10 April 2020

News Flash

पद्मजा फाटक

‘मुक्तपणा पूर्णपणे न उधळलेली लेखिका’ अशा शब्दांत नंदा खरे यांनी पद्मजा फाटक यांचे वैशिष्टय़वर्णन केले होते. ते खरेच असल्याच्या खुणा फाटक यांच्या लिखाणातून दिसतात; पण

| December 8, 2014 12:37 pm

‘मुक्तपणा पूर्णपणे न उधळलेली लेखिका’ अशा शब्दांत नंदा खरे यांनी पद्मजा फाटक यांचे वैशिष्टय़वर्णन केले होते. ते खरेच असल्याच्या खुणा फाटक यांच्या लिखाणातून दिसतात; पण त्यासाठी त्यांचे कौतुक जरा दबूनच झाले, कारण बहुधा तो काळ वेगळा होता.. गौरी देशपांडे आणि सानिया यांच्या कथानकांमधल्या स्त्रियांचा ठसा त्या काळावर होता. आज अनेक जणी ब्लॉगमधून सहजपणे ‘माणूस’ म्हणून व्यक्त होतात, सामाजिक अनुभवो मांडतानाच व्यक्तीकडे माणूस म्हणून पाहू शकतात, त्या लिखणाची छापील मळवाट रुंद करणाऱ्यांत पद्मजा फाटक होत्या. आदल्या पिढीला, दूरदर्शनवरील ‘सुंदर माझं घर’ या कार्यक्रमात अनेक मुलाखती घेणाऱ्या फाटक यांच्या प्रसन्न आणि मिश्कील व्यक्तिमत्त्वाचे जे दर्शन झाले होते, ती मिश्किली आणि ती प्रसन्नता त्यांच्या लिखाणातही होती.
म्हणून त्यांना दु:खे दिसलीच नाहीत किंवा त्यांनी ती लिखाणातून मांडलीच नाहीत, असे नव्हे. ‘आवजो’ या त्यांच्या पुस्तकाची जिम्मा प्रवासवर्णनांत होत असली, तरी ते प्रवासात भेटलेल्या माणसांचे- किंवा त्याहीपेक्षा, त्या माणसांच्या व्यक्तिगत नातेसंबंधांतील गुंतागुंतीचे- वर्णन आहे. माणसे पाहण्याच्या या सवयीला आलेले एक फळ म्हणजे ‘बापलेकी’ या पुस्तकाचे त्यांनी केलेले संपादन. कथालेखनही फाटक यांनी केले, पण तो काही त्यांचा पिंड नव्हता. अनुभव पारखणे, माणसांमधून समाज पाहणे, हा त्यांचा स्वभाव. लिखाणाचा कंटाळा अजिबात नाही. उलट हौसच. इतकी की, ‘स्त्री’ मासिकासाठी ‘पुरुषांच्या फॅशन्स’ या विषयावर एकदा त्यांनी लिहिले. ती ‘कव्हर स्टोरी’ ‘स्त्री’ मासिकालाही ताजेपण देणारी आणि मुंबई, पुण्याचे दुकानदार पुरुषांच्या फॅशन्ससाठी कसे दिमतीला आहेत, हे सांगणारी होती. हे सारे १९८२ ते ८४ या काळात, म्हणजे पुरुषांसाठी ‘पार्लर’ वगैरेही निघाली नव्हती, तेव्हा; मेट्रोसेक्शुअल पुरुष पैदा होण्याच्या फारच आधी. पण पुरुषाने फॅशन दडवण्यात अर्थ नाही, उलट ती मिरवायला आमची (१९८० च्या दशकातल्या स्त्रियांची) काही हरकत नाही, असा पहिला सूर बहुधा, या लेखाने लावला.  साहित्यिक महत्ता वगैरे शब्द त्यांच्याबाबत पडत नाहीत म्हणे.. न का पडेनात; पण तेव्हा  ललित लेखकाने समाज कसा पाहायला हवा, हे फाटक सांगत होत्या. स्वत:च्या क्लेशदायी दुखण्याबद्दलही त्यांनी मजेत लिहिलेल्या ‘हसरी किडनी’चे कौतुक सर्वानाच आहे, तर ‘बाराला दहा कमी’ (सहलेखक माधव नेरुरकर) या पुस्तकाला राज्य पुरस्कारही लाभला. मात्र, फाटक यांचे बालसाहित्य (तीन पुस्तके) वेगळे असूनही त्याची चर्चा झाली नाही. त्यांच्या ललित निबंधांकडे समीक्षकांनी नीटसे पाहिलेलेच नाही. ते काम आता फाटक यांच्या निधनानंतर तरी व्हायला हवे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 8, 2014 12:37 pm

Web Title: padmaja phatak
Next Stories
1 व्हिन्सेंट लेनेरो
2 व्ही. आर. कृष्ण अय्यर
3 वीणापणी चावला
Just Now!
X