पाकिस्तान तालिबान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) या दहशतवादी संघटनेने क्षेपणास्त्र निर्मिती आणि त्याच्या यशस्वी चाचणीबाबत केलेला दावा हा अविश्वसनीय वाटत असला तरी त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. या संघटनेच्या दाव्यानुसार त्यांच्या अभियांत्रिकी विभागाने उमर-१ नामक क्षेपणास्त्र तयार केले आहे. त्याचे वैशिष्टय़ असे की त्याचे सुटे भाग हवे तेव्हा जोडता येतात. याचा अर्थ ते हवे तेथे सुलभतेने नेणे शक्य आहे. त्याचा वापर सहजसोपा आहे. या क्षेपणास्त्राची आपण यशस्वी चाचणी केल्याचा दावाही या संघटनेच्या प्रवक्त्याने केला असून त्याच्या पुष्टय़र्थ यूटय़ूबवर एक ध्वनिचित्रफीतही प्रकाशित करण्यात आली आहे. तेवढय़ाशा पुराव्यावरून टीटीपीकडे क्षेपणास्त्र आहे यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. पाकिस्तानातील समाजमाध्यमांतून तर त्याची खिल्ली उडविण्यात येत असून, त्यातही गमतीची बाब अशी की पाकिस्तान तालिबान ही भारतीय गुप्तचर संस्थांची निर्मिती असल्याचे त्यातील अनेकांचे मत आहे. राष्ट्रवादी पक्ष, संघटना आणि माध्यमे यांतून होत असलेल्या प्रचाराचे मानसिक बळी म्हणून त्या अनेकांकडे पाहता येईल. परंतु मुद्दा तालिबानसारखी संघटना स्वत क्षेपणास्त्राची निर्मिती करू शकते की नाही हा नाहीच. प्रश्न तालिबानकडे असे क्षेपणास्त्र आहे की नाही हा आहे आणि तर्क असे सांगतो की जी संघटना आपण स्वयंनिर्मित क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली असा दावा करते त्या संघटनेकडे क्षेपणास्त्र, भलेही ते स्वयंनिर्मित असो वा नसो, असू शकते. ही शक्यता अत्यंत गंभीर आणि चिंताजनक आहे. सोव्हिएत रशियाने अफगाणिस्तानवर आक्रमण केल्यानंतर पाकिस्तानच्या मदतीने सीआयएने अफगाणी मुजाहिदीनांना विमानविरोधी क्षेपणास्त्रे दिली होती. रशियाने तेथून काढता पाय घेतल्यानंतर त्यातील उरलेली क्षेपणास्त्रे सीआयएने मुजाहिदीन नेत्यांकडून परत विकत घेतली होती. अर्थात ती सगळीच काही अमेरिकेला मिळू शकली नाहीत, हा इतिहास आहे. दुसरी गोष्ट तालिबान ही दहशतवादी संघटना असली तरी अफगाणिस्तानमध्ये ती सत्तेवर होती. आजही ती सत्तेच्या जवळ आहे. या संघटनेकडे शस्त्रास्त्रांची कमतरता नाही. पाकिस्तान तालिबान ही वेगळी संघटना आहे. मात्र आज ज्या पद्धतीने ही संघटना पाकिस्तानी सैन्याला आव्हान देत आहे ते पाहता या संघटनेमागे बडय़ा शक्ती असल्याच पाहिजेत. ही संघटना पाकिस्तानी सरकारच्या विरोधात काम करते. याचा अर्थ तिला पाकिस्तानातून पाठिंबा नाही असा होऊ शकत नाही. किंबहुना तो असल्याशिवाय उत्तर वझिरीस्तान आणि खैबर आदिवासी भागात तिचे वर्चस्व निर्माणच होऊ शकले नसते. अशा संघटनेकडे क्षेपणास्त्र असेल, तर ते पाकिस्तानविरोधात वापरले जाणार हे नक्की. पण त्याचा अर्थ उद्या ते अन्य देशांच्या- उदाहरणार्थ भारत – वापरले जाऊ शकणार नाही असे नाही. पाकिस्तानी तालिबानला ‘रॉ’चे साह्य़ असल्याची पाकिस्तानातील चर्चा खरी मानली तरी तिच्या शस्त्रबळामुळे सुखावून जाण्याचे भारतास कारण नाही. याबाबतीतला एलटीटीईचा अनुभव आपल्या गाठीशी आहे. याहून महत्त्वाची बाब म्हणजे आज एका गटाच्या हातात असलेली अस्त्रे इतरांना सहजी उपलब्ध होऊ शकतात, हे नक्षलवाद्यांच्या रूपाने आपण पाहतो आहोत. म्हणूनच पाकिस्तानी तालिबान्यांचा दावा- खरा असो वा खोटा- ती गांभीर्याने घेण्याचीच  गोष्ट आहे.