उर्दूतील प्रसिद्ध लेखिका हमिदा सलीम यांचे १६ ऑगस्टच्या रविवारी निधन झाले, त्यांच्या साहित्यातून त्यांचे दर्शन घडत राहणार आहे. वयाच्या सत्तराव्या वर्षी सामान्य माणसांचे डोळे पलतीरी लागतात, पण  या महिलेची साहित्यातील सर्जकता तेव्हा उदयास येत होती, ‘शोरिश ए दौराँ’ (कठीण काळ) हे त्यांचे पहिले पुस्तक १९९५ मध्ये प्रसिद्ध झाले. त्यानंतरही ‘हम साथ थे’, ‘परछाईओं के उजाले’ व ‘हरदम रवाँ हैं जिंदगी’ ही त्यांची पुस्तके त्यांच्या प्रतिभेची साक्ष देतात. ‘शौरिश..’चे िहदी रूपांतर २००९ मध्ये प्रसिद्ध झाले. त्यांच्या लघुकथा व लेखांचा संग्रहदेखील प्रसिद्ध होणार होता. यादें व मेरा भाई असरुल हकम मझाझ ही त्यांची पुस्तकेही आत्मपर आहेत.
अलिगढ मुस्लीम विद्यापीठातून स्नातकोत्तर पदवी घेणाऱ्या त्या पहिल्या महिला. पुढे लंडन विद्यापीठातून अर्थशास्त्राचे उच्चशिक्षण त्यांनी घेतले. उत्तर प्रदेशच्या बाराबंकी जिल्ह्य़ात रुडौली येथे जमीनदार कुटुंबात त्यांचा जन्म १९२२ मध्ये झाला. लखनऊच्या आय.टी. कॉलेजमधून बी.ए. केल्यानंतर त्यांनी अलिगढ मुस्लीम विद्यापीठातून एम.ए. केले. त्यांना इतिहास व समाजशास्त्र हे विषय फार आवडत होते, अर्थशास्त्रात रस नव्हता, साहित्यातही रस नव्हता व नेमके त्यांचे कार्य याच दोन विषयांत फार मोठे आहे. त्यांच्या मोठय़ा भावाने त्यांना उर्दूत एमए करण्यास सांगितले, पण त्यांना ते पटले नाही, कारण त्यांचा एक भाऊ असरुल हक हा उर्दूतील फार मोठा- इस्मत चुगताईसारख्या लेखिकेलाही शिरोधार्य वाटणारा- कवी होता. दुसरा भाऊ मझाझ हाही कवी, पण लवकर वारला. अलिगढ विद्यापीठात त्या काळाप्रमाणे पडदा पद्धती पाळून हमिदाने अर्थशास्त्राचा अभ्यास केला. तिच्या शेजारी अबू सलीम बसायचा. त्यांचे प्रेम फुलत गेले त्यात आडपडदा आला नाही. अबू सलीमने पत्रकारिता करून पाहिली, पण नंतर तो विद्यापीठात शिक्षक झाला. या जिवाभावाच्या साथीदाराने हमिदाला घडवले. अतिशय तटस्थपणे आपल्या काळाकडे पाहण्याची ताकद हमिदा यांच्याकडे होती.
हमिदा यांची बहीण साफिया हिची अनेक पुस्तके प्रसिद्ध होती; त्यामुळे ‘आता माझ्या बहिणीची ओळख केवळ जाँ निसार अख्तर यांची पत्नी एवढीच          नाही’ असे हमिदा सांगत असत. साफिया म्हणजे गीतकार जावेद अख्तर व सलमान अख्तर यांची आई.. अर्थात, हमिदा यांचीही ओळख, ‘जावेद अख्तर यांची मावशी’ एवढीच नाही. हमिदा यांनी अलिगढ व जामिया मिलिया विद्यापीठांत अध्यापनही केले होते.