09 July 2020

News Flash

पाहणे = विचार करणे = चित्रभाषा

चित्रं सुरुवातीला नुसत्या काही रेषा किंवा रंगाचे अस्पष्ट आकार असतात, ते आकार हळूहळू स्पष्ट होऊ लागतात.

| March 14, 2015 01:30 am

चित्रं सुरुवातीला नुसत्या काही रेषा किंवा रंगाचे अस्पष्ट आकार असतात, ते आकार हळूहळू स्पष्ट होऊ लागतात. टप्प्याटप्प्याने चित्रं घडत असल्याने चित्रकार जणू काही जग बनत असतानाचे वेगवेगळे टप्पे पाहू शकतो व त्यात जगनिर्मात्याप्रमाणे बदलही करू शकतो.

”We see but we do not observe”
                          – Sherlock Holmes
लेखक ऑर्थर कॉनन डॉयल यांनी जगप्रसिद्ध हेर शेरलॉक होल्म्सचं म्हणून त्यांच्या कथांतील लिहिलेलं वरील विधान सर्वपरिचित आहे. शेरलॉकची तीक्ष्ण नजर, निरीक्षणं त्यातून त्यानं काढलेलं, तात्पर्य केलेला विचार sam02यांच्यात संबंध असतो, त्यातून तो गुन्ह्य़ांचा छडा लावतो. आपल्याकडील ब्योमकेश बक्षीसुद्धा हेच करतो..
शेरलॉकच्या, पर्यायाने कॉनन डॉयल यांच्या विधानाचा मथितार्थ असा की, आपल्याला दिसतं, पण आपण पाहत नाही. पाहणे ही क्षणोक्षणी बदलणाऱ्या जगाला शांतपणे निरीक्षण करण्याची क्रिया आहे. आपण कॅमेरा आणि डोळा अगदी सारख्याच पद्धतीने वापरतो. दोन्ही फक्त साधनं आहेत. कॅमेरा आणि डोळ्यातून आपल्याला दिसतं, पण जसा कॅमेऱ्याच्या मागे फोटो काढणारा असतो तसं आपल्या डोळ्यांमागे आपण, आपला मेंदू असतो.
आपला मेंदू जगाकडे कसा पाहतो यावर आपल्याला जग ‘कसं दिसतं’ म्हणजेच त्याचा अर्थ काय व कसा लागतो हे ठरते. मेंदूचा अभ्यास करणारे शास्त्रज्ञ सांगतात की, अक्रोडाच्या गरासारखा दिसणाऱ्या मेंदूचे दोन भाग आहेत. त्यांना उजवा व डावा मेंदू असं संबोधलं जातं. दोन्ही भाग वेगवेगळी करय करतात. उजवा मेंदू दृश्यं-जाणिवा- अनुभव, अवकाश संदर्भातील अनुभव, संगीत, कल्पनाशक्ती, ध्यान व अंतज्र्ञान, तीव्र भावना अशा गोष्टींशी संबंधित कार्य करतो. तर डावा मेंदू शिस्तबद्ध विचार, भाषाप्रभुत्व, गणित, तार्किक विचार, विश्लेषणाची क्षमता एका क्रमाने विचार करणे अशा संबंधित कार्य करतो. हे दोन्ही मेंदू एकमेकांशी जोडलेले असतात. आपण अखंड मेंदू वापरत असतो. अखंड मेंदू वापरात असल्याने रोजच्या जीवनात आपल्या कृतीचे स्वरूप आपण हवं तेव्हा, हवं तसं ठरवितो. बाजारात फेरफटका मारताना आपल्याला खरेदी करायची नसेल, तर आपण उजव्या मेंदूच्या प्रक्रिया वापरीत वस्तूंचे रंग, आकार, पोत, स्पर्श, नक्षी, विविधता पाहतो; त्यात गुंग होऊन जातो; त्याची मजा, अनुभव घेतो. वस्तू खरेदी करायची झाल्यास डाव्या मेंदूच्या प्रक्रिया वापरीत याच वस्तूंची त्यांच्या विविध घटकांची तुलना, विश्लेषण, घासाघीस, त्यासाठी भाषिक संवाद करतो. त्याच प्रकारे आपण धुंद होऊन नाच करण्याच्या कृतीचाही आनंद घेऊ शकतो आणि त्याच वेळी गरज पडल्यास त्यातील विविध कृतींचा क्रमही लक्षात ठेवतो, ठेवू शकतो. संगीत ऐकण्याचा अनुभव घेऊ शकतो आणि त्याच वेळी त्यातील सूर-लय-ताल यांच्या गणिताला हात, पाय, मान हलवून दाद देत असतो.अखंड मेंदूच्या वापरामुळे आपल्याला कृती करता येते आणि कृतीचं भान, जाणीव, अवधानही मिळतं.
आपल्याला याच ज्ञानेंद्रियांनी संवेदना रूपात ज्ञान मिळतं. त्यापैकी ७० टक्के ज्ञान डोळ्यांनी मिळतं. परिणामी पाहणं ही प्रक्रिया आपली विचार करण्याची प्रक्रिया होते, होऊ शकते. शालेय शिक्षणापासून आपण भाषाधारित शिक्षणाद्वारे संस्कार करीत असतो. भाषेसोबत गणित, विज्ञान हे विषयही आपला डावा मेंदू बळकट करीत असतात. त्यासोबत उजवा मेंदू व पर्यायाने अखंड मेंदूचा विकास आपण करतो का? कारण आपण पाहणं, ऐकणं या कृतींना कधीच शिकवत नाही. पाहणं हा ‘विषय’ आपण शिकवत नाही. परिणामी आपल्याकडे विद्यार्थ्यांना दिसतं, पण ते पाहायला शिकत नाहीत. संगीत-कलांचं रसग्रहण त्यांना समजत नाही, विज्ञान- गणित- भाषा किंवा एकंदरीत अमूर्त संकल्पना समजण्याची क्षमता फार थोडय़ांमध्ये विकसित होतात. विज्ञानाच्या प्रयोगवहय़ांमध्ये कॉपी होते. निरीक्षणं काय लिहायची, असा प्रश्न तर विद्यार्थ्यांना गेली कित्येक दशकं पडत असेल. थोडक्यात काय, आपण पाहणं या मूलभूत क्रियेला एक संपूर्ण विचार करण्याच्या प्रक्रियेत बदलू शकत नाही. पाहणं ही क्रिया फक्त आपल्या डाव्या मेंदूच्या प्रक्रियांशीच संबंधित होते. आपण डावा मेंदू आपल्यावरील संस्कारांमुळे, शिक्षणामुळे वापरायला शिकतो. भाषा, भाषिक विचार, आकडे, गणित, हिशेब म्हणून जगाकडे पाहतो. चित्रकाराचा उजवा मेंदू जास्त प्रबळपणे काम करीत असू शकतो, असतो. तो जगाकडे कसं पाहतो? त्याला ते कसं दिसतं? त्यालाही जग, भाषा, आकडे या रूपात दिसत असतं, पण बाजारातल्या आपल्या अनुभवाच्या उदाहरणासारखं तो दिसणाऱ्या दृश्याचा विचार केवळ रंग, आकार, त्यांची रचना म्हणून करू शकतो; पण चित्रकार केवळ दृश्यांकडे रंग, रेषा यांची रचना म्हणून पाहू शकत नाही, तर त्याआधारे तो विशिष्ट प्रकारचे रंग वापरून ती चित्रंही रंगवत असतो. चित्र रंगवण्याच्या या प्रक्रियेत गंमत होते! जसं आपण बोलण्यापेक्षा लिहायला लागलो की आपले विचार, त्यांचा होणारा अर्थ, आपण वापरतो ती भाषा याविषयी आपल्याला भान येतं, जाणीव होते, जागरूकता येते, त्याचप्रमाणे चित्रकाराचं चित्र काढताना होतं. कारण प्रत्येक चित्र घडताना, घडवताना अरूपाकडून रूपाकडे जातं. म्हणजे जसं एखाद्या शिळेत, झाडाला काही आकार अस्पष्ट रूपात दिसावा व त्याला हळूहळू रंग (शेंदूर) लावून त्याच्या अस्पष्ट रूपाला स्पष्टता, ठसठशीतपणा मिळवून त्यांचा हनुमान, गणपती, देवी, बहिरोबा आदी व्हावं त्याप्रमाणं.
चित्रं सुरुवातीला नुसत्या काही रेषा किंवा रंगाचे अस्पष्ट आकार असतात, ते आकार हळूहळू स्पष्ट होऊ लागतात. रेषा, कडा स्पष्ट होतात व हळूहळू चित्राची रचना ठळक होते. चित्र पूर्ण होऊ लागतं. असं टप्प्याटप्प्याने चित्रं घडत असल्याने चित्रकार जणू काही जग बनत असतानाचे वेगवेगळे टप्पे पाहू शकतो व त्यात जगनिर्मात्याप्रमाणे बदलही करू शकतो. परिणामी चित्रकार जगाकडे रंग-रेषा यांची रचना म्हणून अगदी सहज पाहू शकतो. त्याच्यासाठी पाहणं ही उजव्या मेंदूची क्रिया बनते. पाहणं ही त्याच्यासाठी ‘दृश्य विचार’ करणं बनते. त्यातून त्याची चित्रंभाषा, चित्रं घडतात; पण अशी ‘दृष्टी’ प्राप्त व्हायला चित्रकार खूप धाडस करतात, तपश्चर्या जणू.. जगप्रसिद्ध इंग्लिश निसर्गचित्रकार, १९व्या शतकातला, जे. एम. डब्लू. टर्नर याला निसर्गाची रूपं पाहण्याची, निरखायची, रेखाटायची सवय. आयुष्यभर त्यानं ते केलं. त्याकरिता डोंगर-जंगलं पालथी घातली. युरोपात अनेक ठिकाणं पाहिली, निसर्गातली पंचमहाभूतं याचि देही याचि डोळा पाहायला, अनुभवायला! त्याला बर्फाचं वादळ, पाऊस पाहायचा होता. एका रेल्वे प्रवासात वादळी पाऊस सुरू झाल्यावर हे महाशय खिडकीतून बाहेर डोकावून वादळ ‘पाहू’ लागले. असंच समुद्री वादळ पाहायला वादळ होणार हे कळल्यावर बोटीच्या कॅप्टनला सांगितलं- मला डेकवर बांधून ठेव. मला वादळ कसं दिसतंय ते पाहायचंय. अर्थात केवळ अशा गोष्टी केल्याने टर्नरसारखी चित्रं काढता येत नाहीत. असे दृश्यानुभव उजव्या मेंदूच्या साहाय्यानं पाहावे लागतात. इथे हे लक्षात घ्यायला हवं की, वादळ ही एक ‘अमूर्त’, अ‍ॅबस्ट्रॅक्ट संकल्पना आहे, त्यात बऱ्याच गोष्टी घडत असतात. सोसाटय़ाचा वारा, ढग, विजा, वाऱ्याचा वेग- ध्वनी- दिशा इत्यादी याचं विश्लेषण डावा मेंदू करील, पण या सगळ्यांचा एकत्रित परिणाम ‘वादळ’ उजवा मेंदू पाहू शकेल, समजू शकेल.
चित्रकार अशा प्रकारे विचार करतात, त्यामुळे काय होतं, त्यांची चित्रभाषा कशी विकसित होते त्याचं एक उदाहरण पाहू. इटालियन प्रबोधनकाळातील शिल्पकार डोनातेललो याचं त्यानं सेंट जॉर्ज याचं एक अप्रतिम शिल्प घडवलंय. त्याचं वेगळेपण असं की, त्या काळी सेंट जॉर्जची भाषिक विचारानुसार तयार झालेली प्रतिमा निर्माण केली जायची. त्यात तो घोडय़ावर, सरदाराप्रमाणे संपूर्ण चिलखत घालून ड्रॅगनला मारताना दिसे. याउलट डोनातेललोने एक आत्मविश्वासाने भरलेला तरुण चिलखत घालून ढाल घेऊन उभा आहे असं दाखवलं. त्याचं उभं राहणं, खांदे, एका दिशेने पाहायची पद्धत यातून आत्मविश्वास, संयम, शौर्य अगदी सहज तरलपणे मांडलं गेलं. घोडा, ड्रॅगन, तलवार आदी न दाखविता. गंमत अशी की, उभी राहायची हीच अवस्था एस. एम. पंडितांच्या स्वामी विवेकानंदांच्या चित्रात दिसते व त्यावर आधारित विवेकानंद रॉक मेमोरिअलमधील शिल्पाकृतीतही दिसते. प्रतिमांचा अशा पद्धतीचा विचारही उजव्या मेंदूची करामत आहे. या उभ्या राहण्याच्या अवस्थेमुळे विवेकानंदांचे तत्त्वज्ञान, तेज, द्रष्टेपणा या अमूर्त गोष्टी प्रेक्षकाला अनुभवायला मिळतात. म्हणूनच कोणी म्हटलंय की, a picture is better than thousand words…

*लेखक चित्रकला महाविद्यालयांचे अभ्यासक्रम सल्लागार आणि कलासमीक्षक आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 14, 2015 1:30 am

Web Title: observing thinking the language of pictures
Next Stories
1 शब्दभाषा आणि चित्रभाषा
2 चित्रभाषा
3 दृश्यतरलता
Just Now!
X