मोबाइलचा ध्वनिप्रकटक अर्थात ‘स्पीकर’ कर्मेद्रनं सुरू केला होता. त्यामुळे डॉक्टर नरेंद्र यांचा आवाज चौघाही मित्रांना थेट ऐकता आला. डॉक्टर, त्यांच्या पत्नी आणि त्यांचे सहकारी सुखरूप होते, पण भूकंपामुळे कामाची व्याप्ती आणि ताण अनेक पटींनी वाढला होता. त्यांचा आवाज ऐकून चौघांचा जीव भांडय़ात पडला.. मग गप्पांचा ओघ डॉ. नरेंद्र मथुरेची वारी, ‘पैल तो गे काउ’ या अभंगाचा गवसलेला अर्थ याकडे वळला.. मग नव्या अभंगावर चर्चा झालीच नाही.. दिवस भराभर उलटले.. मे आणि जून वेगात सरले.. शाळा सुरू व्हायच्या आत कर्मेद्रला आणि योगेंद्रला कुठे कुठे जाऊनही यायचे होते.. ते परतले आणि पुन्हा एकवार या चार मित्रांच्या ‘सत्संग गटा’ची बैठक ठरली. सिंहस्थ आणि वारी या दोन निमित्तांनी बुवाही आले होते, कुशाभाऊ आणि दादासाहेबांना जमलं नाही, पण नाना आले होते. ते दोघं ज्ञानेंद्रकडेच उतरले होते, त्यामुळे ही बैठकही ज्ञानेंद्रच्याच घरी घ्यायचं ठरलं होतं.. या वेळी अभंग होता सेना महाराजांचा! ज्ञानेंद्रच्या बंगलीवर समुद्राच्या नादाच्या पाश्र्वभूमीवर पंडित भीमसेन जोशी यांच्या घनगंभीर पहाडी आवाजात अभंगाची ध्वनिमुद्रिका वाजत होती. श्रीसंत सेना महाराजांचे शब्द होते..

जातां पंढरीसी सुख वाटे जीवा। आनंदे केशवा भेटतांचि।।१।। या सुखाची उपमा नाही त्रिभुवनीं। पाहिली शोधोनि अवघी तीर्थे।।२।। ऐसा नामघोष पताकांचे भार। ऐसे वैष्णव डिंगर दावा कोठें।।३।। ऐसी चंद्रभागा ऐसा पुंडलीक। ऐसा वेणुनादी काला दावा।।४।। ऐसा विटेवरी उभा कटेवरी कर। ऐसें पाहता निर्धार नाही कोठें।।५।। सेना म्हणे खूण सांगितली संतीं। या परती विश्रांती न मिळे जीवा।।६।।
अभंग ऐकताना सर्वाच्याच चित्तवृत्ती आनंदल्या होत्या. अभंग संपला आणि काही क्षण नीरव शांतता पसरली. तिचा भंग करीत बुवा म्हणाले..
बुवा- डोळ्यासमोर पंढरीची वारी, तिथला आसमंत कसा लख्ख उभा राहतो पाहा! काय हृदयेंद्र, अभंग कसा सोपा आहे ना?
नाना- कॅसेट निघाली ना, म्हणून हा एवढा एक अभंग ऐकून ऐकून माहित्ये.. पण सेना महाराजांचे किती तरी अभंग आहेत.. ते कुठे माहीत आहेत?
बुवा- नाना, तुम्ही म्हणाला होतात ना मागे की, आजवर सेना महाराजांच्या अभंगावर एकही कीर्तन मी ऐकलेलं नाही (नाना होकारार्थी मान हलवतात)?
कर्मेद्र- म्हणजे तुम्ही आज कीर्तन ऐकवणार?
बुवा- (हसत) घाबरू नका!
हृदयेंद्र- घाबरू कशाला? मला तर तुमचं कीर्तन एकदा तरी ऐकायचंच आहे!
बुवा- हो! पण आता नाही.. तर नाना म्हणाले तेव्हा घरी परतताच मी गाथा पाहिली आणि सेना महाराजांचे अभंग अभ्यासिले.. तरी मी हा सर्वाना माहीत असलेला अभंग घेतला, कारण त्याच्या चर्चेतच इतरही अभंग येतीलच.. बरं हा अभंग सोपा वाटतो, पण त्याच्यात चार-पाच गोष्टी फार सूक्ष्म आहेत बरं का!
हृदयेंद्र- (कुतूहलानं) त्या कोणत्या?
बुवा- पंढरीला जाताना जीव सुखावतो, पण केशवाचं दर्शन झालं की, त्याला आनंदही होतो! अनेक र्तीथ मी पालथी घातली, पण या प्रत्यक्ष भेटीचं जे सुख आहे ना, त्याची सर कशाला नाही! विटेवर उभा राहिलेला हा विठोबा भक्ताची वाट पाहत युगानुयुगं उभा आहे. या अशा उभं राहण्यात अपार करुणा आहे आणि निर्धारही आहे! हा निर्धार अन्यत्र कुठेच नाही!! या सर्वाउपर फार मार्मिक गूढगंभीर शब्द आहे. तो म्हणजे ‘खूण!’ ‘सेना म्हणे खूण सांगितली संती। यापरती विश्रांती न मिळे जीवा!’ ही ‘खूण’ आणि ही ‘विश्रांती’ यातला जो आंतरमेळ आहे ना, तो फार विलक्षण आहे.. आता सांगा, सोपाच आहे ना हा अभंग?
हृदयेंद्र- (हसत) आता तो तेवढा सोपा उरलेला नाही..
योगेंद्र- खरंच ऐकून ऐकून सवयीनं शब्द इतके सरळ भासतात की, त्यामागचा खरा संकेत जाणवेनासाच होतो.. बुवा, तुम्ही असे धावणारे शब्द पकडून डोळ्यासमोर उभे केले आहेत की, त्यांच्या अर्थाचा नव्यानं विचार सुरू झाला आहे.. खरंच हृदू, तुझे अचलदादाही या गप्पांत असते तर आणखी मजा आली असती..
हृदयेंद्र- योग असेल तर घडेलही तसं.. पण बुवा अभंगाची चर्चा सुरू करण्याआधी सेना महाराजांविषयी थोडं सांगा ना!
. चैतन्य प्रेम