नामात आणि श्रीमहाराजांच्या विचारात चित्त स्थिर झालं की ‘धारणा’ साधली. धारणेची ती स्थिती अखंड झाली की ‘ध्यान’ साधलं आणि मग, ‘तदेवरथमात्रनिर्भासं स्वरूपशून्यमिव समाधि:।।३।।’ म्हणजे ज्याचा जप सुरू आहे त्याच्याच विचारानं अंत:करण इतकं भरून जातं की केवळ ज्याचा जप सुरू आहे तोच सर्वत्र दिसू लागतो. चित्त त्यांच्याशी इतकं तन्मय होतं की मी त्यांचं स्मरण करीत आहे, अशी जाणीवदेखील होत नाही. स्वरूपाशी तादात्म्य पावून चित्तातील दोषवृत्तींचा लयच होतो, वृत्तीशून्यतेनं स्वरूपाशी तादात्म्य होतं, ही समाधी! थोडक्यात, प्रत्यक्ष जगत असतानाही नामध्यान अखंड टिकतं तेव्हा महाराजांचं अस्तित्व प्रत्येक घडामोडीत जाणवू लागतं. क्षणोक्षणी त्यांची आठवण येऊ लागते. मन त्यांच्या स्मरणात इतकं बुडून जातं की आपण महाराजांचं स्मरण करीत आहोत, ही जाणीवदेखील होत नाही. श्रीगोंदवलेकर महाराजांनीही ‘समाधी’बद्दल काही सांगितलं आहे. ते म्हणतात- ‘भगवंताकडेच वृत्ती सारखी राहाणे याचे नाव समाधी’ (चरित्रातील व्याख्याविषयक वचने, क्र. ६०), ‘प्रपंचामध्ये व्यवहार होत असताना भगवंतापासून जेव्हा वृत्ती  हलत नाही तेव्हा तिला सहज-समाधी असे म्हणतात (चरित्रातील व्याख्याविषयक वचने, क्र. ६१), ‘सहजपणाने जगणे म्हणजे सहजपणातून वेगळे न राहाणे, ही समाधी’ (चरित्रातील व्याख्याविषयक वचने, क्र. १४४). आता आपलं जगणं सहज आहे का? नाही. जे घडून गेलं त्याची चिंता आणि जे घडणार आहे त्याची चिंता, यानं आपलं मन कधी हिंदकळू लागेल, याचा भरवसा नाही. आपण दुसऱ्याशी व्यवहार करतानाही सहजपणे तो करीत नाही. इथे आर्थिक व्यवहार अभिप्रेत नाही. दुसऱ्याशी आपलं जे वागणं-बोलणं आहे ते मन:पूर्वक नसतं. त्यात अनेक आडाखे असतात, अनेक तर्क-वितर्क असतात, स्वार्थानुसार बांधलेल्या अंदाजांची पाश्र्वभूमी असते. तेव्हा आपलं जगणं, आपलं वावरणं हे सहज नव्हे तर अवघडच असतं! श्रीमहाराजांसारख्या संतांचं जगणं हेच खरं सहज जगणं आहे. जीवनाचा जसा प्रवाह आहे त्याला सहजतेनं सामोरं कसं जावं, वर्तमानात कसं जगावं, प्रत्येक क्षणी जे आवश्यक आहे ते कर्तव्यं पार पाडून त्यातून मोकळं कसं व्हावं, हे श्रीमहाराजांसारख्या संतांच्या चरित्रातूनच जाणता येतं. नाम म्हणजे त्यांचाच सहवास आहे. मग नाम घेताना आपल्यालाही सहज जगण्याची कला ते शिकवू लागतील. त्यांचं भान न सोडता जगणं हेच खऱ्या अर्थानं सहजपणातून वेगळं न होता जगणं आहे. ही समाधीच आहे. कारण जगण्यातला प्रत्येक क्षण हा त्यांनाच वाहिलेला आहे. आता पातंजल योगसूत्रानुसार धारणा, ध्यान आणि समाधी या संकल्पनांच्या व्याख्या आणि त्यांची नाममार्गातली जोडणी आपण श्रीमहाराजांच्या बोधाच्या अनुषंगानं पाहिली. तेव्हा अष्टांगयोगातली सर्वोच्च जी समाधी अवस्था आहे ती नामानंही साधते, हे आपण श्रीमहाराजांच्या बोधातूनही जाणलं. अशी ‘अखंड समाधी अवस्था’ लाभलेले कितीतरी नामयोगी महाराजांच्या चरित्रात लपले आहेत!