नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत राजनाथ सिंग यांची रविवारी भेट घेतली आणि राजधानीत नवीन राजकीय समीकरणे मांडण्यास सुरुवात झाली. पक्षाध्यक्षाची एका मुख्यमंत्र्याने भेट घेणे यात विशेष काही नसते; परंतु मोदी-राजनाथ भेट ही विशेष मानली जाते. याचे कारण मोदी व राजनाथ यांच्यातून काही वर्षांपूर्वी विस्तव जात नव्हता. आता मात्र दोघे गळामिठी मारून आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी करण्यास बसले. राजकारणात कोणीही कायमचा मित्र वा शत्रू नसतो. संधी दिसली की शत्रूचा मित्र वा मित्राचा शत्रू होतो. मोदी व राजनाथ या दोघांनाही पुढील राजकारणातील संधी दिसत आहे. लोकसभा निवडणूक दीड वर्षांवर आली असली तरी बहुधा ती या वर्षअखेरीस होईल असा अंदाज सर्व राजकीय गोटातून व्यक्त होत आहे. निवडणूक जवळ आल्यामुळे पूर्वीचे वाद पुढे चालू ठेवण्याइतका वेळ सध्या नेत्यांना नाही. २००७ मध्ये राजनाथ सिंह यांनी भाजपच्या संसदीय समितीतून मोदी व जेटली यांची हकालपट्टी केली होती. जेटली यांना पक्षप्रवक्तेपदावरूनही काढून टाकण्यात आले. पुढे जेटली यांचा पुन्हा संसदीय समितीत समावेश झाला असला तरी मोदींना कटाक्षाने दूर ठेवण्यात आले. मोदी गुजरातमधून बाहेर पडू नयेत याची काळजी राजनाथ सिंग तेव्हापासून घेत आहेत. मात्र आता परिस्थिती बरीच बदलली. २००९च्या लोकसभा निवडणुकीत राजनाथ काहीही चमक दाखवू शकले नाहीत. अर्थात यात आश्चर्य वाटण्याजोगे काहीही नव्हते. राजपूत व ठाकूर मतांवर उत्तर प्रदेशात राजकारण करणाऱ्या राजनाथ सिंग यांना भारतात अन्यत्र कोणी विचारीत नव्हते. भाजपच्या मध्यमवर्गीय मतदाराला राजनाथ हा आपला चेहरा वाटला नव्हता. अडवाणी व जेटलींसह अन्य नेत्यांशी त्यांचे जमले नाही. संघाच्या पाठिंब्यावर ते तगले. त्यांचे मित्र असलेल्या संघाच्याच सोनी यांनी योग्य वेळी त्यांचे नाव पुढे केले व पक्षाध्यक्षपद अनपेक्षितपणे त्यांना मिळाले. या राजकारणात मोदींचा पाठिंबा व्यंकय्या नायडू यांना होता; परंतु राजनाथ पक्षाध्यक्ष होत आहेत हे कळताच मोदींनी त्वरित फोन करून त्यांचे अभिनंदन केले, मंत्री म्हणून त्यांनी केलेल्या कामा(?)ची प्रशस्ती केली व ट्विटरवरून हे सर्व देशाला कळेल याची व्यवस्था केली. मोदींना असा उमाळा येण्याचे कारण त्यांना दिल्लीत शिरकाव करून घ्यायचा आहे. ते लोकप्रिय असले तरी पक्षाच्या महत्त्वाच्या समित्यांमध्ये त्यांना स्थान नाही व संघही अनुकूल नाही. केवळ लोकप्रियतेवर पंतप्रधानपद मिळत नाही. त्यासाठी संसदीय मंडळातही वजन असावे लागते, कारण तिकीटवाटप तेथून होते. मोदींना यासाठी राजनाथ हवे आहेत. उलट बाजूने केवळ संघाच्या भरवशावर राहिले तर काय अवस्था होते हे गडकरींकडून राजनाथ शिकले आहेत. लोकप्रिय नेत्याची त्यांना गरज आहे. मोदींशी फटकून वागलो तर पक्षाचा जनाधार जाईल ही धास्ती त्यांना आहे. पक्षाच्या आजच्या नेतेमंडळींत लोकप्रियतेबाबत मोदींच्या जवळपासही येऊ शकेल असा नेता नाही. राजनाथ सिंग यांना असलेली जनाधाराची गरज व मोदींना हवा असलेला दिल्लीतील शिरकाव यातून हे नवे समीकरण शिजले. राजनाथ लोकप्रिय नाहीत, पण कसलेले राजकारणी आहेत. मोदींसारखा मुख्यमंत्री दाराशी आल्यामुळे त्यांचा भाव वाढला. लगोलग त्यांनी नागपूर गाठले. कर्नाटक व छत्तीसगढमध्ये लक्ष घालण्यास सुरुवात केली. अध्यक्षपदाचा अधिकार ते बरोबर दाखवून देतात. गडकरींना हेच जमले नाही.