बेदरकार वागायचे असेल तर पायाशी निदान नरेंद्र मोदी यांच्याइतका व्यापक जनाधार असावा लागतो. असा जनाधार नाही आणि तरीही सर्वाना ‘टोल’वण्याची वृत्ती यामुळे नितीनभौ गडकरी यांचे पतन अपरिहार्य होते..
भाजपच्या अध्यक्षीय निवडणुकीत जी काही नाचक्की झाली त्याबद्दल नितीनभौ गडकरी यांना स्वत:लाच दोष द्यावा लागेल. बेजबाबदार वाचाळपणा आणि मी करतो ते सगळेच बरोबर या पद्धतीने गडकरी यांचे वागणे होते. त्यात त्यांना रा. स्व. संघाचा पाठिंबा. तेव्हा परिस्थिती हाताबाहेर जाणार हे उघड होते. तसेच झाले आणि अखेर गडकरी यांना अध्यक्षपदाची दुसरी खेप मिळू शकली नाही. गडकरी अध्यक्षपदी आले ते केवळ संघ मागे होता म्हणून. त्यांना व्यापक पाठिंबा आहे असे चित्र कधीच नव्हते. विधानसभा असो की लोकसभा. गडकरी यांनी निवडणूक लढवलेली नाही. त्या अर्थाने जनाधार असलेला नेता अशी त्यांची प्रतिमा कधीही नव्हती. तरीही त्यांना भाजपचे अध्यक्षपद देण्यात आले. ते देताना भाजपचे कुलदैवत असलेल्या संघाने पक्षाच्या व्यापक हिताचा विचार केला असे म्हणता येणार नाही. गडकरी यांचे सर्वात मोठे कर्तृत्व म्हणजे मुंबई-पुणे महामार्ग आणि मुंबईत उभारलेले पुलांचे जाळे. १९९५ साली शिवसेना-भाजपच्या राजवटीत सार्वजनिक बांधकाम खाते हे गडकरी यांच्याकडे देण्यात आले. तोपर्यंत आणि त्यानंतरही या खात्याची ओळख भ्रष्टाचाराचे कुरण इतकीच राहिली. आपल्या आधीच्या आणि नंतरच्याही सार्वजनिक खाते हाताळणाऱ्यांना जे जमणार नाही ते गडकरी यांनी करून दाखवले. हे खाते सध्या छगन भुजबळ यांच्याकडे आहे. त्यांचा बहुसंख्य वेळ पुतण्या आणि मुलगा यांचे भले कसे होईल हे पाहण्यातच जातो. राज्य आणि राज्याची कामे ही नंतर येतात. परंतु गडकरी यांनी राज्याची म्हणून असलेली काही कामे धडाक्याने केली. त्याचे श्रेय त्यांना द्यावेच लागेल. त्याही काळात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि भाजप-सेना युतीचे शिल्पकार प्रमोद महाजन हे काही उद्योगपतींसाठी आपले वजन खर्ची करत असताना गडकरी हे त्या दबावास बळी पडले नाहीत आणि सरकारी खात्याकडूनच त्यांनी हे प्रकल्प पूर्ण करून दाखवले. ज्या खात्याकडून भ्रष्टाचार वगळता काहीही न करण्याचा इतिहास आहे त्याकडून इतकी चमकदार कामगिरी झाल्याने त्या तडफेने गडकरी यांचे स्वत:चेच डोळे दिपले. एकदा डोळे दिपले की समोरचे काळे किंवा पांढरे काहीच दिसत नाही. गडकरी यांनाही हीच अंधारी आली. सार्वजनिक बांधकामात गडकरी यांनी जे काही पूल उभारले त्याचे सांगाडे सत्तेवरून पायउतार झाल्यानंतर त्यांनी आपल्या कामी आणले. नितीनभौ एकंदरीतच उत्साही. त्यांच्या या उत्साहास मंत्रिपदी असताना जोडल्या गेलेल्या काही आयडियल साथीदारांची जोड मिळाली. त्यामुळे गडकरी यांची झपाटय़ाने इच्छापूर्ती होत गेली. पण ती विश्वासार्हतेच्या बदल्यात. गडकरी यांच्या उद्यमशीलतेबाबत कोणाचेही दुमत असणार नाही. जैविक इंधन, सहकार आदी अनेक क्षेत्रांत गडकरी यांनी भराऱ्या मारल्या. पण तरीही कोणताही उद्योग काय गतीने कसा वाढू शकेल याचे काही नियम असतात. भाजपचा अध्यक्ष झाला तरी ते बदलता येत नाहीत. या नियमांना बगल देत अतिरिक्त वाढ झाली तर अनेक प्रश्न निर्माण होतात. गडकरी यांच्याबाबत तसे ते निर्माण झाले. कारण गडकरी यांनी हे नियम बदलण्याचा प्रयत्न केला. मग स्वत:च्या कंपनीत एका टोल कंपनीची गुंतवणूक असो वा टोल माफियाला राज्यसभेची उमेदवारी देण्याचा मुद्दा असो. गडकरी सगळय़ांनाच खुंटीवर टांगू लागले. इतके बेदरकार वागायचे असेल तर पायाशी निदान नरेंद्र मोदी यांच्याइतका व्यापक जनाधार असावा लागतो. असा जनाधार नाही आणि तरीही सर्वाना ‘टोल’वण्याची वृत्ती यामुळे गडकरी यांचे पतन अपरिहार्य होते. अखेर तसेच झाले.
भाजपमधील काही गडकरीसमर्थक आता काँग्रेस सरकार वा पक्षातील हिंदी भाषकांचे गटतट यांना दोष देतील. पण ते काही खरे नाही. पूर्ती या कंपनीत वाटेल ते उद्योग करण्यास गडकरी यांना काय काँग्रेसने सांगितले होते? वाटेल त्या गुंतवणुकीसाठी वाटेल तशा कंपन्या स्थापन करायच्या, आपल्याच चालक नोकरास त्या कंपन्यांचे संचालक करायचे ही निव्वळ धूळफेक गडकरी यांनी केली होती, त्यामागे काँग्रेसचा हात होता काय? एखाद्या जमीनदारालाही लाजवेल अशा ओंगळवाण्या पद्धतीने संपत्तीचे निर्लज्ज प्रदर्शन करीत गडकरी यांनी आपल्या चिरंजीवाचे विवाह सोहळे उठवले, गावजेवणे घातली. संघाच्या साधेपणाच्या संस्कृतीला अशी तिलांजली देण्यास गडकरी यांना काय विरोधकांनी भाग पाडले होते की काय? खरेतर २०१४ सालच्या निवडणुकांपर्यंत नितीनभौ हे भाजपच्या अध्यक्षपदी राहणे हे काँग्रेसच्या पथ्यावर पडणारे होते. याचे कारण असे की भ्रष्टाचारावर नाक वर करून बोलणाऱ्या भाजपचा अध्यक्ष हा इतका भ्रष्टाचारात गुंतलेला असेल तर त्याच्या विरोधाची धार बोथट होणार हे उघड होते. असा धार गेलेला विरोधी पक्ष हा सत्ताधाऱ्यांना हवा असतोच. ती सोय गडकरी यांनी केली होती. त्यामुळे त्यांच्या कथित बदनामीमागे काँग्रेस आहे हा त्यांचा आरोप अगदीच हास्यास्पद म्हणावयास हवा. जे काही झाले त्यास गडकरी यांनी विरोधीपक्षीय काँग्रेसपेक्षा स्वपक्षातील विरोधकांकडे बोट दाखवणे योग्य. गडकरी यांच्या नेतृत्वाखाली आगामी निवडणुका लढवण्याची वेळ आली तर काँग्रेसवर हल्लाबोल करण्याऐवजी आपली सारी शक्ती ही पक्षाध्यक्षांना वाचवण्यातच जाईल असा रास्त विचार अन्य भाजप नेत्यांनी केला आणि थेट संघविरोधात बंडाचे निशाण फडकावत गडकरी यांना माघार घ्यायला लावली.
भाजपमध्ये जे काही झाले ते एक प्रकारचे संघविरोधातील बंड मानायला हवे. भाजपमधील सूत्रे पडद्यामागे राहून संघच हलवतो हे काही लपून राहिलेले नाही. मी नाही बाई त्यातली.. अशा सुरात संघातील धुरीण राजकारणाविषयी किती शहाजोगपणे सांगत असले तरी भाजप नेतृत्व संघाच्या तालावर नाचते. त्यात गैर असे काही नाही. तो त्या पक्षाचा आणि ते चालवणाऱ्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. परंतु राजकारण करायचे आणि आपण राजकारणात नाही असेही सांगायचे हा दुटप्पीपणा झाला. तोच नेमका संघाच्या अंगलट आला. संघाचा भरभक्कम पाठिंबा असूनही प्रथम लालकृष्ण अडवाणी आणि अन्य लहानथोर सुभेदार यांनी गडकरी यांच्याविरोधात बंडच पुकारले. तरीही संघाने गडकरी यांचीच उमेदवारी रेटली असती तर यशवंत सिन्हा यांच्यासारखा बिगरसंघीय नेता निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता होती. तसे झाले असते आणि ते जर निवडून आले असते तर संघ आणि भाजप दोघांचेही नाक कापले गेले असते. तेव्हा पुढचे रामायण टाळण्यासाठी अखेर गडकरी यांना जा असे सांगण्याची वेळ संघावर आली. अर्थात त्यांना घालवताना अडवाणी यांना हवा तो अध्यक्ष नाकारून संघाने त्याबाबतही पाचर मारली आणि ज्या अध्यक्षावर दूरदृष्टी नसलेला नेता अशी टीका अडवाणी यांनी केली होती त्याच्याच हाताखाली काम करण्याची वेळ त्यांच्यावर आली. तेव्हा एवढे होऊनही सगळेच असमाधानी.
वजन नियंत्रित ठेवले नाही तर गुरुत्वमध्य सरकतो आणि तोल जातो. हे वैज्ञानिक सत्य राजकीय आणि आर्थिक वजनाबाबतही लागू पडते. भाजप अध्यक्षपदाच्या फेरनिवडीत नितीन गडकरी यांचे जे काही झाले त्यावरून हेच दिसून येते.