लालगुडी जयरामन आणि शमशाद बेगम यांच्यातील साम्यस्थळ हे त्यांच्या जीवननिष्ठेत आहे. जगण्याचे कारण कळणारी अशी फार थोडी कलावंत मंडळी असतात, जी उरलेल्यांना ती ऊर्मी देतात..
कोणत्याही आक्रमणाचे संधीत रूपांतर करण्याची अचाट क्षमता भारतीय कलावंतांमध्ये होती, म्हणूनच ब्रिटिशांनी आणलेले व्हायोलिन हे वाद्य भारतीय अभिजात संगीताच्या मैफलीत सन्मानाने विराजमान झाले आणि चित्रपटांच्या दुनियेत पाश्र्वगायनाचे नवे क्षेत्र खुले होताच त्यावर कलावंतांनी स्वप्रतिभेने मोहोर उमटवली. ख्यातनाम व्हायोलिनवादक लालगुडी जयरामन आणि पाश्र्वगायिका शमशाद बेगम यांच्या या आठवडय़ातील निधनामुळे कलावंतांमधील ही अफाट सर्जनशीलता पुन्हा एकदा दृग्गोचर होणे स्वाभाविक होते. तंत्रावर आधारलेल्या चित्रपट या माध्यमावर दादासाहेब फाळके आणि दादासाहेब तोरणे यांच्यासारख्या प्रतिभावानांनी जी हुकमत मिळवली, त्यामुळे नंतरच्या काळात भारत हा जगातील सर्वात जास्त चित्रपट बनवणारा देश ठरला. चित्रपटाच्या तंत्रावर स्वार होताना, मूकपटापासून बोलपट आणि पाश्र्वसंगीतापर्यंतचा सारा प्रवास नुसता अद्भुतरम्य नव्हता, तर एकाच वेळी कलात्मकतेला आणि तंत्रशरणतेला आव्हान देणारा होता. चित्रपट बोलू लागला, तरी चित्रफितीबरोबरच ध्वनिफीतही मुद्रित होण्याचे तंत्र होते. त्यामुळे अभिनेत्यांनाच संवाद आणि गाणे म्हणावे लागे. पाश्र्वसंगीताचे तंत्रज्ञान अवतरल्यानंतरच भारतीय चित्रपट संगीत या एका नव्या संगीतशैलीचा उगम झाला आणि त्यातल्या बिनीच्या संगीतकारांनी आणि गायक कलावंतांनी सुरुवातीपासूनच ही शैली अशा एका उंचीवर नेऊन ठेवली, की पुढचा सारा मार्ग बऱ्यापैकी सुकर झाला. शमशाद बेगम या अशा प्रारंभीच्या काळातील अतिशय लोकप्रिय कलावंत होत्या. चित्रपट ही तंत्रशरण कला होती, तसेच व्हायोलिन हे वाद्यही भारतीयांसाठी पूर्णत: नवे होते. तारांवर गज फिरवून स्वर निर्माण करणारी बीन आणि सारंगी यांसारखी वाद्ये भारतीयांनीच शोधून काढली होती आणि त्यावर संगीत निर्माण करता येईल, एवढा त्याचा विकासही केला होता. पण ब्रिटिशांनी या देशात आल्यावर त्यांच्या संस्कृतीत मुरलेल्या आणि रुजलेल्या ज्या गोष्टी आणल्या, त्यात व्हायोलिन हे वाद्य होते. आपण ते वाद्य स्वीकारताना, त्याचे भारतीयीकरण केले आणि ते वाद्य आपले संगीत व्यक्त करू शकेल, एवढे प्रभुत्व त्यावर मिळवले. लालगुडी जयरामन यांच्या ठायी हे प्रभुत्व तर होतेच, परंतु त्याला साथ होती, ती त्यांच्या असामान्य प्रतिभेची!
पाश्चात्त्य संगीत हे हार्मनी या तत्त्वावर आधारित आहे आणि प्राचीन परंपरा लाभलेले भारतीय संगीत मेलडी या तत्त्वावर आधारलेले आहे. या दोन्ही तत्त्वांमध्ये मूलभूत फरक आहेत. त्यामुळे त्यांच्या स्वरांविषयीच्या धारणाही वेगळय़ा आहेत. आपल्या संगीतात प्रत्येक स्वराला स्वत:चे असे अस्तित्व असते आणि अन्य स्वरांच्या संगतीत आल्याबरोबर तोच स्वर त्याचे व्यक्तिमत्त्व बदलून टाकतो. पाश्चात्त्यांनी संगीतात तीन किंवा अधिक स्वरांचे पुंज एकत्र करून त्यांच्या सहनादातून स्वरांची निर्मिती केली. मूळ बैठक वेगळी असली, तरी संगीतनिर्मितीचे तत्त्व मात्र तेच होते. जगातल्या सगळय़ा संगीतशैलींमध्ये निर्मितीचे हे तत्त्व थोडय़ाफार प्रमाणात सारखेच असले, तरीही भारतीय परंपरेने स्वरांच्या लगावापासून ते त्यांच्या सहअस्तित्वातून सहजपणे दिसू शकणाऱ्या राग या कल्पनेचा अतिशय सुंदर विचार केला. लालगुडी जयरामन यांच्यासारख्या संगीतकारांनी या दोन्ही परंपरांना एकत्र राखत त्यावर आपले संगीत निर्माण केले. गायक कलावंतांना संगत करण्याची त्यांची हातोटी इतकी विलक्षण होती, की गायकांना त्यामुळे नव्या कल्पना सुचत आणि त्यांच्या सर्जनशीलतेला नवे धुमारे फुटत. वाद्यसंगीताच्या क्षेत्रात वाद्याच्या तंत्रावर पकड असण्याला फार महत्त्व असते. वाद्य कसे वाजवायचे, याचे तंत्र अवगत करून त्याला सृजनाची जोड देणारा कलावंतच आपले वेगळे स्थान निर्माण करू शकतो. लालगुडी यांनी नेमके तेच केले. त्यांचे वादन हा कर्नाटक संगीतशैलीतील एक अतिशय विलोभनीय आविष्कार असे. रसिकांना तृप्त करण्याची त्यांची क्षमता त्यांच्यातील कलावंत आणि वाद्याच्या तंत्रावरील त्यांची पकड या दोन्हीतून व्यक्त होत असे. व्हायोलिन या वाद्याला कर्नाटक संगीतात जे उच्च स्थान मिळाले, ते लालगुडी यांच्यासारख्या वादकांमुळे. आजही जगात व्हायोलिन या वाद्यावर कर्नाटक संगीत सादर करणारे असे अनेक ज्येष्ठ कलावंत अतिशय रसिकप्रिय ठरले आहेत.
तंत्र आणि प्रतिभा संगीताच्या क्षेत्रात हातात हात घालून आल्या. त्यामुळेच ध्वनिमुद्रणाचे तंत्रज्ञान विसाव्या शतकाच्या अगदी आरंभी भारतात आले, तेव्हा त्याबद्दल अनेक कुशंका निर्माण झाल्या. अनेक मोठय़ा कलावंतांना या शंकांनी इतके घेरले, की त्यांनी ‘आपण बरे की आपले गाणे बरे’ असे म्हणत या तंत्राकडेच पाठ फिरवण्याचा निर्णय घेतला. चित्रपटासारख्या नव्या माध्यमांनी ध्वनिमुद्रणाचा उपयोग करून घेण्यासाठी २०-२५ वर्षांचा कालावधी जावा लागला. त्यामुळे चित्रपटांतील संगीत स्वतंत्रपणे ध्वनिमुद्रित करून ते चित्रफितीला जोडण्याचे हे तंत्र म्हणजे खरोखरीचे वरदान ठरले. कॅमेऱ्यासमोर स्वत:च गाणे गावे लागत असल्याने गाणारी अभिनेत्री किंवा अभिनेता मिळणे दुरापास्त होई. अनेकदा अभिनयापेक्षा गायनकौशल्यालाच महत्त्व मिळे. पाश्र्वसंगीताच्या तंत्रामुळे चित्रपट अधिक सुबक होण्यास मदत झाली आणि गायक कलावंतांनी फक्त गायनाचे काम करावे आणि अभिनेत्यांनी अभिनयाचे अशी कामाची विभागणी झाली. तेव्हा सुरेल आवाजाच्या कलावंतांनी चित्रपटासारख्या झगमगाटी दुनियेत येण्यास काचकूच केलीच. तशी ती शमशाद बेगम यांच्याही बाबतीत झालीच. लाहोरला असताना जेव्हा ध्वनिमुद्रणाची संधी आली, तेव्हा शमशाद बेगम यांना एकाच अटीवर परवानगी मिळाली. ती म्हणजे बुरख्यात गाणे म्हणायचे आणि छायाचित्र काढायचे नाही. तेथपासून सुरू झालेल्या प्रवासात त्यांना जेव्हा लाहोरहून मुंबईला येण्याची संधी मिळाली, तेव्हाही आईवडिलांकडून काळजीच्या स्वरातील विरोध स्वाभाविक होता. स्वभावातील शालीनता स्वरातूनही त्याच ताकदीने व्यक्त करू शकणाऱ्या शमशाद बेगम यांना काळाच्या पुढचे पाहता आल्याने, नंतरच्या काळात भारतीय चित्रपट संगीताने कात टाकली. चित्रपट संगीताला स्वत:चा चेहरा सापडण्यासाठी शमशादबाईंचे योगदान मोठे होते. सामान्य माणसाची स्वर अभिरुची संपन्न करणाऱ्या या कलावतीने आयुष्यभर त्या झगमगाटाकडे कटाक्षाने दुर्लक्ष केले. त्याबद्दल तसूभरही खंत बाळगली नाही, त्यामुळेच कला हेच ध्येय आणि जीवन ही बैठक जराही ढळली नाही. नंतरच्या काळातील अनेक गायिकांना आदर्श वाटेल, असे वर्तन आणि उच्च दर्जाची कला यांचा हा अपूर्व संगम त्यांच्या ठायी होता, म्हणूनच तर गायन बंद केल्यानंतरच्या कितीतरी दशकांमध्ये त्यांची आठवण कुणी विसरले नाही. त्या कोणत्या ना कोणत्या स्वरूपात पुन:पुन्हा भेटत राहिल्या आणि रसिकांचा आनंद द्विगुणित करत राहिल्या. लालगुडी जयरामन आणि शमशाद बेगम यांच्यातील साम्यस्थळ हे त्यांच्या जीवननिष्ठेत आहे. जगण्याचे कारण कळणारी अशी फार थोडी कलावंत मंडळी असतात, जी उरलेल्यांना ती ऊर्मी देतात. या दोन्ही कलावंतांच्या निधनाने ही ऊर्मी देणारी केंद्रेच काळाच्या पडद्याआड गेली आहेत.