News Flash

एवढे सारे फलाणासिंग..

एरवी राज्यातल्या आणि केंद्रातल्या मंत्र्यांच्या शपथविधी समारंभाचं थेट प्रक्षेपण पाहायला मिळणाऱ्या भारतीयांना खरं तर पंजाबमधल्या भटिंडा जिल्ह्य़ातील सरपंच आणि पंचांचा शपथविधी थेट पाहायला मिळायला हवा

| August 6, 2013 01:01 am

एरवी राज्यातल्या आणि केंद्रातल्या मंत्र्यांच्या शपथविधी समारंभाचं थेट प्रक्षेपण पाहायला मिळणाऱ्या भारतीयांना खरं तर पंजाबमधल्या भटिंडा जिल्ह्य़ातील सरपंच आणि पंचांचा शपथविधी थेट पाहायला मिळायला हवा होता! अशा समारंभांमध्ये जे एक प्रकारचं गंभीर वातावरण असतं, तसं तिथं नव्हतंच मुळी. दोन हजारांहून अधिक जणांच्या शपथविधीचा जम्बो सोहळा होता तो. शपथ का आणि कशासाठी घ्यायची असते, हेसुद्धा माहीत नसलेल्या या पंच-सरपंचांची या कार्यक्रमात जी काही  हबेलहंडी  उडाली, ती प्रत्यक्षच पाहायला हवी होती. ‘नावात काय असतं’ या गहनगंभीर तात्त्विक प्रश्नाशी फारसं घेणंदेणं नसलेल्या प्रत्येकानं आपलं नाव विसरण्याचा जो काही विक्रम केला, तो करमणुकीच्याही पलीकडचा होता. सगळ्यांसाठी शपथ एकच असते, फरक असतो, तो केवळ नावाचा. त्या शपथपत्राची प्रत प्रत्येकाच्या हाती देताना त्यावर त्याचं नाव लिहिलेलं नसतं. तिथं मोकळी जागा सोडलेली असते. शपथ देणाऱ्यानं फक्त ‘मी ..’ असं उच्चारलं की शपथ घेणाऱ्यानं त्यापुढे आपलं नाव उच्चारायचं असतं. भटिंडा जिल्ह्य़ात सरपंच म्हणून २९५ जण, तर पंच म्हणून २२०० जण निवडून आले आहेत. या प्रत्येकाला खुद्द मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांनी शपथ द्यायची होती. सुरुवातीला त्यांनी समजावून सांगताना ‘मी फलाणासिंग शपथ घेतो, की’ असं वाचून दाखवलं खरं, पण वाचणाऱ्या प्रत्येकाला शपथ वाचताना आपलंही नाव तेच असल्याची जणू खात्रीच झाली असावी. जवळजवळ प्रत्येकानं मी फलाणासिंग शपथ घेतो, की असं सुरू केल्यानं गडबडून गेलेल्या मुख्यमंत्र्यांना प्रत्येक वेळी ‘नाव घ्या’ असं सांगणं भाग पडलं. पण याबाबतीत मुख्यमंत्र्यांचंही ऐकायचं नाही, असं त्या सगळ्यांनी जणू ठरवूनच टाकलेलं होतं. सगळ्यांनीच ‘मी फलाणासिंग’ अशी सुरुवात केली. प्रकाशसिंग बादल यांच्याव्यतिरिक्त अन्य कुणाला त्यातला विनोद तरी कळला की नाही, हे कळायला मार्ग नाही. पण जे झालं, ते पोट धरून हसण्यासाठी पुरेसं होतं. बादल यांच्या कपाळावरच्या आठय़ा मात्र या साऱ्या प्रकरणात कमी होण्याचं नाव घेईनात. एवढय़ा साऱ्यांचे नाव असणारा हा फलाणासिंग कोण? अशा प्रश्नही तिथल्या उपस्थितांना पडला नसणार. नाही म्हणायला यानिमित्तानं पंजाबच्या साक्षरतेचा मात्र पंचनामा झाला. देशात घरामध्ये विविध वस्तूंच्या खरेदीवर सर्वात जास्त पैसे खर्च     करणारे नागरिक शीख असल्याचं नुकत्याच एका पाहणीत आढळून आलं होतं. शेती असो, की उद्योग, भांगडा असो की शबद संगीत, शिखांमध्ये असोशीनं जगण्याचा एक मस्त उत्साह असतो. भटिंडा जिल्ह्य़ातील या पंच-सरपंचांना शपथपत्रात आपलं खरं नाव   घ्यायचं असतं, याची कल्पना नव्हती आणि त्याचा संबंध साक्षरतेशी आहे, हे खरं असलं, तरी तेवढय़ावरून समस्त शिखांच्या बुद्धिमत्तेचा लसावि काढणंही जरा चूकच ठरणारं आहे. ज्या फलाणेसिंगांनी पंजाबच्या साक्षरतेवरच प्रश्नचिन्ह उमटवलं, त्यांना आपण काही फार थोर चूक केली असंही वाटत नसणार. पण प्रत्यक्ष कारभार करताना आपण कशावर सही करतो आहोत आणि कोण आपल्याला वापरून घेतो आहे, हे तरी समजायलाच हवं ना!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 6, 2013 1:01 am

Web Title: oath function of gram panchayat head and member in punjab
टॅग : Gram Panchayat
Next Stories
1 नव्या दिशा उजळतील..
2 मनमोहन यांचा सोनिया-वेध
3 गर्भपात कायदा आणि अधिकार
Just Now!
X