बाबरी मशिदीचे राजकारण करणाऱ्या अडवाणींनी आता मोदींवर ध्रुवीकरणाचा आरोप करणे कालबाह्यतेचे निदर्शक ठरते. आक्रमकतेच्या राजकारणाची हीच परिणती असते. आजचा आक्रमक उद्या सर्वसमावेशक ठरू लागल्यावर संघटनेस अधिक आक्रमकाची गरज लागते. ती गरज सध्या मोदी पुरवणार आहेत.
आगामी लोकसभा निवडणुकांत नरेंद्र मोदी हे आपल्या पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील हे जाहीर करून भारतीय जनता पक्षाने या निवडणुका दोन पक्षांभोवतीच फिरतील हे निश्चित केले आहे. आज देशात सत्ताधारी काँग्रेसच्या विरोधात वातावरण आहे आणि त्याचे रूपांतर मतांत करण्याची क्षमता मोदी यांच्यात आहे, असे भाजपला वाटते. मोदी तो विश्वास कितपत सार्थ ठरवतात, हे निवडणुकांनंतरच समजेल. परंतु देशातील राजकारण ढवळून टाकण्याच्या मोदी यांच्या क्षमतेविषयी शंका घेण्याचे कारण नाही. काही महिन्यांपूर्वी झालेल्या भाजपच्या गोवा शिबिरापासूनच मोदी यांचा वारू चौखूर उधळण्यासाठी फुरफुरत होता. त्या बैठकीत मोदी यांच्याकडे भाजपच्या प्रचाराची सूत्रे देण्याची घोषणा झाली तेव्हाच गुजरातच्या मुख्यमंत्र्यांस याहूनही अधिक मोठी भूमिका पार पाडावी लागेल हे दिसत होते. भाजपच्या अध्यक्षपदाची सूत्रे नितीन गडकरी यांच्या हातून राजनाथ सिंह यांच्याकडे गेल्यानंतर मोदी यांच्या पदोन्नतीप्रक्रियेस वेग आला. त्याआधी पंतप्रधानपदाच्या स्पर्धेत आपणही आहोत, असे गडकरी यांच्याकडून सुचवले जात होते. परंतु भ्रष्टाचाराच्या संशयावरून गडकरी यांचे अध्यक्षपदच गेल्याने तो प्रश्न निकालात निघाला. या पाश्र्वभूमीवर पक्षाची सूत्रे हाती आल्यावर राजनाथ सिंह यांनी राजकारणातील उत्तर प्रदेशीय चातुर्य दाखवीत पंतप्रधानपदासाठी मोदी यांचे घोडे दामटवण्यास सुरुवात केली. ते अनेक अर्थानी शहाणपणाचे होते. कारण यानंतर निवडणुकात भाजपस खरोखरच यश आले तर मोदी यांच्या श्रेयात राजनाथ सिंह हे मोठे वाटेकरी होतील. याउलट भाजप जर अपयशी ठरला तर त्याचे खापर मोदी यांच्या माथ्यावर फोडायची सोय राजनाथ सिंह यांना आहेच. गेले काही दिवस मोदी यांच्या नावावर एकमत व्हावे म्हणून राजनाथ सिंह यांनी जिवाचा बराच आटापिटा केला. त्यात ते यशस्वी झाले. आता पुढच्या लढाईत जिवाचे रान करण्याची जबाबदारी मोदी यांची आहे. तेव्हा कोणत्याही अर्थाने हा सौदा भाजप वा मोदी यांच्यापेक्षा राजनाथ सिंह यांच्यासाठी अधिक फायद्याचा आहे, यात शंका नाही.
राजकारणात हे कळण्याचे चातुर्य असावे लागते. ते उत्तर प्रदेशी राजनाथ सिंह यांनी दाखवले. याउलट झाले ते अनंतकुमार आणि सुषमा स्वराज यांचे राजकारण. या दोघांनी मोदी यांना अपशकुन करण्याचा प्रयत्न केला. त्यांचे गणित पूर्णपणे चुकले. या दोघांतील सुषमा स्वराज यांना जनमानसात काही स्थान तरी आहे. भाजपच्या त्यातल्या त्यात विचारी अशा महिला नेत्या असल्यामुळे पंतप्रधानपदासाठी आपली निवड होईल, असे त्यांना वाटत होते. ते झाले नाही. याचे एक कारण म्हणजे कर्नाटकातील अत्यंत वादग्रस्त असे खाणसम्राट रेड्डी बंधू यांच्याशी स्वराज यांची असलेली सलगी. या रेड्डी बंधूंच्या खाणसाम्राज्यातील बेलारी येथे आपले कुलदैवत असल्याने त्यांच्याशी आपला संपर्क आला असे सांगून आपली राजकीय चूक झटकण्याचा प्रयत्न स्वराज यांनी केला. परंतु तो झेपला नाही. या रेड्डी बंधूंनी अवैध मार्गानी किती माया केली होती याचे डोळे विस्फारून टाकणारे चित्र समोर आल्यावर आणि त्याच रेड्डी बंधूंशी स्वराज यांची असलेली कौटुंबिक जवळीक समोर आल्याने त्यांची अडचण झाली. खेरीज दिल्लीतही त्यांचे आणि अरुण जेटली यांचे पटत नाही. त्यात स्वभाव कर्कश. तेव्हा पंतप्रधानपदाच्या शर्यतीतून त्या बाद होणार हे स्पष्ट होते. परंतु अनंतकुमार यांचे तसे नाही. त्यांच्यामागे खुद्द बेंगळुरूतदेखील जनाधार नाही. भाजपची कर्नाटकात जी काही वाढ झाली ती येडियुरप्पा यांनी उपसलेल्या कष्टामुळे. त्यानंतर भाजपची सत्ता कर्नाटकात आल्यावर अनंतकुमार यांचा मुख्यमंत्रिपदावर डोळा होता. ते जमले नाही. त्यामुळे नंतर ते सतत येडियुरप्पा यांचा दुस्वास करीत राहिले. त्यांनी स्वत:स दरबारी राजकारणापुरतेच मर्यादित ठेवल्यामुळे राजकारणातील बदलत्या मतलबी वाऱ्यांची दिशा समजून घेण्यात अनंतकुमार कमी पडले. मोदी यांच्यासारख्या दीर्घशत्रुत्व राखणाऱ्या नेत्याच्या बाबत त्यांचा अंदाज चुकला.
तीच गत झाली ती वयोवृद्ध लालकृष्ण अडवाणी यांची. एके काळी भाजपचा आधार असलेले, लोहपुरुष हे बिरुद मिरवणारे आणि देशाच्या राजकारणाचे ध्रुवीकरण करणारे अडवाणी यांनी मोदी यांच्या हातून आपला अगदीच पालापाचोळा करून घेतला. नको त्या ठिकाणी नको ते करावयास गेले की काय होते याचे मूर्तिमंत उदाहरण अडवाणी यांच्या रूपाने सर्वासमोर राहील. गृहमंत्री या नात्याने पाकिस्तानात महंमद अली जिना यांची स्तुती केल्यापासून अडवाणी यांचे ग्रह फिरले. त्या वेळी आपण जे काही केले त्याचे बौद्धिक जगतात स्वागत होईल असे त्यांना वाटले असावे. मुदलात आपण ज्या पक्षाचे आणि विचारधारेचे प्रतिनिधित्व करतो त्या पक्षास हे मंजूर आहे काय, याची फिकीर अडवाणी यांनी त्या वेळी केली नाही. बरे, तशी फिकीर न करण्याइतकी सहिष्णुता अडवाणी यांनी आधीच्या राजकारणात दाखवली होती असेही नाही. तशी ती दाखवणाऱ्या अटल बिहारी वाजपेयी यांनी जिना यांची स्तुती केली असती तर ते खपून गेले असते. परंतु प्रत्यक्ष राजकारणात बाबरी मशीद पाडण्याच्या मोहिमेचे नेतृत्व करायचे आणि पुढे जिना यांची स्तुती करून कथित निधर्मीयांच्या वर्तुळात घुसायचा प्रयत्न करायचा हा दुटप्पीपणा झाला. तो त्यांच्या अंगाशी आला. त्यांचे त्या वेळचे सल्लागार सुधींद्र कुलकर्णी हे यामागे होते, असे बोलले जाते. आताही अडवाणी यांचे जे काही पक्षांतर्गत पानिपत झाले त्याबद्दल जाहीर शोक व्यक्त करणाऱ्यांत कुलकर्णी आघाडीवर होते. अडवाणी यांची पाठराखण करताना चॅनलीय चर्चात कुलकर्णी यांनी मोदी यांच्यावर बऱ्याच दुगाण्या झाडल्या. ते त्यांच्या दृष्टीने स्वामिनिष्ठादर्शक असेल पण अन्यांसाठी हास्यास्पद होते. हे कुलकर्णी मूळचे कट्टर कम्युनिस्ट. व्यवसायाने पत्रकार/ संपादक. त्यांनी नंतर आपल्या विचारधारेचा रंग लालवरून भगवा केला आणि ते भाजपच्या कळपात शिरले. पुढे ते अडवाणी यांचे सल्लागारही बनले. त्यांचाच पाकिस्तानी सल्ला अडवाणी यांच्या अंगाशी आला. पत्रकाराच्या सल्ल्याने राजकारण करणाऱ्याचा कपाळमोक्ष ठरलेला असतो, हे यानिमित्ताने पुन्हा एकदा सिद्ध झाले. त्यामुळे आता अडवाणी यांच्यापेक्षा कुलकर्णी यांनाच कुंकू पुसल्याचे दु:ख झालेले दिसते. वास्तविक या जिना रामायणानंतरही अडवाणी यांना भाजपचे नेतृत्व करण्याची संधी दिली गेली. त्यात ते अपयशी ठरले. त्या वेळी आपण वाजपेयी यांच्यानंतर पंतप्रधानपदी बसणार हे जणू विधिलिखितच आहे, अशा थाटात अडवाणी यांचे वागणे होते. त्या वेळीही त्यांचा फुगा फुटला. तरीही आपणच भाजपचा चेहरा असल्याचा भ्रम त्यांना झाला होता. तो संघाने दूर केला. आताही मोदी यांना विरोध करताना अडवाणी यांनी जे कारण पुढे केले आहे, ते त्यांच्या कालबाह्यतेचे निदर्शक आहे. मोदी यांच्यामुळे राजकारणाचे ध्रुवीकरण होईल अशी भीती अडवाणी यांनी व्यक्त केली आहे. बाबरी मशिदीच्या प्रश्नावर अडवाणी यांनी जे काही केले ते मनोमीलनाचा प्रयत्न होता, असे मानायचे काय? तेव्हा त्यांनी मोदींवर ध्रुवीकरणाचा आरोप करणे अगदीच केविलवाणे ठरते. आक्रमकतेच्या राजकारणाची हीच परिणती असते. आजचा आक्रमक उद्या सर्वसमावेशक ठरू लागल्यावर संघटनेस अधिक आक्रमकाची गरज लागते. ती गरज सध्या मोदी पुरवणार असल्याने त्यांची निवड होणे क्रमप्राप्त होते.
हे अडवाणी यांच्या लक्षात आले नाही. त्यामुळे कारकिर्दीच्या अखेरच्या टप्प्यावर त्यांच्यावर मानहानीचा प्रसंग ओढवला. आपली गरज संपल्याचे अनेकांना जाणवत नाही. अशा वेळी त्यांना हाताला धरून बसवावे लागते. अडवाणी यांचे असे झाले. हिंदू संस्कृतीचे पाईक असणाऱ्या अडवाणी यांना अजूनही वानप्रस्थाश्रमाची गरज आणि महत्त्व कळू नये हे दुर्दैव. त्याचमुळे आता संघानेच अडवाणींना उपविश अशी आज्ञा द्यायची वेळ आली आहे.