निष्णात छायालेखक, हिंदी सिनेमातील छायालेखनासाठी दादासाहेब फाळके पुरस्कार मिळविणारे एकमेव छायालेखक ठरले. मनस्वी दिग्दर्शक आणि सिनेमाच्या क्षेत्रात नवेनवे प्रयोग करणारे सर्जनशील कलावंत असलेले गुरू दत्त यांच्यासोबत काम करण्याची संधी व्ही. के. मूर्ती यांना मिळाली. त्यांच्या कारकिर्दीला परिसस्पर्श लाभला तो गुरू दत्त यांच्यामुळेच असे ठामपणे म्हणावे लागेल.
व्ही. के. मूर्ती यांचा जन्म २६ नोव्हेंबर १९२३ रोजी म्हैसूर येथे झाला. बंगळुरू येथील जयचामराजेंद्र पॉलिटेक्निकमधून सिनेमाटोग्राफीची पदविका १९४६ साली मूर्ती यांनी मिळवली. १९५१ साली ‘बाजी’ या चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्ही. के. मूर्ती नवकेतन स्टुडिओत लेन्समन म्हणून काम करीत होते. एका दृश्याच्या चित्रीकरणासाठी नेहमीपेक्षा वेगळ्या व कठीण पद्धतीने आखणी करण्यास मूर्ती यांनी गुरू दत्त यांना सुचविले. या चित्रपटाच्या छायालेखकांच्या परवानगीने व्ही. के. मूर्ती यांनीच त्या दृश्याचे चित्रीकरण केले. इतके कठीण दृश्य सहजतेने चित्रित केल्यामुळे गुरू दत्त खूश झाले. त्यानंतर व्ही. के. मूर्ती यांनी गुरू दत्त यांच्याच चित्रपटासाठी छायालेखन केले. ‘कागज के फूल’ या चित्रपटातील ‘वक्त ने किया क्या हँसी सितम’ या गाण्याचे वैशिष्टय़पूर्ण चित्रीकरण हे त्या काळापर्यंत हिंदी सिनेमात कुणीच केले नव्हते. केवळ नायिका ग्लॅमरस दिसण्यासाठी आणि सिनेमा चकचकीत दिसण्यासाठी कॅमेऱ्याचा वापर न करता गुरू दत्त यांच्या चित्रपटांतील आशय अधिक अर्थपूर्ण करून छायालेखनातील तत्त्वज्ञानाचा आविष्कार मूर्ती यांनी केला म्हणूनच ते अव्वल ठरले.
मूर्ती यांच्या छायालेखनाचा उत्कट आविष्कार आणि चित्रपटाला लाभलेले गुरू दत्त यांच्या तरल दिग्दर्शनाचे कोंदण यामुळे गाणे तर लोकप्रिय झाले. सिनेमास्कोप या तेव्हाच्या नव्या तंत्रज्ञानाचा अवलंब करून मूर्ती यांनी ‘कागज के फूल’ चित्रित केला. गुरू दत्त यांच्या चित्रपटातील गाणी हे वैशिष्टय़ होते. त्यामुळे या गाण्यांचे चित्रीकरण करण्यासाठी कॅमेऱ्याचे वेगवेगळे कोन वापरले. गुरू दत्त यांनी समीप दृश्यांमधून त्यातही कलावंतांच्या चेहऱ्यावरील भाव टिपण्यासाठी ७५ एमएम लेन्सचा प्रथम वापर केला. असे अनेक प्रयोग व्ही. के. मूर्ती यांनी केले. भारतीय सिनेमामधील या दिग्गज छायालेखकाला २०१० साली दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरविण्यात आले. गुरू दत्त यांच्यानंतर मूर्ती सिनेमात रमले नाहीत, परंतु श्याम बेनेगल यांच्या ‘भारत एक खोज’ व गोविंद निहलानी (हे ‘जिद्दी’साठी त्यांचे सहायक होते) यांच्या ‘तमस’च्या छायालेखनासाठी दूरचित्रवाणीकडे वळले. केवळ १९ स्मरणीय चित्रपटांचा हा दृश्यकार सोमवारी काळाच्या पडद्याआड गेला.