कोणत्या ना कोणत्या कारणाने भारतात न राहता पाकिस्तानात स्थलांतर केलेल्या सगळय़ा कलावंतांना भारतात परतायचे असते. इथे मिळणारा वाव आणि होणारी कदर त्यांच्यासाठी लाखमोलाची असते. भारताची फाळणी झाली, त्याच वर्षी जन्मलेल्या रेश्मा या कलावतीला हे सगळे कळायला फार काळ जावा लागला नाही. गेल्या सहा दशकांत तिने भारतीय चित्रपट संगीतातील आपल्या मोजक्याच दर्शनाने भारतीय रसिकांच्या हृदयात स्थान मिळवले. भारताच्या बाबतीत तिचे असणारे प्रेमही कधी लपून राहिले नाही. पण हे काही एकटय़ा रेश्माच्या बाबत झाले असे नाही. अनेकांच्या मनात हीच तर सल आहे. मेहदी हसन यांच्या प्रकृतीला आराम पडावा, म्हणून भारतातील त्यांच्या चाहत्यांनी जे जे काही करता येईल, ते केले. तिथल्या नुसरत फतेह अली खान या कव्वाली गायकावर भारतीयांनी मनापासून प्रेम केले. रईस खाँ यांच्यासारखा सतारनवाज भारतात राहिला असता, तर केवढी बहार आली असती, असा सूर त्यांच्यासह अनेक रसिकांनी अनेकदा व्यक्त केला. नूरजहाँने भारतीयांच्या मनावर गाजवलेले राज्य असेच न विसरता येणारे. रेश्माच्या बाबतीत जरा निराळेच घडले. नावावर प्रसिद्ध म्हणावीत अशी काही शेकडो गीते नाहीत. जी काही थोडी लोकांच्या पसंतीला उतरली, त्याने तिचे नाव घराघरांत पोहोचले. आपल्या गळय़ात जे आहे, तेच आपले गाणे, यावर ठाम विश्वास असल्याने उगाचच नको त्या वाटेला जाण्याचा अट्टहास या गायिकेने कधी (धरला) दाखवला नाही. राजस्थानातील बंजारा जमातीत जन्मलेल्या या रेश्माला वयाच्या बाराव्या वर्षी काही कल्पना नसताना नभोवाणीवर संधी मिळाली आणि ती एकदम प्रकाशझोतात आली. त्या वेळी माध्यमांची अशी रेलचेल नसल्याने असेल कदाचित, पण रेश्माच्या आवाजाने जादू करून टाकली. लोकसंगीतातील आवाजाची जातकुळी असल्याने नव्या प्रयोगांना सामोरे जाण्यापेक्षा आपल्या गळय़ाला शोभेल, असेच गाणे त्यांनी आयुष्यभर केले. पाकिस्तानमध्ये राहून गाणे करणाऱ्या सगळय़ांना तो देश स्वरांबाबत शापित वाटतो. ज्या मुसलमानी संगीताने भारतीय संगीताच्या दीर्घ परंपरेत मोठे योगदान दिले, त्या संगीताला पाकिस्तानातच सापत्नभावाची वागणूक का मिळते, याचे उत्तर तेथील सामाजिक परिस्थितीत आहे. कलांच्या विकासासाठी तेथे फार प्रयत्न झाले नाहीत. बहुतांश काळ लष्करी सत्ता असल्याने निर्माण झालेल्या राजकीय अस्थिरतेने कलांकडे दुर्लक्ष झाले. त्याचा परिणाम सामान्यांच्या सांस्कृतिक जीवनावर झाला. त्यामुळेच कलावंतांची घुसमट होऊ लागली. अदनान सामी काय किंवा राहत फतेह अली खान काय, त्यांना भारतात मिळणारी उन्मुक्तता पाकिस्तानात जवळजवळ दुरापास्त असते. रेश्माने त्याबद्दल कधी जाहीर वाच्यता केली नाही. पण भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याकडे भारत आणि पाकिस्तान सीमेवर रस्ता बांधण्याचा हट्ट मात्र धरला. एवढेच नाही, तर लाहोर ते अमृतसर अशा बससेवेच्या उद्घाटनाच्या फेरीत स्वत:सह कुटुंबातल्या अनेकांना घेऊन प्रवासही केला. गाणे हेच आपले जगणे आहे आणि तीच आपली मुक्ती आहे, यावर ज्या ज्या पाकिस्तानी कलावंतांनी विश्वास ठेवला, त्यांचे अर्धे हृदय म्हणूनच भारताकडे आंदण असते. रेश्माच्या बाबतीत नेमके हेच तर घडले.