स्थळ श्रीहरीकोटा येथील उपग्रह प्रक्षेपण केंद्र.. २६ एप्रिल २०१२ रोजी सकाळची वेळ. त्यावेळी रिसॅट-१ या उपग्रहाचे उड्डाण होणार होते. भारतीय अवकाश संशोधन संस्थेतील (इस्रो) वैज्ञानिकांत उत्साह व उत्कंठा होती, याचे कारण म्हणजे दुसऱ्यांदा एक महिला या मोहिमेची संचालक होती, पण या वेळी मात्र एक अवजड उपग्रह अवकाशात सोडला जाणार होता. त्या वेळी प्रा. यशपाल व डॉ. यू. आर. राव यांनी हेतुत: या मोहिमेच्या यशाला प्रसिद्धी देण्याची काळजी घेतली होती, कारण या मोहिमेची संचालक एक महिला होती. या महिला वैज्ञानिकाचे नाव एन. वलारमथी. त्यांना तामिळनाडू सरकारचा पहिला ए. पी. जे. अब्दुल कलाम पुरस्कार प्रदान करण्यात आला. पाच लाख रुपये रोख व सुवर्णपदक असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.कलाम यांच्या सन्मानार्थ दिला जाणारा पहिलाच पुरस्कार एका महिला वैज्ञानिकास मिळावा ही महिलांना विज्ञान क्षेत्राकडे आकृष्ट करणारी घटना आहे. कलाम यांच्याप्रमाणेच अत्यंत साध्या कुटुंबातून आलेल्या वलारमथी या मूळ मागास भाग असलेल्या तामिळनाडूच्या अरियालूर जिल्ह्य़ातील आहेत. त्यांचे वडील नटराजन हे गट विकास अधिकारी होते. वलारमथी यांचे शिक्षण तामीळ माध्यमातून निर्मला गर्ल्स सेकंडरी हायस्कूल येथे झाले. नंतर त्यांनी अरियालूर येथील सरकारी महाविद्यालयातून पुढील शिक्षण घेतले. कोईमतूर येथील सरकारी तंत्रज्ञान महाविद्यालयातून पदवी घेऊन त्यांनी अण्णा विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक्स व कम्युनिकेशन्स या विषयात एम.ई. ही अभियांत्रिकीतील स्नातकोत्तर पदवी घेतली. गेली ३२ वर्षे त्या इस्रोत काम करीत आहेत. २०१२ मध्ये त्यांनी रिसॅट-१ या दूरसंवेदन उपग्रहाच्या प्रकल्पाची जबाबदारी सांभाळली. त्या रोज दिवसातले चार ते पाच तासच स्वत:साठी देऊ शकतात, इतका त्यांचा कामाचा व्याप मोठा आहे. अनेक उपग्रह प्रकल्पांत कामाचा त्यांचा अनुभव आहे, रिसॅट-१ हा दूरसंवेदन उपग्रह असून तो अवकाशातील नेत्र म्हणून ओळखला जातो. २००२ मध्ये हाती घेतलेला प्रकल्प पूर्ण करण्यास किमान दहा वर्षे लागली इतका तो अवघड होता. या उपग्रहावर सिंथेटिक अ‍ॅपर्चर रडार हे उपकरण असल्याने अवकाशातून दिवसा व रात्री पृथ्वीची छायाचित्रे त्याच्या मदतीने घेता येतात. महिला सर्व जबाबदाऱ्या सांभाळण्यास सक्षम असतात, त्यांच्या या कुशलतेचा वापर केला गेला पाहिजे, असे वलारमथी म्हणतात. त्यांच्या कारकिर्दीतील यशाचे श्रेय त्या सहकारी व कुटुंबीयांना देतात. आताच्या पुरस्काराचे श्रेय त्यांनी ‘इदं न मम’ या वृत्तीने इस्रोला दिले आहे.