News Flash

मुद्दा विषयांतराचाच..

स्त्री-पुरुष समतेच्या विषयावर नेहमीच वाद होतात, या वादांना नेहमी फाटे-वाटा फुटतात आणि विषयांतरामध्ये मूळ विषय हरवून जातो.

| June 13, 2015 12:41 pm

स्त्री-पुरुष समतेच्या विषयावर नेहमीच वाद होतात, या वादांना नेहमी फाटे-वाटा फुटतात आणि विषयांतरामध्ये मूळ विषय हरवून जातो. दुसरीकडे नोबेल-मंडित शास्त्रज्ञ, भारताचे पंतप्रधान अशा व्यक्तींची गेल्याच आठवडय़ातील विधाने हे त्यांचे जणू ‘विषयांतर’ होते, अशा थाटात हा आठवडा पुढे सरकला आहे..

‘शाळेत असूनसुद्धा मी शिकू शकलो’ असे एखादा लेखक लिहून जातो आणि अनेक वाचकांना हे वाक्य अगदी पटते. शाळेला लेखक दूषण देतो आहे हे ‘असूनसुद्धा’ या शब्दामुळे अधोरेखित झाले, असे विश्लेषण करत बसण्यात वाचकांना रस नसेल.. पण ‘असूनसुद्धा’ या शब्दातील खोच स्वानुभवाने लक्षात येतेच. भारताच्या पंतप्रधानांनी जेव्हा बांगलादेशच्या पंतप्रधानांचे कौतुक करताना ‘त्या महिला असूनसुद्धा’ असे शब्द वापरले, तेव्हाही ते महिलांना दूषण देताहेत हेच गृहीत धरले गेले आणि गेल्याच आठवडय़ात समाजमाध्यमांतून यावर गदारोळ सुरू झाला. हा गदारोळ विरत नाही तोच नोबेल पारितोषिकाचे मानकरी ठरलेले ब्रिटिश जीवरसायनशास्त्रज्ञ सर टिम हंट यांनी कोरियात महिला शास्त्रज्ञांविषयी जी काही विधाने केली, त्यावरून विज्ञानजगतात कल्लोळ उठला. भारतीय पंतप्रधानांविषयीचा गदारोळ आणि ब्रिटिश शास्त्रज्ञाविषयीचा कल्लोळ यांची कारणे निरनिराळी, त्यांवरून झालेली चर्चा वेगवेगळी आणि अर्थातच ‘काय चूक आहे त्यात?’ अशा आविर्भावात या दोघांना वादग्रस्त ठरवणेच चूक असे सिद्ध करू पाहणाऱ्यांचे हेतूही भिन्न आहेत.. पण दोघेही महिलांबद्दल बोलले आणि वाद सुरू  झाला हे खरे आहे आणि या वादांतून जो काही तत्त्वबोध व्हायला हवा तो मानवजातीला कधीकाळी होईल काय हा प्रश्न आहे. याचे कारण या वादात विषयांतरेच अधिक होतात.

विषयांतरे का होतात, याचे कारण साधेच. वाद जुना, हे. स्त्री-पुरुष समतेच्या तत्त्वाला बट्टा लावणारे बोल उच्चपदांवरून ऐकू आले की वाद वाढतोच. बोलणारे उच्चपदस्थ नसले, तरीही लिंगसमभाव न्यायाचा वादच असा आहे की तो डोके वर काढू शकतो. त्याला कितीही फाटेसुद्धा फुटू शकतात. नव्हे फुटतातच. शास्त्रज्ञ टिम हंट हे दक्षिण कोरियात अलीकडेच भरलेल्या ‘जागतिक विज्ञान-पत्रकार संमेलना’त जे काही बोलले, ते त्यांच्या मूळ विषयाला सोडून होते. परंतु त्यावरील वादादरम्यान त्यांनी काढलेला अवांतर विषयही मागे पडावा आणि मुद्दय़ावर घाव घालण्याऐवजी अन्यत्र पाहावे, असे होणे अटळ आहे. ‘प्रयोगशाळेत मुली (महिला) आल्या की त्रासच.. एक तर त्या रडतात आणि दुसरे म्हणजे त्या पुरुष शास्त्रज्ञांच्या प्रेमात पडतात.. अशाने वैज्ञानिक संशोधनाचे काम अडखळते’ अशी टिम हंट यांची वादग्रस्त विधाने आहेत. परंपरेचा पगडा शास्त्रज्ञांवर किती असतो, हे यातून दिसतेच. येथे ती परंपरा केवळ स्त्री-पुरुष विषमतेची आहे असे नव्हे. तर्क म्हणजे पुरुष आणि भावना म्हणजे स्त्री, अशा चुकीच्या वैचारिक रूढीला २००१ साली शरीरशास्त्र-आरोग्यविज्ञान या विषयातील नोबेल मिळवणारे टिम हंट शरण गेलेले दिसतात. परंतु ‘तो’ तर्क आणि ‘ती’ भावना ही विभागणी कितीही पुढे दामटली तरी पुरुषांना भावनिकपणे वागण्याची मुभा मिळतच असते. हंट पाच-सात मिनिटे या विषयावर बोलत होते, त्यादरम्यान त्यांनी स्वत:च्या आयुष्यात प्रयोगशाळेतील सह-वैज्ञानिक मुली अनेकदा आल्या आणि या अनेकींच्या प्रेमात पडल्यामुळे आपले संशोधन अडखळले, अशी खंत व्यक्त केली. हीच खंत जर ‘इश्क ने हमको निकम्मा कर दिया ग़ालिब। वरना हम भी आदमी थे काम के॥’ या ओळींमधून आली तर तो मिर्झा ग़ालिब यांचा भावनिक आविष्कार आणि शास्त्रज्ञ हेच बोलले तर मात्र तार्किक, हे कसे? तेव्हा मुलींवर भावनिकतेचा दोषारोप करणाऱ्या या शास्त्रज्ञाची चार बोटे स्वत:कडेच होती, हेच खरे. याच मानसिकतेतून कलेच्या क्षेत्रात स्त्रीला ‘स्फूर्तिदेवता’ मानले जाते आणि पुरुष कलावंतांमध्ये तर कुणाच्या आयुष्यात सर्वाधिक ‘स्फूर्तिदेवता’ आल्या आणि गेल्या, हे मोजण्याची लबाड स्पर्धाच लागलेली अनेकदा दिसली आहे. लबाड म्हणायचे, कारण देवता आणि भोग्यवस्तू यांमधला फरक नेमका काय, हे येथे धूसरच असते. कलावंताप्रमाणे वैज्ञानिकाला स्त्रीचा ‘स्फूर्तिदेवता’ म्हणून उपयोग नाही- उलट तर्कनिष्ठेच्या मार्गातील ती धोंडच- हे सुचवताना स्वत:ला हाच अनुभव पुन:पुन्हा आल्याचे सांगून टिम हंट यांनी खंत व्यक्त केली की त्या मिषाने बढाई मारली, हेसुद्धा अंधारातच राहणार असते. अधिक स्त्रियांना जिंकणे म्हणजे अधिक पौरुष, हा विषमतेकडे नेणारा समज मात्र इथे अगदी स्पष्ट असतो.
परंपरांचे प्रवाह अडवू म्हटले तरी अडवता येत नाहीत आणि त्यांची सरमिसळ म्हणा की भेसळ म्हणा- ती होतच राहते, हे टिम हंट यांच्यासारख्यांच्या वक्तव्यांवरून दिसते. परंपरा स्त्रीला स्फूर्तिदेवता किंवा धोंड मानणारी असते, तशीच ‘स्त्रीदाक्षिण्या’च्या नावाखाली स्त्रीचे कोडकौतुक पुरवत, तिची काळजी घेत तिला तिच्या मर्यादा किती गृहीत धरण्याजोग्या आहेत याची जाणीव करून देणारीही असते. यापुढली पायरी म्हणजे बसगाडीत महिलांसाठी राखीव आसने किंवा पंचायतींपासून लोकसभेपर्यंत महिलांसाठी राखीव प्रतिनिधित्व ठेवणे यांसारख्या मूलत: अन्याय-निवारक निर्णयांची भलामणही स्त्रीदाक्षिण्यवादी मानसिकतेतूनच केली जाते. असे करणे सोयीचे असते, कारण अन्याय होतो आहे हे मान्य न करताच ‘यत्र नार्यस्तु पूज्यन्ते..’सारखे एकमेवाद्वितीय सुभाषित वापरून प्रश्न सुटतो. एखाद्या परंपरेच्या एखाद्या प्रवाहाची सरमिसळ झाल्यावर स्त्री-पुरुष समता हे तत्त्व आहे की नाही, त्या तत्त्वाला हरताळ फासला जातो म्हणून सामाजिक जीवनात स्त्रियांचे पारडे हलके ठरते की नाही आणि ते हलके पारडे जड करण्यासाठी राखीव जागा हा उपाय योजावा लागतो की नाही, हे सरळसाधे प्रश्न बाजूला राहतात. फक्त आपल्याच परंपरेला दोष देण्याचे काही प्रयोजन नाही. जगभरचे देश-प्रदेश, बहुतेक साऱ्या ‘सभ्यता’ आणि त्या सभ्यतांचे वंगण ठरणाऱ्या संस्कृती, त्या संस्कृतींची धारणा करणारे धर्म, या सर्वानी स्त्री-पुरुष विषमतेच्या मुद्दय़ावर अशी काही विषयांतरे केली आहेत की, त्यापुढे स्त्री-पुरुष समतेचे तत्त्व जणू झूटच वाटावे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना वाजेद यांची स्तुती करताना ‘त्या महिला असूनसुद्धा दहशतवाद खपवून घेत नाहीत’ असे विधान सोमवारी केले होते. त्यावर वाद झाला, तो प्रामुख्याने ट्विटर या समाजमाध्यमातून. ट्विटरचा स्थायिभावच टिप्पणीचा असल्यामुळे अनेकींनी आणि अनेकांनी धारदार उपरोध वा उपहासाचे दर्शन या ट्विप्पण्यांतून घडविले. यावरही कुणी तरी, ज्या देशात पंतप्रधानांमागेही ट्विटर-टीकेचा ससेमिरा लागू शकतो तो खरोखरच लोकशाही देश, अशी ट्विप्पणी केली. वास्तविक मोदींवर प्रतिगामीपणाचा ठपका वारंवार ठेवणाऱ्यांनाही, ‘मोदी हे स्त्री-पुरुष समता नाकारणारे आहेत,’ असा आरोप करण्याची संधी आजवर मिळाली नव्हती. ती आता केवळ ज्ञात टीकाकारांनाच नव्हे तर सर्वानाच मिळाली, असा संदेश ट्विटरवरील गदारोळातून किमान ब्रिटन आणि अमेरिकेतील प्रसारमाध्यमांपर्यंत गेल्याचे आठवडय़ाअखेर दिसू लागले आहे. चर्चिल किंवा अब्राहम लिंकन या नेत्यांनी स्त्रियांबाबत विषमतावादी दृष्टिकोनच दाखविला होता, हे याच दोन देशांतील इतिहासकार गेल्या काही वर्षांत दाखवून देत होते, त्यामुळे मोदींवर ब्रिटिश-अमेरिकी वृत्तपत्रांनी आणखी टीका केल्यास त्याला ‘सडेतोड उत्तर’ देता यावे अशी तजवीज आहेच. ती तजवीज वापरणे हा विषयांतर-नीतीचा परमोच्च बिंदू ठरेल.
‘मी जे बोललो ते मला खरे वाटते; परंतु मी माझ्या वक्तव्यांबद्दल दिलगीर आहे’ अशी भूमिका टिम हंट यांनी स्पष्ट केली आहे. ‘महिला असूनसुद्धा’बद्दल मोदी यांना तसे स्पष्टीकरण देण्याची गरजच नाही कारण त्यांच्या दौऱ्यातील या दोन शब्दांपेक्षा अन्य किती तरी बाबी अधिक महत्त्वाच्या आहेत, हा युक्तिवाद अगदी बिनतोड ठरणारा आहे. मात्र स्त्री-पुरुष समतेच्या तत्त्वाशी आपण कसे वागतो, हा मूळ प्रश्न नेहमीच विषयांतरांमुळे बाजूला पडणार, हे सरत्या आठवडय़ाने आपल्याला दाखवून दिले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 13, 2015 12:41 pm

Web Title: nobel scientist tim hunt and gender equality
Next Stories
1 ऊस आणि कोल्हे
2 रॅम्बो राठोडना रोखा
3 सत्तामदास उतारा
Just Now!
X