सव्वाशे कोटी लोकसंख्येच्या भारतात प्राप्तिकर भरणारे आहेत जेमतेम साडेतीन कोटी. म्हणजे केवळ तीन टक्के. या तुलनेत अमेरिकेत ४५ टक्के नागरिक करदाते आहेत हे पाहिलं की तसं धन्यच वाटतं.

चार वर्षांपूर्वी फुकुशिमा घडलं त्यानंतर हे वाचलेलं आठवतंय. केवढा हाहाकार उडाला होता जपानमध्ये. हिरोशिमा आणि नागासाकीनंतर इतका मोठा आण्विक विध्वंस पाहून सगळ्याच जुन्या आठवणी जाग्या झाल्या असणार. माणसं सावरायला, पुन्हा त्यांच्या करपलेल्या मनांना उभारी यायला किती काळ जावा लागतो. असो. मुद्दा जपानमधल्या या अपघाताचा नाही.
या घटनेनंतर काहीच दिवसांनी जपानमध्ये प्राप्तिकर भरण्याची शेवटची तारीख होती. आता जपान काही पाश्चात्त्यांसारखा केवळ भौतिकवादी वगरे नाही. तोही आपल्यासारखाच. अघळपघळ. भावनांनी ओथंबणारा. पण या फुकुशिमानंतर तो काही आपल्यासारखा वागला नाही. म्हणजे आपल्याकडे असं काही झालं असतं तर प्राप्तिकर भरायची तारीख वाढवून मागितली गेली असती किंवा अतिमहनीय व्यक्तींनी अपघातग्रस्तांसाठी कोरडे अश्रू वाहण्यासाठी गर्दी केली असती. एकूण सहानुभूतीचा राष्ट्रीय पूर वाहू लागला असता.
पण जपानमध्ये असं काहीही घडलं नाही. अगदी फुकुशिमा परिसरातले नागरिकही कर भरण्यासाठी गेले. अगदी रांगेत उभं राहून त्यांनी आपलं राष्ट्रीय कर्तव्य पूर्ण केलं. उगाच आम्हाला यंदा करमाफी द्या, आमची र्कज माफ करा.. अशी एक मागणी आली नाही. नागरिक जणू हा अपघात आणि आपलं कर भरण्याचं कर्तव्य या दोन अगदी परस्पर भिन्न गोष्टी आहेत, असेच वागले.
हे जपानचं उदाहरण आताच आठवायचं कारण म्हणजे अटलांटिक साप्ताहिकाच्या ताज्या अंकात आलेला लेख. तो आहे आधारित. लेखकानं त्यासाठी अमेरिकेत अनेक नागरिकांच्या मुलाखती घेतल्या. वेगवेगळ्या प्रांतांतल्या, वेगवेगळ्या वंशांतल्यांना यासाठी बोलतं केलं गेलं. सगळ्यांना प्रश्न म्हणजे प्राप्तिकर भरण्याविषयी तुमचं मत काय?
या पाहणीचं कारण म्हणजे सर्वसामान्य अमेरिकी माणूस कराविषयी फार कुरकुर करत असतो. अमेरिकेत किती कर आहेत, ही त्याची तक्रार असते. निवडणुकांच्या वेळी कोणता राजकीय पक्ष प्राप्तिकराविषयी कोणती भूमिका घेणारे याकडे त्याचं लक्ष असतं. कर हा त्यामुळे अमेरिकेत कायमच चच्रेचा विषय असतो. जगातल्या एकमेव महासत्तेच्या नागरिकांचा गप्पांचा, तक्रारीचा आवडता विषय म्हणजे हे कर. तरी अमेरिकेत स्कँडेनेव्हियन देशांतल्यासारखे कर नाहीत. तिकडच्या काही देशांत तर अगदी ७० टक्क्यांपर्यंत प्राप्तिकराचा दर असतो. म्हणजे आपण कमावलेल्या प्रत्येकी १०० रुपयातले ७० रु. सरकार कराच्या पोटी काढून घेतं. अमेरिकेत ही परिस्थिती नाही. तरीही जनता प्राप्तिकरावर नाराज असते. त्यामुळे या पाहणीत अंदाज होता ही करविषयक नाराजी बाहेर पडेल. पण तिचा निष्कर्ष भलताच धक्कादायक निघाला.
तो असा की अगदी सर्वसामान्य नागरिकदेखील आपण कर भरायलाच पाहिजे या मताचा असतो आणि तसं त्याचं आचरणही असतं. किंबहुना आपण करदाते आहोत ही बाब अमेरिकी नागरिकांसाठी अभिमानाची असते. या पाहणीत नोंदवली गेलेली मतं याबाबत पुरेशी बोलकी आहेत. कर भरणं हे आपलं कर्तव्यच आहे.. आपण कर नाही भरला तर देश कसा मजबूत होईल.. करचुकवेगिरी झाली तर सरकार आपल्यासाठी रस्ते कसे बांधेल, संरक्षणावर कोण खर्च करेल.. प्राप्तिकराचे नियम आवडत नसतील तर ते बदलण्यासाठी प्रयत्न करणं हे आपलं काम आहे पण करच भरायचा नाही हे काही बरोबर नाही.. कर भरणं म्हणजे एका अर्थानं नोकरशाहीचं पोट भरणं.. पण आपलेच कोणी ना कोणी नोकरशाहीत असतात तेव्हा त्यात गर ते काय.. अशा स्वरूपाची मतं या पाहणीत आढळून आली. सगळेच काही प्राप्तिकराविषयी प्रेमानं बोलत होते असं नाही. अनेकांनी तक्रारी केल्या, कुरकुर केली. पण तरीही कर न भरणं यावर उपाय आहे.. असं एकही मत या पाहणीत व्यक्त झालं नाही. अगदी ज्येष्ठ नागरिकांनीदेखील कर भरण्याच्या बाजूनेच कौल दिला. काही तरुण तर असं म्हणाले.. आम्ही आता कर भरला नाही तर आमच्या म्हातारपणी आम्हाला परवडेल अशा दरांत वैद्यकीय उपचारांची व्यवस्था सरकार कसं काय करू शकेल?
आता यावर आपल्याकडच्या तुच्छतावादास सरावलेले काही असंही म्हणतील, बोलायला काय जातंय? बोलणं म्हणजे काही प्रत्यक्ष कर भरणं नाही.
तेव्हा अशांच्या शंकांना उत्तरं मिळावीत म्हणून पाहणी करणाऱ्यांनी सरकार दरबारची आकडेवारीही तपासली. आश्चर्य म्हणजे ही आकडेवारी आणि पाहणीतील सहभागींनी व्यक्त केलेल्या भावना समांतर होत्या. म्हणजे अमेरिकेत कर भरण्यात नागरिकांचा उत्साह वाढू लागलाय असंच आकडेवारीही सांगत होती. साधारण निम्मी अमेरिकी जनता प्राप्तिकर भरते. म्हणजे दर दोन नागरिकांतील एक जण प्राप्तिकर भरणारा असतो. याचा अर्थ अन्यांना करांत सूट असते वा त्यांना वगळलेलं असतं असं नाही. तेही कर भरत असतात. पण अप्रत्यक्ष. वयोवृद्ध झालेल्या कोणा अमेरिकी नागरिकास एक वेळ प्राप्तिकरात सवलत असेल, पण म्हणून त्याचा मालमत्ता कर वा अन्य कोणता कर माफ केला जातो असं नाही. तेव्हा जे काही आपले नियत कर आहेत ते अमेरिकी नागरिक आनंदाने भरतो. या पाहणीचा निष्कर्ष असं सांगतो की सरकारकडून बेकार भत्ता वगरे घेणारे, अनाथ आदी वगळले तर जवळपास सर्वच अमेरिकी नागरिक कोणत्या ना कोणत्या प्रकारे कर भरतात.
आता यामागे कायद्याचं भय किती? पाहणीकर्त्यांचं म्हणणं असं की कायद्याचा दट्टय़ा हा कदाचित सुरुवातीच्या काळात परिणामकारक ठरला असेल. कर भरला नाही तर सरकार दंड करतं हे आधीच्या काही पिढय़ांनी अनुभवलेलं असेल. पण त्याचा आताच्या करप्रेमाशी काहीही संबंध नाही, असं हा अहवाल सांगतो. याचा अर्थ असा की वर्षांनुवर्षांच्या या सवयीमुळे कर भरणं आता नागरिकांच्या जनुकांचाच भाग होऊन गेलंय. त्यामुळे या पाहणीतला एकही नागरिक कर भरले नाहीत तर आपण पकडले जाऊ आणि शिक्षा होईल या भीतीनं कर भरत नाही. कर हे भरण्यासाठीच असतात असं त्याचं प्रामाणिक मत आहे.
म्हणजे चौकात वाहतूक पोलीस पकडायला नसला तर सिग्नल मोडला तरी चालतो.. असं अमेरिकी नागरिकाला वाटत नाही. वाहतुकीच्या बाबतही आणि करासंदर्भातही.
या सगळ्याचं महत्त्व आता पुन्हा नव्यानं जाणवतंय ते गेल्या आठवडय़ातल्या बातमीमुळे. केंद्रीय अर्थमंत्र्यांनी बँकांना आदेश दिलेत, प्राप्तिकरदात्यांच्या वेतनातून कापल्या गेलेल्या कराचा भरणा ताबडतोब केंद्राच्या तिजोरीत करण्यासाठी. कारण सरकारच्या थेट कराच्या उत्पन्नात चांगलीच खोट आलीय. आपल्या देशभरातून सरकारला वेगवेगळ्या थेट करांतून ७.३६ लाख कोटी रुपये मिळतील असं सरकारला वाटत होतं. प्रत्यक्षात त्यात दोनेक लाख कोटी रुपयांची घट आहे.
या पाश्र्वभूमीवर आपल्या देशातल्या कर भरणाऱ्यांची संख्या चांगलीच टोचेल. या सव्वाशे कोटी लोकसंख्येच्या भारतात प्राप्तिकर भरणारे आहेत जेमतेम साडेतीन कोटी. जेमतेम तीन टक्के. किंबहुना तितकेही नाहीत. यात तीन टक्क्यांतल्या ८९ टक्क्यांचं उत्पन्न वर्षांकाठी पाच लाख रुपयांपर्यंत आहे. २० लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असणारे १.३ टक्के इतकेच नागरिक आपल्या देशात आहेत. म्हणजे करदाते म्हणून नोंदलेले आहेत. आणि एक कोटी रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्यांची संख्या तर फक्त ४२ हजार इतकीच आहे.
या तुलनेत अमेरिकेत ४५ टक्के नागरिक करदाते आहेत हे पाहिलं की तसं धन्यच वाटतं. आणि तेसुद्धा अमेरिकी संस्कृती बाजारू, चंगळवादी, उच्छृंखल, मूल्यहीन वगरे असताना.. जननी जन्मभूमीश्च वगरे असं कुठे काय असतं अमेरकी संस्कृतीत?
आता एकदा आपणच नक्की करायला हवं. थोर संस्कृती, त्याहून थोर थोर इतिहास यांचंच कौतुक करत बसायचं की हे काहीही नसलेल्यांचा प्रामाणिकपणा अनुकरणीय समजायचा? थोर इतिहास मोठा की प्रामाणिक कर भरणारं वर्तमान मोठं?