News Flash

व्यक्तिवेध: किसनराव बाणखेले

दांडगा जनसंपर्क, जनतेच्या सुख-दु:खांमध्ये सहभागी होण्याची वृत्ती, साधी राहणी आणि जनतेला जवळची वाटेल अशी जीवनपद्धती यांच्या जोरावर राजकारण केले, तर नेता कोणत्या पक्षाचा आहे याच्याशी

| August 12, 2014 01:01 am

दांडगा जनसंपर्क, जनतेच्या सुख-दु:खांमध्ये सहभागी होण्याची वृत्ती, साधी राहणी आणि जनतेला जवळची वाटेल अशी जीवनपद्धती यांच्या जोरावर राजकारण केले, तर नेता कोणत्या पक्षाचा आहे याच्याशी मतदाराला देणेघेणे नसते. पुणे जिल्ह्य़ाच्या आंबेगाव तालुक्यातील लोकनेते, मंचरचे रहिवासी आणि खेड मतदारसंघातून १९८८ मध्ये जनता दलाच्या तिकिटावर लोकसभेत निवडून गेलेले किसनराव-अण्णा- बाणखेले यांनी हे सिद्ध केले होते.
मंचरचे सरपंचपद, पुणे जिल्हा परिषदेचे सदस्यपद, आंबेगाव विधानसभा मतदारसंघाची तीन वेळा आमदारकी आणि रामकृष्ण मोरे यांच्यासारख्या मातब्बराचा पराभव करून कोणत्याही लाटेला न जुमानता जनता दलाच्या तिकिटावर मिळविलेली खेडची खासदारकी हा किसनरावांच्या राजकीय कारकिर्दीचा आलेख! जेमतेम ११वीपर्यंत लौकिक शिक्षण झालेल्या किसनरावांनी खेड लोकसभा मतदारसंघाच्या राजकारणावर अखेपर्यंत आपली छाप कायम ठेवली होती. जनता दल, शिवसेना, काँग्रेस अशा राजकीय प्रवासातही, किसनरावांच्या व्यक्तिमत्त्वाला राजकीय पक्षाचे लेबल लागले नाही. जनतेचा नेता हीच त्यांची प्रतिमा होती. अलीकडे निवडणुकीच्या राजकारणात पैशाचा प्रचंड प्रभाव असतो. किसनरावांनी मात्र, हाती पैसा नसतानाही निवडणूक लढविता येते आणि जिंकताही येते हे दाखवून दिले. अनेक निवडणुका त्यांनी लोकवर्गणीतून लढविल्या. आपल्या उमेदवाराच्या विजयासाठी मतदारच पैसे उभे करतो, हे काहीसे वेगळे चित्र उभे करून किसनरावांनी निवडणुकीच्या राजकारणात वेगळा आदर्श निर्माण केला.
पांढरे सुती कपडे, राखीव दाढी, पायात साधी चप्पल असा सामान्य पेहराव असलेल्या या नेत्याने आपल्या कर्तृत्वाची एक मोहर सहकार क्षेत्रावरही उमटवली. १७ जानेवारी १९७४ या दिवशी किसनरावांनी सहकार क्षेत्रात पदार्पण केले, आणि राजकीय गुरुस्थानी असलेले माजी खासदार संभाजीराव काकडे ऊर्फ लाला यांच्या नावाने लाला अर्बन बँकेची नारायणगावला स्थापना केली. या बँकेने आता पुणे जिल्ह्य़ात चांगला लौकिक संपादन केला आहे. निवडणूक प्रचाराच्या काळात घरोघरी जाऊन त्यांच्या समस्या नोंदवून घेण्याची एक आगळी सवय त्यांनी जपली. त्यामुळे त्यांची डायरी हा मतदारसंघाच्या समस्यांचा एक दस्तावेज ठरला होता. गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसतर्फे खेड मतदारसंघातून उमेदवारी मिळाल्यास आपण विजयी होऊ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता. विजयी झालो नाही, तर राजकारणातून संन्यास घेऊ असे त्यानी जाहीरही केले होते. एक प्रभावशाली लोकनेता कालगतीमुळे पडद्याआड गेला असला, तरी किसनरावांनी आपल्या कामाचा ठसा मात्र परिसरावर उमटवून ठेवला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 12, 2014 1:01 am

Web Title: personality kisanrao bankhele
टॅग : Congress,Personality
Next Stories
1 वॉरन बेनिस
2 प्राणकुमार शर्मा
3 अरविंद आपटे
Just Now!
X