आयएसआय या पाकिस्तानी गुप्तहेर संघटनेचा तालिबान्यांना कसा पाठिंबा आहे आणि ओसामा बिन लादेन याची काळजी घेण्यासाठी आयएसआयने खास अधिकारी नेमला होता व याचीही माहिती अमेरिकेला होती, या गौप्यस्फोटानंतर अमेरिकेने ‘आम्हाला काही माहीत नव्हते’ असा खुलासा करून टाकला आहे. पण तेवढय़ाने ज्येष्ठ पत्रकार कालरेटा गाल यांच्या आगामी पुस्तकातील म्हणणे खोटे ठरत नाही. आयएआयविषयी भारतीय तज्ज्ञांचे जे निरीक्षण आहे, त्याला न्यूयॉर्क टाइम्सच्या पत्रकार कालरेटा यांनी शोधपत्रकारितेतून दुजोरा दिला आहे आणि ‘द राँग एनिमी’ या पुस्तकातील आत्मपर निवेदनातून तो मांडला आहे. आयएआयसारख्या गुप्तहेर संघटनेवर आरोप करताना कागदोपत्री पुराव्यांचा आधार मिळणे दुरापास्तच होते आणि तो कालरेटा यांनाही मिळालेला नाही; परंतु २००१ ते २०१४ च्या जानेवारीपर्यंत अफगाणिस्तान आणि पाकिस्तानात न्यूयॉर्क टाइम्सची पत्रकार म्हणून वावरताना बातमीच्या पलीकडचे जे दिसले, अनेक पाकिस्तानी अधिकारी, मंत्री अनौपचारिकपणे जे बोलले, त्यातून हा निष्कर्ष कालरेटा यांनी मांडला आहे.
दहशतग्रस्त, हिंसाचारग्रस्त आणि फुटीर भागांत पत्रकार वावरणे कालरेटा यांना नवे नाही. त्यांचे आईवडील ब्रिटिश, परंतु रशियन आणि फ्रेंच भाषा शिकलेल्या कालरेटा आंतरराष्ट्रीय राजकारण व पत्रकारिता या विषयांतील पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून १९९४ मध्ये मॉस्को टाइम्ससाठी रशियात काम करू लागल्या आणि चेचेन प्रदेश, अझरबैजान आदींच्या वार्ताकनाची जबाबदारी त्यांच्याकडे आली. चेचेन्यावरील ‘कलॅमिटी इन द कॉकेशस’ हे पुस्तक त्यांनी थॉमस द वाल यांच्यासह १९९८ साली लिहिले आणि १९९९ पासून न्यूयॉर्क टाइम्ससाठी कोसोवो, सर्बिया, बोस्निया अशा अस्थिर देशांत त्यांना संधी मिळाली.
अफगाणिस्तानात त्यांना २००१ मध्ये पाठविण्यात आले आणि २००५ मध्ये ‘तालिबान्यांचा नि:पात’ हा अमेरिकेचा दावा कसा फसवा आहे, याची वार्तापत्रे त्यांनी पाठविली. पाश्चात्त्य पत्रकार म्हणजे अन्य देशांची अक्कल काढणारे, थोडक्या माहितीवर अवाच्या सव्वा दावे करणारे, हा समज लिखाणातून आणि कामातून खोटा ठरवणाऱ्यांपैकी कालरेटा आहेत. पाकिस्तानबद्दल लिहिताना, काश्मिरी दहशतवादय़ांबद्दलही अशीच दुटप्पी धोरणे कशी राबविली जातात याचाही उल्लेख त्या करतात. आता त्या टय़ुनिशिया व आसपासच्या देशांत वार्ताकन करीत आहेत. परंतु आजही अफगाणिस्तानच्या महिलांची स्थिती, तेथील लेखक-कलावंतांची उपेक्षा हे विषय त्यांना अस्वस्थ करतात आणि टय़ुनिशियात राज्यघटना संमत होताना साऱ्यांचे चेहरे कसे उजळले होते, याबद्दल उत्साहाने लिहितात.