चय मुख्यत: जाती-प्रजातींच्या पातळीवरच आढळतात, कोणतेही संपूर्ण कूळच्या कूळ मातृजनित असल्याची नोंद नाही. म्हणजे मातृजनित जाती उत्क्रांतीच्या ओघात निर्माण झाल्या तरी फार काळ तगून राहू शकत नाहीत. त्यांच्यातून आणखी नवनव्या जाती, प्रजाती घडत नाहीत. अलैंगिक जाती उद्भवतात आणि काही काळानंतर लयाला जातात. त्यांचा वंश फोफावत राहून त्यातून काही मोठय़ा शाखा निर्माण होत नाहीत. असे दिसते की पूर्ण कुळांच्या पातळीवरच्या चाळणीत लैंगिक समूहच तगून राहतात. जरी मातृजनित जीव नरांचे उत्पादन टाळतात, आणि दुप्पट वेगाने प्रसवू शकतात, तरी शेवटी लैंगिक पुनरुत्पादन करणाऱ्या जीवजातीच दीर्घ काळ टिकून कुळेच्या कुळे घडवू शकतात.
लैंगिक पुनरुत्पादनच असे फत्ते का होते? कारण वेगवेगळी गुणवैशिष्टय़े असलेल्या नर-माद्यांच्या संगमातून संततीत सतत नवनवे गुणधर्म प्रगट होत राहतात. साऱ्या जीवांपुढे परिस्थितीची नवनवी आव्हाने सतत ठाकत असतात. विशेषत: अगदी भरभर बदलत राहणाऱ्या बॅक्टेरियांच्या, विषाणूंच्या हल्ल्याला तोंड द्यावे लागते. या सूक्ष्म शत्रूंचा प्रतिकार करायला नवनवी शस्त्रे पाजळायला लागतात. ती कुठून निर्माण होणार? योगायोगाने उपजलेल्या म्युटेशन्समधून; अशा हरतऱ्हेच्या म्युटेशन्सच्या मिलाफांतून. लैंगिक प्रजननात दर पिढीत म्युटेशन्सचे असे अगणित नावीन्यपूर्ण मिलाफ अवतरत राहतात. त्यातील काही बॅक्टेरियांच्या, विषाणूंच्या नव्या अवतारांना समर्थपणे उत्तर देतात. अशाच लैंगिक पुनरुत्पादनाद्वारे सतत वैविध्यनिर्मिती करीत, त्याच्या बळावर चिकाटीने तगून राहणाऱ्या गोतावळ्यांतून नवी कुळे प्रगटू शकतात.
फुला-फुलपाखरांचा सहकार, वनस्पतींचा-प्राण्यांचा आणि त्यांच्यावर हल्ला चढवणाऱ्या बॅक्टेरिया-विषाणूंचा संघर्ष अशा नानाविध संवादांतून जीवसृष्टी उमलत गेली आहे. अब्जावधी वष्रे घडत गेलेल्या परस्परसंबंधांतून जीवसृष्टीचे वैविध्य वाढत राहिलेले आहे. या जैववैविध्याच्या लीलेतूनच मानवकुळी उपजली; हे जैववैविध्य आपल्या पिढय़ान्पिढय़ांना खुलवत आले आहे. या अमोल ठेव्याला सांभाळणे ही मानवाची सर्वात मोठी नतिक जबाबदारी आहे!
* लेखक  ज्येष्ठ परिसर्ग-अभ्यासक आहेत. ईमेल : madhav.gadgil@gmail.com