एखादे प्रकरण न्यायप्रविष्ट असेल, तर न्यायप्रक्रियेवर प्रभाव पडेल अशी कोणतीही कृती केली जाऊ नये, असे नैतिक संकेत असतात. गुजरातमध्ये सत्तेत असताना तेथील कोणत्याही न्यायप्रविष्ट प्रकरणांत दूरान्वयानेही हस्तक्षेप होईल वा प्रभाव पडेल असे काहीही आपण कधीच केले नाही, असे देशाचे नवे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीच्या प्रचारकाळात अनेकदा सांगत असत. मोदी सरकारच्या शानदार शपथविधी सोहळ्यातील निमंत्रितांची हजेरी आणि आसन व्यवस्थेमुळे याची साहजिक आठवण अनेकांना झाली असेल. राष्ट्रपती भवनाच्या भव्य प्रांगणात याआधी कधीही झाला नाही एवढय़ा आलिशान सोहळ्यात नरेंद्र मोदी यांनी सोमवारी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. देशविदेशातील अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसोबतच, देशातील उद्योग क्षेत्रातील दिग्गज, विविधधर्मी साधुसंत आणि रुपेरी दुनियेतील तारे-तारकांच्या हजेरीमुळे या नरेंद्रोदय सोहळ्याला झळाळी प्राप्त झाली होती. पण काही चेहरे मात्र, प्रांगणातील गच्च गर्दीत विनाकारण हरवूनच गेले. हा सोहळा दूरचित्रवाणीवरून न्याहाळणाऱ्या देशभरातील जनतेच्या, ‘कोण कुठे आहे’ ते शोधण्याच्या प्रयत्नांना मात्र, दोन-अडीच तासांनंतरही यश आलेच नाही. अशा सोहळ्यांच्या आयोजनामध्ये शिष्टाचाराचा भाग महत्त्वाचा असतो. निमंत्रित व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राजनैतिक महत्त्व लक्षात घेऊन त्याच्या आसनाची व्यवस्था केली जावी असा संकेत असतो. देशाच्या नव्या पंतप्रधानाच्या शपथविधी समारंभात राष्ट्रपती भवनाच्या संबंधित यंत्रणेने या शिष्टाचाराचे पालन करण्याकरिता सोहळ्याआधीचे अनेक दिवस परिश्रम घेतले, पण प्रत्यक्ष सोहळ्यात मात्र, राजशिष्टाचाराची पुरती ऐशीतैशी झाल्याची शंका यावी असेच चित्र दिसू लागले. दिल्लीसारख्या राजधानीच्या नगरीत, जेथे सामाजिक प्रतिष्ठा आणि राजकीय महत्त्व यांना प्राधान्य असते, तेथे होणाऱ्या या सोहळ्यात मात्र, केवळ नोंदीपुरती हजेरी लावण्याची वेळ अनेक दिग्गजांवर आली आणि तारे-तारका मात्र पुढच्या रांगांमधून चमकू लागले. निवडणुकांचा माहोल ऐन रंगात असताना गुजरातच्या पतंगोत्सवात नरेंद्र मोदी यांच्यासमवेत अवकाशात पतंगभराऱ्यांच्या खेळात दंगलेला दबंग अभिनेता सलमान खान या सोहळ्यातही दिमाखात वावरताना दिसू लागला आणि मावळत्या केंद्रीय मंत्रिमंडळातील तिसऱ्या क्रमांकाचे स्थान असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अनेक मान्यवरांना मात्र सलमानच्या मागच्या रांगांतून या सोहळ्याला हजेरी लावावी लागली. उपस्थितांच्या गर्दीतून वारंवार फिरणारे दूरचित्रवाणीचे कॅमेरे सलमान खानवर स्थिरावले, तेव्हा हा सोहळा पाहणाऱ्या अनेकांच्या मनात मोदी यांचे ते वक्तव्य चमकून गेले असेल यात शंका नाही. सलमान खान हा अभिनेता असला तरी राजस्थानातील काळवीट हत्या प्रकरण आणि बेदरकार वेगाने मोटार चालवून एका व्यक्तीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याबद्दल त्याच्यावर आरोपपत्र दाखल झालेले आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना, पंतप्रधानांच्या ऐतिहासिक शपथविधी सोहळ्यात त्याला इतके सन्मानाचे स्थान मिळाल्याचे पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या असतील. अनेक अतिमहत्त्वाच्या प्रतिष्ठितांना निमंत्रितांच्या रांगेतील एखादी कोपऱ्यातील खुर्ची मिळाल्याबद्दल कदाचित आश्चर्य वाटले नसेल, पण सलमानला मानाचे स्थान मिळाल्याने अनेकांना मोदी यांच्या त्या वक्तव्याची आठवणही झाली असेल. सीझरची पत्नी संशयातीतच असली पाहिजे, या माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या विधानाचीही अनेकांना आठवण झाली असेल. देशाची न्यायव्यवस्था कमकुवत नसल्याने सलमानच्या त्या चमकदार सन्मानाचा त्याच्या न्यायप्रविष्ट प्रकरणांवर प्रभाव पडेलच असे नाही. पण जनतेच्या मनात असे प्रश्न उमटले, तर ते गैर कसे मानता येईल?