तहरीक ए तालिबान या संघटनेचा प्रमुख हकीमुल्ला मेहसूद याला अमेरिकेच्या अद्ययावत चालकरहित विमानांनी टिपल्यानंतर पाक सरकारने गळा काढला असला, अमेरिकेचा निषेध केला असला तरी त्यात काहीही तथ्य नाही.  एका बाजूला डोक्यावर मिऱ्या वाटणारी अमेरिका आणि दुसरीकडे डोक्यावर बसलेले इस्लामी अतिरेकी या अडकित्त्यात पाकिस्तानची मान अडकली आहे.
दुसऱ्यांच्या मदतीच्या तुकडय़ावर जगायची सवय लागली की पाकिस्तानचे जसे झाले आहे तसे होते. तहरीक ए तालिबान या संघटनेचा प्रमुख हकीमुल्ला मेहसूद याला अमेरिकेच्या अद्ययावत चालकरहित विमानांनी टिपल्यानंतर पाक सरकारने गळा काढला असला, अमेरिकेचा निषेध केला असला तरी त्यात काहीही तथ्य नाही. तहरीक ही तालिबान या संघटनेची पाकिस्तानी शाखा. बैतुल्ला मसूद यांनी ती स्थापन केली आणि वझिरिस्तान या पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमावर्ती भागात तिचे कार्यक्षेत्र आहे. ही संपूर्ण संघटनाच पाकिस्तानसाठी डोकेदुखी बनून राहिली आहे. पाकिस्तानातील अनेक प्रमुख दहशतवादी हल्ल्यांची ती सूत्रधार. माजी पंतप्रधान बेनझीर भुत्तो यांच्या हत्येच्या कटातही बैतुल्ला यांची भूमिका होती. या कराल दहशतवादी गटाचा चालक असलेला हकीमुल्ला याच्याकडे पुढे या संघटनेची सूत्रे आली आणि त्याने या संघटनेस अधिक क्रूर रूप दिले. २००८ साली इस्लामाबादेतील पंचतारांकित मॅरियट या हॉटेलात झालेल्या भयकारी दहशतवादी हल्ल्याची आखणी आणि अंमलबजावणी हकीमुल्ला यानेच केली होती. परंतु अमेरिकेने आता त्याला टिपले ते काही या पापासाठी नाही. अफगाणिस्तानात हकीमुल्लाच्या संघटनेने अमेरिकी लष्करी तळावर हल्ला करून सात अधिकाऱ्यांचा बळी घेतला होता. तेव्हापासून अमेरिका त्याच्या मागावर होती. अखेर चालकरहित अमेरिकी विमानांनी त्यास शुक्रवारी ठार केले आणि हा शोध एकदाचा संपला. या हत्येबद्दल पाकिस्तानने बराच थयथयाट केला असून अमेरिकेच्या पाकिस्तानातील राजदूतास पाचारण करून या हल्ल्याबाबत आपली नाराजी व्यक्त केली. या हत्येमुळे पाकिस्तानातील शांतता प्रक्रियेत बाधा येईल असा पाकिस्तानचा दावा असला तरी त्यास काहीही अर्थ नाही. याची प्रमुख कारणे दोन. पहिले आणि महत्त्वाचे म्हणजे अमेरिकेच्या या चालकरहित विमानहल्ल्यास पाकिस्तानचा एके काळी छुपा पाठिंबा होता आणि ते लपून राहिलेले नाही. पाकिस्तानी गुप्तहेर यंत्रणेचे, म्हणजे आयएसआय प्रमुख शुजा अहमद पाशा आणि अमेरिकी गुप्तहेर यंत्रणा सीआयएचे प्रमुख डेव्हिड पेट्रस यांनी २००१ सालीच एका गोपनीय कराराद्वारे अशा प्रकारच्या हल्ल्यांस मान्यता दिली होती. इतकेच नव्हे तर अशा हल्ल्यांसाठी शम्सी या सीमावर्ती पाकिस्तानी तळाचा वापर करू देण्यावरही उभय देशांत एकमत होते. त्यामुळे आता जरी पाकिस्तानकडून अमेरिकेच्या या हल्ल्याचा निषेध केला जात असला तरी मुळात अमेरिकेचा हा चालकविरहित उंट आपल्या तंबूत घुसू देण्यास पहिल्यांदा मंजुरी दिली ती पाकिस्ताननेच, याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. पाकिस्तानला याबाबत अमेरिकेच्या दबावापुढे मान तुकवावी लागली ती केवळ पर्याय नव्हता म्हणून. पाकिस्तानचे माजी अध्यक्ष जनरल झिया उल हक यांनी अमेरिकेकडून मिळत राहिलेला निधी इस्लामी मदरशांवर खर्च केला आणि अफगाणिस्तान-पाकिस्तान आणि पुढे पाकिस्तान-भारत या सीमांवर धर्माध इमामांच्या प्रशिक्षण छावण्या स्थापन करू दिल्या. अफगाणिस्तानात घुसलेल्या सोविएत रशियाच्या फौजांना मिळेल त्या मार्गाने जेरीस आणणे हे अमेरिकेचे त्या वेळी एकमेव उद्दिष्ट होते आणि त्यात त्यांना पाकिस्तानच्या जनरल हक यांची पूर्ण साथ होती. त्या वेळी अफगाणिस्तानातील या कामगिरीसाठी अमेरिकेकडून आलेला पैसा मधल्यामध्ये जनरल हक यांनी हडप केला आणि त्यातूनच पाकिस्तानातील धर्माध शक्तींना ताकद मिळाली. नंतर रशियन फौजांनी अफगाणिस्तानातून माघार घेतल्यानंतर अमेरिकेस पाकिस्तानची तितकी गरज राहिली नाही. परंतु दरम्यानच्या काळात इस्लामी धर्माध मात्र माजले आणि त्यातून वेगळीच डोकेदुखी त्या देशासाठी तयार झाली. आता त्यांना आवरणे हे पाकिस्तानच्या क्षमतेबाहेर गेले असून अमेरिकी हातातून त्यांचे परस्पर निर्दालन होणार असेल तर ते पाकिस्तानला हवेच आहे. हे यामागील दुसरे कारण. त्यामुळेच हकीमुल्ला याच्या हत्येने पाकिस्तानने गळा काढला असला तरी तो केवळ देखावा आहे. एका बाजूला डोक्यावर मिऱ्या वाटणारी अमेरिका आणि दुसरीकडे डोक्यावर बसलेले इस्लामी अतिरेकी या अडकित्त्यात पाकिस्तानची मान अडकली आहे. परंतु त्याबाबत सहानुभूतीचे काहीही कारण नाही.
हकीमुल्लाच्या हत्येने तालिबानी संतप्त झाले असून त्यांनी सूडाची आणि रक्तरंजित प्रतिहल्ल्याची भाषा सुरू केली आहे. त्यानुसार तालिबान्यांनी प्रतिहल्ला केला तरी त्याची धग अमेरिकेस लागणार नाही. उलट त्याचा फटका पाकिस्तानलाच बसण्याची शक्यता अधिक. २००१ सालातील ९/११ नंतर अमेरिकेविरोधात एकही दहशतवादी हल्ला अमेरिकेच्या भूमीवर करणे दहशतवाद्यांना शक्य झालेले नाही, हे या संदर्भात ध्यानात घ्यावयास हवे. याचे कारण अमेरिकेची अमोघ ताकद. चालकरहित विमानहल्ला हे याच ताकदीचे प्रतीक. गेल्या १० वर्षांत अमेरिकेने असे शेकडो हल्ले केले असून साडेतीन हजारांपेक्षा अधिक दहशतवादी वा त्यांचे सहकारी त्यातून मारले गेले आहेत. या आणि अशा हल्ल्यांत बळी पडणारे निरपराध हा जरी चिंतेचा विषय असला तरी अमेरिका त्यास भीक घालण्याची काहीही शक्यता नाही. आतापर्यंत हजाराच्या आसपास निरपराधांचे प्राण या ड्रोनहल्ल्यांत गेले आहेत आणि त्यातील सर्वाधिक पाकिस्तानीच आहेत. त्यामुळे पाकिस्तानातील विविध न्यायालयांनी हे ड्रोनहल्ले बेकायदा ठरवले असून अमेरिकेस त्यासाठी दोषी ठरवले आहे. याचा अर्थातच काहीही उपयोग नाही. कारण अमेरिकेकडून त्याचा वापर कमी व्हायच्या ऐवजी वाढणारच हे उघड आहे. १९७३ सालच्या योम किप्पूर युद्धात इस्रायलने या तंत्रास जन्म दिला. त्याआधी पहिल्या महायुद्धाच्या अखेरीस चालकविरहित यान ही संकल्पना जन्माला आली असली तरी त्याबाबतचे कौशल्य विकसित केले ते इस्रायलने. १९८२ साली झालेल्या लेबनॉनविरोधातील युद्धात इस्रायलने अशा विमानांचा मुबलक वापर केला आणि शत्रुपक्षांच्या विमानांना उड्डाणांची संधीही दिली नाही. वेगवेगळ्या विमानतळांवरील विमाने इस्रायलच्या चालकविरहित विमानांनी जागच्या जागी टिपली. त्यानंतर हे तंत्रज्ञान लोकप्रिय झाले आणि त्याच्या वापरातील सुरक्षितता आणि उपयुक्तता लक्षात घेता अमेरिकेचे माजी अध्यक्ष जॉर्ज बुश यांनी आखाती युद्धात मोठय़ा प्रमाणावर वापरले. आज या तंत्रज्ञानात अमेरिकेने इतकी आघाडी घेतली आहे की त्या देशातील नेवाडा येथील लष्कराच्या तळावर बसून संगणकाच्या एका आदेशाद्वारे हजारो किलोमीटरवर, अटलांटिकच्या पलीकडील प. आशियाच्या वाळवंटातील हव्या त्या लक्ष्याचा वेध घेता येतो. या ड्रोनच्या वापरास खरा वेग आला तो विद्यमान अध्यक्ष बराक ओबामा यांच्या काळात. हे ड्रोन तंत्रज्ञान ओबामा हे सढळहस्ते वापरत असून त्याचा सर्वात मोठा फटका पाकिस्तानलाच बसला आहे. त्यामुळे आता पाकिस्तानात या ड्रोनहल्ल्यांविरोधात जनमत संघटित होत असून पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी गेल्या महिन्यातील अमेरिका दौऱ्यात या संदर्भात अध्यक्ष ओबामा यांच्याबरोबरच्या चर्चेत तीव्र नाराजी व्यक्त केली. अमेरिका यापुढे पाकिस्तानात ड्रोनचा वापर करणार नाही, असे आश्वासन अध्यक्ष ओबामा यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शरीफ यांना दिले होते.
त्यानंतर आठच दिवसांत त्यांनी या आश्वासनास तिलांजली दिली आणि हकीमुल्ला याला अशा हल्ल्यात टिपले. आता त्या संदर्भात पाकिस्तानने छाती पिटणे सुरू केले आहे. त्याचा काहीही परिणाम होणार नाही. कारण पाकिस्तान आपले सार्वभौमत्व गमावून बसला असून अमेरिकेच्या तालावर नाचण्याखेरीज अन्य पर्याय त्या देशापुढे नाही. अमेरिकेपुढे सतत भिकेचा द्रोण घेऊन उभे राहिल्यामुळे पाकिस्तान अमेरिकेचा मिंधा झाला असून हातातील द्रोणाचा त्याग जोपर्यंत केला जात नाही तोपर्यंत आकाशातून होणारे हे ड्रोनहल्ले पाकिस्तानला सहन करावेच लागतील. ही द्रोणद्रोहाची शिक्षा आहे.