दिल्लीच्या राजकीय धुक्यात काही नेते दिसतील न् दिसतील असे झाले आहेत.. त्यांपैकी काहींचे न दिसणे साधेपणाच्या अंगभूत गुणामुळे असेल. पण अन्य अनेक जण आपापल्या अस्तित्वाची जाणीव करून देण्यास कितीही उत्सुक असले, तरी त्यांचे राजकीय भवितव्य टांगणीलाच आहे आणि पाच राज्यांच्या निकालांनंतर यात काही फरक पडेल, अशी आशा असणाऱ्यांत वाचाळ, बालिश, उच्चभ्रू  असे हरतऱ्हेचे राजकारणी आहेत..
भंपकपणा व भपकेबाजपणा हा दिल्लीचा स्वभावधर्म आहे. एखादा लहानसहान कार्यक्रम- अगदी मुलाची मुंज, बारशाचा कार्यक्रम, रामनवमी/ हनुमान जयंतीला भजनसंध्या असली तरी एखाद्या केंद्रीय मंत्र्याने, खासदाराने, आमदाराने यावे अशी यजमानांची इच्छा असते. त्यात एखाद्या मंत्र्याकडे कार्यक्रम असला की तेथे चमकगिरी करणारे पायलीला पन्नास सापडतात. साधेपणा व ल्युटन्स झोन हे दोन परस्परविरोधी शब्द म्हटले पाहिजेत. या ल्युटन्स झोनमध्ये मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कन्येचा विवाह सोहळा ११ रेस कोर्स या बंगल्यावर पार पडला. मुख्यमंत्र्यांघरची निमंत्रण पत्रिका अत्यंत साधी होती. इतकी साधी की त्यावर चव्हाण यांच्या कुठल्याच पदाचा उल्लेख नव्हता. ही पत्रिका हातात पडल्यावर कितीतरी दिल्लीकर काँग्रेस नेत्यांनी संबंधित दूरध्वनी क्रमांकावर चौकशी केली.. ‘पृथ्वीराज चव्हाण म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीच ना’, अशी. चव्हाण यांच्याकडच्या कार्यक्रमात ना भंपकपणा होता न भपकेबाजपणा. निम्मे केंद्रीय मंत्रिमंडळ या समारंभात उपस्थित होते. अनुपस्थित राहिले ते काँग्रेस संघटनेत मोठय़ा पदावर असलेले नेते. पाच राज्यांतील निवडणुकांमुळे संघटनेत सक्रिय असलेले काँग्रेस नेते काही प्रमाणात अस्वस्थ आहेत. या अस्वस्थतेतून काही बालिश प्रकार दिल्लीत अनुभवायला मिळत आहेतच; पण राजधानीत दिसते आहे ती, दरबारी राजकारणात आपापले स्थान टिकवू पाहणाऱ्यांची अस्तित्वाची लढाई.  
सामान्य जनता म्हणजे मूर्ख, अशी समजूत काँग्रेसजनांची झाली आहे की काय, असा एक प्रकार दिल्लीत अनुभवायला मिळाला. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणे हेच केवळ आपले जीवितकार्य आहे, अशी अनुभूती साऱ्या काँग्रेस नेत्यांना झाली आहे. नरेंद्र मोदी लाल किल्ल्यासमोरील परेड मैदानावरून भाषण करतील तेव्हा दूरचित्रवाणीवर पाहणाऱ्यांना मोदींच्या मागे लाल किल्ला दिसेल. त्यामुळे मोदी जणू काही लाल किल्ल्यावरून भाषण करीत आहेत, असा भास निर्माण होईल. पंतप्रधानच जणू लाल किल्ल्यावरून भाषण देत आहेत, असे कोटय़वधी भारतीयांना वाटेल. तेव्हा मोदी यांना परेड मैदानावर भाषणाला परवानगी देऊ नका, अशी अजब मागणी दिल्ली प्रदेश काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे केली होती. अर्थात या युक्तिवादाला निवडणूक आयोगाच्या लेखी काडीचीही किंमत नाही. जणू काही भारतीय मतदार बालबुद्धीचे आहेत, अशी ठाम समजूत झाल्याप्रमाणे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जे.पी. अगरवाल यांनी अशी बालिश मागणी निवडणूक आयोगाकडे केली. सध्या दोन प्रकारच्या सत्तापिपासू राजकारण्यांची फळी देशात तयार होऊ पाहात आहे. एक म्हणजे कोणत्याही परिस्थितीत सत्ता मिळविण्यासाठी अग्रेसर असलेले नरेंद्र मोदी यांची फळी, तर दुसरी किंवा विरोधी फळी म्हणजे मोदींना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी सारेच हातखंडे अजमावणारे काँग्रेसचे नेते. या दोन्ही प्रकारच्या राजकारण्यांना आपापल्या क्षमतांचा अंदाज पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीनंतर येईलच.  
भारतीय जनता पक्षाला केंद्रात सत्ता हवी आहे. पण सत्तेत आल्यावर सत्तासंचालनासाठी आवश्यक असणारी यंत्रणा, तज्ज्ञ राजकारण्यांचा अभाव भाजपमध्ये आहे. कैक वर्षे विरोधी पक्षात बसल्यामुळे आलेले शैथिल्य मोदींमुळे काहीसे दूर होत असले तरी सत्तासंचालनासाठी आवश्यक परिपक्वता भाजपमध्ये नाही. याचे अलीकडचे उदाहरण म्हणजे तरुण तेजपाल प्रकरण. तेजपाल यांच्या तहलकाने केलेल्या ऑपरेशन दुयरेधनमध्ये देशातील नऊ खासदारांना संसदेत प्रश्न विचारण्यासाठी पैसे देताना दाखविले होते. त्यापैकी भारतीय जनता पक्षाचे दोन खासदार होते. एक होते तत्कालीन जळगाव लोकसभा मतदारसंघाचे वाय. जी. महाजन (सर), तर दुसरे होते एरंडोल मतदारसंघाचे एम. के. पाटील. संबंधित खासदारांविरोधात न्यायालयीन खटला सुरू आहे व खासदारांची बाजू ज्येष्ठ वकील राम जेठमलानी मांडत आहेत. तेजपाल यांच्या तहलकामध्ये असलेल्या जेठमलानी यांच्या भागीदारीची माहिती तत्कालीन भाजप नेत्यांना कशावरून नसेल? तहलकाने पितळ उघडे पाडायचे; तर तहलकामध्ये भागीदारी असलेल्या राम जेठमलानी यांनी त्यांचे वकीलपत्र घ्यायचे.. या राजकीय कंपूशाहीचा बळी भारतीय जनता पक्षच आहे. जेठमलानींना वकीलपत्र द्यायचा सल्ला प्रमोद महाजन यांनी दिला होता.   
प्रमोद महाजन हयात असताना त्यांचे खास पंटर म्हणून ओळखले जाणारे सुधांशू त्रिवेदी सध्या विविध वृत्तवाहिन्यांवर, वृत्तपत्रांमधून कालपरवापर्यंत झळकत होते. महाजन यांच्या निधनानंतर दरवर्षी केवळ त्रिवेदीच श्रद्धांजलीची जाहिरात देतात. कधीकाळी साधा मंडप कंत्राटदारीचा व्यवसाय असलेल्या त्रिवेदींचे नाव आज दिल्लीत मध्यरात्री वावरणाऱ्या राजकारण्यांमध्ये घेतले जाते. तहलकाच्या माजी संपादक शोमा चौधरी यांच्या घराला काळे फासणारे विजय जॉली हेदेखील याच कंपूतले. मध्यरात्री सक्रिय होणाऱ्यांचा हा मोठा गट केवळ एका पक्षापुरता मर्यादित नसून उच्चभ्रूपणा हा या साऱ्यांना जोडणारा दुवा आहे. या गटाचे नेतृत्व तेजपाल यांच्याकडे होते. या कंपूत दिल्लीतील अनेक काँग्रेस नेतेही आहेत. तेजपाल यांच्यानिमित्ताने तहलकावर कारवाई झाल्यास या कंपूत वावरणाऱ्या केंद्रीय मंत्र्यांचेही भवितव्य टांगणीला लागलेच म्हणून समजा. त्रिवेदी, जॉली यांना तर दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारापासून दूर भिरकावण्यात आले आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व सोनिया गांधी यांचे खास दूत असलेल्या मोतीलाल व्होरा यांच्यावर राहुल गांधी यांची वक्रदृष्टी आहे. व्होरा कधीकाळी मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते. सध्या ते पक्षसंघटनेत सक्रिय आहेत. एकीकडे राहुल गांधी यांच्या हातात काँग्रेस एकवटली जात असताना व्होरा यांनी त्यांचीच नाराजी ओढवून घेतली. व्होरांनी आपले चिरंजीव अरुण यांना छत्तीसगढच्या दुर्ग विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळवून दिली. सलग तीन वेळा त्यांचा या मतदारसंघातून पराभव झाला आहे. राहुल गांधी यांच्या यंग ब्रिगेड प्रयोगाचा पहिला बळी व्होरांचे चिरंजीव ठरतील. कारण एकदा पराभव झाल्यानंतर दुसऱ्यांदा उमेदवारी देऊ नका, अशी भूमिका राहुल यांनी घेतली होती. पण व्होरांच्या आग्रहामुळे अरुण यांना सोनियांनी उमेदवारी बहाल केली. मात्र याही वेळी पराभूत झालात तर पुन्हा उमेदवारी मिळणार नाही, या अटीवर. काँग्रेसच्या परंपरेला शोभणाऱ्या घराणेशाहीला विरोध करण्याची धमक (?) राहुल गांधी यांनी दाखविल्याने व्होरा, दिग्विजय सिंह यांच्यासारखे बडे काँग्रेस नेते हादरले आहेत. स्वत:च्या मुलाला काँग्रेसमध्ये प्रस्थापित करण्यासाठी धडपडणाऱ्या दिग्गीराजांच्या हाती अद्याप निराशाच आली आहे.
विजय जॉली काय नि मोतीलाल व्होरा काय, किंवा पृथ्वीराज चव्हाण यांच्या कन्येच्या विवाह सोहळ्यात बराच वेळ उपस्थित राहून खुल्या दिलाने गप्पा मारून बातम्या पेरणारे दिग्गीराजा काय नि येऊन लगोलग मुंबईला रवाना झालेले महाराष्ट्राचे माजी आदर्श मुख्यमंत्री अशोक चव्हाण काय, हे सारे नेते आपापल्या परीने आपले राजकीय अस्तित्व कायम राखण्यासाठी सतत धडपडत असतात. अशांसाठी या पाच राज्यांच्या निवडणुका म्हणजे अग्निपरीक्षा आहे. या पाच राज्यांच्या सत्ताबाजारात काय होणार, याचा कानोसा अनेक जण घेऊ लागले आहेत. त्यामुळेच सट्टा-बाजारात मध्य प्रदेश, दिल्ली व राजस्थानमध्ये भाजपची तेजी आहे, तर राजस्थानमध्ये भाजप-काँग्रेसमध्ये टोकाची लढत होईल, असा अंदाज आहे. जनमानसाच्या हाती मतदानाचा पवित्र हक्क असल्याने निवडणूक फिक्सिंगची सुतरामही शक्यता नाही. लोकशाही समृद्ध करणाऱ्या या निवडणुकांमधून जसे विजयी होणाऱ्यांचे स्थान भक्कम होईल, त्याप्रमाणे वर्षांनुवर्षे सुभेदाराच्या थाटात वावरणाऱ्यांचे अस्तित्वही नष्ट होईल.