सूर्यनमस्कार हा राजकीय आरोग्यासाठी उत्तम असल्याचे ज्ञान आपल्याकडे प्राचीन काळापासून आहे. मात्र येथे कोणत्याही सूर्याला नमस्कार घालून चालत नसते. तो उगवता वा तळपताच असावा लागतो. पूर्वी तो गांधी घराण्यात दिसत असे. त्याला नमस्कार करणाऱ्यांच्या शीर्षस्थानी देवकांत बरुआ यांचे नाव घ्यावे लागेल. इंडिया इज इंदिरा हे घोषवाक्य त्यांचे. सध्या गांधी घराणेच काळोखात चाचपडत असून, देशाच्या आकाशात नरेंद्र मोदी नावाचा सहस्ररश्मी तळपत आहे. तेव्हा आता त्यांच्या आरत्या ओवाळणाऱ्यांचे कळप दिसू लागले आहेत. खुद्द मोदी यांना हे माहीत नाही असे नाही. त्यांनी राजकारणातील भाटगिरी जवळून पाहिलेली असल्याने सत्तेवर येताक्षणी त्यांनी आपल्या खासदारांना त्यापासून दूर राहावे असे बजावले होते. कोणी आपल्या पाया पडू नये असे त्यांनी सांगितले होते. पण मोदी म्हणजे काही संत गाडगे महाराज नाहीत. पाया पडणाऱ्याच्या पाठीत गाडगेबाबांची काठी पडायची. स्वत:चे नाव विणलेला महागडा कोट परिधान करणाऱ्या स्वप्रतिमाप्रेमी मोदींना ते कसे जमणार? परिणामी ज्याला वाईट व त्याज्य म्हणत मोदी मोठे झाले, त्याच गोष्टी आज त्यांच्याबाबत घडत आहेत. भारतीय जनता पक्षामध्ये घालीन लोटांगण, वंदीन चरणम् या चरणांना आता प्रात:प्रार्थनेचे स्वरूप येऊ लागले आहे. अमृतसर शताब्दी एक्स्प्रेसमध्ये सापडलेले मोदी-शहांचा छाप असलेले चहाचे कप हे त्याचे ताजे उदाहरण आहे. ती कशी केटररची चूक होती वगरे आता सांगितले जात आहे. भारतीय राजकारणात अशा पांघरुणांची कधीच कमतरता नव्हती. परंतु त्याने मूळ मुद्दा काही लपून राहत नाही. यावर जिकडे-तिकडे नेहरू-गांधी परिवाराची नावे आणि छब्या दिसतात ते बरे चालते असा एक निर्बुद्ध हुकमी सवाल टीकाकारांच्या तोंडावर फेकता येईल. पण दुसऱ्याने गाय मारली म्हणून लगेच आपण वासरू मारण्याची टेंडरे भरायची नसतात. शताब्दी एक्स्प्रेसमधील चहाच्या कपांची एवढी चर्चा करण्याचे काही कारण नाही. ती किरकोळ गोष्ट आहे असे म्हणावे तर तिकडे अहमदाबादेतून आलेल्या एका बातमीवर काय म्हणावे, असा प्रश्न पडतो. गेल्या १ जानेवारी रोजी प्रसारित करण्यात आलेल्या एका वृत्ताची शिक्षा म्हणून दूरदर्शनच्या अहमदाबाद केंद्रावरील व्ही. एम. वणोल नामक अधिकाऱ्याला थेट ‘काळ्या पाण्या’वर पाठविण्यात आले. सेवानिवृत्तीला केवळ एक वर्ष बाकी असताना त्याची अंदमानला बदली करण्यात आली. कारण? त्यांनी मोदी यांच्या पत्नी जसोदाबेन यांनी गुजरात पोलिसांकडे माहितीच्या अधिकाराखाली केलेल्या अर्जाची बातमी प्रसारित करण्याचे धाडस दाखविले. ही बदली काही कोणी पंतप्रधानांना विचारून केली नाही. तेव्हा हे सरळच माहिती व प्रसारण मंत्रालयातील चापलुसांचे कृत्य आहे. अशा चापलुसांची एक्स्प्रेस आता जोरात आहे. त्यात नुकतीच किरण बेदी यांचीही भर पडली आहे. मोदी यांचा चेहरा हा त्यांना जगातील सर्वात सुंदर असल्याचा भासत असेल तर तो केवळ त्यांच्या सौंदर्यदृष्टीचा प्रश्न नसतो. तो राजकीय संस्कृतीचा सवाल असतो. ती शुद्ध करण्याच्या बाता मारणारे ती अधिक नासवत आहेत. वाईट आहे ते हेच.