गेली पंचवीस वर्षे हातात हात घालून चालणाऱ्याभाजप आणि शिवसेनेने एकमेकांची साथ सोडली, काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडीही बिघडल्याने राजकारणाला लागलेला ‘साथी’चा विळखा सुटण्याची चिन्हे निर्माण झाली असली, तरी सर्वसामान्यांच्या आरोग्याला मात्र साथींनी ग्रासलेलेच आहे. परतीच्या पावसाळ्यापाठोपाठ तापू लागलेल्या वातावरणात उचल खाल्लेल्या ‘साथीच्या आजारां’नी आपले आक्रमण अधिक धारदार केले आहे. पक्ष, निष्ठा, संस्कार असे सारे शब्द खुंटीला बांधून राजकारणातील साथीदारांमध्ये  सुरू झालेल्या पळापळ आणि पळवापळवीच्या स्पर्धेत निवडणुकीचे राजकारण दृष्टिहीन झाले आहे, तर या साऱ्या राजकीय कोलांटउडय़ा आणि कसरतींकडे डोळसपणे पाहण्याची नेमकी वेळ येऊन ठेपलेली असताना, सामान्य मतदार मात्र ‘डोळे येण्या’च्या साथीने हैराण झाला आहे. मलेरिया, डेंग्यू, स्वाइन फ्लूसारखे आजार मुंबई आणि राज्यातील जवळपास सर्वच शहरी-निमशहरी भागांमध्ये जणू ठाण मांडून मुक्कामाला थांबले आहेत. ‘सर्वात पुढे, हा महाराष्ट्र माझा’ असा दावा आचारसंहिता लागू होण्याअगोदरच्या सरकारी जाहिरातींतून केला जात होता, तेव्हा हे शब्द ऐकून सामान्य माणसाची छाती अभिमानाने इंचभर तरी फुलली असेल. पण प्रगत देशांनी केव्हाच हद्दपार करून टाकलेल्या या आजारांनी महाराष्ट्राची मात्र पाठ सोडलेली नाही. म्हणूनच, केवळ क्षुल्लक दिसणाऱ्या डास-चिलटांमुळे मरण्याची पाळी माणसांवर येऊ लागल्याने, ‘सर्वात पुढे’ असण्याच्या महाराष्ट्राच्या त्या ‘अभिमानगीता’वर प्रश्नचिन्ह उमटले आहे. साडेचार वर्षांपूर्वी, ७ एप्रिल २०१० या दिवशी जागतिक आरोग्य दिनाच्या मुहूर्तावर महापालिकेने ‘मुंबई आरोग्य अभियान’ सुरू केले होते. गुणात्मक आरोग्यसेवेचा र्सवकष कार्यक्रम राबवून मुंबईला कायमचा विळखा घालून बसलेल्या साथीच्या आजारांपासून सामान्य जनतेला मुक्ती देण्याचा संकल्प या अभियानाने सोडला होता. आता चार वर्षे उलटून गेल्याने मुंबईची जनता हे अभियान विसरून गेली असली, तरी त्याआधीपासून ठाण मांडून बसलेल्या साथींनी मात्र मुंबईची पाठ सोडलेली नाही अशी स्थिती आहे. या लहानमोठय़ा आणि कधी कधी जीवघेण्या ठरणाऱ्या साथींच्या साथीनेच जणू मुंबईच्या आरोग्याचा डळमळीत प्रवास सुरू राहिला आहे. चालू वर्षांच्या महापालिकेच्या अर्थसंकल्पात, आरोग्य सेवेसाठी सुमारे तीन हजार कोटींचा खर्च अपेक्षित धरण्यात आला होता. मलेरियाची साथ आटोक्यात आल्याचा दावाही पालिका प्रशासनाने केला होता, आणि डेंग्यूमुक्त मुंबईचा संकल्पही सोडला होता. पण मलेरिया आणि डेंग्यू नियंत्रणासाठी महापालिकेने रचलेल्या पाचसूत्री ‘मुंबई मंत्रा’ची शक्ती जणू डासांपुढे निष्प्रभ ठरली आहे. साथीच्या आजारांनी मुंबईची साथ सोडलेली नाहीच, उलट त्यांच्या हातात हात घालून आता क्षयरोग आणि औषधांनाही दाद न देणारा क्षयरोग फैलावू लागला आहे. स्वाइन फ्लूच्या संकटाचे सावट अजूनही दाटलेलेच आहे, तर धकाधकीच्या जीवनशैलीमुळे मधुमेह, रक्तदाब, मानसिक तणावासारखे आजारही वाढीला लागले आहेत. दुर्लक्षितपणामुळे अनारोग्याचे आगर बनलेल्या गलिच्छ वस्त्या, दूषित पाणीपुरवठा आणि सुस्त आरोग्य यंत्रणा यांची साथ मिळाल्याने साथीचे आजार फोफावतात, हे आता उघडय़ावर आलेले वास्तव आहे. ‘आजार यंदा कमी झाले’ अशी आकडेवारी हे त्यावरील उत्तर नव्हे. वर्षांगणिक हजारो कोटी रुपये ओतूनदेखील मुंबईला डासमुक्ती मिळत नसेल, तर जगणेच बेभरवशी ठरेल. महापालिकेचा अर्थसंकल्प सादर करताना मुंबईतील स्मशानभूमींचा दर्जा वाढविण्याचे आयुक्तांनी जाहीर केले होते. स्मशानांचा दर्जा वाढविणे ही गरज असली, तरी तिकडे जाणाऱ्या वाटा गजबजू नयेत यासाठी प्रयत्न करण्याची खरी गरज आहे.