श्रीगोंदवलेकर महाराज जेव्हा सांगतात की, ‘प्रपंचात पैशाइतकीच धीराची गरज आहे’, तेव्हा पैसा आणि धीर या दोन स्वतंत्र गोष्टी आहेत,  पैशानं धीर येतो, असं आपण मानत असलो तरी या दोन्ही गोष्टींचा असा काही आंतरसंबंध नाही, हे स्पष्टच होतं. आपल्याला वाटतं की पैसा असेल तर धीर येतोच. पण पैशाबरोबरच अधीरताही येऊ शकते, हे आपल्या लक्षात येत नाही! आता श्रीमहाराज जेव्हा सांगतात की, प्रपंचात पैशाइतकीच धीराचीही गरज आहे, त्यामागचे कारण काय असावे? आज आपण प्रपंच सुखाचा व्हावा यासाठी सर्वप्रथम तरतूद करतो ती पैशाचीच! भविष्यकाळ अडचणीरहित असावा याकरिता अनेकानेक प्रकारच्या योजनांत आपण गुंतवणूक आणि तरतूद करतो. या सर्व गुंतवणुकीचा आणि तरतुदीचा एकमात्र आधार पैसा हाच असतो. आता पैशाची तरतूद होऊनही आपण निशंक काही होत नाही. मनातली काळजी सुटत नाहीच. श्रीमहाराजांच्या शब्दांत सांगायचं तर, ‘‘एक स्थिती कायम राहात नाही म्हणून आपल्याला भीती वाटते, आणि तिच्यातून काळजी उत्पन्न होते’’(चरित्रातील काळजीविषयक बोधवचने, क्र. २९). आपलं जगणं काळाच्या आधीन आहे. जी गोष्ट काळाच्या पकडीत आहे ती एकसमान कधीच राहू शकत नाही. घट, बदल आणि नाश या गोष्टी काळाच्या प्रभावापायी अटळच असतात. काळाचा प्रवाह सतत वाहाता आहे. त्यानुसार आपल्या जीवनातही अनुकूल आणि प्रतिकूल घटना घडत जातात. पण आपल्याबाबतीत सदोदित अनुकूलच घडावं, अशी आपली दृढ इच्छा असते. काळाच्या पकडीत जगताना ती अशक्य असते. त्यामुळे काळानुरूप जे बदल आयुष्यात घडत जातील त्याविषयी कल्पनेनंच आपण फार मोठी भीती आणि काळजी उत्पन्न करतो. काळाचा प्रवाह जसा सतत वाहाता, बदलता आहे तसाच पैसाही चंचल आहे. कोणत्या प्रसंगात किती पैसा क्षणार्धात जाईल, हेदेखील सांगता येत नाही. त्यामुळे कितीही पैसा गाठीशी असला तरी क्षणार्धात धनहीन होण्याची भीतीही आपल्याला लागू शकते. या कल्पनेतून उत्पन्न झालेल्या भीतीचं फार मोठं ओझं मनावर येऊ शकतं. त्यामुळेच महाराज सांगतात, पैशाइतकीच धीराची गरज आहे. हा धीर कशानं येईल? ज्या ज्या गोष्टींचा आज आपल्याला आधार वाटतो त्यांचं खरं स्वरूप उमगलं तर हा धीर येईल. पैशासकट भौतिकातील ज्या गोष्टींचा कायमचा आधार आपण गृहित धरला आहे त्या गोष्टी काळाच्या पकडीत असल्याने कशा अशाश्वत आहेत, हे मनात ठसलं तर हा धीर येईल. मग खरा जो शाश्वत आधार आहे तो मिळाला तरच मनाची अधीरता कायमची संपू शकते, मन स्थिर, निशंक, शांत आणि समाधानी राहू शकतं, हे जाणवू शकतं. श्रीमहाराजही म्हणूनच सांगतात, ‘‘समाधान मनाचा धर्म आहे. मन भगवंताशी चिकटले तर समाधान येईल’’ (बोधवचने, क्र. ११९). पैशाला चिकटलेलं मन भगवंताला चिकटणं, ही गोष्ट वाटते तितकी सोपी नाही. कारण आपली जन्मोजन्मीची स्वाभाविक ओढ पैशाकडेच आहे, भगवंताकडे नव्हे!