17 December 2017

News Flash

मूर्तिभंजनच हवे

अनुत्तीर्णाने नापास होताना २० गुणांच्या ऐवजी ३० गुण मिळवून त्याच वर्गात राहिल्याचा आनंद मानावा

मुंबई | Updated: December 11, 2012 5:43 AM

अनुत्तीर्णाने नापास होताना २० गुणांच्या ऐवजी ३० गुण मिळवून त्याच वर्गात राहिल्याचा आनंद मानावा तसे भारतीय क्रिकेटचे झाले आहे. इंग्लंडविरुद्ध कोलकाता येथील तिसरी कसोटी भारत डावाच्या फरकाने हरणार होता. ते टळले. म्हणजे पराभव झाला, पण सात गडी राखून. डावाच्या पराभवाची नामुष्की टाळण्यात यश आले ते भारतीय फलंदाजांना नव्हे, तर अश्विन या गोलंदाजाच्या फलंदाजीमुळे. अश्विन गोलंदाजीत तितकासा यशस्वी ठरला नाही. पण त्याने अब्रू राखली ती फलंदाजीत. या पराभवानंतर क्रिकेट नियामक मंडळाने साफसफाईचा आव आणला आणि नागपूर येथील कसोटीसाठी युवराज, हरभजन, झहीर खान आदींना वगळले. ही मलमपट्टी अगदीच वरवरची म्हणायला हवी. यातून आपल्या क्रिकेटचे काहीही भले होणार नाही. तसे ते व्हावे अशी क्रिकेट संघटकांची इच्छा असल्यास काही काळ तरी क्रिकेटला विराम द्यायला हवा. आताच्या ज्या काही समस्या आहेत त्या क्रिकेटच्या अतिरेकाने झालेल्या आहेत आणि पोटाच्या अजीर्णावर ज्याप्रमाणे काही काळ लंघन हा उपाय असतो त्याप्रमाणे क्रिकेटच्या या अजीर्णावरही काही काळ क्रिकेटबंदी हाच उपाय असू शकतो.
पण तो अर्थातच क्रिकेटचे दुकान चालवणाऱ्या धुरिणांना मान्य असणार नाही. पूर्वीचे राजेरजवाडे ज्याप्रमाणे आपल्या तबेल्यातील घोडे, पिंजऱ्यातील अन्य प्राणी यांना झुंजवत ठेवून मौज पाहत बसायचे, तसे आताच्या खेळ संचालकांचे झाले आहे. या खेळ संचालकांना ना खेळात रस आहे ना खेळाडूंत. त्यांचा डोळा आहे तो खेळाच्या नावाने दुकान चालवण्यात. या दुकानाची भरभराट झाली की वेगवेगळय़ा कारणांनी जमीनजुमला करता येतो, आपल्याच मर्जीतील कंत्राटदारांना कंत्राटे देऊन त्यांचे उखळ पांढरे करता येते आणि जाता जाता आपल्यालाही हात मारता येतो. आपल्या जवळपास सर्वच क्रीडा संघटनांच्या चाव्या राजकारणी, कंत्राटदार यांच्याकडे आहेत ते यामुळे. क्रिकेट हे या खेळ दुकानांतील सर्वात भव्य दुकान. त्यामुळे ते जास्तीतजास्त कसे चालेल याकडेच ते चालवणाऱ्यांचे लक्ष असल्यास नवल नाही. दुकानाच्या गल्ल्यावर बसलेल्यास ज्याप्रमाणे दुकान बारा महिने तेरा काळ सुरूच राहावे असे वाटते आणि कर्मचाऱ्यांनी सुट्टीच घेऊ नये अशी जशी त्याची इच्छा असते, तसेच क्रिकेट संघटकांचे झाले आहे. या खेळात जी काही चलनी नाणी आहेत त्यांनी असेच चालत राहावे आणि आपल्या धंद्याची बरकत कमी होऊ नये यापलीकडे त्यांना कशातही रस नाही. आहे तो फक्त गल्ल्यात किती धन होत आहे याकडे. त्यामुळे एका मागोमाग एक अशा प्रकारे या खेळाडूंना सामने खेळण्यास भाग पाडले जाते. कोणत्याही गोष्टीचे उत्पादन अति झाले की कस उतरणारच. तसा तो आपल्या क्रिकेटपटूंचाही उतरलेला आहे. परंतु विद्यमान अवस्थेत ते काहीही बोलू शकत नाहीत आणि बोलायची संधी मिळाली तरी बोलणार नाहीत. याचे कारण असे की, त्यांचेही हितसंबंध या व्यवस्थेत तयार झाले आहेत. त्यामुळे कितीही वाईट कामगिरी झाली तरी पूर्वपुण्याईवर संघात राहता येते. तसे ते राहता आले की जाहिराती वगैरेही मिळत राहतात आणि एकंदरच आपले स्वाभिमानशून्य सरकार त्या धंद्यास देशसेवा वगैरे मानत असल्याने बक्षिसांवरच्या सवलतीही उपटता येतात. असे झाले की कामगिरी हा संघात टिकून राहण्याचा निकष राहत नाही. मुदलात आपण इतिहासप्रेमी असल्याने गौरवशाली इतिहासाच्या आठवणी जागवत वर्तमानकाळ सुखात काढू शकतो. त्यामुळे एखाद्या खेळाडूने कधी काळी काही विक्रमी कामगिरी केली असेल तर त्याच्या आधारावर त्याची उत्तरकाळातील सपक कामगिरी दुर्लक्षित करण्याचा उदारपणा आपण दाखवू शकतो. या सगळय़ा जोडीस आणखी एक किनार आहे. ती आहे कंपन्यांची. एखादा खेळाडू चांगला कामगिरी करू लागला की जाहिरातींसाठी त्यांच्या मागे कंपन्या धावत जातात आणि मोठमोठे करार करतात. त्यांची त्यामुळे साहजिकच इच्छा असते की या कराराच्या काळात तरी या खेळाडूस संघातून डच्चू मिळता नये. तसे झाले तर या कंपन्यांचे नुकसान होणार असते. ते टाळण्यासाठी त्यामुळे मग कंपन्या थेट संघ निवडणाऱ्यांनाही जाळय़ात ओढतात आणि आपला मॉडेल खेळाडू संघात राहील अशी तजवीज करतात. हे सर्रास होते आणि क्रिकेट यास अपवाद आहे असे मानणे दूधखुळेपणाचे ठरेल. क्रीडा संघटनांच्या व्यवहारांवर कोणाचेही नियंत्रण नसल्याने आणि एकूणच देवपूजक क्रीडाप्रेमींना यात काही रस नसल्याने या खेळावर अनेकांची महादुकाने विनासायास सुरू राहतात आणि त्या महादुकानांच्या आडोशाने अनेकांचे कुटीरोद्योगही तितकेच निधरेकपणे सुरू राहतात. यातूनच मग क्रिकेट हा धर्म आहे आणि अमुक एक खेळाडू देव आहे अशा स्वरूपाची भाषा सुरू होते. माध्यमेही या आरतीला उभे राहून टाळय़ा वाजवण्यात धन्यता मानू लागतात आणि या साऱ्या व्यवहारात खेळ म्हणावे असे काहीही नाही, जो काही आहे तो शुद्ध व्यवसाय हे कोणाच्याच लक्षात सर्वानुमते आणून दिले जात नाही.
भारतीय क्रिकेटला या व्यवसायवृत्तीने ग्रासलेले आहे. परंतु आपला दोष असा की व्यवसायाचे म्हणूनही काही नियम असतात आणि तेही आपण क्रिकेटच्या बाबतीतही पाळेनासे झालो आहोत. कोणत्याही व्यवसायातील सर्वात प्राथमिक नियम हा असतो की एखादे उत्पादन चालत नसेल, त्याला मागणी नसेल तर ते ग्राहकांच्या माथी मारायचे नसते. क्रिकेटमध्ये तेच सुरू आहे. आपल्या संघातील अनेक खेळाडू पार थकले आहेत आणि त्यांना क्रिकेटचा कंटाळा आलेला आहे. तो त्यांच्या देहबोलीतून, पडक्या खांद्यांतून सहज दिसतो. पण इतिहासपूजक संघटक या एकेकाळच्या आकर्षक पण आता रंग उडालेल्या उत्पादनांना हात लावण्यास तयार नाहीत. त्याचमुळे गेल्या आठ कसोटींपैकी सहांत पराभव पत्करूनही क्रिकेटच्या दुकानातील कोणत्याही उत्पादनावर कसलीही बंदी घातली जाणार नाही. कारवाईचा देखावा म्हणून हरभजन, झहीर वगैरेंचा बळी दिला गेला. पण ते तेवढेच. ज्यांचा बळी दिला गेला त्यांच्याविषयी कोणतीही सहानुभूती बाळगण्याचे कारण नाही. हरभजनची फिरकी आता सपाट झाली आहे आणि वयाची ३४ शी गाठणारा झहीर आता अगदीच निष्प्रभ ठरू लागलेला आहे. पण संघात त्यांच्यापेक्षाही अपयशी असे अनेक खेळाडू आहेत. पण ते सर्वफलदायी अशा व्यवस्थेचे भाग असल्याने त्यांच्या अपयशाची चर्चाही होणार नाही.
सदासर्वकाळ आपण जिंकायलाच हवे असे कोणीही म्हणणार नाही. परंतु आपला संघ आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या ताऱ्यांनी भरलेला असतानाही त्यांचा असा सामुदायिक अंधारच पडावा हे नुसते क्लेशकारकच नाही तर गुन्हेगारीवृत्तीचे निदर्शक आहे. याचे कारण सर्वसामान्य क्रिकेटप्रेमीस संघटकांच्या कटकारस्थानांची काहीच माहिती नसते आणि तो या सगळय़ाकडे खेळ म्हणूनच पाहत आनंद मानीत असतो. तेव्हा त्याच्या आनंदासाठी अनेकांची देवपणाची झूल उतरवणे ही काळाची गरज आहे. खेळात देव-दानव काहीही नसते. असतात.. आणि असायला हवेत.. ते फक्त खेळाडू. त्यांनाही वय असते आणि वयानुसार कामगिरी उतरली की त्यांनाही निरोप द्यायचा असतो. हे भान ऑस्ट्रेलियासारखा देश दाखवतो. आपल्यालाही ते शिकायला हवे. सामाजिक पातळीवरील अनेक क्षेत्रांप्रमाणे क्रिकेटमध्येही आपण मूर्तिभंजक होण्याची गरज आहे.

rich

First Published on December 11, 2012 5:43 am

Web Title: need idol breaker