‘नरसिंहाच्या मंदिरावरून सिंहगड हे नाव पडले – ज्येष्ठ संशोधक रा. चिं. ढेरे यांचा दावा’ या, ढेरे यांच्या मुलाखतीवर आधारित बातमीकडे (लोकसत्ता, २१ जुलै) मी लक्ष वेधू इच्छिते. इतिहास हा माझा स्वतचा आवडीचा विषय आहे. महाराणी ताराराणी यांच्या ऐतिहासिक कामगिरीच्या विषयावर थिसिस लिहून मी मुंबई विद्यापीठातून पीएच. डी. प्राप्त केली आहे, त्याचप्रमाणे राजमाता जिजाऊ यांचे एक ललित चरित्र लिहिलेले आहे आणि शिवकालीन इतिहासाचा अभ्यास करताना महाराष्ट्रातले सर्व गड आणि किल्ले फिरून पाहिलेले आहेत. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या नेतृत्वाखाली ऐतिहासिक महत्त्वाच्या ठिकाणांना भेटी दिलेल्या आहेत.
मी स्वत सातारा जिल्ह्यातली माहेरवाशीण आहे. या जिल्ह्यात प्रतापगड, कल्याणगड आणि वसंतगड आहेत.. ही उदाहरणे अशासाठी की, यापैकी एकही नाव कोणत्याही देवाचे नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आवडीची ही नावे असली पाहिजेत किंवा त्यांच्या एखाद्य सहकाऱ्याच्या विनंतीवरून ही नावे ठेवली गेली असावीत. या प्रत्येक किल्ल्यावरती शिवकालापूर्वीपासून कोणत्या ना कोणत्या देवाचे मंदिर हे अन्य किल्ल्यांप्रमाणेच निश्चितच असले पाहिजे, कारण त्या काळी सुरक्षितता म्हणून देवदेवतांची स्थापना अवघड जागेवर केलेली असावी.
कोंडाणा किल्ल्याचे सिंहगड हे नाव नरवीर तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमानंतर त्यांनी केलेली कामगिरी अत्यंत मोलाची असल्यामुळे आणि स्वराज्याच्या कामासाठी केलेल्या त्यागातून सिंहगड हे नाव नव्याने अस्तित्वात आले, ही माझ्याप्रमाणे इतर कित्येकांची समजूत आहे. नव्याने संशोधित करून , नरसिंह देवावरून सिंहगड नाव पडले हा विचार कोणी करत असेल तर त्याला आमचा विरोध नाही. परंतु ते प्रसिद्ध करून लक्षावधी लोकांच्या भावनांना ठेच पोहोचविणे योग्य आहे असे मला वाटत नाही.
– शालिनीताई पाटील (माजी मंत्री व माजी खासदार), मुंबई.

अपघातांचे परवाने
चारकोप येथे ब्रेकऐवजी अ‍ॅक्सिलरेटर दाबला गेला, गाडी दुभाजक ओलांडून रिक्षा आणि दुचाकीला धडकली, दुचाकीस्वार ठार. शीव येथे गाडी अचानक रस्त्यामध्येच थांबवून दरवाजा उघडला, मागून येणारा दुचाकीस्वार धडकला – ठार ..  अशा बातम्या दररोज एक याप्रमाणे येतात, वाहनचालकाच्या चुकीमुळे अशा प्रकारचे रोज एक/ दोन तरी अपघात होत असतात. याला कारण आपली ‘वाहनचालक परवाना’ मिळण्याची पद्धत.
आपल्या आजूबाजूला कितीतरी परवानाधारक असतात पण त्यांना सफाईदारपणे गाडी चालविता येत नाही. कारण त्यांनी परवाना ‘मिळवलेला’ असतो. ‘ड्रायव्हिंग स्कूल’ मध्ये जाणाऱ्या अनेक (माझ्या अनधिकृत अंदाजाप्रमाणे ८० टक्के) लोकांचे म्हणणे असते की, ‘स्कूल’वाले परवाना व्यवस्थित ‘मॅनेज’ करतात. ड्रायव्हिंग शिकणाऱ्याला परवान्यासाठी विशेष काही करावे लागत नाही.
लोकांची ही मानसिकता बदलायची असेल तर वाहतूक शाखेने स्वत:च्या पद्धतीत आमूलाग्र बदल केले पाहिजेत. केवळ नव्या सुसज्ज आणि अद्ययावत वास्तूमध्ये कार्यालय हलवून हा प्रश्न सुटणार नाही. लोक भारतातील ‘ड्रायव्हिंग टेस्ट’ बारावी किंवा पदवी परीक्षेएवढी गांभीर्याने देतील, इतकी प्रादेशिक परिवहन कार्यालयांची (आरटीओंची) जरब बसली पाहिजे.
सूर्यकांत पिळणकर

पर्यावरणपूरक जीवनशैली ही आपल्या अस्तित्वाची गरज
डॉ. माधव गाडगीळ यांच्या ‘निसर्ग, विज्ञान आणि प्रजातंत्र’ या सदरातील ‘परस्परां करू साहाय्य, अवघे धरू सुपंथ!’ हा परखड लेख (१७ ऑगस्ट) वाचला. सरकारच्या धोरणातील विकासाच्या चुकीच्या संकल्पनांवर लेखामध्ये अचूक बोट ठेवले आहे.
खरेतर, आज जवळजवळ संपूर्ण जगभरच, देशाचा विकास म्हणजे सकल राष्ट्रीय उत्पन्न वाढीचा उत्तरोत्तर वाढणारा दर, हा विचार प्रस्थापित झाला आहे, परंतु हा विचार संपूर्ण जीवसृष्टीला विनाशाकडे नेणारा आहे. सकल राष्ट्रीय उत्पन्नाचा मोठा हिस्सा हा यंत्राधारित वस्तू उत्पादनातून निर्माण होतो, ज्याकरिता विविध प्रकारच्या कच्च्या मालाची आणि ऊर्जेची मोठय़ा प्रमाणात आवश्यकता असते. याचाच सरळ अर्थ हा की सकल राष्ट्रीय उत्पन्नाचा वाढता दर वाढत्या प्रमाणात कच्च्या मालाची आणि ऊर्जेची आवश्यकता निर्माण करतो.
कोणत्याही प्रकारच्या कच्च्या मालाचा थेट संबंध विविध प्रकारच्या खनिज द्रव्यांच्या खाणींतून होणाऱ्या उत्खननाशी असतो आणि खाण उद्योग मोठय़ा प्रमाणात वनसंपत्तीच्या विनाशास आणि भू आणि जल प्रदूषणास कारणीभूत असतो. ऊर्जा आज मानवी जीवनाच्या सर्व क्षेत्रांतील अतिआवश्यक घटक बनली आहे. ऊर्जेची वाढती निर्मिती कोळसा, खनिज तेल आणि नसíगक वायू यांच्या ज्वलनातून होत असते आणि या क्रियेतून प्रचंड प्रमाणात कार्बन डायऑक्साइड वायूची निर्मिती होते. कार्बन डायऑक्साइड वायू जागतिक तापमानवाढीमागील प्रमुख कारण आहे.
जागतिक तापमान वाढीचे वाढते दुष्परिणाम, अतिवृष्टी, नद्यांना येणारे महापूर, प्रचंड हिमवर्षांव, चक्रीवादळे, उष्णतेची तसेच थंडीची लाट, जंगलांना लागणारे वणवे या सर्वाची वाढती संख्या आणि तीव्रता यांच्या स्वरूपात अनुभवास येत आहेत. वाढती लोकसंख्या आणि तिच्या जीवनमानाविषयीच्या उंचावलेल्या अपेक्षा यामुळे या दुष्परिणामांची व्याप्ती उत्तरोत्तर वाढत जाणार आहे. अशा वेळी लोकप्रबोधनातून सरकारवरील दबाव वाढवून सरकारच्या चुकीच्या धोरणांत बदल घडवून आणणे आणि त्याच वेळी अधिक पर्यावरणपूरक जीवनशैली अंगीकारणे हे मानवासहित सजीवसृष्टीच्या अस्तित्वाकरिता अत्यंत गरजेचे आहे.
डॉ. मंगेश सावंत

इतर राज्यांचे रस्ते पाहा..
प्रतिवर्षी पावसाळ्यात मुंबईतील रस्त्यांना पडणारे खड्डे, त्यामुळे मुंबईकरांना सोसावे लागणारे कष्ट, विस्कळीत वाहतूक, रस्ते दुरुस्तीच्या संबंधी न्यायालयांच्या आदेशांकडे दुर्लक्ष, रस्ते दुरुस्तीसाठीची टेंडर्स या दुष्टचक्रात मुंबई शहर गेली अनेक वष्रे सापडलेले दिसते. कर भरणाऱ्या मुंबईकरांचे दुर्दैव हे की आजपर्यंत रस्ते दुरुस्तीवर कोटय़वधींचा खर्च होऊनही रस्त्यांची स्थिती मात्र एखाद्या दुर्गम खेडय़ातील रस्त्यांप्रमाणे असते.
महाराष्ट्राप्रमाणे इतर राज्यांतही तीव्र पावसाळा असतो. दक्षिणेकडील केरळ, तामिळनाडू, तसेच उत्तरेतील हिमाचल प्रदेशासारखी राज्ये येथील पावसाचे प्रमाण काही कमी नसते.  चढ-उतारांवर रोलर फिरवणे, डांबर-खडीचे मिश्रण करून ते सतत वरच्या तापमानावर ठेवणे, धुराने चेहरा काळवंडलेले कामगार, हे पाहिल्यास तेथील वास्तवाची कल्पना येते. काही हजार मीटर उंचीवर असलेले रस्ते, कमी तापमान अशा परिस्थितीत व एका मार्गाने वाहतूक चालू ठेवत तेथील रस्ते व्यवस्थितपणे कसे दुरुस्त केले जातात याचे निरीक्षण मुंबई महापालिकेने केल्यास वाया जाणारी ऊर्जा, वेळ आणि पसे यांची बचत होऊ शकेल.  
डॉ. श्रीकांत परळकर, दादर

सैनिकी शिक्षणाची उपेक्षाच!
‘आम्ही आणि आमची मुलं वेडीच होतो आणि आहोत?’ या पत्रातून (‘लोकमानस’, १० ऑगस्ट’) सन्यदलातील शहिदांच्या कुटुंबीयांची एकंदरीतच गेल्या काही दिवसांतील घडलेल्या घटनांबाबत प्रतिक्रिया वाचली. खूप संयमित शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. परंतु आजची राजकीय व्यवस्था सदर पत्राचे गांभीर्य न समजण्याइतकी बधिर झाली आहे का? तसे असेल तर ही बाब निश्चितच राजकीय व्यवस्थेविषयी अविश्वास निर्माण करणारीच, आणि हाच अविश्वास सदर पत्रात ध्वनित झालेला दिसतो. आपल्या पाल्याला सन्यदलात पाठवण्यात चूक झाली असे जर त्यांना वाटत असेल तर हे समाजाचे सर्वात मोठे अपयश समजायचे काय?  
आम्ही आमच्या देशात सनिकी शिक्षणाची उपेक्षाच केली. राजकीय नेतृत्वाला आपली पिलावळ व तिच्या भवितव्यापलीकडे इतर बाबींबाबत ना खेद ना खंत. आम्ही अमेरिकनांचे, पाश्चिमात्यांचे नेहमीच अनुकरण नेहमीच करीत आलेलो आहोत. दुसऱ्या महायुद्धांत हॉलीवूडचे अनेक अभिनेते चित्रपटसृष्टी सोडून रणभूमीवर गेले होते. आम्ही त्यांचे अनुकरण केव्हा करणार? तेव्हा पुढील काळात परिस्थितीच अशी येईल की राजकीय नेतृत्वाला सन्यदलाचे व सनिकी शिक्षणाचे महत्त्व समजेल, किंबहुना ती काळाची गरज असेल (याचा अर्थ मला सनिकीशाहीचा पुरस्कार करावयाचा आहे असा होत नाही).  कदाचित त्यातूनच ज्याप्रमाणे चीनमध्ये माओत्से तुंग यांच्या लष्करी शिस्तीत तयार झालेल्या नेत्याचे नेतृत्व मिळाले, त्याचप्रमाणे भारतालासुद्धा एखादा माओ मिळेल आणि ही उपेक्षा थांबेल.
-शैलेश न पुरोहित, मुलुंड