नोकिया, मोटोरोला, कॅसिओ.. कॉम्पॅक..यांची आठवण आज पुन्हा काढण्याचं कारण ट्विटर..
आता आठवलं तरी ते खोटं वाटतं. १९९८ सालच्या जून महिन्यात एके दिवशी मी पहाटे तीन वाजता हेलसिंकी विमानतळावर उतरलो तेव्हा माझ्याकडे त्या देशाचा व्हिसा नव्हता. लंडनला ‘द गार्डियन’मध्ये काम करत होतो आणि एका समारंभाच्या वृत्तांकनासाठी ‘गार्डियन’नं मला तिकडे पाठवलं होतं. माझा संपादक म्हणाला, निर्धास्तपणे जा.. आयोजक सगळी काळजी घेतील. त्याला तसा विश्वास होता.
कारण आयोजकाच्या भूमिकेत होती, नोकिया ही कंपनी. नोकिया ही फिनलंडची. घराघरांत नोकियाचे फोन होते तिकडे. तिकडे गेल्यावर कळलं नोकिया नाही, असं एकही घर त्या देशात नव्हतं. माणशी चार असं त्या वेळी त्या देशात नोकिया फोन्सचं प्रमाण होतं. म्हणजे लोकसंख्येच्या चौपट मोबाइल फोन होते. प्रत्येक फिनलंडकराला त्या कंपनीचा कोण अभिमान. त्या कंपनीची प्रचंड ताकद होती, त्या वेळी. हे सगळं नंतर कळलं. पण त्या वेळी  स्कँडेनेव्हियन एअरलाइन्सच्या विमानातून बाहेर उतरताना पोटात नाही म्हटलं तरी बागबुग होती. न जाणो व्हिसाशिवाय उतरलो म्हणून अटकबिटक केली तर काय? पण विमानातून बाहेर आलो तर विमान कंपनीचा प्रतिनिधी माझ्या नावाचा फलक घेऊन उभा होता. तो अलगदपणे मला रांगेतून बाहेर काढून, कस्टम्स वगैरे सर्व सोपस्कार व्हायच्या आधीच विमानतळावरच्या संबंधित कार्यालयात घेऊन गेला, पासपोर्ट घेतला आणि आत जाऊन त्यावर व्हिसा डकवून आलादेखील. जे झालं त्याचं थक्कपण माझ्या चेहऱ्यावर असावं बहुधा. ते पाहून तो म्हणाला.. आफ्टर ऑल, यू आर नोकियाज गेस्ट.     
साहजिकच विमानतळ ते हॉटेल गप्पा नोकिया कंपनीबाबत. ती सुरुवातीला कशी अगदी काहीही बनवणारी कशी कंपनी होती, मग ती कशी वाढली, आता ती जगातल्या अनेक कंपन्यांत कशी गणली जाते.. वगैरे सर्व नोकियाभिमान नुसता गप्पांतून उतू जात होता. त्या गप्पा थांबताना तो एक वाक्य म्हणाला.. आता नोकिया लवकरच मोटोरोला या अमेरिकी कंपनीलादेखील मागे टाकेल. अमेरिकी महाकंपनीला मागे टाकणं हा त्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा राष्ट्राभिमानी वगैरे दिवस ठरणार होता. लवकरच नोकियानं मोटोरोलाला खरोखरच मागे टाकलं. फिनलंडमध्ये जल्लोष झाला असणार नुसता.    
आज त्या दोन्ही कंपन्या नाहीत. मोटोरोला कशीबशी, अगदी टिकून राहण्यापुरतीच जिवंत आहे आणि नोकियाला मायक्रोसॉफ्टनं गिळून टाकलं. गेल्याच आठवडय़ात बातमी आली- इतके दिवस ‘नोकिया ल्युमिया’ या नावानं बाजारात विकले जाणारे फोन यापुढे फक्त ‘मायक्रोसॉफ्ट ल्युमिया’ हे इतकंच नाव धारण करून बाजारात येणार.
एक बलाढय़ कंपनी बघता बघता दिसेनाशी झाली.    
माहिती उद्योगाचं, त्या क्षेत्रातल्या तंत्रज्ञानाच्या सुसाट वेगाचं ते एक प्राक्तनच असावं. १९९८ सालीच कॉम्पॅक नावाची बलाढय़ संगणक कंपनी ह्यूलेट पॅकार्ड, म्हणजे एचपी, या कंपनीनं विकत घेतली. कॉम्पॅक दिसेनाशी झाली. आज आता एचपीदेखील आपलं मोठेपण टिकवून ठेवण्यासाठी धडपडतीये. हॉटमेलचा असाच दबदबा होता. त्या कंपनीचं स्वतंत्र अस्तित्व असंच पुसलं गेलं. अशी किती उदाहरणं दिसतील. मोबाइलचा प्रसार यायच्या आधी पेजर नावाच्या काडेपेटय़ा कंबरपटय़ाला लावून मिरवायची फॅशन होती. वास्तविक पेजर हे एकतर्फी दळणवळण. म्हणजे नुसते निरोप घ्यायची सोय असायची त्यावर. ते उलट पाठवता यायचे नाहीत. पेजर कंपन्या होत्या त्या वेळी मोठमोठय़ा. त्याही गेल्या. त्या वेळी फोन नंबर नोंदवून ठेवण्यासाठी कॅसियो या कंपनीच्या डिजिटल डायऱ्या यायच्या. कोटटाय लावून बिझनेसची (धंद्याची नव्हे) भाषा करणारे त्या डायऱ्या हातात घेऊन फिरायचे. त्या डायऱ्यांत मोबाइल क्रमांकाच्या बरोबर पेजर क्रमांकदेखील नोंदवून ठेवायची सोय असायची. काळाच्या ओघात तेही कालबाह्य़ ठरलं. दिसेनासं झालं.     सॉफ्टवेअर्सच्या बाबत तर अशी कित्येक उदाहरणं आढळतील. ऑर्कुट गायब झालं. एके काळी ऑर्कुटवर असणं म्हणजे आधुनिक समजण्याचा मानदंडच मानला जायचा. विंडोजचा प्रादुर्भाव वाढल्यावर डिस्क ऑपरेटेड सिस्टीम्स.. म्हणजे डॉस प्रणाली.. अंतर्धान पावली. असं खूप काही झालं.
का होतं असं हे? उत्तर अर्थातच साधं आहे. जे काही आहे त्यापेक्षा अधिक काही चांगलं बाजारात येतं, हे एक. आणि तोपर्यंत जे काही असतं ते या बदलास सामोरं जायला तयार नसतं. इतका चतुरपणा त्याच्याकडे नसतो. असला तरी आहे त्याला बदलासाठी जितका वेळ लागतो तितका वेळ थांबायला बाजारपेठ तयार नसते. परिणामी आहेत ती उत्पादनं झपाटय़ानं दिसेनाशी होतात. या अपरिहार्यतेचा एक परिणाम असा की जेव्हा केव्हा ही उत्पादनं इतकी लोकप्रिय असतात की त्या वेळी ती थेट यशाच्या शिखरावरच जातात. जगच जिंकतात. इतका प्रचंड नफा, लोकप्रियता असं काय काय यांच्या वाटय़ाला इतकं येतं की ते उत्पादन अमरच वाटू लागतं.    
असं सध्याचं उदाहरण म्हणजे ट्विटर.    
याचा जन्म अगदी अलीकडचा. म्हणजे २००६ सालचा. जॅक डॉर्से, इव्हान विल्यम्स, बिझ स्टोन वगैरे पोरांच्या डोक्यातनं ही कल्पना जन्माला आली. विषय असा होता की, मोबाइल फोनवरचा एक मेसेज अनेकांना एकाच वेळी पाठवता येईल का. यातले डॉर्से वगैरेंना तर पदवीदेखील मिळायची होती त्या वेळी. फेसबुकच्या जन्मासारखंच हेही. कॉलेजमधल्या सर्वासाठीच एखादा असा समान नोटीस बोर्ड करता येईल का, या प्रश्नाच्या उत्तरातनं फेसबुक जन्माला आलं. तसंच एकच मेसेज अनेकांना पाठवता येईल का, या साध्या इच्छापूर्तीच्या प्रयत्नातून ट्विटर जन्मलं. कल्पना साध्या निरोपाची होती आणि निरोप हे लहानसेच असतात. त्यामुळे याला नावही तसंच दिलं गेलं. ट्विटर म्हणजे पक्ष्याची चिवचिव. ऐकू येतीय असं वाटते, पण शोधू गेलं तर दिसेनाशी होते. ट्विटर तसंच होतं आणि अजूनही आहे.     
..बघता बघता ते वाढलं. जन्मानंतर एकाच वर्षांत, २००७ साली, एकूण ट्विट्सची संख्या होती चार लाख. पुढच्या वर्षी ती झाली थेट १० कोटी. त्यानंतर आणखी एक वर्षांनंतर तर दर दिवशीचे ट्विट्स पाच कोटींवर गेले. २०१० सालच्या फिफा विश्वचषकाच्या काळात त्यानं भलतीच झेप घेतली. २९४० ट्विट्स प्रति सेकंद इतक्या गतीनं लिहिले जात होते. त्याच्या आदल्या वर्षी गायक-नर्तक मायकेल जॅक्सन याचं गूढ निधन झालं. त्या वेळी मायकेल जॅक्सन हे दोन शब्द लिहीपर्यंत ट्विटरचा सव्‍‌र्हर संगणक मोडून पडत होता. एका तासात एक लाख इतक्या गतीनं ट्विट्स त्या वेळी लिहिले गेले.    
२०१३ साली, तेही म्हणजे अगदी एक वर्षांपूर्वी, सप्टेंबर महिन्यात ट्विटरचा पब्लिक इश्यू आला. भांडवली बाजारातून कंपनीनं विस्तारासाठी पैसे उभे करायचं ठरवलं. कंपनीला उभे करायचे होते १०० कोटी डॉलर. विस्तार, तंत्रशोध वगैरेसाठी. प्रत्यक्षात किती हाती आले? तर ३१०० कोटी डॉलर. कंपनीची लोकप्रियता इतकी होती की समभागांना प्रचंड मागणी होती. अजूनही आहे. सुरुवातीला अनेकांना इतका काही प्रतिसाद या ट्विटरला मिळेल असं वाटत नव्हतं. त्यामुळे गुंतवणूकदारांच्या या उत्साहानं सगळेच अचंबित झाले.
..पण ही काही ट्विटरची गौरवगाथा नाही.
इथं दखल घ्यायची आहे ती नुकत्याच जाहीर झालेल्या ट्विटरच्या तिमाही निकालाची.     
तोही धक्कादायक आहे. ट्विटरने सलग तिसऱ्या तिमाहीत महसूल वाढ नोंदवली आहे. हा महसूल ११४ टक्क्यांनी वाढून ३६ कोटी १३ लाख डॉलरच्या आसपास गेला.     
पण हेच फक्त काही दखल घ्यावं असं नाही.    
याच काळात ट्विटरचा तोटाही पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त गतीनं वाढला. ६.४६ कोटी डॉलरवरून तो १७ कोटी ५५ लाख डॉलरवर जाऊन पोहोचलाय.     
खरी धक्कादायक बाब आहे ती ही. ट्विटर अफाट गतीनं वाढलं, वाढतंय. पण ज्या गतीनं प्रसार होतोय त्या गतीनं ट्विटरच्या महसुलात वाढ होत नाहीये, असं झालंय. नुसतं आताच नाही तर गेले जवळपास वर्षभर असंच सुरू आहे. म्हणजे एखाद्या वर्तमानपत्रानं वेगवेगळ्या पद्धतींनं, क्लृप्त्या करून.. म्हणजे दहा रुपयांत वर्षभर वगैरे असं काही करून.. आपलं वितरण वाढवावं, पण महसूल मात्र वाढू नये, तसंच हे. ही अशी वाढ पोकळ असते.    
नेमका हाच इशारा आता अर्थतज्ज्ञ ट्विटरच्या संदर्भात देतायत. गुंतवणूकदार सल्लागारांनी तर सांगायला सुरुवात केलीय, ट्विटरमध्ये गुंतवणूक करू नका, म्हणून.
अर्थात ट्विटरच्या खजिन्यात अजून ३६० कोटी डॉलर रोख पडून आहेत, पण तज्ज्ञांचं म्हणणं श्रीशिलकीच्या आधारे किती दिवस जगणार आणि मुख्य म्हणजे त्यांचा प्रश्न हा की कोणत्या टप्प्यापासून ट्विटरला नफा मिळायला सुरुवात होईल.
याचं उत्तर अर्थातच कोणाकडे नाही. त्या उत्तराच्या मार्गावर नोकिया, ऑर्कुट, कॉम्पॅक.. वगैरेची सय येते इतकंच..

twit