महेश भट्ट यांच्याशी मैत्री, तिस्ता सेटलवाड यांची पाठराखण, इशरत जहाँ-सोहराबुद्दीन आदी ‘संशयित अतिरेक्यां’ची वकिली, अमित शहा- अरुण जेटली आणि नरेंद्र मोदी हे कायद्याशी विपरीत वागत वा बोलत असल्यास त्यांचे माप त्यांच्या पदरात घालण्याची नेहमीच तयारी.. ही सारी वैशिष्टय़े मुकुल सिन्हा यांचा द्वेष करण्यासाठी अनेकांना पुरेशी वाटतात आणि ही द्वेषभावना इतकी प्रबळ आहे की, सिन्हा यांचे सोमवारी कर्करोगाने निधन झाल्यानंतर ‘मोदी जिंकताहेत असे एग्झिट पोलचे निष्कर्ष ऐकून हार्टफेलच झाला असेल!’ अशी मरणाची खिल्ली उडवण्यासही काही सिन्हाद्वेषी ट्विटर-फेसबुकवीर मागेपुढे पाहत नाहीत.
अवघ्या ६३व्या वर्षी आलेल्या मृत्यूनंतरही सिन्हा अनेकांसाठी प्रेरणास्थान ठरतील, तर बाकीच्यांसाठी द्वेषविषय. कदाचित मुकुल सिन्हांसारख्या व्यक्ती या जगात नसण्याचाच काळ यापुढे सोकावत राहील. ज्या विज्ञानवादी नेहरू काळात सिन्हा जन्मले (१९५१) आणि कोलकात्यात वाढून कानपूरच्या आयआयटीत एम.एस्सी. होऊन अहमदाबादेत पीएच.डी.साठी आले, तो काळ १९७५ नंतर पार बदलून गेला होता. याच बदलत्या काळात १९७७ साली गुजराती भाषक निर्झरी यांच्याशी प्रेमविवाह, पुढे अहमदाबादच्या विद्यापीठात नोकरी आणि १९७९ मध्ये या विद्यापीठातून तडकाफडकी काढून टाकलेल्या कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी संघटना उभारली म्हणून स्वत:चीही बडतर्फी, त्यातच मुलाचा जन्म, मग कामगार-कर्मचारी संघटनांच्याच कामात पूर्ण वेळ झोकून देऊन ‘गुजरात फेडरेशन ऑफ ट्रेड युनियन्स’च्या स्थापनेस हातभार आणि त्या कायदेशीर लढाया आपणच लढवल्या पाहिजेत अशा गरजेपायी १९८९ मध्ये वकिलीची सनद, हा प्रवास  सिन्हा यांनी केला. २००१च्या कच्छ भूकंपानंतर त्यांनी भौतिकशास्त्र आणि कायदा या दोन्ही विषयांतील आपले ज्ञान पणाला लावून, गुजरात उच्च न्यायालयात अहवाल सादर केला आणि त्याआधारे ‘भूकंपरोधक घरांच्या सक्ती’ची मागणी कायद्याच्या दरबारात मान्य करवून घेतली.
इथवर सारे ठीक चालले होते, पण आज १२ वर्षांनंतरही ज्यांची नावे गुलदस्त्यातच आहेत, त्या ‘गोध्रा जळीतकांडातील बळीं’ना कारसेवकच ठरवले जाणे, लगोलग गोध्रापासून २०० कि.मी.वरील अहमदाबादेत ‘उत्स्फूर्तपणे प्रतिक्रिया’ उमटणे आणि पुढल्या दहा दिवसांत अल्पसंख्य समाजावरील अत्याचार अनन्वित असूनसुद्धा ‘आमचेही लोक मारले गेले’ असे सांगण्यातच नेत्यांनीही धन्यता मानणे या घटनांमुळे मुकुल सिन्हा अस्वस्थ झाले. गुजरातमधील सरकारप्रणीत खुनशीपणा उघडा पाडण्यासाठी त्यांनी पुढील तप घालवले. अरुण जेटलींनी सीबीआयच्या स्वायत्ततेबद्दल आवाज उठवला तेव्हा ‘आता अमित शहांना यूपीएच्याच काळात क्लीन चिट मिळेल’ अशी इशाराघंटा सिन्हा यांनी २ ऑक्टोबर २०१३ रोजीच दिली होती, यावरून त्यांच्या क्षेत्रातील त्यांची जाणकारी व हुशारी लक्षात यावी.