उत्तर प्रदेशात जणू ‘राम मंदिर’ उभे राहावे, अशी आनंदभावना सध्या महाराष्ट्राच्या राजधानीतील उत्तर मुंबईच्या अनेक ‘रामभक्तां’मध्ये उचंबळत असेल. त्याला कारणही तसेच आहे. अनेक वर्षे उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाचे लोकसभेत प्रतिनिधित्व केलेले भाजपचे वयोवृद्ध नेते राम नाईक यांनी उत्तर प्रदेशच्या राज्यपालपदाची सूत्रे हाती घेतली आहेत. ‘उत्तर मुंबई ते उत्तर प्रदेश’ असा ‘झेपावे उत्तरेकडे’ प्रवास करणाऱ्या राम नाईक यांच्या अभिनंदनाचे फलक उत्तर मुंबईत जागोजागी पाहावयास मिळतात. मुंबईला विद्रूप करणारे फलक, होर्डिग्ज लावण्यास न्यायालयाने मनाई केल्यानंतर राजकीय फलकबाजीला काही काळ आळा बसला होता. पण लोकसभा निवडणुकीनंतर पुन्हा रस्तोरस्ती असे फलक दिसू लागले. उत्तर मुंबईतील फलकांच्या गर्दीत आता राम नाईक यांच्या अभिनंदनाच्या फलकांची भर पडली आहे. वास्तविक, राम नाईक हे उत्तर मुंबईचे राजदूत किंवा प्रतिनिधी म्हणून उत्तर प्रदेशच्या राजभवनात दाखल झालेले नसून उत्तर प्रदेशचे राज्यपाल म्हणून त्यांनी शपथ घेतली आहे. त्यामुळे ते राष्ट्रपतींचे त्या राज्यातील प्रतिनिधी ठरतात. राज्यपालपदावर विराजमान झाल्यानंतर, ती व्यक्ती कोणा पक्षाची, कोणा प्रदेशाची किंवा कोणा भाषेपुरती सीमित राहत नाही. त्यामुळे, खरे तर पदाच्या संकेतानुसार, उत्तर मुंबई आणि उत्तर प्रदेश यांच्यातील मतांच्या राजकारणापुरत्या नात्याचा त्यांना आणि त्यांच्या निष्ठावंतांना विसर पडावयास हवा. पण मुळातच, उत्तर प्रदेशची मेहेरनजर नसेल, तर उत्तर मुंबईतून निवडून येणेदेखील अवघड असल्याची जाणीव असल्यामुळेच, राम नाईक यांना राजकारणात स्थिरावता आले. राज्यपालपदी नियुक्ती झाल्यानंतरही त्यांनी या ऋणाची जाणीव ठेवली, यामुळे उत्तर मुंबईतील उत्तर भारतीयांना भारावून गेल्यासारखेही वाटले असेल. गेली अनेक वर्षे उत्तर मुंबई मतदारसंघ हेच राम नाईक यांचे राजकीय कार्यक्षेत्र होते. उत्तर मुंबईतील उत्तर भारतीयांशी त्यांचे भावनात्मक नाते जडल्याचे त्यांनी राज्यपालपदाची सूत्रे हाती घेतल्यावर व्यक्त केलेल्या मनोगतातून स्पष्ट झाले आहे. उत्तर भारतीयांवर मुंबईत हल्ले घडविल्यामुळेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व उमेदवारांची अनामत लोकसभा निवडणुकीत जप्त झाली होती, असे सांगत राम नाईक यांनी मुंबईतील उत्तर भारतीयांच्या राजकीय शक्तीचीच अप्रत्यक्ष कबुलीही दिली. उत्तर मुंबईच्या लोकसंख्येपैकी तब्बल ३० टक्के  जनता उत्तर भारतीय असल्याने उत्तर प्रदेशातही आपल्याला घरच्यासारखेच वाटेल, अशी भावनाही राम नाईक यांनी व्यक्त करून टाकली.  हे भावनिक विधान त्यांनी भाजपचे (निवृत्त) खासदार म्हणून केले की राज्यपाल म्हणून, असा प्रश्न  इतरांना पडेल, पण सच्च्या उत्तर मुंबईकरांना तो पडणारच नाही. हा नेता आता उत्तर प्रदेशसारख्या महत्त्वाच्या राज्याच्या राज्यपालपदी नियुक्त झाल्याने, महाराष्ट्र आणि उत्तर भारत यांच्यातील राजकीयदृष्टय़ा धुमसता प्रादेशिकवादही मवाळ होईल आणि महाराष्ट्रातील वा मुंबईतील उत्तर भारतीयांना महाराष्ट्राविषयी राजकीय आपुलकीही वाटू लागेल, असा भाजपच्या ‘राम’भक्तांचा समज असावा. महाराष्ट्र नवनिर्माण सेना किंवा भूमिपुत्रांच्या हक्कांसाठी लढणारी शिवसेना, हे प्रादेशिक पक्ष आहेत. त्यांची राजकीय वाटचाल भूमिपुत्रांच्या भरवशावरच अधिक असणार हे साहजिकच आहे. राष्ट्रीय विस्तार असलेल्या भाजपला भाषा किंवा प्रांतभेद परवडणारा नाही, हेही साहजिकच आहे. पण आता राम नाईक यांच्या घटनात्मक पदानेच त्यांना उत्तर मुंबईतील मतांच्या राजकारणातून दूर केले आहे. एके काळी नाईक यांना ‘भाजपचा माईक’ असे गमतीने म्हटले जायचे. आता मात्र, कोणतेही वक्तव्य करताना, राष्ट्रपतींनी भेटीदाखल दिलेली भारतीय राज्यघटनेची प्रत त्यांना पदाच्या जबाबदारीचे भान देणार आहे.