जबरदस्त शारीरिक क्षमता, विजिगीषू वृत्ती आणि खेळभावना जोपासत खेळण्याची वृत्ती हे चेक प्रजासत्ताकच्या खेळाडूंचे वैशिष्टय़ समजले जाते. हीच गुणवैशिष्टय़े जोपासत पेट्रा क्विटोव्हाने विम्बल्डन स्पर्धेत महिला एकेरीच्या जेतेपदावर नाव कोरले.     
महिला टेनिसमध्ये विल्यम्स भगिनी सातत्यपूर्ण प्रदर्शनासाठी ओळखल्या जातात. ग्रँड स्लॅम स्पर्धाच्या जेतेपदांच्या यादीवर नजर टाकल्यास हीच बाब अधोरेखित होते. यंदा सेरेना आणि व्हीनस दोघींनीही झटपट गाशा गुंडाळल्यामुळे अन्य खेळाडूंसाठी जेतेपदाचा मार्ग सुकर झाला. विल्यम्स भगिनींनी आत्मसात केलेला सातत्याचा मंत्र पेट्राने विम्बल्डनच्या दुसऱ्या जेतेपदासह जपला. महिला टेनिसमध्ये विल्यम्स नावाव्यतिरिक्त खेळाडूने पटकावलेले जेतेपद एका स्पर्धेपुरता चमत्कार समजला जातो. खराब फॉर्म आणि कामगिरीतील असातत्य यामुळे अन्य खेळाडूंनी हे त्रराशिक सिद्धही केले आहे. मात्र या दुर्दैवी यादीत आपला समावेश होऊ द्यायचा नाही, असा निश्चय पेट्राच्या खेळात दिसून आला. अंतिम लढतीत युजेनी बुचार्डवर गाजवलेले वर्चस्व याच निश्चयाची परिणती होती. २०११ मध्ये पेट्राने मारिया शारापोव्हासारख्या अव्वल खेळाडूला नमवत जेतेपदावर नाव कोरले होते. टेनिसविश्वात सर्वोत्तम समजल्या जाणाऱ्या ग्रँड स्लॅम जेतेपदाची कमाई कोणत्याही खेळाडूसाठी अनोखी प्रेरणा असते. मात्र पेट्राच्या बाबतीत तसे झाले नाही. विम्बल्डननंतर होणाऱ्या अमेरिकन खुल्या स्पर्धेत पहिल्याच फेरीत बाद होण्याची नामुष्की तिच्यावर ओढवली. २०१३ या वर्षांत पेट्राने चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र ग्रँड स्लॅम स्पर्धामध्ये सेरेनाच्या उपस्थितीमुळे तिला उपान्त्य आणि उपान्त्यपूर्व फेऱ्यांपर्यंतच मजल मारता आली. मात्र दडपणाच्या क्षणी खेळ उंचावता न येणारी गुणवान खेळाडू असा शिक्का तिच्या नावावर बसला. यंदाही ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेत सलामीच्या लढतीतच तिला पराभवाला सामोरे जावे लागले, तर फ्रेंच खुल्या स्पर्धेत तिसऱ्या फेरीत तिला गाशा गुंडाळावा लागला. मात्र विम्बल्डनच्या जेतेपदासह आपण एका जेतेपदाचा चमत्कार नाही, हे पेट्राने सप्रमाण सिद्ध केले. यामुळेच २०११ पेक्षा या जेतेपदाचे महत्त्व जास्त असल्याचे सांगताना तिच्या डोळ्यांत अश्रू तरळले. अव्वल दहा मानांकित खेळाडूंपैकी एकीचाही सामना न करता पेट्राने जेतेपद मिळवल्याने पुन्हा एकदा तिच्या चाहत्यांना टीका करण्यासाठी संधी मिळाली आहे. मात्र त्यामुळे तिच्या जेतेपदाचे महत्त्व कमी होत नाही. मात्र येत्या काही वर्षांत सेरेना विल्यम्ससारख्या मातब्बर खेळाडूला नमवत ग्रँड स्लॅम जेतेपद पटकावून टीकाकारांना चोख प्रत्युत्तर देण्याची २४ वर्षीय पेट्राला संधी आहे. पेट्राला विजयपथावर आणण्यात प्रशिक्षक डेव्हिड कोट्झ आणि सहयोगींची भूमिकाही तितकीच निर्णायक आहे.