पाश्चात्त्य चित्रकलेच्या इतिहासात इटलीमध्ये, प्रबोधनकाळात चित्रकारांनी पस्र्पेक्टिव्ह हे तंत्र वापरले.  या तंत्राचा वापर केला की चित्रामध्ये दूरपर्यंत, क्षितिजापर्यंत जमीन- आकाश- अंतर- अवकाश यांचा अभ्यास चित्रकार निर्माण करू शकत असे. फक्त या तंत्राची मर्यादा एकच होती की, चित्रात नेहमी एकाच दिशेने अंतर, खोली निर्माण व्हायची, प्रेक्षकाच्या समोर प्रेक्षकापासून दूर क्षितिजापर्यंत..
आजकाल सुरक्षेच्या कारणास्तव अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले असतात. एकेका बँकेत, कार्यालयात, हॉटेलात.. अनेक संख्येने कॅमेरे लावलेले असतात. आपल्याला सूचना/ इशाराही दिला जातो की, या ठिकाणी कॅमेरा लावून नजर ठेवली जात आहे. पण ते असो.. मूळ मुद्दा असा की, या सर्व कॅमेरांतून दिसणारी दृश्यं एका संगणकाच्या किंवा टीव्हीच्या स्क्रीनवर सुरक्षारक्षकाला पाहायला मिळत असतात, ती sam03तुम्ही कधी पाहिली आहेत काय?
त्यात गंमत असते. एकाच स्क्रीनवर त्या विशिष्ट जागा इमारतीच्या ठरावीक भागाचा परिसर वेगवेगळ्या दिशेने, कोनात लावलेल्या कॅमेरातून आपल्याला दिसतो. अशा सर्व कॅमेरांतून दिसणारी दृश्यं एकाच स्क्रीनवर दिसतात. त्याकरिता त्या स्क्रीनची विभागणी झालेली असते. प्रत्येक छोटय़ा भागात एका कॅमेरातून दिसणारं दृश्यं दिसतं.
त्यामुळे एखादी व्यक्ती त्या परिसरातून चालत जात असेल तर एकाच वेळेला ती कधी समोरून तर कधी मागून, बाजूने आपल्याला दिसत असते.
अशाच प्रकारचा अनुभव आपण दैनंदिन जीवनात घेत असतो. आपल्या नकळत आपण आपला परिसर, त्यातील वस्तू अनेक कोनांतून पाहत असतो. त्यातील काही कोनातून पाहिलेलं वस्तू, परिसराचं रूप आपण नेहमी पाहतो. त्यामुळे ते लक्षात राहतं, परिचयाचं असतं. इतर कोनातून पाहिलेली रूपं अपरिचित वाटतात. आश्चर्याचा धक्का देतात. काही वर्षांपूर्वी गोपाळ बोधे यांच्या छायाचित्रांनी, जी हेलिकॉप्टरमध्ये बसून त्यांनी टिपली होती त्यात अशाच प्रकारे परिचित स्थळांना आकाशातून पाहिल्यावर दिसणारी अपरिचित, आश्चर्यकारक रूपं आपल्याला दिसली. म्हणजे गेट वे ऑफ इंडियाच्या कमानींच्या वर, छतावर घुमटासारखे भाग आहेत, वगैरे.. जेव्हा १८५८ मध्ये फेलिक्स नादर या छायाचित्रकाराने गरम हव्याच्या फुग्यातून पॅरिसच्या वर आकाशात जाऊन पॅरिसचे फोटो काढले आणि पॅरिसच्या लोकांना आपल्याच शहराच्या वेगळ्या रूपाचं भान आलं.
मुद्दा असा की, वस्तू किंवा परिसर यांची ‘ओळख’ यापलीकडे जाऊन जर का आपल्याला ज्ञानाच्या पातळीवर काही जाणून घ्यायचं असेल तर वस्तू, परिसराला अनेक अंगांनी, बाजूंनी, कोनांतून पाहण्याची इच्छा, गरज निर्माण होते. कारण अनेक अंगांनी वस्तू, परिसर पाहिल्याने जी समग्रता येते त्याची गरज ज्ञान मिळवण्याकरिता असते. (जसं क्रिकेटमध्ये एकच घटना अनेक कोनांतून पाहिली जाते. गोलंदाज, फलंदाज, खेळाडूंच्या कृतीचं पृथ:करण केलं जातं. फलंदाज बाद आहे की नाही हेही त्याआधारे ठरवलं जातं.)
अशा प्रकारे समग्र पाहण्याचा व दिसणारं, कळणारं रूप चित्रित करण्याचा प्रयत्न पाश्चात्त्य चित्रकलेच्या इतिहासात झाला. तो प्रयत्न जॉर्ज ब्राक व पान्लो पिकासो यांनी केला. त्या प्रयत्नाला, युरोपियन चित्रकलेतील, चित्रांत खोली, अंतर दाखवण्याचं तंत्र, ज्याला आपण पस्र्पेक्टिव्ह म्हणतो त्याचा संदर्भ होता. सोबतचं पिकासोचं चित्र पाहा! ते त्याच्या पत्नीचं आहे. पिकासो हा आपल्याकडील अनेकांचा आवडता चित्रकार, त्याची चर्चा होते. त्याची लग्नं, प्रेमप्रकरणं आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे त्याची चित्रं न कळल्याने. सोबतचं चित्रही असंच न कळणाऱ्या चित्रांपैकी आहे. ते व्यक्तिचित्र आहे.
पण त्यातील चेहरा पाहून धक्का बसतो. कारण तो विद्रूप वाटतो. पिकासोच्या पत्नीचा चेहरा हा विद्रूप होता का, असा प्रश्न आपल्याला पडेल. येथे पिकासोने काय केलंय ते पाहायला हवं. पिकासोने हे चित्रं पत्नीला समोर बसवून रंगवलं नाहीये. ती समोर असली तरी केवळ एक संदर्भ आहे. त्याचमुळे कुठच्याही व्यक्तिचित्रात, व्यक्तीच्या छायाचित्रात, छायाप्रकाशाचा परिणाम जसा जाणवतो, दिसतो तो या चित्रांत दिसत नाहीये.चित्र मोठं विचित्र आहे. चेहऱ्यात डोळे, नाक, ओठ, केस यांची जागा फार बदलली आहे. त्यामुळेच तो विद्रूप असल्यासारखा वाटतो. पिकासो इथे असं काम करतोय की, पत्नीच्या रूपाची जी ठळक वैशिष्टय़ं दिसताहेत, त्याचं एकत्रीकरण करून तिचं रूप तयार करतोय. ही ठळक वैशिष्टय़ं म्हणजे केसांची ढब, डोळ्यांचा- ओठांचा- चेहऱ्याचा आकार, नाकाची लांबी- कोन इत्यादींची गोळाबेरीज असते. हे सर्व तपशील वेगवेगळ्या बाजूंनी वेगवेगळ्या प्रकारे दिसतात व बऱ्याच वेळेला ठरावीक कोनातून पाहिलेलं रूप व्यक्तीच्या दिसण्याशी, ओळखीशी घट्टपणे निगडित होतात, लक्षात राहतात. जसं भगतसिंग यांना आपण फक्त समोरून ओळखू शकतो. तीच गोष्ट हिटलरची. पण शिवाजी महाराज, राणाप्रताप यांचे रूप, वैशिष्टय़ त्यांचा चेहरा कडेने पाहिल्यावरच जास्त स्पष्ट होतात; लक्षात असतात.
पिकासो अशाच पद्धतीने विविध कोनांतून, वेगवेगळ्या वेळी पत्नीला पाहिल्याने तिची लक्षात राहिलेली वैशिष्टय़पूर्ण ओळखरूपं एकत्र करून तिचं व्यक्तिचित्र तयार करतोय. आहे की नाही गंमत. पाश्चात्त्य चित्रकलेच्या इतिहासात इटलीमध्ये, प्रबोधनकाळात १३-१४ व्या शतकांपासून चित्रकारांनी पस्र्पेक्टिव्ह हे तंत्र वापरले. त्याला शास्त्रशुद्ध बनवले. या तंत्राचा वापर केला की चित्रामध्ये दूपर्यंत, क्षितिजापर्यंत जमीन- आकाश- अंतर- अवकाश यांचा अभ्यास चित्रकार निर्माण करू शकत असे. फक्त या तंत्राची मर्यादा एकच होती की, चित्रात नेहमी एकाच दिशेने अंतर, खोली निर्माण व्हायची, प्रेक्षकाच्या समोर प्रेक्षकापासून दूर क्षितिजापर्यंत. जसं थ्रीडी चित्रपटात. आपल्या दिशेला काही वस्तू येतात असा आभास आपल्याला होतो तसा या चित्रांत व्हायचा नाही.
प्रत्यक्ष जीवनात आपण पस्र्पेक्टिव्ह तंत्राच्या अगदी उलट अवकाश अनुभवत असतो. ते म्हणजे जरी आपण आपल्यासमोरील अवकाश, अंतर पाहत असलो तरीही आपल्याला आपल्या शरीराद्वारे तसेच स्मृतीच्या पातळीवर सर्व बाजूला अवकाश आहे याचं आपल्याला आपल्या नकळत भान असतं. जसा मासा किंवा इतर जलचर पाण्यात असतात, तसे आपण जमिनीवर व इतर बाजूंनी पसरलेल्या अवकाशात असतो.
पिकासो आणि ब्राकने एक साधा प्रश्न विचारला. चित्रामध्ये फक्त एकाच दिशेला अंतर का दाखवायचं. त्यात फक्त एकाच बाजूने दिसणाऱ्या वस्तू का रंगवायच्या? आपण वस्तूंना अनेक अंगांनी, कोनातून पाहिलेलं असतं. त्यांची ही रूपं आपल्या स्मृतीत, मनात असतात. जेव्हा आपण वस्तूला पाहतो तेव्हा एका बाजूने, ठरावीक कोनातून पाहत असतो, पण त्याच वेळेला आपला मेंदू त्याच वस्तूच्या भूतकाळात इतर कोनातून पाहिलेल्या प्रतिमा, रूपं यांचीही माहिती आपल्याला देत असतो. त्याद्वारे आपण आपल्यासमोर पाहत असलेल्या वस्तूच्या रूपांतून ओळख पटून, पूर्ण ज्ञान मिळतं.
पिकासो आणि ब्राकने अशा रीतीने समोरील दिसणारं वस्तुरूप व आठवणीतलं वस्तुरूप यांना एकत्र करण्याचा प्रयत्न केला. त्यातून फार क्रांतिकारक बदल घडला असं मानलं जातं. पस्र्पेक्टिव्हमुळे एक दिशेतलं पाहण्याची जी सवय, बंधन निर्माण झालं होतं त्यात व्यापकता आली, समग्रता आली. समीक्षकांनी अशा प्रकारच्या चित्रांना, ‘क्युबिझम’ असं संबोधलं.
क्युबिझमने पाश्चात्त्य जगात चित्रकला, साहित्य, संगीत, नाटकं, सिनेमा चित्रित करायची तंत्र, शिल्पकला, स्थापत्यकला आदींवर अत्यंत दूरगामी परिणाम केला. त्या सगळ्याबाबत पुढच्या वेळी चर्चा करू.
*लेखक चित्रकला महाविद्यालयांचे अभ्यासक्रम सल्लागार आणि कलासमीक्षक आहेत.