पाकिस्तानात इंग्रजी साहित्याचं एवढं मोहोळ उठलेलं कधी दिसलं नसेल.. ६ ते ८ फेब्रुवारीला कराचीत आणि सध्या (२० व २१ फेब्रु.) लाहोरमध्ये जमण्याचं निमित्त इंग्रजीत लिहिणाऱ्यांना मिळालं, ते म्हणजे लिटफेस्ट.
भारतात जयपूर लिटररी फेस्टिव्हलनं सात वर्षांपूर्वी ‘लिटफेस्ट’ची हवा दक्षिण आशियात निर्माण केली, त्यानंतर भारतात मुंबई, कोची, कोलकाता इथं लिटफेस्ट सुरू झालेच, पण पाकिस्तानातही कराचीत २०१० पासून, तर लाहोरमध्ये गेल्या वर्षीपासून लिटफेस्ट सुरू झाला. प्रकाशकांच्या मदतीनं आणि अनेक प्रायोजकांच्या साथीनं आंतरराष्ट्रीय पातळीवरल्या लेखक-कवी आणि चित्रकार-संगीतकार वगैरे मंडळींना एकत्र आणून केलेली चटपटीत, खमंग भेळ असं लिटफेस्टचं जे स्वरूप जयपूरला दोन-तीन र्वष जाणाऱ्यांना लक्षात आलंच असेल, त्याला लाहोर आणि कराचीदेखील खरं तर अपवाद नाहीत. फक्त जयपूरपेक्षा ही ‘लहान भावंडं’ कमी चटपटीत आहेत.
विक्रम सेठ आणि भारतीय संस्कृतीच्या प्रदर्शनासाठी नवी योजकता दाखवणारे डिझायनर-संघटक राजीव सेठी, कादंबरीकार मंजू कपूर, आत्मचरित्र नुकतेच प्रकाशित झालेल्या एकेकाळच्या भारतसुंदरी बिना रामाणी, भारताबाहेरच अधिक राहणाऱ्या लेखिका शर्बाणी बसू आणि चित्रपटकार मीरा नायर, चित्रकला-इतिहासकार यशोधरा दालमिया, शोभा डे आदींची (प्रत्यक्ष वा व्हिडीओद्वारे हजेरी) लाहोरच्या लिटफेस्टात आहे.
कराचीत मात्र भारतीय सहभाग कमीच होता. आशीष नंदी यांचा परिसंवादात समावेश, ए. जी. नूरानी यांच्या काश्मीर प्रश्नाविषयीच्या पुस्तकाचं प्रकाशन आणि राजमोहन गांधी यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद आणि महमूद फारुकी यांची ‘दास्तानगोई’ एवढय़ा तीन-चारच प्रसंगी भारतीय चेहरे इथं दिसले. भारतीय वंशाच्या आणि आपल्या ‘पॉप्युलर’ भटकळांसह आंतरराष्ट्रीय प्रकाशन संस्था चालविणाऱ्या मंदिरा सेन याही इथं होत्या. कराची हे शहर मूळचंच बहुढंगी- अठरापगड वगैरे असल्यामुळे बिनू शाह, निकेश शुक्ला, मीनू गौड अशा नावांची पाकिस्तानी (पण आता पाश्चात्त्य देशांतच राहणं पसंत करणारी) लेखक मंडळी या फेस्टिव्हलच्या निमित्तानं खास निमंत्रित होती.
लाहोरात सध्या वातावरण ढगाळ आहे.. पाऊसही पडतो आहे. पण पाकिस्तानातल्या साहित्यिक कार्यक्रमात इतके भारतीय लेखक असण्याची ही पहिलीच वेळ आहे आणि या पावसातही, किमान संशयाचे ढग तरी नाहीत.
आहे थरारकथा तरीही..
भारतातील जंगलात वाढलेला नथानिएल हा अँग्लो इंडियन मॉर्निग स्टारच्या पहिल्याच मोहिमेवर आह़े  लुपिनने मात्र याआधीही अशी कामे केली आहेत़  दोघांना एक लालचुटूक माणिक हुडकून नष्ट करून टाकायचा आह़े  त्यासाठी त्यांनी केलेले जीवापाड प्रयत्न आणि त्यादरम्यान त्यांच्यात निर्माण झालेले नातेसंबंध या मूळ गाभ्यावर ‘टेरर ऑन द टायटॅनिक’ ही समित बसू यांची गूढकथा बेतली आह़े
विविध प्रसंगांतून खुलणारे मानवी नातेसंबंध, नौकेवरील विरोधी गटातील प्रत्येकाच्या वैयक्तिक आयुष्याबाबतच्या अनभिज्ञतेचा शाप पुसत चालल्यामुळे नथानिएलला त्यांची नव्याने होणारी ओळख, त्यातून निर्माण होणारे भावबंध यांचे सुरेख चित्रण या पुस्तकात करण्यात आले आह़े  सुरुवातीपासून शेवटापर्यंत प्रत्येक व्यक्ती आणि गोष्टीबद्दल गूढ पेरण्यात लेखक कमालीचा यशस्वी झाला आह़े  परंतु पुस्तकांच्या शीर्षकाप्रमाणे थरारकथा किंवा साहसकथा वगैरे निर्माण करण्याचा लेखकाचा प्रयत्न असेल, तर तो काही तितकासा यशस्वी झालेला दिसत नाही़  कारण श्वास रोखून धरावे असे प्रसंग पुस्तकात अगदी नगण्यच आहेत़  काही ठिकाणी- विशेषत: कथेच्या मध्यात गूढाची हलकेच उकल करण्याच्या वेळी लेखकाकडून त्याच्या मूळ संवादात्मक शैलीचे बंध तुटले आहेत़  त्यामुळे कथानक अचानक एखाद्या पाठय़पुस्तकाप्रमाणे ‘माहितीपर’ व्हायला लागत़े  पण सुदैवाने पुस्तकात अशा जागा कमी आहेत़
पृथ्वीवरचा सर्वात प्रगत प्राणी मनुष्य असला तरीही या ब्रह्मांडात अनेक ठिकाणी मनुष्याहूनही प्रगत लोक अस्तित्वात आहेत़  ज्यांना एलियन्स म्हणतात़  हे परग्रहवासी इतके प्रगत आहेत की, आपण जसे विमानाने एका देशातून दुसऱ्या देशात किंवा एका खंडातून दुसऱ्या खंडापर्यंतचाही प्रवास सहज करतो; तसे हे एलियन्स ब्रह्मांडातील एका ग्रहावरून दुसऱ्या ग्रहापर्यंतचा प्रवास त्यांच्या अंतराळयानातून बायका-मुलांसह अगदी सहज करतात़  या प्रवासादरम्यान एकदा त्याचे प्रचंड मोठे यान फुटते, काही लोक मरतात़  काही इतरत्र विखुरतात़  त्यांपैकी काही एलियन्स पृथ्वीवरही पडतात़  इथे वर्षांनुवष्रे, पिढय़ान्पिढय़ा जुळवून घेतात़  पण त्यांना त्यांच्या मूळ ग्रहावर परतायचे आह़े  या पिढीत नाही तर पुढच्या पिढीत तरी..
दुर्दैवाने त्यांच्या मूळग्रहवासीयांमध्ये मात्र त्याच्यासाठी प्रयत्न करणारे कुणीच नाही़  पण त्यांच्या परतीसाठी एक गोष्ट मात्र पृथ्वीवर विखुरलेल्या या जमातीला उपलब्ध आह़े  ती म्हणजे माणिक! ज्याला ‘साम्राज्याचा डोळा’ असे म्हणण्यात आले आह़े  अडचण फक्त एकच आहे की, आताच्या एलियन्सचे पूर्वज जेव्हा पृथ्वीवर पडले तेव्हाच्या घिसडघाईमध्ये तो कुठेतरी हरवला आह़े  
येनकेनप्रकारे हे माणिक विसाव्या शतकाच्या दुसऱ्या दशकाच्या आरंभी अपघातात रसातळाला गेलेल्या टायटॅनिक या अवाढव्य नौकेवरून लंडनहून अमेरिकेला जाणार असल्याची माहिती एलियन्सच्या एका गटाला मिळते आणि त्याचबरोबर या माणिकाची महती आणि मानवासाठीच्या दुष्परिणामांची माहिती असणाऱ्या ‘मॉर्निग स्टार’ शोधक संस्थेलाही मिळत़े  त्यामुळे मानव्याच्या हितार्थ हे माणिक अमेरिकेपर्यंत पोहोचू न देण्याची जबाबदारी संस्थेकडून जेनेव्हिह लुपिन आणि नथानिएल ब्राऊन या एजंटवर सोपविण्यात येत़े  ़  
एकंदरीत, गूढकथेसाठी आवश्यक असणारा कल्पनाविलास, खिळवून ठेवणारी आणि डोळ्यांपुढे प्रसंग प्रत्यक्ष उभा करणारी कथनशैली, चित्रपटाच्या पटकथेप्रमाणे पुढे सरकणारे कथानक आणि चित्रपटाप्रमाणेच ‘क्लायमॅक्स’ गाठणारा शेवट अशा गुणवैशिष्टय़ांमुळे हे पुस्तक गूढकथेची आवड असणाऱ्यांना समाधान देणारे ठरत़े  

टेरर ऑन द टायटॅनिक : समित बसू,
प्रकाशक : रुपारेड टर्टल, नवी दिल्ली,
पाने : १८५, किंमत : १९५ रुपये.
पत्रकारितेतील अंडरवर्ल्ड
आपल्या क्षेत्रातील यशाचे उत्तुंग शिखर गाठण्यासाठीचा जीवघेणा संघर्ष, यशामुळे येणारी उन्मत्तता आणि त्याचे दुष्परिणाम यांचे यथार्थ चित्रण विभा सिंग यांनी ‘ए कन्व्हिनीएन्ट कल्प्रिट’मध्ये केले आह़े  पण ही कादंबरी त्यापेक्षा काही अधिक सांगणारी आह़े  पत्रकारांमधील सनसनाटी बातम्या देण्यासाठीची स्पर्धा, तशा बातम्या मिळवण्यासाठी खात्रीलायक सूत्रांची बांधणी, पत्रकाराचे व्यावसायिक जीवन आणि व्यक्तिगत भावबंध, अहंभाव अशा गोष्टींवर लेखिकेने आनुषंगिक भाष्य केले आह़े
जागृती वर्मा आणि जॉय दत्त हे दोघेही गुन्हेवार्ताहर आहेत़  मुंबईसारख्या महानगरातील गुन्हेगारी जगताचे बिंग फोडण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा आह़े  दोघेही अमर अ‍ॅने या वरिष्ठ गुन्हे वार्ताहराच्या हाताखाली तयार होत आहेत़  सुरुवातीला जॉयचे अंगीभूत कौशल्य जाणल्याने आघाडीच्या इंग्रजी वृत्तपत्रात गुन्हेगारी विश्वाचे वार्ताकन करण्यात हयात घालवलेला अमर त्याला प्रोत्साहन देतो़  त्याच्यातल्या पत्रकाराला प्रगल्भ करतो़  काही काळाने तो अन्य वर्तमानपत्रांत निघून जातो आणि त्याची जागा घेण्याचा प्रयत्न जागृती करत़े  अमरचा विश्वास संपादन करून ती गुन्हेगारी विश्वातील बातम्यांमध्ये स्वत:ला झोकून देत़े फरक फक्त इतकाच असतो की, लवकर अमरला जुमानेशी होत़े  त्याच्या सल्ल्यांकडे दुर्लक्ष करत़े
तिच्या बातम्यांना दोन-पाच पुरस्कार मिळतात़  पोलीस दलातही तिचा दबदबा वाढतो़  त्यामुळे तिला सनसनाटी बातम्यांची चटकच लागत़े  तिचा उन्मत्तपणा आणखीनच वाढतो. तिच्या बातम्या मागाहून इतर वर्तमानपत्रांतही छापून येऊ लागल्यानंतर, तर ती स्पर्धक वर्तमानपत्रांच्या संपादकांना दूरध्वनी करून सांगू लागते की, ‘तुम्ही वार्ताहर ठेवण्यापेक्षा झेरॉक्स यंत्रच ठेवा, नाही तरी तुम्हाला माझ्याच बातम्यांची नक्कल करायची असते.’ पोलीस आयुक्तांनी फोन न उचलल्यासही ती एसएमएस पाठवून त्यांची निर्भर्त्सना करत़े  तिच्या या वागण्यामुळे सर्वच ठिकाणी ती शत्रू निर्माण करून घेत़े
दरम्यानच्या काळात जॉयचेही नाव गाजत असत़े  एक वेळ तर अशी येते की, जॉयने आणि जागृतीने दिलेल्या एकाच विषयाच्या बातमीत परस्परविरोधी तपशील आढळतो आणि दोघेही स्वत:च्याच तपशिलावर अडून राहतात़  पुढे  पुढे हा संघर्ष अधिक तीव्र होतो़  याचदरम्यान अमर परोपरीने समजावत असतानाही त्याचे न ऐकता जागृती अंडरवर्ल्डच्या सनसनाटी बातम्यांच्या मागे लागते.़  त्यातून चिकना रामू या कुख्यात गुंडाशी तिचा संपर्क येतो़  मात्र त्यात आपण गुरफटत आहोत, याची जाणीव तिला होत नाही.
अखेर एके दिवशी चिकना रामू जॉय दत्तची हत्या करतो आणि त्याचा आरोप जागृतीवर येतो़  त्या वेळी एकटा अमरच तिच्या पाठीशी ठामपणे उभा राहतो.़  अनेक भेटगाठी घेऊन, पुरावे जमवून तो तिला कोठडीबाहेरून साहाय्य करतो़  अखेर जागृती निर्दोष ठरते.   पण गुन्हा सिद्ध होण्याआधी केवळ आरोपांमुळे माथी येणाऱ्या कलंकाचे ओझे सावरणे किती अवघड असते, हे वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा लेखिकेचा प्रयत्न नक्कीच यशस्वी झाला आह़े.
पत्रकार जे. डे. यांच्या हत्त्येत सहकार्य केल्याच्या आरोप ठेवलेल्या गेलेल्या जिग्ना व्होरा यांची ही कादंबरी वाचताना आठवण झाल्याशिवाय राहत नाही.

अ कन्व्हिनीयंट कलप्रिट : विभा सिंग,
प्रकाशक : पेंग्विन, नवी दिल्ली,
पाने : २५०, किंमत : २५० रुपये.