क्षमा या संकल्पनेला सर्वच धर्मात महत्त्व असते, ते ख्रिस्ती धर्मात- त्यातही या धर्मातील बलवत्तर रोमन कॅथलिक पंथात- वादातीत आहे. चर्चगणिक असलेले नक्षीदार कन्फेशन बॉक्स आणि झाल्या कृत्यांची वा पापाची कबुली देण्यासाठी तेथे  जाणारे भाविक किंवा ‘फरगिव्हनेस’ या कप्प्यात इंग्रजी वृत्तपत्रांतून दिसणाऱ्या छोटय़ा जाहिराती, ही त्याची काही दृश्य उदाहरणे. या जगात पाप केले नाही किंवा केलेल्या पापाबद्दल पश्चात्तापदग्धतेने क्षमायाचना केली, तरच आत्म्याला शांती लाभेल, हा विश्वास ख्रिस्ती समाजाला एकसंध ठेवतो. त्यामुळेच अमेरिकेतील काही पूर्वाश्रमीचे गुंड- माफिया- पुढे सारे काळे धंदे सोडून चर्चचे काम करू लागल्याच्या कथा अनेक आहेत. अशा प्रकारे क्षमा मिळून धर्मकार्यकर्ता झालेला मायकल फ्रांझेस हा अमेरिकी गुंड टोळीप्रमुख त्याच्या काळ्या धंद्यांच्या जोरावर इतका गब्बर झाला होता की, ५० अतिधनाढय़ माफियांच्या यादीत त्याचा क्रमांक १८ वा लागे. अशा फ्रांझेसने १९९०च्या सुमारास चर्चकडे क्षमायाचना केली आणि मग गेली २५ वर्षे तो ख्रिस्ती धर्मप्रसाराची व्याख्याने देत फिरतो आहे. टॉम पापानिया याने तर आपण आधी कसे माफिया होतो आणि मग धर्मप्रसारक कसे झालो, या अनुभवावर पुस्तकच लिहिले. हा टॉम ऊर्फ थॉमस खरोखरच माफिया होता की नाही याबद्दल प्रवाद आहेत आणि काही अभ्यासकांच्या मते, माफिया होतो ही टॉमची थापेबाजी आहे. काहीही असो, पण वाल्याचा वाल्मीकी होणे काय किंवा माफियाचा श्रद्धाळू कॅथलिक होणे काय, दोन्ही गोष्टी धार्मिकांना उद्बोधक आणि प्रेरणादायक वाटणारच. इटलीत तर काही चर्चना मिळणाऱ्या  देणग्या माफियांकडून असतात इथपासून ते माफियांची वक्रदृष्टी झाली तर गावातला एकही ख्रिस्ती चर्चमध्ये जाऊ धजणार नाही, इथवरच्या सांगोवांगी कथा आहेत. हा साराच पूर्वेतिहास बाजूला ठेवून विद्यमान पोप फ्रान्सिस यांनी, एखाद्याला  धर्मभ्रष्ट ठरवण्याचा अधिकार माफियांविरुद्ध वापरला, याबद्दल ते अभिनंदनास पात्र ठरतात. विद्यमान पोप इतरांपेक्षा निराळे आहेत, याची ग्वाही देणारेच हे वक्तव्य त्यांच्याबद्दलच्या अपेक्षा आणखी वाढवणारे ठरले आहे. एनद्रान्घेटा ही माफिया टोळी सिसिली प्रांतात गेल्या शतकापासूनच कार्यरत आहे आणि या टोळीकडून १९७५ पासून झालेल्या खुनांची संख्या ३००हून अधिक आहे. अमली पदार्थाची तस्करी, हा या टोळीचा प्रमुख धंदा. असे अमली पदार्थ विकताना या टोळीतील एक  दाम्पत्य पकडले गेले आणि कैदेपूर्वी त्यांनी आपली काही माहिती पोलिसांना दिल्याचा संशय टोळीला आला, म्हणून या दाम्पत्याचा तीन वर्षांचा मुलगा आणि त्याचे आजोबा यांची भरदिवसा  डोक्यात गोळ्या झाडून हत्या या टोळीने केलीच, शिवाय त्यांच्या प्रेतांसकट मोटार जाळून टाकली. ते कोळसा झालेले मृतदेह पाहून या टोळीची दहशत सिसिली प्रांतभर वाढणार, अशी खात्रीच असताना पोप हेलिकॉप्टरने घटनास्थळी पोहोचले आणि  मृतांच्या नातलगांचे सांत्वन करण्यावर न थांबता, त्यांनी माफियांना ख्रिस्ती धर्मात स्थान नसल्याचे जाहीर वक्तव्य शनिवारी केले. आपल्याला सर्वच माफिया म्हणायचे नसून फक्त या प्रकरणात गुंतलेले तेवढे धर्मभ्रष्ट, असा या वक्तव्याचा अर्थ असल्याची पळवाट पोप काढू शकत होते, पण त्यांनी ती काढलेली नाही. इटलीतील राजकीय सत्तेला न जुमानणारी, किंबहुना राजकीय सत्ता ही इटलीत तरी ज्यामुळे सशक्त असूच शकत नाही, अशी माफियांची ताकद आहे. संघटित ख्रिस्ती धर्मापेक्षाही अधिक संघटित या माफिया टोळय़ा आहेत. त्यांना चाप लावण्याचे काम अखेर पोप फ्रान्सिस यांनी हाती घेतल्याचे संकेत या वक्तव्यातून मिळाले, हे उत्तम झाले.