रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांना आता महानगरपालिका स्वच्छतेचे धडे देणार ही बातमी ऐकून हसावे की रडावे तेच समजेना. स्वच्छतेचे धडे हे लहान अथवा शाळकरी मुलांना द्यायचे असतात. रस्त्यावरील गाडीवरचे खाद्यपदार्थ विकून हजारो रुपये कमाविणाऱ्या या व्यक्तींनी निव्वळ अर्थाजनाद्वारे नफ्याकडे न पाहता ग्राहकांच्या आरोग्याची काळजी घेणे तितकेच गरजेचे आहे. उदा. खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी स्वत:चे हात स्वच्छ धुतलेले असावेत. लोकांना खाद्यपदार्थ देताना हातात प्लास्टिकची पिशवी घातल्यास उत्तम. खाद्यपदार्थ व्यवस्थित झाकून ठेवलेले असावेत. विविध पदार्थ ठेवलेली भांडी घाणेरडी व कळकट असू नयेत ती स्वच्छच असावीत. खाद्यपदार्थ विकणाऱ्यांच्या आजूबाजूच्या परिसरात वाहती गटारे अथवा कचऱ्याच्या पेटय़ा नसाव्यात.
रस्त्यावर विकल्या जाणाऱ्या पदार्थावर माझ्या तसेच इतर जीवजंतू पसरल्यामुळे रोग होतात. हे शास्त्र माहीत असूनदेखील लोक त्याकडे सोयीस्कररीत्या दुर्लक्ष करतात कारण त्यांना घरच्यापेक्षा हे उघडय़ावरील पदार्थतच जास्त चवदार व रुचकर लागतात.
रस्त्यावरील खाद्यपदार्थ विकणारे जे विक्रेते स्वच्छता पाळणार नाहीत. त्यांचा परवाना महानगरपालिका रद्द करणार असल्याचे समजते. पण हा परवाना कायमस्वरूपी रद्द होणार की त्यांना केवळ समज देऊन पुन्हा खाद्यपदार्थ विकायला परवानगी देणार असतील तर त्याला काहीही अर्थ नाही. थोडक्यात, महानगरपालिकेला एवढेच सांगायचे आहे की, जे नियम कराल त्याचे कडकपणे पालन करावे, त्यामध्ये मुळमुळीतपणा नसावा.

ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया : आधी विजय जोशी, मग सचिन
सचिन तेंडुलकर यांना ‘ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया’ हा सन्माननीय पुरस्कार ६ नोव्हेंबरला मिळाला. त्या वेळी आणखी एक मराठी अभियंते डॉ. विजय जोशी हे ऑस्ट्रेलियाहून या समारंभास हजर राहण्यासाठी ऑस्ट्रेलियन सरकारच्या विनंतीवरून आले होते. त्यांनी हाच पुरस्कार ऑस्ट्रेलियन सरकारकडून सुमारे सहा महिन्यांपूर्वी मिळाला होता. मात्र सचिनप्रमाणे त्यांना फारशी प्रसिद्धी मिळाली नाही. डॉ. जोशी ठाण्याचे रहिवासी असल्यामुळे ठाणेकरांनी मात्र त्यांचा एक हृदय सत्कार घडवून आणला होता.
डॉ. जोशी हे मो. ह. विद्यालय, ठाणे येथून शालान्त परीक्षा पास झालेले. नंतर व्ही.जे.टी.आय.मधून सिव्हिल इंजिनीअरिंगची पदवी घेतली. त्यानंतर ते कॅनडामधून एम.एस. झाले.भारतामध्ये काही काळ व्यतीत केल्यावर ते ऑस्ट्रेलियाला गेले व तेथे स्टील मिल सव्‍‌र्हिसेसमध्ये काम करू लागले. सध्या ते ‘फल्टन होगन’ या कंपनीत ऑस्ट्रेलियात कार्यरत आहेत.डॉ. जोशी यांचा रस्तेबांधणीचा व त्या अनुषंगाचा अनुभव व संशोधन पाहून ऑस्ट्रेलियन सरकारने त्यांना ‘ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया’ हा बहुमानाचा पुरस्कार प्रदान केला. सिडने एअरपोर्टचा तिसरा रनवे बांधताना डॉ. जोशी यांनी पोलाद कारखान्यातील वाया जाणारी मळी उपयोगात आणली. त्यामुळे एकंदर खर्च कमी येतो व पर्यावरणाच्या दृष्टीनेही ते फायद्याचे आहे. जर भारतात अशा तऱ्हेचे काम होणार असेल, तर मी मोफत सहकार्य करण्यास तयार आहे, असे ते म्हणतात.डॉ. जोशी यांची एक मुलाखत सुमारे दोन वर्षांपूर्वी राजू परुळेकर यांनी सकाळी दूरचित्रवाणीच्या कार्यक्रमात घेतली होती.
पु. ग. आचार्य, ठाणे पूर्व.

हा प्रज्ञावंत मतदार कोठे सापडेल?
प्रा. डॉ. अनंदा गांगुर्डे यांचे ‘झुंडशाही नव्हे, लोकशाही मार्गाने अध्यक्षांची निवड’ हे माझ्या पत्राला प्रतिवाद करणारे पत्र वाचले (लोकमानस, ८ नोव्हें.) मी त्यांच्या मतांचा सन्मान करते परंतु साहित्य क्षेत्रातील मतदार स्वतंत्र प्रज्ञेचा आह,े स्वतंत्र विचाराचा आहे, हे त्यांचे प्रतिपादन वस्तुस्थितीला धरून नाही हे खेदाने नमूद करावे लागत आहे. कोणत्याही साखर कारखान्याच्या निवडणुकी सारख्या याही निवडणुका लढवल्या जातात हे बारामतीत राहून गांगुर्डे यांना माहीत नसावे याचे आश्चर्य वाटते. इंदिरा संत निवडणूक का हरल्या, शिवाजी सावंत यांच्या साख्या जेष्ठ लेखकाला निवडणुकीसाठी एवढी पायपीट का करावी लागली? विजय तेंडुलकर, श्री. ना. पेंडसे यांसारखे लेखक निवडणुकीपासून दोन हात दूर का राहिले यातच याची उत्तरे आहेत.
माझे समस्त माजी संमेलन अध्यक्षांना आणि निवडणूक लढवलेल्या साहित्यिकांना नम्र आवाहन आहे की त्यांनी आपले मतदार कसे स्वतंत्र प्रज्ञेचे आहेत याबद्दल आमचे सर्वाचेच प्रबोधन करावे.
झुंडशाहीला आपले मतदार भीक घालत नाहीत, दहशतीला बळी पडत नाहीत असे डॉ. गांगुर्डे म्हणतात.  महाबळेश्वरच्या संमेलनात आनंद यादव या जेष्ठ लेखकाला त्यांनी निवडून देऊनही त्यांना आपण प्रज्ञावंत मराठी रसिक, मतदार अध्यक्षपदी सन्मानाने बसवू शकलो नाही याची खंत आपल्याला वाटणार नाही का?
साहित्य संमेलन हा सर्वसाधारण रसिकांचा उत्सव असतो. त्यांना आपण नेहमी वाचलेले लेखक, कवी यांच्या कडून काही ऐकायची इच्छा असते. समीक्षक ,संशोधक यांचे महत्व साहित्यात अनन्यसाधारण असेच आहे पण अशा ठिकाणी मात्र लोकप्रिय असा अध्यक्ष हवा असतो. २००५ च्या नाशिक संमेलनात प्रा मेश्राम, २००८ मध्ये म . द. हातकणंगलेकर आणि २०१० ला पुण्यात झालेल्या द. भि. कुलकर्णी या विद्वानांच्या अध्यक्षीय भाषणाला थंड प्रतिसाद मिळाला होता हा इतिहास जुना नाही.
डॉ. कोत्तापल्ले यांच्याबद्दल मलाही आदर आहे आणि त्यांच्यासारखा ऋजु स्वभावाचा अध्यक्ष आपल्याला मिळाला याचा आनंदही आहे , पण म्हणून समाजामध्ये वाढत चाललेली असहिष्णुता आणि झुंडशाही यांकडे काणाडोळा करणे हे प्रागतिक महाराष्ट्रात होता कामा नये असे प्रांजळपणे मांडावेसे वाटते.
अनघा गोखले, मुंबई</strong>

अभ्यंकर दाम्पत्याचे अगत्य
थोर गणिती डॉ. श्रीराम अभ्यंकरांच्या अमेरिकन पत्नी सौ. उषा अभ्यंकर यांना मराठीचे मार्गदर्शन करण्याची संधी मला लाभली. १७ नोव्हेंबर १९६९ ते १० जानेवारी १९७० या कालावधीत त्यांच्या चर्चगेट येथील जागेत रोज संध्याकाळी सहा-सात अशी अध्ययनाची वेळ होती. डॉ. अभ्यंकर तेव्हा मला वाटते, टी.आय.एफ.आर.मध्ये प्राध्यापक होते. ते अमेरिकेला गेल्यानंतर सौ.  उषा यांचे मला मराठीत पत्र आले होते. हरी आणि काशी दोघांचेही जन्मवृत्त त्यांनी आम्हांला कळवले होते. अमेरिकेत जाण्याआधी दोघेही मुलुंडला आमच्याकडे आले होते. त्याचे आम्हा सर्वाना अप्रूप आणि कौतुक वाटले. गेल्या ४० वर्षांत आमची दोन वेळा ओझरती भेट झाली.
डॉ. श्रीकृष्ण कर्वे, मुलुंड (पूर्व).

मदतीचा हात द्याल की नाही?
‘ती आणि तो’ हा गिरीश कुबेर यांचा लेख (अन्यथा, १० नोव्हेंबर) वाचताना अमेरिकन अध्यक्ष कुठे व आपले दुसरे भाबडे कुठे, ही तुलना मनोज्ञ वाटली. लेखातून हे दुसरे बिचारे भाबडे असे दाखवणारे काही बोध घेतील अशी अशा करू या. आपल्या कष्टाचे मार्केटिंग करायचे म्हणजे किती? मराठीत एका सरळसोट मार्गाने मार्केटिंग करायचे व इंग्रजीत त्याला जातिवाचक वलय देऊन मार्केटिंग करायचे. खस्ता काढून वर आल्यावर त्याचा जरूर अभिमान बाळगावा, परंतु नंतर मात्र फक्त आणि फक्त आपण! ज्या लोकांतून आपण वर आलो त्यांना काही मदतीचा हात द्याल की नाही? असो.
एकमेकाला सांभाळत हुशार, कष्ट करणारा एक सर्वसामान्य जर अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष होतो तर आपल्याकडे हे का होणार नाही?
– प्रवीण आंबेसकर, ठाणे