चित्तशुद्धी रोजच्या कामांमधूनच साधायची, तर जे काम आपण करतो आहोत, ते सरळपणे करावे लागेल.. व्यापाऱ्याने तराजू नेहमी सरळच धरावा लागेल.. शरीराच्या पातळीवर घडणाऱ्या कर्माचा मनावर, चित्तावर परिणाम घडला, तर त्याद्वारे मन वा चित्त परमेश्वराच्या वस्तीसाठी शुद्ध होईल..
”कुरुक्षेत्रावर भगवान कृष्णांनी पेरलेल्या गीतेच्या बीजांना महाराष्ट्राच्या खडकाळ पठारावर अमाप पीक आले. महाराष्ट्रात दुसरे काही पिकत नाही.
फक्त गीता पिकते. ज्ञानोबातुकोबांपासून ते विनोबांपर्यंत सर्व संतांनी येथे गीतेचीच पेरणी केली. म्हणून फळाचा लोभ न धरता कर्तव्य करणे हा महाराष्ट्राचा मुळी देहस्वभावच होऊन बसला आहे..” गीता आणि गीतेने सांगितलेल्या निष्काम कर्माच्या तत्त्वज्ञानाचा कट्टर अभिमानी असलेल्या एखाद्या घनघोर भाष्यकाराचे हे उद्गार असले पाहिजेत, असाच आपला ग्रह सकृतदर्शनी तरी होतो. पण नाही! हे वक्तव्य आहे आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांचे. बडोद्यातील मराठी वाङ्मय परिषदेने बडोदे येथे १८, १९ व २० जानेवारी १९५६ रोजी आयोजित केलेल्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून बोलताना आचार्यानी त्यांच्या अध्यक्षीय भाषणात महाराष्ट्राचा देहस्वभाव वरील शब्दांत विशद केला. महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे ते १९वे अधिवेशन होते आणि आचार्य अत्रे यांच्या अध्यक्षीय भाषणाचे शीर्षकसूत्र होते- साहित्य आणि नवसमाजरचना. व्यक्तिगत आणि सामाजिक जीवनाची निखळ ऐहिक भूमिकेतून धारणा करणाऱ्या कर्मप्रधान भक्तीचे बाळकडू पाजून संतांनी महाराष्ट्राचा देहस्वभाव घडवला, हे आचार्य अत्रे यांचे अचूक निरीक्षण संतविचाराचा गाभाच जणू आपल्या पुढय़ात मांडते.
‘मोक्ष’ या संकल्पनेचे सर्वसाधारण भारतीय मनावर प्रचंड गारुड आहे. असा हा मोक्ष मेल्यानंतरच मिळतो. त्यामुळे, आपले रोजचे जगणे ही त्या मोक्षाची पायाभरणी, अशी आपली पक्की कल्पना. याच कल्पनेची मांड मनावर पक्की असल्याने इहलोकातील जीवन एक प्रकारच्या तुच्छ भावनेने जगण्याची रोगट प्रवृत्ती समाजामध्ये बोकाळण्याचा धोका असतो. संतविचाराने हे संकट नेमके जोखून मुळावरच घाव घातला. मोक्ष हा आपण मेल्यावरच मिळतो, या समजुतीचा पायाच संतांनी पहिल्यांदा उखडून टाकला! हे काम केले ज्ञानदेवांनी. मेल्यानंतरच मोक्षगती मिळते अथवा मिळवायची असते या जाणिवेमध्ये रममाण राहणाऱ्यांची कानउघडणी करताना, उभ्या जगाचे माउलीपण निभावणाऱ्या ज्ञानदेवांच्या मृदुकोमल वाणीलाही प्रखर धार चढते. ”मोक्ष मेल्या पाठीं आम्हांसी होईल। ऐसें जें म्हणतील अतिमूर्ख।।”, अशा तीव्र शब्दांत ज्ञानदेव मोक्ष आणि पारलौकिक जीवन यांचा सांधा मोडीत काढतात. याच जन्मात आणि याच देहात मोक्ष हातोहात मिळतो तो स्वकर्म मनोभावे केल्यामुळे, ही संतविचाराने मोक्षसाधनाची केलेली पर्यायी मांडणी संतांच्या इहवादी जीवननिष्ठेशी सुसंवादी आहे. संतांच्या याच जीवननिष्ठेचा उच्चार आचार्य अत्रे करतात. फळाचा लोभ न धरता केलेले कर्तव्य हाच मोक्ष, हा भागवतधर्मी संतांनी शिकविलेला विचार आला गीतेमधून. कर्म करायचे, पण त्या कर्माचा कर्तेपणा अंगाला चिकटू द्यायचा नाही, ही साधना अवघड आहे. या सगळय़ाबाबत विनोबांनी त्यांच्या गीता प्रवचनांमध्ये नितांत सुंदर आणि मार्मिक भाष्य केलेले आहे. हाताने काम आणि मुखाने नाम, ही जीवनरीत संतविचार शिकवतो, कारण नामचिंतन नावाच्या विशेष कर्माची जोड हातून घडणाऱ्या कर्माला दिली की कर्तेपणाच्या अहंकाराचा वारा लागत नाही हा संतांचा अनुभव होता.
हे समजावून घ्यायचे तर विनोबांचा हात धरायला हवा. ‘कर्म-विकर्म-अकर्म’ या गीतेतील तीन संकल्पना विनोबा अतिशय सोप्या शब्दांत समजावून सांगतात. त्यासाठी विनोबाजी आधार घेतात तो ‘कर्मणा शुद्धि:’ या गीतासूत्राचा. आपल्या हातातून घडणारे अथवा केले जाणारे काम हे चित्तशुद्धीचे साधन आहे, हा या सूत्राचा अर्थ. मन म्हणा वा चित्त शुद्ध असणे, हा परमार्थाचा गाभा. ही चित्तशुद्धी रोजच्या कामांमधूनच साधायची. आपण करत असलेल्या कामांचा, आपण चरितार्थासाठी करत असलेल्या उद्योगाचा मन अथवा चित्त शुद्ध करण्यासाठी उपयोग करून घ्यायचा तर त्यासाठी जागरूकपणे प्रयत्न करणे भाग आहे. या खास अशा प्रयत्नालाच ‘विकर्म’ अशी संज्ञा गीता देते. ‘विकर्म’ म्हणजे ‘विशेष कर्म’ अशी फोड विनोबाजी करतात.
रोजच्या कामांना विकर्माची जोड दिली, की साध्या कर्माचे रूपांतर कर्मयोगात होते,  हे विनोबांचे सूत्र. त्यासाठी त्यांनी गोष्ट सांगितलेली आहे ती महाभारतातील तुलाधार वाण्याची. जाजली नावाचा ब्राह्मण ज्ञान मिळवण्यासाठी तुलाधार वाण्याकडे जातो. तुलाधार दुकानात बसलेला असतो. समोर टांगलेला असतो तराजू. ग्राहक कोणीही येवो, तो गरीब असो वा श्रीमंत; ज्ञानी असो वा अडाणी त्याला सरळ दांडय़ाच्या तराजूनेच माप घालायचे, हा पहिला धडा तुलाधार वाणी जाजलीला शिकवतो. तराजूचा दांडा सरळ धरायचा म्हणजे त्याच सरळपणाचा संस्कार मनावर घडतो, असा या कथेचा इत्यर्थ विनोबा उलगडतात. शरीराच्या पातळीवर घडणाऱ्या कर्माचा मनावर, चित्तावर असा जो सुभग परिणाम घडून आणायचा त्याद्वारेच मन वा चित्त शुद्ध होणे अपेक्षित आहे. तराजू सरळ धरला की तीच सरलता मनाला लाभेल आणि असे सरळ मन तराजूची दांडी तिरकी मारण्याची प्रेरणा शरीराला कधीच देणार नाही, असा हा अन्योन्य संबंध. अर्थात, त्यासाठी मनाच्या पातळीवरही डोळसपणे कार्यरत राहावेच लागते. मन अथवा चित्त संशोधनासाठी जे कर्म करायचे ते कर्म मनाच्या पातळीवर करायचे असते. अशा कर्मालाच म्हणतात विकर्म!
नामचिंतन हे संतांच्या लेखी विकर्म होय. तुकोबांनी वारसा चालविला तो तुलाधाराचाच. ”सत्य तराजू पैं धरा। नको कृत्रिम विकरा।।” असा दंडक तुकोबा घालून देतात. कारण, सत्याला अनुसरणे म्हणजे तुकोबांच्या लेखी विठ्ठलालाच अनुसरणे. विठ्ठल हाच सत्य! ईश्वरार्पण बुद्धीने केलेले कर्म म्हणजेच मोक्ष, ही संतांनी केलेली मोक्षाची व्याख्या. आता, हातून पार पडणाऱ्या कर्माला ईश्वरार्पण भावनेची जोड द्यायची तर मनाच्या पातळीवरही त्याच ईश्वराचे अनुसंधान हवे. ते अनुसंधान नामामुळे निर्माण होते. नामस्मरण भक्ती संत शिरोधार्य मानतात ती याचसाठी. ”करा विठ्ठल स्मरण! नामरूपी अनुसंधान।।”, या ज्ञानदेवांच्या सांगाव्याचा इत्यर्थ हाच. प्रपंचातील कामे शरीर निपटत असताना नामचिंतनाद्वारे मन निर्मळ होते, असा स्वानुभव सांगताना, ”महामळें मन होतें जें गांदलें। शुद्ध चोखाळलें स्फटिक जैसें।।” असे तुकोबांनी काढलेले उद्गार मोठे लक्षवेधी आहेत. कारण, अशा शुद्ध चित्तातच तुकोबांच्या दाखल्यानुसार विठ्ठल वस्तीला येतो. ”तुका ह्मणें चित्त करावें निर्मळ। येऊनि गोपाळ राहे तेथें”, असा उपदेश तुकोबा आपल्याला करतात तो याच कार्यकारणभावाला धरून. परतत्त्वाचा प्रकाश चित्तात पसरला की अहंकार लोपतो आणि साध्या कर्माचे रूपांतर ईश्वरार्पण कर्मात होते.
नामस्मरणाच्या साधनाकडे संत विकर्म म्हणून बघतात. याचा आपल्याला पत्ताच नाही! शुद्ध मनाची आवश्यकता परमार्थापेक्षाही प्रपंचातच अधिक भासते. चित्त शुद्ध नसल्यानेच सरळ चालणाऱ्या बुद्धीचे अवस्थांतर व्यंकटी बुद्धीमध्ये होते. ही वाकडी बुद्धीच चौफेर धुमाकूळ घालू लागते म्हणून ”जे खळांचि व्यंकटी सांडों”, असे पसायदान ज्ञानदेवांना मागावे लागते. चित्त शुद्ध करण्यासाठी करावयाचे विशेष कर्म म्हणजे नामस्मरण, या दृष्टीने आपण या साधनाकडे बघतो का? आपल्या लेखी, नामचिंतन हे एक कर्मच आहे. विकर्म नव्हे! त्यामुळे, माळा ओढून ओढून मणी गुळगुळीत झाले तरी आपण ठणठणीत गोटेच राहतो. इथून तिथून सगळाच दांभिकपणा!